Home महाराष्ट्र कोकण कोकणामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला विजयाची संधी

कोकणामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला विजयाची संधी

1

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी आघाडी आणि युतीमध्ये जोरदार चुरस आहे. राज्यातील कोकण परिसरात येणा-या सहा जागांवर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला अनुकूल वातावरण आहे. 

मुंबई- राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी आघाडी आणि युतीमध्ये जोरदार चुरस आहे. राज्यातील कोकण परिसरात येणा-या सहा जागांवर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला अनुकूल वातावरण आहे. येथून आघाडीला जास्तीत जास्त जागा जिंकण्याची संधी आहे. कोकणामध्ये एकूण चार जिल्हे असून, लोकसभेच्या सहा जागा आहेत. एकटया ठाणे जिल्ह्यात लोकसभेच्या चार आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमध्ये प्रत्येकी एक जागा आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि ठाण्याची जागा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने जिंकली होती. कल्याणची जागा शिवसेनेने तर, पालघरची जागा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने जिंकली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार डॉ. निलेश राणे आणि रायगडमधून शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले होते.

मागच्या पाच वर्षात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. निलेश राणे यांनी मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत. संसदेमध्ये वेळोवेळी कोकणाच्या विकासाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे यावेळी येथील जनमत त्यांच्याबाजूने आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे अनंत गीते यांच्यामध्ये लक्षवेधी लढत आहे. रायगडचा गड राखण्याचे शिवसेनेसमोर आव्हान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे अनंत गीते खासदार आहेत. त्यामुळे प्रस्थापित लोकप्रतिनिधी विरोधातील लाटेचा त्यांना सामना करावा लागत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने येथून तुल्यबळ उमेदवार दिल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

राज्य सरकारमध्ये मंत्री असणारे सुनील तटकरे जिल्ह्यातील वजनदार नेते आहेत. रायगडमधून शेतकरी कामगार पक्षाने स्वत:चा उमेदवार उभा केल्याने गीते यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मागच्या २००९ च्या निवडणुकीत शेकापची मते गीते यांच्या विजयात निर्णायक ठरली होती. यावेळी मनसेने येथून उमेदवार उभा न करता शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना विजयाची संधी आहे.

२००९ लोकसभा निवडणुकीता भिवंडीची जागा काँग्रेसने जिंकली होती. यावेळी काँग्रेसने येथून कुणबी समाजाच्या विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भिवंडीमध्ये कुणबी आणि मुस्लिम मतदारांचे वर्चस्व आहे. भिवंडीमध्ये दोन लाख ४० हजार मुस्लिम मतदार असून, मुस्लिम मतांवरही काँग्रेसची मदार आहे. भाजपने येथून कपिल पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या कपिल पाटील यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली. ते ही कुणबी समाजाचे आहेत. त्यामुळे काही प्रमाणात कुणबी मतांमध्ये विभाजन होऊ शकते. मनसेनेही येथून आपला उमेदवार उभा केला आहे. ज्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो. मागच्यावेळी मनसेने येथून एक लाखापेक्षा जास्त मते मिळवली होती.

पालघरमध्ये काँग्रेसने बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना पाठिंबा दिला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या चिंतामण वानगा यांचा फक्त बारा हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळीही भाजपने येथून चिंतामण वानगा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचा विजय सोपा होऊ नये यासाठी, काँग्रेसने येथून आपला उमेदवार मागे घेत बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकदिलाने काम केले तर, ही जागाही आघाडीला मिळू शकते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version