Home महामुंबई खासगी सुरक्षारक्षकांचा राहणार घुसखोरांवर डोळा!

खासगी सुरक्षारक्षकांचा राहणार घुसखोरांवर डोळा!

0

वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात खितपत राहणारे रहिवासी आपल्याला हक्काचे घर मिळेल या आशेने दिवस काढत जगत असतात.

मुंबई- वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात खितपत राहणारे रहिवासी आपल्याला हक्काचे घर मिळेल या आशेने दिवस काढत जगत असतात. म्हाडाद्वारे तयार करण्यात येणा-या मास्टर लिस्टकडे रहिवासी आशेने बघत असतातच. मात्र या मास्टर लिस्टवर दलाल, घुसखोरांचा डोळा असतो. भ्रष्ट अधिका-यांशी संगनमत करून मास्टर लिस्टमध्ये अवैधरित्या नाव घुसवून घरे लाटण्याचे प्रकार अनेकदा उघड झाले आहेत. ही घुसखोरी टाळण्यासाठी म्हाडा खासगी सुरक्षारक्षकांची मदत घेण्याचा विचार करत आहे. मास्टर लिस्टद्वारे वितरण करण्यात आलेल्या घरात मूळ भाडेकरूच राहत आहे ना, यावर सुरक्षारक्षक नजर ठेवण्याचे काम करेल.

संक्रमण शिबिरात राहणा-या तसेच पुनर्विकास होऊ न शकलेल्या उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाच्या ‘मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा’तर्फे मास्टर लिस्ट बनवण्यात येत आहे. म्हाडाच्या सोडतीवर दलाल नजर ठेवून असतातच. मात्र बनावट कागदपत्रेबनवून, आर्थिक गैरव्यवहार करत मास्टर लिस्टमधील घरे बळकावण्यासाठी घुसखोर, दलालांची टोळी सक्रिय असते. याचा फटका मात्र मूळ रहिवाशांना बसतो आणि रहिवासी जुन्या, मोडकळीस आलेल्या संक्रमण शिबिरात ताटकळत राहतो. मास्टर लिस्टसाठी रहिवाशांच्या अर्जाची छाननी करत पात्र, अपात्र अर्जदार ठरवले जातात. मात्र यात बनावट कागदपत्रेसादर केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच काही रहिवासी परस्पर घराची विक्री करून इतरत्र स्थलांतरीत होत असल्याने मूळ भाडेकरू कोण ? असा प्रश्नही अनेकदा उद्भवतो. या सगळय़ावर तोडगा काढत म्हाडाने खासगी सुरक्षा रक्षक पुरवणा-या कंपनीशी विचारणा करण्याचे ठरवले आहे. मास्टर लिस्टद्वारे ज्या म्हाडाच्या गाळय़ांचे वितरण केले गेले आहे त्यावर या सुरक्षारक्षकांद्वारे लक्ष ठेवले जाईल.

ज्या इमारतीत मूळ रहिवासी राहतात, त्या इमारतीच्या सचिवावरही जबाबदारी देण्यात येईल. नेमण्यात येणारे सुरक्षारक्षक महिन्यातून किंवा आठवडय़ातून इमारतीची तपासणी करत मूळ भाडेकरू राहत असल्याची छाननी करेल. घुसखोर आढळल्यास त्यावर त्वरित कारवाईसुद्धा केली जाईल, असे म्हाडाच्या अधिका-यांनी सांगितले.

सुरक्षारक्षकांच्या सहाय्याने म्हाडाच्या घरात होणारी घुसखोरी टाळण्याची योजना पुढे आली आहे. नेमण्यात आलेले सुरक्षारक्षक महिन्यातून किंवा आठवडय़ातून म्हाडाच्या इमारतींचा आढावा घेतील. तसेच सदनिकेत मूळ भाडेकरूच राहत आहे ना, हे तपासण्याची जबाबदारी इमारतीच्या सचिवावरही देण्यात येईल. घुसखोर आढळल्यास त्यावर त्वरित कारवाईसुद्धा केली जाईल. – सुमंत भांगे, मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version