Home महाराष्ट्र खडसेंवर काय आहेत आरोप?

खडसेंवर काय आहेत आरोप?

1

महाराष्ट्राचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना तीन वेळा क्लीनचिट दिलेले महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाच आपल्या पत्रकार परिषदेला डाव्या हाताला बसवून एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. खडसेंवर असे काय आरोप आहेत?

कुख्यात दाऊद इब्राहिम याच्या कराची येथील घरातील लॅण्डलाईनवरून महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या फोनवर जानेवारी आणि मार्च या दोन महिन्यात सात वेळा फोन आल्याचा आरोप असून एक फोन सतत अठरा मिनीटे सुरू होता, असा आक्षेप घेण्यात आला आहे.

श्री. खडसे यांनी त्याला उत्तर दिले की, माझ्या ज्या मोबाईल नंबरचा उल्लेख करण्यात आला आहे तो नंबर गेली दोन वर्षे बंद आहे. त्यानंतर मनीष भांगळे याने खडसेंच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याने म्हटले आहे की, जर खडसे यांचा मोबाईल दोन वर्षे बंद होता तर त्या काळात आलेले प्रत्येक महिन्याचे बिल समान असायला हवे होते. त्यानंतर खडसेंनी खुलासा केला की, फोन एक वर्षच बंद होता.

पोलीस यंत्रणेने दाऊदच्या घरून खडसेंना आलेल्या फोन प्रकरणाचा तपास केल्यानंतर असे स्पष्टीकरण दिले की, खडसे यांच्या मोबाईलवरील आम्ही सर्व नंबर तपासले आहेत. यात दाऊदकडून आलेला कोणताही नंबर नाही.

जर खडसेंचा फोन बंद होता तर पोलिसांना तपासणीसाठी कोणते नंबर सापडले?

ज्या गजमल पाटील याला मंत्रालयाच्या दारात लाचलूचपत प्रतिबंधक (एसीबी) अधिका-याने पकडले तो गजमल पाटील याने एका जमिन व्यवहारात खडसेंसाठी तीन कोटींची लाच मागितली, असा आरोप केला गेला.

खडसेंनी सुरूवातील सांगितले की, गजमल पाटील हा भाजपा कार्यकर्ता नाही, तो वारकरी संप्रदायाचा आहे. नंतर स्पष्टीकरण दिले की, जमिनीची किंमत पाच कोटी रूपये आहे तर तीस कोटींची लाच कशी मागितली जाईल?

लाचलूचपत प्रतिबंधक खात्याने गजमल पाटीलला अटक केले असून तो पोलीस कोठडीत आहे. त्यानंतर या जमिनीच्या किमतीची माहिती रेडीरेकनरतर्फे स्पष्ट झाली की, गजमल पाटील यांनी तीस कोटी लाच मागितलेल्या जमिनीची किंमत खडसेंच्या अधिपत्त्याखालील महसूल खात्याच्या रेडीरेकनरमध्ये आजच्या बाजारभावाप्रमाणे या जमिनीची किंमत ३०० कोटी आहे.

खडसे यांच्यावरील पुढचा गंभीर आरोप असा आहे की, भोसरी येथील एमआयडीसीची जमिन ज्या जमिनीची किंमत ३० कोटी रूपये आहे ती ३ हेक्टर जमिन खडसे यांनी आपली पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष दयाराम चौधरी यांच्या नावे ३ कोटी रूपयात घेतलेली आहे.

भोसरीची एमआयडीसीची जी जमिन आहे ती विक्री करता नसून लघु उद्योजकांना भाडेतत्त्वावर देण्याकरता आरक्षित केलेली आहे. त्या जमिनीची विक्री करता येत नाही. ती जमिन खडसे यांनी विकत कशी घेतली? असा प्रश्न भोसरीचे नागरिक गावंडे यांनी उपस्थित केला आहे.

खडसे यांच्यावरचा आणखी एक आरोप असा की, खडसे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवताना आपले संपत्तीविषयक जे विवरण सादर केले आहे त्या तपशीलामध्ये जळगाव जिलतील सातोड या गावी खरेदी केलेली ८८ एकर जमिनीची माहिती दिलेली नाही. या जमिनीची किंमत ६३ कोटी रूपयांची आहे.

एकनाथ खडसे पाटबंधारे मंत्री असतानाच्या काळात तापी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळामार्फत कु-हाबडोरा या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. या कामावर ६१९ कोटी रूपये खर्च दाखवले गेले. मात्र प्रत्यक्षात गरज नसताना पाईपची खरेदी करण्यात आली आणि ८०० कोटींचा घोटाळा झाला, असाही एक आरोप करण्यात आला आहे.

[EPSB]

एकनाथ खडसेंचा अखेर राजीनामा

अनेक वादात सापडलेले महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे.


चौकशी न करताच फडणविसांनी घेतला खडसेंचा बळी

त्यांचा राजीनामा हा भाजपामधील अंतर्गत सुडराजकारणाचा बळी आहे, अशी तीव्र प्रतिक्रीया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे.

[/EPSB]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version