Home महाराष्ट्र ‘गंगा आली रे अंगणी!’

‘गंगा आली रे अंगणी!’

0

बिरवाडी उपसा जलसिंचन योजनेचे काम पूर्ण, आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नांना यश, ३००० एकर जमीन सिंचनाखाली येणार

शहापूर – भातसा धरण परिसरातील बिरवाडीसह इतर पाच पाडय़ांच्या शेतीला उपयोगी ठरणा-या बिरवाडी उपसा जलसिंचन योजनेच काम पूर्ण झाले. गुरुवारी या योजनेची अंतिम चाचणी झाली. आणि ५०३ अश्वशक्तीचे दोन पंप सुरू झाले. राज्यातील अशी ही पहिलीच योजना आहे की, ४० मीटर सक्शन हेड (पंप हाऊसपासून ४० मीटर पाणी उचलून) ७० मीटर सक्शन हेड असलेल्या टाकीत पाणी सुरू झाले. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणा-यांना ‘गंगा आली रे अंगणी’चा आनंद झाला आहे.

८ कोटी रुपये खर्चाच्या बिरवाडी उपसा जलसिंचन  योजनेला २००५ साली ८ कोटी २७ लाख रुपये प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. सदर योजना  २००९ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना ती पुढे अनेक वर्षे रखडली. या योजनेसाठी प्रथम सुधारित मान्यतेनुसार १९ कोटी ५६ लाख प्राप्त झाले असून फ्रेब्रुवारी २०१७ पर्यंत १५ कोटी ४४ लाख खर्च झाले आहेत.  या योजनेमध्ये बिरवाडीसह शेंडय़ाचा पाडा, नावूचा पाडा, मेंगाळपाडा, चौकीचा पाडा, पेंढरघोळ या  आदिवासी गाव-पाडय़ातील सुमारे १,२६७ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येऊन तेथील शेतक-यांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

भातसा धारणाच्या निर्मितीनंतर  बिरवाडी परिसराला सिंचनाची सोय व्हावी म्हणून  स्व.  दादासाहेब खाडे यांनी प्रथम स्वप्न पहिले होते. त्यानंतर  स्व. म. ना. बरोरा यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांच्याकडून बिरवाडी उपसा जलसिंचन योजना मंजूर करून घेतली होती. प्रत्यक्षात या योजनेचे काम २००७ साली सुरू झाले. पण पुढे अनेक अडचणींमुळे  ही योजना रखडली होती. आमदार  पांडुरंग बरोरा यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी  पत्रव्यवहार, विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून ही योजना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला.

गेल्या आठ दिवसांपासून या योजनेची चाचणी सुरू होती. आज या योजनेची अंतिम चाचणी झाली आणि ५०३ अश्वस्शक्तीचे  दोन पंप सुरू झाले. या योजनेमुळे अंदाजे ३००० एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. नाऊचापाडा, चौकीचापडा, शेंडेगाव, बिरवाडी, मेंगाळपाडा, पेंढारघोळ, मढवीपाडा या गावाच्या जमिनी ओलिताखाली येणार आहेत. ही योजना पूर्ण करणे हे एक आव्हानात्मक काम होते. परंतु जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी हे आव्हान स्वीकारले व आमदार बरोरा यांच्या उपस्थितितीत चाचणी यशस्वी पार पाडली. आमदार बरोरा यांच्या प्रयत्नांना यश आल्याने शेतकरी मात्र खूश झाले आहेत.

आज माझे वडील स्व. माजी आमदार म. ना. बरोरा यांचे स्वप्न ख-या अर्थाने पूर्ण झाले असून त्यांच्या स्वप्नातील गंगा शेतक-यांच्या दारापर्यंत पोहोचली  आहे. त्यामुळे या परिसरातील शेती उत्पादनामध्ये वाढ होणार असून याचा फायदा परिसरातील शेतक-यांना नक्की होईल.

– पांडुरंग बरोरा  (आमदार, शहापूर)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version