Home एक्सक्लूसीव्ह केईएममध्ये रुग्णांना कैद्यांची वागणूक!

केईएममध्ये रुग्णांना कैद्यांची वागणूक!

0

देशभरातील रुग्ण चांगल्या उपचारांकरता मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात धाव घेत असले तरी या रुग्णांना सद्यस्थितीत कैद्यांसारखी वागणूक मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई- देशभरातील रुग्ण चांगल्या उपचारांकरता मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात धाव घेत असले तरी या रुग्णांना सद्यस्थितीत कैद्यांसारखी वागणूक मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपचार घेणा-या रुग्णांना त्यांच्या खाटेवर जेवण देणे आवश्यक असताना; रुग्णालयात नव्याने रुजू झालेले वॉर्डबॉय आणि आया रुग्णांना रांगेत उभे राहण्यास भाग पाडत असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

केईएम रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी येतात. यापैकी अनेकांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात येते.रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तो पूर्ण बरा होईपर्यंत त्याच्या आरोग्याची काळजी घेणे रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी असते, मात्र या रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याची आेरड नातेवाईकांपासून नगरसेवकांपर्यंत सर्वाचीच आहे. रुग्णालय प्रशासनाकडूनही रुग्णांची हेळसांड होताना दिसते. अशा प्रकारांमुळे पालिका रुग्णालयांच्या नावाला बट्टा लागला  असतानाच; आता केईएम रुग्णालयातील रुग्णांना अक्षरश: जेवण घेण्यासाठी रांगेत उभे राहण्यास भाग पाडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दुपारी १२.३० व सायंकाळी ७.३० वाजता रुग्णांना मोफत जेवण देण्यात येते, परंतु हे जेवण घेण्यासाठी रुग्णाला रांगेत उभे राहावे लागते. एखाद वेळी रुग्णासोबत त्याचा नातेवाईक नसल्यास काठी, भिंत अथवा दुस-या खाटांचा आधार घेत अनेक रुग्ण लांब रांगेत उभे दिसतात. रुग्णांना देण्यात येणारे जेवणही निकृष्ट दर्जाचे असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. रुग्णालय प्रशासनाच्या या मनमानी व निष्काळजीमुळे रुग्णांच्या मनात कैद्येत असल्याची भावना वाढत आहे.

रुग्णाला रांगेत उभे राहून जेवण दिल्यास रुग्णांचा रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. त्यामुळे रांगेत उभे करून जेवण दिल्यास अयोग्य नाही. – अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version