Home मध्यंतर शोध - बोध कोकणचा गाभा जांभा दगड

कोकणचा गाभा जांभा दगड

1

माझ्या वडिलांची बदलीची नोकरी असल्याकारणाने आम्ही काही वर्षे रत्नागिरीत राहायला होतो. तिथल्या होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये सहावीपर्यंतचं माझं शिक्षण झालं. तिथल्या तीन गोष्टी आजही मला भुरळ घालतात. एक घर, दुसरा समुद्र व तिसरा जांभा दगड. जेव्हा जेव्हा मला वेळ व संधी मिळते, तेव्हा मी आवर्जून रत्नागिरीला जातो व या तीन गोष्टींना मनाच्या कुशीतून अलगद माझ्या सोबत घेऊन येतो.

माझं लहानपण काही काळ कोकणात गेलं. तेव्हा तिथल्या घरांनी व समुद्राने मला भुरळ घातली. घराच्या व समुद्राच्या या आठवणी आपण आपआपल्या आवडीप्रमाणे मनात साठवून ठेवतच असतो.

घर व इतर आवडत्या जागेपासून लांब गेल्यानंतर आपण त्यांची आठवण सतत मनात जागवत ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. स्मरणरंजन हा मानवाचा अंगभूत गुणच असतो. पण माझ्या मनात खडकदेखील लक्षात राहिले होते.

खडकांच्या प्रेमात मी लहानपणीच पडलो होतो. कोकणच्या लाल रंगाच्या जांभा खडकाने मला मोहिनी घातली होती. उन्हाळय़ाच्या सुट्टीत कोल्हापूरला गेल्यानंतर तर या रंगीत खडकाची आठवण अधिकच गडद होत जायची. कारण गावी गेल्यानंतर संगळीकडे फक्त काळाच खडक दिसायचा. त्यामुळे रंगीत खडकाची आठवण जास्तच येत असे.

जांभा खडकाला इंग्रजीत ‘लॅटेराईट’ असे म्हणतात. हा खडक रत्नागिरीत का, कसा व केव्हा तयार झाला याबद्दलचे प्रश्न विचारून माझ्या घरच्यांना व शिक्षकांना, मित्रांना मी भंडावून सोडत असे. मी त्यांना फारच भंडावलं की ते वर्गात थातूरमातूर उत्तरं देऊन वेळ निभावून नेत असत. माझ्या शिक्षकांनी बहुदा योग्य उत्तरं दिलेली असतील. पण त्यावेळी बहुतेक ते समजण्याएवढे माझे वय नव्हते किंवा तेवढी बुद्धी नव्हती. ती समज फार उशिरा आली.

इतर खडकांच्या तुलनेत याला रंगाबरोबर छिद्रेसुद्धा असतात. त्याचे हे देखणे रूप एका विशिष्ट पर्यावरणीय परिस्थितीशी जोडले गेलेले आहे. रासायनिकदृष्टय़ा या खनिजाचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले आहे की, यात सरसकट जलीय ऑक्साईड किंवा हायट्रेटेड ऑक्साईड वास करून असतात. या खडकात प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनियम व लोह जलीय ऑक्साईड असतात.

यांच्यासोबत ब-याचदा मँगनिज व टायटेनियम ऑक्साईडसुद्धा असतात. पण यांचे प्रमाण फारच कमी असते. अ‍ॅल्युमिनियम व लोहाचे गुणोत्तर हे बदलत असते. कधी अ‍ॅल्युमिनियमचे प्रमाण वाढते तर कधी लोहाचे कमी होते व लोहाचे वाढले तर अ‍ॅल्युमिनियमचे कमी होते. त्याचमुळे वेगवेगळ्या प्रकारचे जांभा खडक आपल्याला पाहायला मिळतात. जिथे अ‍ॅल्युमिनियमचे प्रमाण जास्त होते त्याला आपण ‘बॉक्साईट’ म्हणतो.
लोहाचे ऑक्साईड जांभ्यात असल्याकारणाने त्याला लाल रंगाची छटा प्राप्त होते. जांभ्याच्या रचनेकडे बारकाईने पाहिल्यास आपल्याला कधी कधी लोह हा गोलाकार पद्धतीने केंद्रित झालेला आढळते. गोलाकार पद्धतीने जमा झालेल्या खनिजाला ‘उलीटीक कॉन्क्रिशन’ असे म्हटले जाते. जिथे लोह गोलाकार पद्धतीने केंद्रित होतं, तिथे लाल रंगाची उधळण झाल्याचे आढळते.

पण जिथून लोह पूर्णपणे निघून गेलेलं आहे व अ‍ॅल्युनिमियमची साठवणूक झालेली आहे. तिथे फिका किंवा सफेद रंग चिकटून बसल्याचा भास होतो.

जांभा खडक आपल्याला दख्खनच्या पठारावर अनेक ठिकाणी तयार झालेला आढळतो. तो बसाल्ट खडकाच्या शिरपेचात एखाद्या राजमुकुटासारखा विराजमान झालेला आहे. बसाल्ट खडकामध्ये जांभा राजा आहे आणि हा मुकुट अधेमधे कोठेच तयार होत नाही. काही ठिकाणी जांभ्याची जाडी १५ ते ६० मीटर इतकी असते आणि व्याप्ती काही मीटर ते अनेक मैलांची असते. दख्खनच्या पठारावर तर काही ठिकाणी नजर जाईल तिथपर्यंत जांभा खडक पसरलेले दिसतात.

मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी तर बसाल्ट खडकाचे रूपांतरण जांभा खडकात होतानाचे बदलसुद्धा पाहायला मिळतात. याला ‘बोल’ म्हणतात. बसाल्ट खडकाचा एक मोठा पट्टा लाल, हिरव्या, निळ्या रंगाने माखलेला दिसतो. इथे लॅटरेटायझेशनची प्रक्रिया सुरू झालेली असते.

जांभा खडक कसे निर्माण होतात याच्याबद्दल अनेक तज्ज्ञांनी आपले सिद्धांत मांडलेले आहेत. पण या सा-या प्रक्रियेत पर्यावरणाचा फार मोठा सहभाग असतो. हे कोणीही नाकारू शकत नाही. जांभा निर्माण होण्याची क्रिया फार जटिल आहे. यात भौतिक बदलाबरोबरच रासायनिक परिवर्तनाची क्रियासुद्धा कार्यरत असते. त्यामुळेच पर्यावरण, हवामान, भौगोलिक व भूशास्त्रीय संरचनेची सरमिसळ एकमेकांत झालेली असते.

जांभा खडक फक्त बसाल्ट खडकातूनच निर्माण होतात असे नाही. तर त्याचा उगम नाईससारख्या रूपांतरित व ग्रॅनाईटसारख्या अग्निजन्य खडकातूनसुद्धा होतो. त्यामुळे नेमक्या कोणत्या एका प्रक्रियेमुळे जांभा तयार होतो, हे सांगणं कठीण जाते.

बसाल्ट किंवा ग्रॅनाईटसारखा खडक आपले मूळ स्वरूप का बदलतो, हा एक संशोधनाचा विषय आहे; कारण यातून काही मोजकेच खनिज बाहेर पडतात व काही विशिष्टच खनिज मागे राहतात. हे सारे घडत असताना मूळ स्वरूप बदलून त्याच्या जागी एक नवी रासायनिक व भौतिक संरचना तयार होते. हे बदल फक्त एकाच ठिकाणी होत असतील व एकाच प्रकारच्या खडकात होत असतील, तर त्याची कारणमीमांसा शोधून काढणे सोपे जाते.

जांभा खडकाची छिद्रे पाहून काहींनी याचा उगम अग्निजन्य खडकाशी जोडला होता. लाव्हा पृष्ठावर आल्यानंतर थंड होताना त्यातून वाफ व वायू बाहेर पडत असते. त्यातूनच खडकात मोकळी जागा, छिद्रे निर्माण होतात. पण नंतर भूवैज्ञानिकांच्या लक्षात आले की, हे खडक फक्त पृष्ठावरच तयार होतात. त्यामुळे ते अग्निजन्य प्रकाराऐवजी हे भूस्तरीत प्रकारचे आहेत. यावर त्यांचे एकमत होऊ लागले. त्यानंतर जांभा खडक फक्त उष्णता व आद्र्रता असणा-या ठिकाणी व जिथे पावसाचे प्रमाण जास्त असते, तिथेच आढळतात. याचे सखोल अभ्यासानंतर त्यांना ज्ञान अवगत झाले. उष्णता, आद्र्रता व भरपूर पावसामुळे मूळ खडकातील सिलिकेट विघटित होते.

सिलिका विघटनामुळे इतर ठिकाणी ‘केओलिन’ हा खनिज घटक निर्माण होतो. हा मातीचा एक महत्त्वाचा घटक आहे. पण आद्र्रता, उष्णता व विपुल पावसाच्या ठिकाणी केओलिनपर्यंतच ही रासायनिक प्रक्रिया संयुक्त राहत नाही. तर ती पुढेही सुरू राहते. विघटनाची प्रक्रिया जलीय ऑक्साईड अ‍ॅल्युमिनिअम तयार होईपर्यंत सुरू असते. हा बॉक्साईट असतो. छिद्रांची निर्मिती ही पाणी राहिलेल्या रासायनिक घटकांची घट्ट बंधनात अडकण्याची धडपड असते.

आणखी एका सिद्धांतानुसार जांभा निर्मितीची प्रक्रिया भूमिगत प्रावणाच्या माध्यमातून होते. या प्रावणात वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक घटक असतात. जे पृष्ठावरील खडकापर्यंत पोहोचतात. तिथं पोहोचल्यानंतर ते काही घटकांना आपल्याबरोबर विरघळवून नेतात व पाठी अ‍ॅल्युमिनियम व लोहाला सोडून जातात. भूवैज्ञानिकांच्या दृष्टीने जांभा खनिजाचे अनेक उपयोग आहेत.

पृथ्वीच्या इतिहासाचा गोषवारा मांडताना हे खडक कुठे व कोणत्या पर्यावरणीय परिस्थितीत, तसेच कोणत्या पद्धतीने निर्माण झाले, याच्यावरून पृथ्वीच्या वयाचा ताळेबंद मांडण्यात मोठी मदत होते. भूकालमापनात अनेक ठिकाणी या खनिजांचा वावर शोधून काढण्यात आलेला आहे. या खडकाचे असणे हे सांगते की, उष्ण, आद्र्र व भरीव पावसाची परिस्थिती मागील काळात अस्तित्वात होती.

पण सामान्य लोकांच्या दृष्टीने जांभा खडकाचे एक महत्त्वाचे गुणवैशिष्टय़ अधोरेखित करणे गरजेचे आहे. दुय्यम खनिज म्हणून जांभ्याची ख्याती आहे. हा खडक जेव्हा त्याच्या मूळ जागेतून कापून काढला जातो, तेव्हा तो बराच मऊ असतो. पण जेव्हा हा खडक उघडय़ावर वा-याला सामोरा जातो, तेव्हा तो टणक बनत जातो. त्याचे हे गुणवैशिष्टय़च बहुधा त्यांना वापरातून माहिती असल्याकारणाने ते त्याला विटांच्या स्वरूपात कापतात व बांधकामात वापर करतात.

1 COMMENT

  1. खूपच उपयुक्त माहिती मिळाली. मी रत्नागिरी येथील आंब्याचा अभयास करताना तेथील जांभ्या दगडाचा उल्लेख खूप वेळा ऐकलं आहे. म्हणून अभ्यास चालू आहे. धन्यवाद प्रवीण गवळी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version