Home महाराष्ट्र कोकण कोकण माझे, मी कोकणचा!

कोकण माझे, मी कोकणचा!

2

कोकण माझे आणि मी कोकणचा आहे. कोकणच्या जनतेने मला उदंड प्रेम दिले, ते माझे कुटुंबीयच आहेत. चला कोकणच्या विकासासाठी एक होऊ या, एकमेकांना साथ देऊया, असे भावोत्कट आवाहन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथील प्रचंड सभेत केले. 
सावंतवाडी – कोकण माझे आणि मी कोकणचा आहे. कोकणच्या जनतेने मला उदंड प्रेम दिले, ते माझे कुटुंबीयच आहेत. चला कोकणच्या विकासासाठी एक होऊ या, एकमेकांना साथ देऊया, असे भावोत्कट आवाहन उद्योगमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांनी येथील प्रचंड सभेत केले. आपल्या लाडक्या नेत्याने घातलेल्या या सादेला येथील गांधी चौकात जमलेल्या हजारो कोकणवासीयांनी टाळय़ांचा कडकडाट करीत जोरदार प्रतिसाद दिला.

कोकणच्या जनतेने मला खूप प्रेम दिले. एकमेकांच्या सुख-दु:खात साथ दिली. कोकण माझे आणि मी कोकणचा आहे. इथली जनता माझे कुटुंबीय आहे. कोकणी माणसाच्या या प्रेमाच्या बळावरच डॉ. निलेश राणे पुन्हा प्रचंड मताधिक्य घेऊन विजयी होतील.

कोकणच्या जनतेने मला खूप प्रेम दिले. सुख-दु:खात साथ दिली. कोकणी माणसाच्या या प्रेमाच्या बळावरच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश राणे पुन्हा प्रचंड मताधिक्य घेऊन विजयी होतील, अशा शब्दांत राणे यांनी कोकणी माणसांविषयी अत्यंत हळव्या भाषेत कृतज्ञता व्यक्त केली.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस हे कुणाला मंत्रीपद मिळावे म्हणून एकत्र आलेले नाहीत, तर या महाराष्ट्राच्या, देशाच्या विकासासाठी एकत्र आलेले आहेत. देशाचा विकास झाला पाहिजे, धर्मनिरपेक्ष राज्य आले पाहिजे, अशी आमची विचारधारा आहे. देशाच्या विकासासाठी काँग्रेसलाच मतदान करा, असे आवाहनही त्यांनी डॉ. निलेश राणे यांच्या प्रचारसभेत केले.

कोकणचा विकास हाच आपला ध्यास असून इथे विकास झाला पाहिजे यासाठी वेगवेगळय़ा माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. अपार कष्ट, अभ्यास आणि सततच्या प्रयत्नामुळे मंत्रिमंडळात मी दरारा निर्माण केला आहे. त्याच्या बळावर कोकणी माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सतत प्रयत्न केले. एक वेळ अशी होती कोकण हा मनिऑर्डरवर जगणारा जिल्हा म्हणून ओळखला जात होता.

शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. इथल्या मुलांना शिक्षणासाठी पुण्या-मुंबईला जावे लागत होते. आता कोकणात सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय झाली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी शाळा, हॉर्टिकल्चर कॉलेज, इंजिनीअरिंग कॉलेज, कृषी महाविद्यालय आणि आता वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे.

एकही माणूस उपचारांशिवाय राहणार नाही, अ‍ॅडमिशनअभावी कुणाचे शिक्षण थांबणार नाही याची काळजी मी घेत आलो आहे. विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. ८ हजार कोटींचे सिंचन प्रकल्प सुरू आहेत. डॉ. निलेश राणे यांनी केंद्रातून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून पैसे आणून इथे काम सुरू केले. यांच्यात कुणाकडे अशी कामाची धमक आहे का? असा सवाल करून त्यांनी डॉ. निलेश राणे यांच्या कामाचा आढावा घेतला.

कोकणवासीयांच्या प्रश्नांसाठी डॉ. निलेश राणे रेल्वे ट्रॅकवर झोपले, इकोसेन्सिटिव्ह झोनच्या विरोधात मोर्चा काढला, हे आम्ही कामाचे मुद्दे मांडतोय. विरोधकांनी काय केले ते सांगावे. साधी बालवाडी तरी यांनी कुणी चालविली आहे काय, अशी सरबत्ती त्यांनी केली.

धर्मनिरपेक्ष विचार घेऊन समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता जातीयवादी शक्तींबरोबर कधीही जाऊ शकत नाही. आपण खरोखरच शरद पवार यांना मानत असाल तर राष्ट्रवादीमध्ये परत या, असे आवाहनही राणे यांनी वाट चुकलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले. जे कुणी शरद पवार यांना मानत असतील त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात यावे. त्यांना पूर्ण ताकद दिली जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.

दीपक केसरकर आणि त्यांच्यासोबत चार टाळक्यांनी चालविलेल्या नौटंकीचा समाचार घेताना राणे म्हणाले, आज माझी इथे सभा आहे. दोन दिवस या मैदानाच्या साफसफाईचे काम दीपक केसरकर झाडू घेऊन करीत होते, शंकर कांबळी पाणी घालीत होते आणि नंदू घाटे चुना मारीत होता. काय माणसे आहेत. केलेल्या उपकारांची जाण नाही या माणसांना.

विधानसभा निवडणुकीत केसरकर याला निवडून आणण्यासाठी शरद पवार यांचा फोन आला. म्हणाले, केसकर निवडून आला पाहिजे. काय करायचे ते करा. मी शेवटची सभा बॅ. नाथ पै सभागृहात घेतली. सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले. यांना निवडून आणले. माझे सोडा ज्या शरद पवारांनी यांना आमदार केले, त्यांच्याबद्दल तरी या कृतघ्न माणसाला आदर आहे का हो? पवारसाहेब हेलिपॅडवर आले तेव्हा त्यांना भेटायलाही आला नाही. मग नासीर शेख यांच्या घरी भेटायला आला, तेव्हा पवारसाहेबांनी ‘गेटआउट’ म्हणून हाकलून लावले.

आमच्या बातम्या रंगवून देणा-या पत्रकारांना ती बातमी दिसली नाही. त्यांच्यासाठी यांचे शब्द कसे हळवे होतात. काय तर म्हणे ‘थोडय़ाच वेळात केसरकर तिथून निघाले.’ अरे वा, तिथे काय परिस्थिती होती. पवारसाहेबांनी कशी खरडपट्टी काढली. काही नाही. वर काय शरद पवार यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसताना फोन केला.

‘दीपक तू कसा आहेस.’ काय खोटारडेपणा आहे. अरे कशासाठी फोन करतील पवार? गद्दारी केली म्हणून? जातीयवादी पक्षांबरोबर गेला म्हणून याला फोन करतील काय? राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे. जातीयवादी पक्षांबरोबर जाणा-याला ते कधीही माफ करणार नाहीत. इतिहास कधीही गद्दारांची दखल घेत नाही. जे एकनिष्ठ असतात त्यांची कीर्ती गायली जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांनी बलिदान दिले, त्यांना देश आजही विसरलेला नाही. सूर्याजी पिसाळचे कुणी नाव घेत नाही. तसेच राष्ट्रवादीतील या सूर्याजी पिसाळालाही काही दिवसांत इथली जनता विसरल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार यांनी सांगितल्यामुळे याला निवडून आणले. आता निवडणुकीला उभा राहू द्या, त्याचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोला राणे यांनी लगावला.

शिवसेनेत गाळ राहिला
शिवसेनेच्या नव्या नेतृत्वात आता दम राहिलेला नाही. परवा कणकवली येथे उद्धव ठाकरेंची सभा झाली. दीड-दोन हजार टाळकीही जमली नाहीत. त्यातील बरेच जण मुंबई, ठाणे कोल्हापूरचे होते. काय भाषण केले? सांगितला का एक तरी विकासाचा मुद्दा. काही नाही. म्हणे मी मर्द आहे. का बाबा सांगावे लागते तुम्हाला मर्द आहात ते. जो मर्द आहे, त्याला सांगायची गरज पडते काय. काय रुबाब होता शिवसेनेचा.

या माणसाने मातीत मिसळला. याच कणकवलीत त्यांची मी सभा घेतली होती. एक लाख लोक होते. ते दीड-दोन हजारावर आले. सगळे चांगले लोक निघून गेले. गणेश नाईक, भुजबळ, मी सगळे लोक गेले. उरले कोण नुसता गाळ. सध्याच्या उमेदवारावर तर स्पॉटलाइट लावावा लागतो.

अंधारात दिसत नाहीत. काय यांची पात्रता. एकीकडे डॉ. निलेश राणे उच्चशिक्षित. तर हे मॅट्रिकला दोन वेळा नापास, असा उमेदवार दिल्लीत जाऊन काय करणार? महाराष्ट्राच्या विकासासाठी, कोकणच्या स्वाभिमानासाठी डॉ. निलेश राणे यांनाच पुन्हा लोकसभेत पाठवावे, असे आवाहन राणे यांनी केले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version