Home रविवारची मुलाखत खानदानी अभिनयाचं लोभस रूप

खानदानी अभिनयाचं लोभस रूप

1

अनसूया साक्रीकर हे नाव घेतलं तर या नावाची मराठीत कुणी अभिनेत्री होती, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र उमा एवढंच नाव घेतलं तर ‘थोरातांची कमळा’पासून ते अगदी जवळच्या ‘भालू’पर्यंतच्या त्यांच्या अनेक भूमिका डोळ्यांसमोर तरळतील. ऐंशीच्या आसपास चित्रपटात आपल्या अभिनयाचे विविध रंग दाखवणा-या उमाजींचा आवडता रंग हा त्यांच्या गृहिणीपदाचा आहे. एकेकाळची आघाडीची अभिनेत्री म्हणून मिरवण्यापेक्षा आजची आजीची भूमिका त्यांना जास्त जवळची वाटते. त्यात रमणा-या, आनंदी होणा-या उमा यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या आयुष्याचा फ्लॅशबॅकच समोर येतो.

उमाजी, आपण आजच्या काळापासून सुरुवात करूया, आजचा जमाना हा रिमेकचा आहे, तुम्हाला जर असं विचारलं की, तुमच्या कोणत्या चित्रपटाचा रिमेक व्हावा, तर तुम्ही काय सांगाल?

>आजच्या चित्रपटांकडे पाहताना एक जाणवतं की, आज काळ फार पुढे गेलाय. वातावरणात एक प्रकारचा मोकळेपणा आलाय, तरीही मला असं वाटतं की, ‘मधुचंद्र’ या चित्रपटाचा रिमेक जर आज केला तर तो फार गमतीशीर होईल. मला अजून आठवतं की, मी तेव्हा ‘काका मला वाचवा’ हा विनोदी चित्रपट करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राजा परांजपे, तर राजदत्त हे राजाभाऊंचे सहाय्यक होते. हा चित्रपट विनोदी असला तरी त्यातली माझी भूमिका गंभीर होती. मारक्या मास्तरणीची ही भूमिका मला सुलोचनादीदींच्या शब्दावरून मिळाली होती. त्याआधी मी राजाभाऊंबरोबर काम केलं नव्हतं. हे मी सुलोचनादीदींना सांगितलं. त्यांनी राजाभाऊंना मला चित्रपटात घ्यायला सांगितलं. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानाच राजदत्त यांना ‘मधुचंद्र’ हा चित्रपट मिळाला. एम. बी. सामंत हे या चित्रपटाचे निर्माते होते. त्यांचा हा पहिलाच चित्रपट. प्रभाकर ताम्हाणे यांच्या ‘अल्ला जाने क्या होगा आगे’ या कथेवर हा चित्रपट बेतला होता. एन. दत्ता यांचं संगीत होतं. या चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांचा डबल रोल होता. राजदत्त यांनी मला या चित्रपटासाठी विचारलं, तेव्हा मी ताबडतोब हो म्हणाले. या चित्रपटाचं चित्रीकरणही फार मजेशीर होतं. काशीनाथ घाणेकर व श्रीकांत मोघे अशी जोडी होती. आमचं चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओत सुरू होतं. त्यासाठी तिथे रेल्वेचा एक खास डबा तयार करण्यात आला होता. या चित्रपटाचं जे बाह्य चित्रीकरण झालं ते महाबळेश्वरला झालं होतं. त्यातली गाणीही खूप गाजली. या चित्रपटामुळे मी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये स्वीकारले गेले. मला आठवतं की, या चित्रपटानंतर माझी स्टारव्हॅल्यू जबरदस्त वाढली. त्या वेळी या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला होता. 

आपण अभिनेत्रीच व्हायचं, असं तुम्ही आधीपासून ठरवलं होतं का?

>मी तसं ठरवलं, असं काही म्हणता येणार नाही. माझे आईवडील चित्रपटसृष्टीशी संबंधित होते, ते प्रभात कंपनीत कामाला होते. चित्रपटांतून ते लहानमोठया भूमिका करत. मी मोठी नायिका व्हावं, अशी माझ्या आईची इच्छा होती. त्यासाठी तिने मला तेव्हा भालजींकडे नेलं. त्यांनी मला पाहून म्हटलं की, ही फार लहान आहे. तेव्हा मी सातवीत होते. कोल्हापूर गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकत होते. मला त्यांनी लगेच संधी दिली नसली तरी माझा चेहरा त्यांच्या लक्षात राहिला. पुढे त्यांच्या ‘आकाशगंगा’ या चित्रपटातल्या एका गाण्यात सीतेची भूमिका करण्याकरता त्यांनी मला बोलावलं. नेमकी त्याच वेळी माझी सातवीची वार्षिक परीक्षा होती. आमचं चित्रीकरण पन्हाळ्याला होतं. चित्रीकरण झाल्यावर त्यांनी त्यांच्या गाडीतून मला थेट शाळेत सोडलं होतं. पुढे काही वर्षानी त्यांनी मला त्यांच्या कंपनीत घेतलं. लहानमोठया भूमिका करण्यासाठी मला तेव्हा महिना दीडशे रुपये पगार ठरला. त्या काळी भालजींच्या स्टुडिओतलं वातावरण अगदी वेगळं होतं. सकाळी अकरा ते सहा असं काम करावं लागे. अकरा वाजता आल्याबरोबर एक सामुदायिक प्रार्थना होई, त्यानंतर शिक्षणाचा तास असे. त्या काळात अगदी तलवार-ढाल चालवणं, घोडेस्वारी हे तर शिकावं लागायचंच, त्याचबरोबर संवाद कसे म्हणायचे, अभिनय कसा करायचा, खासकरून डोळ्यांचा वापर कशा प्रकारे करावा याचंही शिक्षण स्टुडिओत दिलं जायचं. चित्रपटाच्या, नाटकाच्या तालमीही चालत. कधी एखादी भूमिकाही करावी लागे. ‘अंतरीचा दिवा’ नावाचा एक चित्रपट तेव्हा लता मंगेशकर यांनी सुरू केला होता. या चित्रपटाचा नायक होता सूर्यकांत, तर नायिका सीमा. सूर्यकांत यांच्या लहान बहिणीची भूमिका मी या चित्रपटात केली होती. पण माझं नाव काही लताबाईंना आवडलं नाही. शेवटी त्यांनी काही नावांच्या चिठ्ठय़ा तयार केल्या. त्या चिठ्ठय़ा त्यांनी मंगेशीच्या समोर टाकल्या. तेव्हा आशाबाईंची मुलगी वर्षा लहान होती. तिनं त्यातली एक चिठ्ठी उचलली. त्या चिठ्ठीवर उमा असं नाव लिहिलं होतं. अर्थात, हे मला काहीच माहीत नव्हतं. हा चित्रपट जेव्हा कोल्हापुरात लागला तेव्हा मी तो पाहायला गेले. सुरुवातीला येणा-या नावांमध्ये माझा कुठेही उल्लेख नव्हता, पण नवतारका उमा अशी पाटी झळकली होती. मला फार वाईट वाटलं. मी अगदी रडायलाच लागले. नंतर मला भालजींनी सांगितलं की, अगं तुझं नाव फार मोठं आहे ना, म्हणून तुझं नाव आम्ही बदललं आहे. अशा प्रकारे मी उमा झाले.

त्यानंतर तुम्ही नायिका म्हणून कधी झळकलात? ‘थोरातांची कमळा’ कसा मिळाला?

>भालजींचे पुत्र प्रभाकर पेंढारकर हे त्या वेळी ‘भाव तिथे देव’ हा चित्रपट करत होते. या चित्रपटात मला त्यांनी नायिका म्हणून घेतलं. या चित्रपटात मी चित्तरंजन कोल्हटकर यांच्या प्रेयसीची भूमिका केली होती. अशा लहानसहान भूमिका करतानाच ‘थोरातांची कमळा’साठी माझी निवड झाली. तो चित्रपट फार मोठा होता. सूर्यकांत हे संभाजी, तर चंद्रकांत हे शिवाजी महाराजांची भूमिका करणार होते. कमळेच्या भूमिकेसाठी मुंबईच्या वंदना नावाच्या एका अभिनेत्रीची निवड झाली होती. तर तिची मैत्रीण असलेल्या चिमणीच्या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली होती. जयप्रभामध्ये या चित्रपटाचा मुहूर्त होता, दुपारी दीड वाजताचा. यात माझी भूमिका होती, म्हणून मीही त्याला उपस्थित होते. पण वंदनाचा पत्ता नव्हता. बराच वेळ झाला तरी ती आली नाही. शेवटी भालजींनी निर्णय घेतला. ते मला म्हणाले, जा मेकअप करून ये. मला वाटलं की, हे आता माझ्यावर एखादं दृश्य चित्रित करून वेळ मारून नेतायत की काय? माझ्यावर तसं एक दृश्य चित्रित झाल्यावर भालजी मला म्हणाले की, या चित्रपटातली कमळेची भूमिका तू करतेयस. बाप रे! माझ्यासाठी हा एक मोठाच धक्का होता. कितीतरी वेळ मी अगदी मनातल्या मनात आनंदानं नाचत होते. मला अजून चांगलं आठवतं की, त्या वेळी या चित्रपटाचा प्रीमिअर सांगलीत होता. मी कुठलाही कार्यक्रम असला तरी माझ्या आईचा शालू नेसून जायचे. तशी मी गेले. तिथे कुसुमताई देशपांडे यांची बहीण रंजना होती. त्यांनी मला स्वत:ची साडी दिली. मी ती नेसूनच प्रीमिअरला गेले. नायिकेचं प्रीमिअरला काय स्वागत होतं, ते मी याचि देही याचि डोळा अनुभवलं. ‘थोरातांची कमळा’ने मला स्टार बनवलं, असं म्हणायला हरकत नाही.

त्या वेळची स्टारव्हॅल्यू कशी होती. आजच्यासारखं ग्लॅमर होतं का?

>ग्लॅमर म्हणजे लोक अधिक ओळखायचे. फार फार तर आधीपेक्षा अधिक पैसे मिळत, पण त्या काळात मुळातच पैसे फार मिळत नसत. नायिका असो की लहान भूमिका करणारी सगळ्यांना सारखंच वागवलं जायचं. भालजींची शिस्त तर फारच कडक असायची. सेटवर इतर जण काम करत तेव्हा बाकीच्या कलाकारांनी त्यांचं काम पाहत बसलं पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. कुणी गप्पा मारलेल्या, टाइमपास केलेला किंवा विनाकारण इकडे-तिकडे फिरलेलं त्यांना चालत नसे. आता कलाकारांना मेकअप करायला व्हॅनिटी व्हॅन असतात, तशा त्या काळात नव्हत्या. अगदी कुणाच्या घरी, एखाद्या झाडाखालीही मेकअप केला जात असे. जी बाई साडी नेसवायची तीच केस विंचरायची आणि अंबाडा घालायची. जेवणही, जे सगळ्यांसाठी सारखंच असे. त्यामुळे आपण नायिका वगैरे आहोत, अशी भावना अजिबात नसायची.

या क्षेत्रात तुमच्या काळात अधिक संघर्ष होता, की आता आहे?

>तसा फार फरक पडलेला नाही. केवळ आज पैसा जास्त मिळतो. शिवाय संधी जास्त मिळतात. माध्यमंही खूप आहेत. अभिनेत्री म्हणून कारकीर्द घडवताना तुलनेने अधिक सुरक्षितता आहे. आमच्या वेळी केवळ चित्रपट हे एकच माध्यम. त्यातही निर्मितीचा वेग कमी. त्यामुळे अभिनेत्री म्हणून कारकीर्द घडवताना खूप कष्ट पडत. एक मात्र होतं की, तेव्हा चित्रपटांना इतका प्रचंड प्रतिसाद मिळत असे की, आज त्याची कल्पनाही करता येणार नाही.

कारकिर्दीच्या शिखरावर असताना तुम्ही चित्रपट संन्यास का घेतलात? 

>माझं प्रकाश भेंडेंशी लग्न झाल्यावर काम थांबवलं. खरं त्यांनी मला काम करू नको, असं काही सांगितलं नाही. मात्र मला संसाराची आवड होती. मला जी काही कारकीर्द करायची होती, ती मी केली होती. त्यात मी समाधानी होते. त्यामुळे मी लग्नानंतर काम बंद केलं. मात्र यांनी माझी आवड व माझी कारकीर्द पाहून स्वत:च चित्रपटनिर्मिती करायचं ठरवलं. याच काळात आमच्या पहिल्या मुलाचा, प्रसादचा जन्म झाला. त्यानंतर त्याच्या नावानेच आम्ही चित्रपटनिर्मिती संस्था सुरू केली. आम्ही अनेक चित्रपटांची निर्मिती केली. प्रकाश यांनी माझी खूप दिवसांची एक इच्छाही पूर्ण केली. मला एक अशी भूमिका करायची होती, ज्यात लहानपणापासून ते वार्धक्यापर्यंतची स्त्रीची रूपं असतील. ‘आई थोर तुझे उपकार’ या चित्रपटात मी ही संपूर्ण लांबीची भूमिका केली. त्याचं समाधान हे काही औरच होतं. या आमच्या चित्रपट संस्थेतर्फे आम्ही अनेक नव्या कलाकारांनाही संधी दिली. ‘आपण यांना पाहिलंत का?’ या चित्रपटातून रेशम टिपणीस वगैरे कलाकारांना संधी दिली. आजही आम्हाला चित्रपटनिर्मिती करायची आहे. आपल्याकडून जितकं होईल तितकं करायचं आहे.

तुमचा कुठला ग्रामीण चित्रपट खूप गाजला?

> मला वाटतं की, त्या काळात मराठीत ग्रामीण किंवा शहरी असा काही भेद नव्हता. मराठीत चित्रपटनिर्मिती कमीच होत होती, पण एकाहून एक दर्जेदार कथानकं येत होती. त्यात मातब्बर कलाकार काम करत होते. माझ्याकडेही काही चांगल्या भूमिका आल्या. मी कथ्थक नृत्यात विशारद आहे. त्यात विशेष प्रावीण्याचं प्रमाणपत्र माझ्याकडे आहे. ‘गणानं घुंगरू हरवलं’ या माझ्या गाजलेल्या चित्रपटात मी सादर केलेली लावणी आजही लोकांच्या लक्षात आहे. ‘झोंबतो गारवा..’ या लावणीवरचं हे माझं नृत्य लोकांना खूप आवडलं. राम कदम यांचं संगीत असलेल्या या चित्रपटातली इतर गाणीही गाजलेली होती.

तुमचा ‘दोस्ती’ हा चित्रपट फार गाजला?

>हा चित्रपट माझ्याकडे अगदी अपघाताने आला. ताराचंद बडजात्या या चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार होते. पाटील हे त्याचे कॅमेरामन होते. त्यांनी मला कोल्हापूरला पत्र पाठवून बोलावून घेतलं. मी मुंबईत आले व त्यांची स्क्रीन टेस्ट दिली. त्यानंतर या चित्रपटात आंधळ्या मुलाची भूमिका करणा-या सुधीरला विचारण्यात आलं की, या मुलींपैकी तुला बहीण म्हणून कोण हवी आहे. त्यानं माझ्याकडे बोट दाखवलं. या चित्रपटातलं काम झाल्यानंतर मी कोल्हापूरला परत गेले, कारण तेव्हा मुंबईत राहण्याची माझी काहीच सोय नव्हती. हा चित्रपट पुढे खूप गाजला. कोल्हापुरात त्याला जो प्रतिसाद मिळाला त्यावरून मला त्याच्या अफाट यशाची कल्पना आली. या चित्रपटाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने आमचा सत्कार केला. हा कार्यक्रम तेव्हा लखनौला झाला होता. या कार्यक्रमासाठी शशी कपूर, चित्रपटाचे सर्व कलाकार व हसरत जयपुरी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या वातावरणात मला लाजल्यासारखं होतं होतं. व्यासपीठावर मी असताना मला त्यांनी एखादं गाणं म्हणण्याचा आग्रह केला. मला तेव्हा हिंदीतलं गाणं येतं नव्हतं, त्यामुळे मी सरळ मराठी गाणं म्हटलं. त्यालाही लोकांनी अगदी भरभरून दाद दिली.

आताच्या काळात व्यावसायिकता फार वाढली आहे, असं तुम्हाला वाटतं का?

>काही गोष्टी या काळानुरूप बदलत असतातच. ते बदल आपण स्वीकारले पाहिजेत. आमच्या वेळी कलाकार केवळ कलेचा विचार करायचे. इतर गोष्टींचा कसलाही बाऊ नसायचा. आमच्या ‘भालू’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी एकदा आम्ही एका गावी रात्री दोन वाजता पोहोचलो. आता कुणाला उठवायचं, कुठे झोपायचं याचा विचार करत होतो. निळूभाऊ आमच्याबरोबर होते. ते म्हणाले की, एका सतरंजीची व्यवस्था होते का ते पाहा. आपण या बसमध्येच झोपू. आताच्या कलाकारांना हा प्रसंग अगदी वेगळ्या ग्रहावर घडलाय की काय, असं वाटेल. मला आणखी एक आठवण सांगावीशी वाटतेय, ‘आम्ही जातो आमच्या गावा’ या चित्रपटाच्या वेळची ही गोष्ट. कमलाकर तोरणेंनी या चित्रपटाची निर्मिती सुरू केली, पण नंतर आर्थिक कारणास्तव हा चित्रपट बंद पडला. तो त्यांनी पुन्हा काही दिवसांनी सुरू केला. दरम्यानच्या काळात या चित्रपटासाठी शिवण्यात आलेल्या कपडय़ांना वाळवी लागली होती. मात्र सर्व कलाकारांनी तेच कपडे पुन्हा शिवून घातले. त्या चित्रपटाचा खर्च कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात केवळ पुरी-भाजीचाच बेत असायचा. मात्र आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण हा चित्रपट झालाच पाहिजे, या भावनेतून सगळ्यांनी काम केलं. हा चित्रपट तेव्हा चांगलाच गाजला होता. या चित्रपटातलं माझं गाणं ‘ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले..’ हे आजही लोकांच्या ओठी आहे.

तुमच्या लग्नामुळे तुम्ही कुटुंबाला दुरावलात?

>माझी आई दत्तभक्त होती. त्यामुळेच तिने माझं नाव अनसूया ठेवलं होतं. माझा जन्मही गुरुवारचा होता. मात्र एका गोष्टीची खंत आजही वाटते. माझ्या आईचे व माझे संबंध लग्नानंतर प्रेमाचे राहिले नाहीत. त्या काळात मी यशस्वी होते. चलनी नाणं होते. त्यामुळे माझ्या लग्नाला माझ्या आईचा विरोध होता. आम्ही लग्न केल्यानंतर, मला मुलगा झाल्यानंतर तरी तिचा हा विरोध मावळेल, असं मला वाटत होतं, पण तसं काही झालं नाही. अगदी आईच्या शेवटच्या क्षणापर्यंत ना तिची माझी भेट झाली, ना आमचं मनोमिलन झालं. लग्नानंतर माझं माहेर तुटलं ते कायमचंच!

तुम्ही तुमच्या जीवनात आज समाधानी आहात का?

>फारच समाधानी आहे. एक अभिनेत्री म्हणून मी यशस्वी कारकीर्द केली. चांगला संसार केला. त्यानंतर चित्रपटनिर्मिती केली. माझी दोन्ही मुलं या क्षेत्रात आहेत. मोठा मुलगा प्रसाद आज आघाडीचा कॅमेरामन आहे. त्याचा ‘दुनियादारी’ हा चित्रपट गाजतोय. लहान प्रसन्न हा जाहिरातपटांच्या क्षेत्रात आहे. माझी थोरली सून मालिकांमध्ये काम करते, तर धाकटी सून माझ्या मुलाबरोबर काम करते. नातवंडं वगैरेंमुळे मी अगदी पूर्ण समाधानी आहे.

आपल्याला जीवनगौरव पुरस्कार मिळावा, असं वाटतं का? 

>दादासाहेब फाळके संस्थेतर्फे देण्यात येणारा पुरस्कार मला मिळालेला आहे. तसंच चित्रभूषण पुरस्कार मिळालाय. त्या जीवन गौरव पुरस्काराचं राहून गेलंय. माझ्यापेक्षा तरुण असलेल्या अनेकींना तो मिळाला. मला वाटतं, माझ्या वाटय़ाला आलेलं रसिकांचं प्रेम हाच माझ्यासाठी मोठा पुरस्कार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version