Home महाराष्ट्र कोकण रेल्वे मार्ग धोकादायक

कोकण रेल्वे मार्ग धोकादायक

1

कोकण रेल्वे मार्गाचे पावसाळ्यापूर्वीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या मार्गावरील १३ ठिकाणे धोकादायक असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गाचे पावसाळ्यापूर्वीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या मार्गावरील १३ ठिकाणे धोकादायक असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. धोकादायक ठिकाणांवर कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. पावसाळ्यात घडणा-या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी १३ धोकादायक ठिकाणांवर एलईडी दिवे बसवण्यात  आले आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर मागील काही वर्षापासून पावसाळ्यात उद्भवणारी आपत्ती चिंतेचा विषय ठरली आहे. कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडून कोकण रेल्वे दीर्घकाळ ठप्प होण्याच्या अनेक घटना घडल्या. यात कोकण रेल्वेसह प्रवाशांचही मोठे नुकसान झाले. गतवर्षी तर कोकण रेल्वे मार्गावर आडवली बोगद्यानजीक धावत्या रेल्वेवर दरड कोसळल्याने अपघात झाला होता.

सुदैवाने या अपघातात मोठी हानी झाली नव्हती. परंतु, पावसाळ्यात उद्भवणा-या या समस्यांवर उपाययोजना आखण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने पावसाळापूर्व सर्वेक्षण केले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात कोकण रेल्वे मार्गावरील १३ ठिकाणे अतिधोकादायक असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी पावसाळ्यात दरड आणि माती रुळावर कोसळण्याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

यामध्ये आगवे, बोडवे, मांडवकरवाडी, किरसवणे, दासगाव, शिंदेआंबेरे अशी १३ ठिकाणे अतिधोकादायक असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. धोकादायक ठिकाणी कोकण रेल्वे प्रशासनाने आतापासूनच विशेष लक्ष पुरवले आहे. या ठिकाणांवर चौवीस तास सुरक्षा रक्षकांमार्फत गस्त ठेवण्यात येत आहे.

याशिवाय रात्रीच्या वेळी आणि विशेष करून पावसाळ्यात या धोकादायक ठिकाणांवर लक्ष ठेवता यावे यासाठी या ठिकाणी एलईडी दिवे बसवण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. धोकादायक ३०० ते ४०० मीटरच्या परिसरात एलईडी लाईट्स बसवण्यात येणार आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर गाडयांना प्रचंड गर्दी

चिपळूण- सध्या सुट्टीचा हंगाम सुरू असल्याने कोकणवासी मुंबईकर चाकरमानी कोकणाकडे धाव घेत आहेत. मात्र, कोकण रेल्वेच्या गाडयांना तुफान गर्दी असल्यामुळे या कोकणवासीयांना गर्दीतच प्रवास करावा लागत आहे. काही जण दरवाजात लोंबकळत तर काही टपावर बसून प्रवास करीत आहेत, यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे

शाळा-महाविद्यालयांना पडलेली सुट्टी, तसेच लग्नाचा हंगाम यामुळे मुंबईकर गावाकडे, गावाकडील मंडळी मुंबईकडे येण्यासाठी कोकण रेल्वेवरील गर्दीमुळे एसटी, खासगी बस, तसेच खासगी गाडया करून प्रवास करीत आहेत. तरीही कोकण रेल्वे मार्गावरील गाडयांना प्रचंड गर्दी आहे.

प्रवाशांनी आरक्षण केले असले तरीही हजारो प्रवासी गर्दीमुळे प्रतीक्षा यादीवर आहेत. यामुळे बरेच जण आरक्षित डब्यात घुसून प्रवास करीत आहेत. तर जागा न मिळाल्यामुळे काही प्रवासी दरवाजात लोंबकळत प्रवास करीत आहेत. वीर ते कणकवलीपर्यंत ३५ ते ४० बोगदे आहेत. ब-याच ठिकाणी उंच पूल आहेत. झोपेत बोगदा आल्याचे समजले नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version