Home कोलाज कॅलरींच्या सुरक्षेचं काय?

कॅलरींच्या सुरक्षेचं काय?

1

अन्न सुरक्षा विधेयकावरून अनेक उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाल्या. परंतु अन्नातील संपूर्ण पोषण करणा-या कॅलरींबद्दल कुणी बोलत नाही. कॅलरींच्या पोषणाबाबत आपला देश आपल्या कथित मागास शेजा-यांपेक्षाही कुपोषित आहे. विशिष्ट धान्यांचेच उत्पादन वाढवून फायदा नाही. आपल्याला धान्यांचे समतोल व्यवस्थापन करावं लागणार आहे.

अन्न हा शब्द तसा उच्चारायला अवघड. गरिबाला तर गिळायलाही कठीण. हिंदीतला अनाज तुलनेत सोपा. अन्नाला देशात सरसकट दाणा म्हटलं जातं. दानापानी हा अन्नासाठी शिष्टसंमत शब्द आहे. दाणाबंदर, दाणाबाजार ही ठिकाणांची नावं अन्न-धान्याशी निगडितच रूढ झाली. सर्वसामान्य मराठी माणूस आजही दोन घास खाऊन घेऊया असंच म्हणतो. चला दाबून पोटभर अन्न खाऊ या, असं म्हटलं जात नाही. पोटाला थोडं फार, हीच संकल्पना सर्वमान्य आहे. पोटाला तड लागेपर्यंत खाणं ही एक तर बडया घरची वृत्ती किंवा ज्या गरिबाला दिवसेंदिवस काही मिळत नाही त्याला एखाद्दिवस उपलब्ध झालं तर तो घशाजवळ येईपर्यंत खातो.

जागतिक पातळीवर ८४ कोटी माणसं उपाशी आहेत. ही संख्या २०१५ सालापर्यंत निम्म्यावर आणण्याचं लक्ष्य आहे. हे एक मोठं आव्हान आहे. आजघडीला जगातल्या सहा माणसांपैकी एक माणूस भुकेला झोपतो. त्यासाठी जागतिक पातळीवर अन्नकोट चालवण्याची वेळ येणार आहे. पण आपल्या देशातली भुकेल्यांची संख्याही मोठी आहे.

जागतिक पातळीवर अन्न सुरक्षेसह दरडोई कॅलरीचं पोषण महत्त्वाचं धरलं जातं. मनुष्य त्याच्या जेवणातून किती कॅलरीज ग्रहण करतो, तेही आवश्यक असतं. त्यानुसारच खरं तर अन्न सुरक्षा किती परिणामकारक आहे हे लक्षात घेतलं जातं.आपल्या देशातील नागरिक २००९ साली अन्नावाटे दरडोई २३२१ इतक्या कॅलरीज ग्रहण करत होता. त्याचवेळी पाकिस्तानचा दरडोई कॅलरी इनटेक होता २४२३, तर बांगलादेशचा होता २४८१ आणि चीनचा ३०३६. म्हणजे आपल्या शेजा-यांमध्ये आपल्या कॅलरीचं प्रमाण सर्वात कमी आहे. आपण त्याबाबतीत काही छोटया आफ्रिकन देशांशीच स्पर्धा करू शकतो.

अन्न सुरक्षा विधेयकावरून विविध पातळीवर उलट-सुलट चर्चा सुरू होती तेव्हा विरोधकांनी केवळ मध्यमवर्गीय करदात्यांचा मुद्दाच अधिक प्रकर्षाने उचलून धरला. अन्नाच्या असमतोलाचा मुद्दा कुणी विचारातच घेतला नाही.

अन्न सुरक्षेचे धनुष्य पेलताना देशभरात मोठया प्रमाणात केवळ गहू आणि तांदळाचीच शेती तयार होते आहे. डाळी, तेलबिया, तृणधान्यांची संख्या कमी होतेय. त्यामुळे आपल्या अन्नातली समतोलता कमी होतेय. अन्न सुरक्षेच्या नादात केवळ गहू आणि तांदूळ पिकवून उपयोगाचे नाही. कारण या धान्यातून मोठया प्रमाणात कबरेदके शरीराला मिळतातही मात्र त्यामुळे संपूर्ण पोषण होत नाही.

विशेषत: गव्हातील काही घटक पदार्थामुळे देशातील बहुसंख्य लोकांमध्ये अ‍ॅनिमिया विकसित होतो, असं संशोधन पुढे आलं आहे. ज्याला सेलिअ‍ॅक डिसिज म्हणतात. त्याचं प्रमाण भारतीयांमध्ये जास्त आहे. त्यामुळे गव्हातल्या ग्लुटेन या पदार्थाचा टॉलरन्स कमी होतो. त्यामुळे शरीरातील लोह नाहीसं होतं आणि हिमोग्लोबिनचा अभाव जाणवू लागतो. गव्हातला फायटेट नावाचा घटक लोह शोषण्याची प्रक्रिया अडवून धरतो. गव्हाचा हा परिणाम जाणवण्याइतका मोठा आहे. आपल्या देशात मैद्याच्या रोटया खाणा-यांचं प्रमाणही मोठं आहे. पूर्वी कोंडा खाणं गरिबीचं लक्षण होतं आता गहू कोंडयासकट खाणं श्रीमंती लक्षण झालं आहे. कोंडयातून फायबर्स मिळतात आणि ग्लुटेन टॉलरन्स मिळतो असं लक्षात आलं आहे. त्याचवेळी अनेक लोक आता जाणीवपूर्वक आपल्या आहारातून गव्हाला फाटा देऊ लागले आहेत. मात्र सगळ्यांनाच हे शक्य नाही. आपल्या देशात मात्र आता गहू हे मुख्य अन्न म्हणून विकसित झालं आहे. रोजच्या जेवणात रोटया, चपात्या, फुलके हे गव्हापासूनच बनवले जातात.

खरं तर अभ्यासकांच्या मते गहू आणि तांदूळही भारतीय मातीतली धान्ये नाहीत. ही इतर भागातून भारतात येऊन रुजली. इथे नाचणी हे महत्त्वाचे मातीतले धान्य आहे. ज्वारी-बाजरीही भारतीय पंचनसंस्थेला चांगली मानवणारी आहे. शिवाय तृणधान्ये आणि डाळींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र तांदूळ आणि गव्हाच्या तुलनेत या धान्यांच्या उत्पादनाचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे एकतर ती महाग आहेत किंवा उपलब्ध नाहीत.

मधल्या काळात ज्वारीला कुणी वाली नव्हता. तेव्हा ज्वारीपासून वाइन बनवण्याच्या उद्योगाबद्दल बोललं जाऊ लागलं होतं. त्यावर वादही झाले. मात्र अचानक ज्वारी हे धान्य उपकारक म्हणून सिद्ध झालं आणि ज्वारी महाग झाली. मका आणि इतर काही कृषी उत्पादनांना जैव इंधन म्हणून मान्यता मिळू लागली म्हणून त्यांची लागवड वाढली. मात्र पुन्हा जैव इंधन म्हणून मुळात शेतजमिनीचा उपयोग करावा का, असा मूलभूत प्रश्न उपस्थित होऊ लागला.

आपण धान्याच्या कमतरतेच्या सायलेंट त्सुनामीबद्दल बोलतो. मात्र त्याचवेळी अन्नाच्या उष्मांकाच्या परिपूर्ततेबद्दल काही बोललं जात नाही. मात्र आता एखादं कॅलरी सुरक्षा अभियान चालवण्याचीही वेळ आपल्यावर येणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात पाऊस चांगला झाल्यामुळे आधीच तांदळाची लागवड देशभरात सात टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलं जात आहे. साधारण दोन कोटी हेक्टर जमीन ही तांदळाच्या लागवडीखाली आहे. आपल्या देशात शेतीद्वारे उत्सर्जित होणा-या हरितगृह वायूचं प्रमाण २८ टक्के आहे. त्यातही भातशेतीतून मोठया प्रमाणावर मिथेनचं उत्सर्जन होतं. फरमेंटेशन आणि खतांच्या वापरातूनही मोठया प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित होतात.

आपल्या साधारण अडीचशे दशलक्ष टन धान्य उत्पादनात सुमारे २०० दशलक्ष टनांचा वाटा तांदूळ आणि गव्हाचा असतो. रब्बीच्या हंगामाची तयारी सुरू होतेय. गव्हाचंही वारेमाप पीक येईल. ईशान्येकडील राज्यांतील आणि हिमाचल, झारखंड, उत्तराखंड या राज्यांतही धान्य उत्पादनांबाबत प्रेम निर्माण होते आहे. मात्र त्यांच्याकडील पारंपरिक हरभरा, डाळी, मोहरी यांचं प्रमाण वाढत नाहीए.

अन्न हे पूर्णब्रह्म आहे असं आपण मानतो. मात्र अन्नातील समतोलता जर आपण टिकवू शकलो नाही तर हे अपूर्णब्रह्म आपल्या शरीरात अनेक तामसी प्रकोप निर्माण करू शकतं आणि इतकी अन्न सुरक्षा प्रदान करूनही अखेरीस आपल्यावर कुपोषणाचा कलंक मिरवायची वेळ येऊ शकते.

1 COMMENT

  1. First think is that all minister should it this food, who thouse are talking about food is avelabel in 12RS and 6RS, i am happy that Rashid Massod is eating in the jail this food, Now Chara also on the way, let me tell u if we are not controling on Ghotala, one day we all are in deep problem

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version