Home संपादकीय तात्पर्य काश्मीरवर जलसंकट

काश्मीरवर जलसंकट

0

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या अभूतपूर्व पूर परिस्थिती निर्माण झाली असून राज्य जलमय झाले आहे. गेल्या ६० वर्षात झाला नसेल असा हा नसíगक प्रकोप आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांना तीव्र थंडी आणि बर्फवृष्टी यांचा नेहमीच सामना करावा लागतो; परंतु पुरासारखे संकट त्यांच्यावर अभावाने कोसळते. मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वहात आहेत. त्याचबरोबर अनेक गावे जलमय झाली आहेत. जम्मू-काश्मीरची भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे. त्यातच तिथे गेली चार दिवस सलग मुसळधार पाऊस पडत आहे. पंजाबला सुजलाम सुफलाम करणा-या ब-याच लहान-मोठय़ा नद्या जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावतात आणि डोंगराच्या उतरणीवरून सुसाट वेगाने मैदानी प्रदेशाकडे धाव घेतात. पाऊस मर्यादित असतो तेव्हा डोंगर उतरणीवरून अल्लडपणे धावणा-या या नद्या छोटय़ा असतात; परंतु या सगळ्याच नद्या आता सततच्या पावसामुळे धोकादायक बनल्या आहेत. डोंगराच्या उतरणीला असलेली गावे त्यामुळे संकटात सापडली आहेत. एरवी या नद्या अशा गावांना वळसा घालून आणि गावक-यांना फार त्रास न देता उतारावरून वेगाने पुढे धावत असत. पण आता त्यांचे प्रवाह मोठे झाले असल्यामुळे गावाला वळसा घालण्याऐवजी या नद्या गावाला कवेत घेऊन पुढे जायला लागल्या आहेत. त्यामुळे डोंगर उतार संपल्याबरोबर जे भाग असतात त्यांच्यामध्ये पाणी भरपूर साचले आहे. ते वेगाने पुढे सरकत नाही. काश्मीरच्या खो-यातील अनेक गावे डोंगराच्या उतारावर आहेत. त्यांना थोडा धोका कमी आहे. आतापर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये मिळून एकूण १५६ जण मृत्युमुखी पडले आहेत. या राज्यातील १,२२५ खेडी पूरग्रस्त झाली आहेत; परंतु निव्वळ पाण्याखाली बुडलेल्या गावांची संख्या जम्मूमध्ये जास्त आहे, तरीही काश्मीर खो-यात ३९० गावे जलमय झाली असून अनेक गावांचा जगाशी असलेला संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे डोंगराचे कडे ठिसूळ बनले आहेत. त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. भारताच्या अती उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, उत्तरांचल आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये असे दरडी कोसळण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर घडत असतात. त्याचाच अनुभव आता जम्मू-काश्मीरच्या लोकांना येत आहे. पुराबरोबर आणि गावे जलमय होण्याबरोबरच दरडी कोसळण्यानेही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काश्मीरसारख्या भागामध्ये डोंगराळ भागात पुलाचे फार महत्त्व असते. छोटय़ा-छोटय़ा नद्या, नाले यांनी भूप्रदेश विभागलेला असतो. अशा लोकांना परस्परांशी संपर्क साधण्यासाठी पूल हेच साधन असते. गावे जलमय झाली नाहीत तरी ती पूल कोसळल्यामुळे जगापासून तुटून राहतात. अशा लोकांना गावात आहे त्या साधनसामग्रीवर तग धरून राहावे लागते. सतत पाऊस पडत असल्यामुळे हवाई मार्गानेही मदत मिळत नाही आणि अशा लोकांची उपासमार होते. सध्या काश्मीर खो-यातील अनेक लोकांना पूल उद्ध्वस्त झाल्यामुळे हाल सहन करावे लागत आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला एक हजार कोटी रुपयाचा मदतनिधी जाहीर केला आहे. पुरात मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबीयांना दोन लाख तर जखमींना ५० हजारांची मदतही जाहीर केली आहे. तूर्तास तिथल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवणे, हे लष्करासमोरचे मोठे आव्हान ठरत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version