Home महाराष्ट्र कोकण कोकणच्या मातीतूनच मिळाला आव्हान स्वीकारण्याचा गुण

कोकणच्या मातीतूनच मिळाला आव्हान स्वीकारण्याचा गुण

1

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. या कठीण परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठय़ा विश्वासाने प्रचारप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली. 

कणकवली – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. या कठीण परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठय़ा विश्वासाने प्रचारप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपविली. कोणतेही कठीण आव्हान स्वीकारणे हा माझा स्वभाव आहे. हा गुण मला कोकणच्या मातीतून मिळाला आहे.

काँग्रेसचे प्रचारप्रमुख म्हणून मी जे मुद्दे उपस्थित केले, तेच मुद्दे सर्व पक्षांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले, हेच आपले यश आहे, असे काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी सांगितले. कणकवली तालुक्यातील वरवडे येथे मतदान केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आज चिरंजीव नितेश यांना मतदान करून मी राष्ट्रीय कर्तव्याबरोबरच वडिलांचे कर्तव्यही पार पाडले. त्याचा वेगळा आनंद आहे, असेही ते म्हणाले.

लोकांना समजून घेता आले 
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण मतदारसंघातील लोकांशी संपर्क साधता आला. त्यांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. कार्यालयात बसून जे प्रश्न कळले नसते ते सर्व प्रश्न या निमित्ताने समजून घेता आले. या मतदारसंघातील लोक माझ्यावर विश्वास दाखवतील आणि आमदार म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवतील, असा मला विश्वास वाटतो. पुढील पाच वर्षे मी त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन, असे नितेश राणे यांनी मतदान केल्यानंतर सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही वेगळे लढले. त्यामुळे राज्यात पंचरंगी लढती झाल्या. या परिस्थितीत काँग्रेसचे प्रचारप्रमुख म्हणून आव्हान स्वीकारून यशस्वीरीत्या पार पाडले. प्रचारप्रमुख म्हणून मी जे मुद्दे उपस्थित केले तेच मुद्दे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांनी उचलून धरले.

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आल्यापासून महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्त्व कमी करणारे निर्णय घेतले गेले. ज्यात रिझव्‍‌र्ह बँकेची तीन कार्यालये दिल्लीला हलविणे, मुंबई बंदरातील वाहतूक गुजरातला वळविणे, पालघर जिल्ह्यात सागरी सुरक्षा दलाचे प्रशिक्षण केंद्र गुजरातला हलविणे, निवडणुकीला अठरा दिवस शिल्लक असताना राष्ट्रपती राजवट लागू करणे या मुद्दय़ांचा समावेश होता.

याच मुद्दय़ांच्या भोवती संपूर्ण प्रचार झाला. हेच आपले यश आहे, असे राणे यांनी सांगितले. नितेश राणे हे पहिल्यांदा निवडणूक लढवीत आहेत. त्यांना मतदान करताना आपल्या काय भावना आहेत, असे विचारले असता राणे म्हणाले की, मी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य तर पार पाडले आहेच, त्याशिवाय वडिलांचे कर्तव्यही पार पाडले आहे. मी नितेशला ‘यशस्वी भव’ असा आशीर्वाद दिला आहे. नितेश निवडून येतील आणि एक आदर्श आमदार म्हणून काम करतील, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला.

1 COMMENT

  1. आमदार नितेश साहेब अशीच ओळख पुर्ण सिंधुदूर्ग आणि महाराष्ट्राला होवो हीच आमची इच्छा ……एक राणे समर्थक 62

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version