Home किलबिल काठयांचा खेळ

काठयांचा खेळ

1

आंधळी कोशिंबीर, टिक्कर का पाणी, डोंगर का पाणी, हतुतु, डबा ऐसपैस, आटय़ापाटय़ा, भोवरा, साखळी साखळी, लपाछपी, विषामृत, काठयांचा खेळ.. ही नावं तुम्ही कधी ऐकली आहेत का? नसतील तर ती कसली आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगतो. ही आहेत काही खेळांची नावं! कदाचित तुमच्या दादा-ताईला ती ठाऊक असतील, नाही तर आई-बाबांना तर नक्कीच त्यांची माहिती असेल. या खेळांची नुसती नावं ऐकली तरी ते या खेळांच्या आठवणीत रमून जातील. कारण पूर्वी टीव्ही फारसे नव्हते आणि मोबाइल फोन तर अजिबातच नव्हते, त्या काळातल्या मुलांचे हे आवडते खेळ होते. विशेष म्हणजे, यातले बहुतेक खेळ मैदानी होते आणि त्यांना फारशी साधनंही लागायची नाहीत. सवंगडी जमले की, झाली खेळाला सुरुवात. आजच्या टेक्नोसॅव्ही काळातल्या तुम्हा मुलांना यात काय विशेष, असंच वाटेल, पण त्यात एक गंमत असायची. तुम्हाला या खेळांची माहिती नसल्याने ती गंमतही तुम्ही अनुभवली नसणार. म्हणूनच ती तुम्हाला अनुभवता यावी यासाठी आम्ही यातल्या काही खेळांची माहिती देणार आहोत. हे खेळ तुम्ही खेळलात तर तुम्हाला कळेल की, इंटरनेटवरच्या खेळांपेक्षा या अस्सल आपल्या मातीतल्या खेळांमध्ये किती धम्माल असते ती. हो, पण त्यासाठी थोडं मैदानाकडे फिरकायला हवं.. कमीत कमी तुमच्या सोसायटीच्या आवारात तरी.

काठयांचा खेळ पूर्वीच्या मुलांचा एक आवडता खेळ होता. कारण या खेळासाठी काठयांव्यतिरिक्त दुसरं काही साहित्य लागत नाही. शिवाय हा खेळ खेळायला अत्यंत सोपा आहे. त्यात किचकट नियम नाहीत. हा खेळ खेळायला दोन संघ असण्याची गरज नसते. पाच-सहा मुलं जमून तो सहज खेळू शकतात. त्यांच्याजवळ काठय़ा असल्या की बस्स! डाव कुणावर असणार, हे ठरवण्यासाठी आधीच सुटण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. तीदेखील थोडी वेगळी म्हणजे काठयांच्या मदतीनेच होते. यासाठी प्रत्येक खेळाडूने ठरलेल्या ठिकाणी उभं राहून दोन पाय फाकवून आपापली काठी मागे फेकायची. ज्याची काठी सगळ्यात जवळ पडेल, त्याच्यावर राज्य. त्यानंतर ‘टचिंग सरफेस’ काय असणार, हे ठरवलं जातं. म्हणजे, माती, सिमेंट, दगड. समजा दगड असं ठरलं तर प्रत्येक खेळाडूला आपली काठी सतत दगडाला स्पर्श करत राहील, याची काळजी घ्यावी लागते.

खेळाला सुरुवात करण्यासाठी ज्याच्यावर राज्य आलंय, तो आपल्या दोन्ही हाताने आपली काठी आकाशाच्या दिशेने धरून पाठमोरा उभा राहतो. इतर खेळाडूंपैकी एक जण त्याची काठी हवेत उडवतो. ती जमिनीवर पडल्यावर खेळाडूंनी आपल्या काठयांनी ती फटकावत पुढे पुढे न्यायची. ती फटकावत असताना राज्य असलेल्या खेळाडूने एखाद्या खेळाडूला त्याने आपली काठी दगडाला टेकवण्याच्या आत स्पर्श केला तर तो खेळाडू बाद झाला. आता आधीच्या खेळाडूवरचं राज्य संपून बाद झालेल्या खेळाडूवर राज्य येतं. मग त्याची काठी फटकावत इतर खेळाडू पुढे नेतात. विशिष्ट अंतरापर्यंत काठी नेल्यावर खेळ संपतो. राज्य असलेल्या खेळाडूला तिथून एका पायाने लंगडी घालत खेळाची जिथून सुरुवात झाली तिथपर्यंत जावं लागतं. या खेळात पडण्या-धडपडण्याचा धोका नसल्याने मुलांना त्यात वेगळाच आनंद मिळतो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version