Home वाचकांचे व्यासपीठ कोकण रेल्वेचे डबे वाढवा!

कोकण रेल्वेचे डबे वाढवा!

3

नऊ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. कोकणवासीयांसाठी रेल्वेने आरक्षण खुले करताच ते अवघ्या दीड मिनिटांत ‘फुल्ल’ झाले. परिणामी भाविकांची प्रतीक्षा यादी भलीमोठी आहे. एसटीचेही आरक्षण संपले की खासगी बसेसवर अवलंबून राहावे लागणार आहे. खासगी बसेसचे मालक-चालक या भाविकांची गरज पाहून अवाच्या सव्वा रक्कम घेऊन कोकणात नेतील. यावर काय उपाय करता येतील, सरकारने, राजकीय संघटनांनी कोणती पावले उचलावीत, यावर ‘प्रहार’ने वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या.. नारायण राणेच यावर चांगला उपाय काढतील, ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी मुंबईत तिकीट काउंटर सुरू करावे, कोकणवासी प्रवासी मंडळ स्थापावे, खासगी बसचालकांना थारा देऊ नये, रेल्वे आरक्षणात होणा-या भ्रष्टाचारामुळे कोकणवासीयांना सणाला जाताना त्रास होतो, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केल्या.

कोकणवासीयांचा प्रश्न कधी सुटणार?

कोकण रेल्वे स्वस्त असली तरी गोवा व दक्षिण भारतात जाणा-या ब-याच गाडया कोकणातील स्थानकांवर थांबत नाहीत व ट्रॅक कमी असल्याने जास्त गाडया सोडल्यास त्यांचे नियमन होत नाही. त्यामुळे उपलब्ध गाडयांना खूप गर्दी होते. अरुंद रस्ते, वाहनांची गर्दी, अनियंत्रित वेग व खड्डे यांच्यामुळे मुंबई सावंतवाडी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. यावर उपाय म्हणजे त्याचे चौपदरीकरण शीघ्रगतीने पूर्ण करणे व त्याआधी दर दोन कि.मी.वर एक वाहतूक पोलिस चौकी उभारून तिच्यातून पुरुष व महिला पोलिसांची महामार्गावर चोवीस तास गस्त ठेवणे. खासगी वाहतूकदारांबाबतचे नियम प्रसारमाध्यमांमार्फत प्रसिद्ध करून त्यांचा भंग झाल्याची तक्रार कुणाकडे व कशी करून तिची तड कशी लावायची याची जनतेस माहिती द्यावी. महामंडळाने जादा गाडया सोडाव्यात. – डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम


रेल्वे आरक्षणात भ्रष्टाचार

गणपतीसाठी कोकणात जाणा-या रेल्वे गाडयांचे आरक्षण फक्त दीड मिनिटात म्हणजेच रांगेतील एकाही प्रवाशाला तिकीट न देताच ‘फुल्ल’ झाल्याचे वाचून विक्रमी बुकिंगचे कौतुक वाटले. आता लोक घरी ‘नेट’वर रेल्वेचे बुकिंग करतात असे कारण दिले जाईल, पण हे सर्व बुकिंग खरोखरच प्रवाशांनी केलेय की दलालही त्यात सामील आहेत हे कोण तपासणार? आता प्रवाशांना एस. टी. बसचे आरक्षण केव्हा सुरू होणार याची वाट पाहावी लागेल, पण तेही काही प्रवाशांना मिळेल. मग खाजगी बसचाच आधार मग त्याचेही तिकिट रुपये ४०० च्या ऐवजी ८०० ते एक हजार रुपये घेतात. खाजगी बसवर शासनाचे किंवा कोणत्याही राजकीय पक्षांचे, संघटनांचे नियंत्रण नसल्याने त्यांची मनमानी चालते. कोकणांत जाणा-या खाजगी बसना सरकारने विशेष परवाना द्यावा, तसेच दर प्रवासी ५००/६०० रुपयांपेक्षा जास्त भाडे आकारणार नाही, असा दंडक घालावा. – मनमोहन रोगे, ठाणे


नारायण राणेच चांगला उपाय काढतील!

कोकणभूमी म्हणजे पृथ्वीतलावरील स्वर्ग आहे. गणेशोत्सव, भराडी देवी जत्रा, महाशिवरात्र, होलिकात्सवात लाखो भाविक जातात-येतात. मात्र एसटी व रेल्वेच्या गाडयांची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होतात. यामुळे खासगी बसवाले गरजू भाविकांकडून वाट्टेल तेवढी रक्कम उकळून त्यांना कोकणात नेतात, याचा विचार एसटी महामंडळाने व रेल्वे प्रशासनाने गंभीरपणे केला पाहिजे आणि गाडय़ा जादा सोडण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी वर्गाबरोबर चर्चा करण्यासाठी कोकणचे भूमिपुत्र आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पाठीमागे कोकणवासीयांनी खंबीरपणे एकत्र येऊन हे काम केल्यास नक्कीच प्रवाशांचे हाल थांबतील. कारण तेच या गंभीर समस्येवर चांगला कायमस्वरूपी तोडगा काढतील, याची खात्री आहे. – प्रवीण पाटील, लोअर परळ


रेल्वेच्या गाडयांची संख्या वाढवा

गौरी-गणपतीच्या सणासाठी गावाकडे जाणार नाही, असा कोकणी माणूस सापडणे कठीण. या माणसांची सणासुदीच्या दिवसांत गावाकडे जाण्याची ओढ पाहून एसटी महामंडळ दरवर्षी मोठया प्रमाणावर जादा गाडयांची व्यवस्था करत असते. मात्र गेल्या काही वर्षापासून प्रवासी गावाकडे रेल्वेने जायला लागले आहेत. सध्या रेल्वेचे बुकिंग आणि आरक्षण करणे, या गोष्टी सोप्या व्हायला लागल्या आहेत. तसेच मोबाइलवरूनही आरक्षण करता येते. शिवाय ‘ऑनलाइन’चीही व्यवस्था आहेच. लोकांचा कल आता जास्त रेल्वेकडे असल्यामुळे कोकण रेल्वेची सेवाही त्यामुळे अपुरी पडू लागली आहे, कारण काही मिनिटांतच या वर्षी आरक्षण पूर्ण झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. याला कारण म्हणजे एकच की, रेल्वेकडे फिरकणारे दलाल. या दलालांनी आगाऊ आरक्षण केल्याने प्रवाशांना तिकिटे मिळत नाहीत व हे दलाल नंतर अवाच्या सव्वा रुपये मागून प्रवाशांना वेठीस धरतात, त्यासाठी रेल्वेने या दलालांच्या धटिंगणशाहीला मोडून काढले पाहिजे व रेल्वेनेही एसटीप्रमाणे कोकणात जाणा-या जादा रेल्वे सोडल्या पाहिजेत. त्यामुळे आधीच फायद्यात असणा-या कोकण रेल्वेला आणखी महसूल मिळेल व प्रवाशांचाही फायदा होईल. – दादासाहेब येंधे, काळाचौकी


प्रवास सुखकर करावा

गणेशोत्सव हा कोकणातील मोठा उत्सव आहे. पोटापाण्यासाठी कोकणाबाहेर राहणारे या सणाला मोठया संख्येने घरी जाण्याची धडपड करतात. मराठी माणसे पर्यटनाला हाच काळ निवडतात, कारण कोकणातील गणेशोत्सव हा देखणा, दृष्ट लागण्यासारखा असेल. तेव्हा कोकणातील लोकांना आपल्या घरी जाण्यासाठी सरकारने आतापासून तयारी करून कोकणवासीयांची सेवा करावी. एसटी कशी सज्ज होते तशीच एसटी महामंडळाने लागतील तेवढया बसेस कोकणात सोडाव्या व कोकणवासी नाराज होणार नाहीत यांची काळजी घ्यावी. – प्रभाकर देशपांडे, गोवंडी


‘स्वाभिमान’ने तिकीट विक्री सुरू करावी

गणेश चतुर्थीला कोकणात जाणे म्हणजे यू.पी., बिहारला जाण्यासारखे आहे. कोकण रेल्वेने गणेश चतुर्थीसाठी जादा रेल्वे गाडया सोडल्या तरी आरक्षण करताना मात्र दोन मिनिटातच कोकण रेल्वेचे आरक्षण ‘तुडुंब’ होते. त्यात दलालांचा सुळसुळाट असतो. कोकणातील वयोवृद्ध विविध कारणांनी मुंबईत येतात. होळी, गणेश चतुर्थीला त्यांना गावची ओढ लागते. या मंडळींना गावी घेऊन जाणे परीक्षाच असते. नाना त-हेचे अडथळे पार करून गावी जावे लागते. परळ-आरोंदा या साध्या एस.टी.चे तिकीट ५५० रुपये आहे व रेल्वेने प्रवास केला तर दादर-सावंतवाडी १६५ रुपये होतात, म्हणून कोकणवासीयांचा कल हा कोकण रेल्वेकडे जास्त असतो. त्यात कोकण रेल्वेचे तिकीट काढणे कठीण झाले आहे. खाजगी गाडया करून गावी जाणे म्हणजे २०-२५ हजार रुपये मोजावे लागतात. यासाठी राजकीय संघटनांनी कोकण रेल्वेचे तिकीट जनतेला मिळण्यासाठी प्रयत्न करावा. पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त व इतर ठिकाणी या राजकीय संघटना मदतकार्य करतात. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जसा कोकणचा कायापालट केला तसेच ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी मुंबईत तिकीट काउंटर सुरू करावे. म्हणजे कोकणवासीयांसाठी सहज तिकिटे उपलब्ध होतील, अशी आशा कोकणवासी करीत आहेत. कोकणवासीयांच्या मनातील भावना व सुख-दु:ख हे फक्त नारायण राणे, नितेश राणे यांच्याशिवाय कोणत्याही राजकारणी नेत्यांना समजणार नाही. – रामचंद्र पेस्त्री, घाटकोपर.


कर्तव्याची जाणीव होणार तरी कधी

गणपतीचा सण जवळ आला की एसटी आणि रेल्वेचे अधिकारी कोकणवासीयांसाठी जादा गाडय़ा उपलब्ध करून देणार, अशी आश्वासने देतात. मागणी किती व पुरवठा किती याचा विचार केला जात नाही. राज्य परिवहन खात्याकडे गणेशोत्सवासाठी मुबलक जादा गाडया नसतील, तर जवळच्या गुजरातकडे तात्पुरता कालावधीसाठी जादा गाडयांची मागणी का करू नये? यावेळी रेल्वेने आरक्षण चालू करताच अवघ्या दीड मिनिटात नोंदणी संपली, असे जाहीर केले. परिणामी प्रतीक्षा यादी हनुमंताच्या शेपटाप्रमाणे वाढतच जाणार. कोकणात जाण्यासाठी आणि मुंबईच्या परतीच्या प्रवासासाठी दोन-तीनच आगारांतून गाडया सोडण्याऐवजी, दादर, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, घाटकोपर, भांडुप, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण या स्थानकांतूनही गाडया सोडण्याची व्यवस्था तात्पुरत्या कालावधीसाठी करणे अशक्यप्राय आहे का? – मधुकर ताटके, गोरेगाव


इच्छाशक्तीचा अभाव

कोकण कायम मागासलेला राहिला. याला कारण विकासाकरिता लागणारे नेतृत्व दुर्मीळ. लोकांकडून निवडणुकीत ‘मते’ घ्यायची आश्वासने देऊन पुढे काहीच विकासाची कामे करायची नाहीत, मग ती एस.टी. असो अथवा कोकण रेल्वे प्रवाशांच्या नशिबी कायम दुर्दैव. कोकणच्या भूमिपुत्रांनी स्वत:च्या जमिनी, जागा दिल्या त्या काय, कर्नाटक, केरळ, गोवा राज्यांतील लोकांच्या भल्यासाठी? कोकणात दोन पॅसेंजर एक राज्यराणी एक्स्प्रेस हेच कोकणचे ‘भूषण’ आहे. कोकणातून या गाडयांसह ३७ गाडया जातात आणि येतात. त्यात कोकणाला स्थान काय याचा मागोवा घ्यावा. – महादेव गोळवसकर, घाटकोपर


कोकणवासी चाकरमानी उपेक्षित

गणपती म्हटले की कोकणातील चाकरमानी गावी जाणारच आणि रेल्वे सुरू झाल्यापासून कोकणात जाण्यासाठी गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली आहे आणि त्यात यावेळेला गणपती सोमवारी येत असून, आधी सुट्टी असल्याने आणखीनच गर्दी वाढणार. आज इतकी वर्षे उलटूनही कोकणातील माणसांना हा असा दु:खद प्रवास का? कोकण हे एक उत्तम पर्यटनस्थळ असून कायम दुर्लक्षित का? निदान होळी, गणपतीला कोकण रेल्वेच्या पटरीवर फक्त कोकणासाठीच गाडया सोडाव्यात. फक्त एक रेल्वे कोकणात सोडली तरी कोकणातील चाकरमान्यांना आधार होईल, खाजगी बस व गाडयावर आळा बसेल व कोकणवासीयांचा गणपती आनंदात साजरा होईल. – मयूर ढोलम, जोगेश्वरी


कोकणवासी प्रवासी मंडळ स्थापावे

मुंबईतील कोकणवासीय दरवर्षी गौरी-गणपती, दिवाळी सुटीत आपल्या गावी जाऊन सण साजरा करतात, पण रेल्वे आणि एस.टी. आरक्षण दोन महिने अगोदर काही मिनिटांत पूर्ण होते. त्यासाठी प्रवासी मंडळ स्थापन करून ५० ते ५५ प्रवासी यांची एखादा रेल्वे डबा किंवा एस.टी. बस आरक्षित केल्यास प्रवास सुखाचा होऊ शकतो. यासाठी सामाजिक व रेल्वे प्रवासी संघटना यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. बोगस नावावर आरक्षण करणा-या दलालांना शिक्षा व्हावयास हवी. रेल्वेचे आरक्षण पूर्ण झाले असेल तर पर्यायी गाडीची त्वरित व्यवस्था करावी, जेणेकरून प्रतीक्षा यादी कमी होईल. खासगी बसेसच्या मालकांनी माणुसकीला जाणून योग्य दरात प्रवाशांची सोय केली तर वाहतुकीवर ताण कमी होऊन चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल, पण यासाठी प्रयत्नांची जोड हवी व आपली मानसिकताही बदलायला हवी. – हरिभाऊ खरनार, उल्हासनगर


बसचालकांवर बंधने लादा

सणानिमित्त कोकणात जाणा-या भाविकांच्या सोयीसाठी सरकारने स्वस्त परिवहन सेवा सुरू करायला हरकत नाही, परंतु त्याचबरोबर खाजगी बसवाल्यांवर कडक निर्बंध घालावेत, जेणेकरून अपघात टाळता येतील. कारण खासगी बसगाडयांच्या वेगावर नियंत्रण नसते. खाजगी वाहनेही मोठया संख्येने येतात परिणामी बरेचदा वाहतूक कोंडी होते. पाच-सहा तासांच्या प्रवासाला १२ तास लागतात. महिला, लहान मुले, वरिष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. राजकीय संघटनांनी पुढाकार घेऊन कोकणातील भाविकांसाठी स्वस्त परिवहन सेवा उपलब्ध करून द्यावी. यात कोकणातून निवडून आलेल्या पुढाऱ्यांनी जास्त सहभाग घ्यावा. गोरेगाव ते मंडणगड (आंबेतमार्गे) रस्त्याची पाहणी करावी. हा रस्ता अरुंद तर आहेच, शिवाय रस्त्याची दुर्दशाही झाली आहे. – संजय जाधव, सांताक्रूझ


गाडयांच्या डब्यांची संख्या वाढवा

कोकण रेल्वे हा एकपदरी मार्ग आहे. तरीसुद्धा रोहयापासून पुढे मंगळूरुपर्यंत गाडयांच्या वेळा ब-यापैकी पाळल्या जातात. तर रोहा-पनवेल दरम्यान गाडया ब-याच वेळा रखडतात. हा मार्ग मध्य रेल्वेऐवजी कोकण रेल्वेला द्यावा. गाडयांत प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी, जनशताब्दी २०, राज्यराणी २४ डब्यांची असावी तसेच रत्नागिरी पॅसेंजर व दिवा-सावंतवाडी गाडयांचेही डबे वाढवावेत. ‘गणपती विशेष गाडयांना २४ डबेच असावेत. रेल्वे आरक्षण सकाळी आठ ते १२ या वेळेत रेल्वेच्या आरक्षण खिडकीवरच मिळावे. ‘ग्रुप बुकिंग’ एक महिनाअगोदर व खिडकीवर १५ दिवस अगोदर मिळावे. – अरुण गुरव, कल्याण (पूर्व)


गैरसोय टाळा

कोकणात गणपतीला जाण्यासाठी भाविकांना विशेष व अधिक रेल्वेगाडया सोडाव्यात, कारण रेल्वे तुलनेने स्वस्त आहे. तसेच स्वस्त परिवहन सेवा सरकारने सुरू करावी. ब-याचशा शाळांना या दरम्यान सुटया असल्याने शाळेची वाहने व वाहनचालक यांनाही सरकारने आपल्या अखत्यारीत वाजवी दरात वाहतुकीसाठी परवानगी द्यावी. खाजगी बसेस व त्याच्या तिकीट विक्रीसाठी निरीक्षक नेमावा किंवा त्यांना तिकीट किमतीची मर्यादा घालून द्यावी. राजकीय संघटनांनीही याबाबत सरकारला मदत करावी. – वासंती काळे, दादर


रेल्वेने प्रश्न मार्गी लावावा

प्रथमपूज्य गणपती हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला गणेशभक्तांसह लहान-मोठी सारेच जण तयारीला लागतात. यंदा कोकणातील चाकरमान्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कोकण रेल्वेच्या सर्वच गाडयांचे विक्रमी आरक्षण झाल्यामुळे चाकरमान्यांच्या आनंदावर विरजण पडले, तर त्यात नवल ते काय? याआधीही अक्षय्य तृतीयेनिमित्त कोकण रेल्वेने आरक्षण सुविधा करूनही चाकरमान्यांना तुडुंब गर्दीतून प्रवास करावा लागला होता, त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात तरी चाकरमान्यांची गैरसोय होणार नाही. यासाठी प्रशासनाने जादा गाडया सोडण्याची पर्यायी व्यवस्था करावी. – उदय वाघवणकर, जोगेश्वरी


प्रवासीसंख्येनुसार सुविधा हवी

परिवहनाच्या अनियोजित धारणामुळे व अचूक अंदाजामुळे ब-याच वेळा कोकणी माणूस अडचणीत आला आहे. या धोरणामुळे त्याला अक्षरश: फरफटत जाऊन प्रवास करावा लागतो. कोकणी माणसाला आरक्षणाचा फायदा होतच नाही. निम्म्याहून अधिक प्रवासी हे सुट्टी मिळण्यावर तिकडे जाण्याचा कार्यक्रम आखतात. आयत्या वेळी आरक्षण न मिळाल्यास खाजगी वाहनांनी जातात. एसटी महामंडळानेही अधिकाधिक बसगाडया सोडल्यास प्रवाशांची खाजगी बसमालकांना होणारी लूट थांबेल. गणपतीसाठी जाणा-या भाविकांसाठी मोठया प्रमाणात बसेस सोडल्यास हा प्रश्न कायमचा सुटणार आहे. सरकारने या बाबीकडे गांभीर्यता दाखविली पाहिजे. प्रवाशांच्या संख्येनुसार बसगाडयांची संख्या हवी. – सचिन टिक, ठाणे


खासगी बसचालकांना थारा नको

गौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ते कोकण रेल्वे पसंत करत असले तरी रेल्वेने आरक्षण खुले करताच ते ‘दीड मिनिटांत फुल्ल’ झाले याचा अर्थ गणपती आगमनापूर्वी एक आठवडे आधी रेल्वेने जादा गाडया सोडणे अपरिहार्य होय! आरक्षणकर्त्यांचा आरंभ प्रवास सुखकर असतोच असे नाही. गाडी आरंभस्थानी फलाटावर लागताच ‘एका मिनिटात फुल्ल’ होते आणि चुकीच्या डब्यात आलेल्या आरक्षित प्रवाशांबरोबर अनारिक्षत प्रवासीही घुसत असल्याने त्यांच्याशी हुज्जत घालण्यात, हुसकावण्यात बरेच श्रम वाया जातात. आरंभ प्रवासच क्लेशकारक ठरतो. जादा डबे जोडण्याबरोबर रेल्वे पोलिस व स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी संयुक्तपणे गर्दीला शिस्त लावण्यादृष्टीने पावले उचलल्यास उपरोक्त त्रासाला बहुतांश आळा बसू शकेल. एस.टी.प्रशासनाने जादा बसेस सोडून खाजगी बसचालकांना अजिबात थारा न मिळावा याची दक्षता घेण्याचे आव्हान पेलावे. – सन्मान चौधरी, वसई


गणेशभक्तांसमोर विघ्न

आता सर्व गणेशभक्तांचे लक्ष गणरायाच्या आगमनाकडे लागले आहे. कोकण रेल्वेचे गणेशचतुर्थीच्या कालावधीसाठी आरक्षण पूर्ण झाले असून कोकणात जाण्यासाठी मुंबईकर चाकरमानी आता एस.टी.च्या आरक्षणाकडे वळणार अन् एस.टी.चे आरक्षणही नाही मिळाले तर आयत्या वेळी महागडया खाजगी बसेस वा इतर वाहनांनी वारेमाप पैसे देऊन सहकुटुंब कोकणात जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे यंदाही खाजगी बसेस-गाडीचालक कोकणी प्रवाशांकडून अमाप पैसा लुटणार. ही लूट थांबणार कशी व कधी? त्याकरिता शासनाने या कालावधीत अधिकाधिक एस.टी.बसेस व रेल्वे गाडय़ा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्यास कोकणी प्रवाशांना आर्थिक ओढाताणीत दिलासा मिळेल. तसेच राजकीय संघटना व स्वयंसेवी संघटना एकत्र येऊन सण-उत्सवांच्या दरम्यान प्रवाशांकडून अमाप पैसा लुटणा-या खाजगी बसेस व इतर वाहनचालकांना योग्य दरात प्रवाशांची नेण्या करण्यासाठी आवाहन करावे, प्रसंगी तसा दबाव आणावा. – विभा भोसले, मुलुंड


दुहेरी प्रवासी भाडयात सवलत द्या

प्रत्येक वर्षी कोकणवासीयांना कोकणात जाण्या- येण्यासाठी रेल्वे, एस.टी. खाजगी बसेसचे आरक्षण मिळवण्यासाठी मोठी परवड सहन करावी लागते. नियोजन करूनही आरक्षण यंत्रणा का कोलमडते? रेल्वे, एस.टी. वेळापत्रकातील अनियमितता, प्रवाशांची संख्या, दरपत्रकातील फरक, आरक्षणातील दुरवस्था, कर्मचा-यांवर पडणारा कामाचा ताण, अपघाताचे वाढते प्रमाण वगैरे कारणांमुळे प्रवास करणेही जिकिरीचे झाले आहे. प्रवाशांची गरज ओळखून जादा एस. टी., रेल्वे आणि खाजगी बसेसची सोय करायला हवी, परंतु योग्य निर्णय आणि त्याची अंमलबजावणी यांचा अभाव दिसतो. कधी कार्यालयीन तांत्रिक अडचणीही उद्भवतात. स्वस्त परिवहन सेवा देण्यात एस.टी. आणि रेल्वे महामंडळातील वरिष्ठ अधिका-यांचे खासगी वाहतूकदारांशी असलेले आर्थिक स्नेहसंबंध आडवे येतात. त्यामुळे खासगी बसवाल्यांकडून गणेशभक्तांची आर्थिक लूट मोठया प्रमाणावर होते. याकरिता प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे व एस.टी.ने वेळापत्रकांत सोयीस्कर बदल करून तोटयाच्या मार्गावरील फे-या तात्पुरत्या रद्द करून जादा विशेष गाडया सोडाव्यात. संदर्भात प्रशासनाने प्रवासी संघटना, प्रवासी यांच्या हरकती व सूचना मागवून चर्चा करून तोडगा काढावा. लूट करणा-या चालक, वाहक, मालकांचे परवाने रद्द करून तुरुंगाच्या शिक्षेसह दंडही आकारावा अन्यथा त्यांनी एस.टी.च्या दरपत्रकाप्रमाणे आकारणी करावी, हे बंधन घातले पाहिजे. मुस्लीम समाजास हज यात्रेसाठी आर्थिक अनुदान देण्यात येते तर गणेशोत्सवानिमित्त गावी जाणा-या कोकणवासीयांना दुहेरी प्रवासी भाडय़ात सवलत द्यावी. – कमलाकर गुर्जर, कळवा


समन्वय हवा

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील गणेशोत्सवाचे रेल्वे आरक्षण अवघ्या दीड मिनिटात ‘फुल्ल’ झाले. १५ ते २० तास अगोदर रांगा लावून, रात्ररात्र जागून पहिल्या क्रमांकाच्या प्रवाशाला सकाळी आठ वाजता खिडकी उघडल्यावर प्रतीक्षा यादीचे तिकीट हातात पडते. याचे मुख्य कारण म्हणजेच मध्य रेल्वेचा कोकण रेल्वेशी असणारा पूर्वीपासूनचा दुजाभाव. उत्सवाच्या काळात नियमित धावणा-या गाडयांचे सुयोग्य परिचालन केल्यास जास्त प्रवाशांना ‘कन्फम्र्ड’ तिकिटे मिळतील. नेत्रावती, मत्स्यगंधा आणि गरीबरथ या गाडया मुंबईतून रात्री सोडाव्यात, कोकणकन्या आणि मांडवी या दोन स्वतंत्र गाडया असाव्यात, कोकणकन्या आणि ‘राज्य राणी’ यांना ठाण्याला अनारक्षित दोन डबे कायमस्वरूपी राखीव असावेत, जनशताब्दी आणि राज्य राणी या गाडयांना रेल्वे बोर्डाकडून कायमस्वरूपी मंजूर झालेले पाच डबे उत्सवाच्या अगोदर विनाविलंब लावावेत, दिल्ली आणि अहदाबादहून वसई मार्गे दक्षिणेकडे कोकणात जाणा-या गाडयांना गणेशोत्सवात कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे द्यावेत. – नरेंद्र कदम, सांताक्रूझ


कोकणाला ‘एसटी’ पावणार का?

कोकणवासीयांसाठी रेल्वेने आरक्षण खुले करताच ते अवघ्या दीड मिनिटांत ‘फुल्ल’ झाले. प्रतीक्षा यादीही भलीमोठी आहे. एसटीचेही आरक्षण संपले की खासगी बसेस अवाच्या सव्वा रक्कम घेऊन भविकांना लुटतील.. अशा या अवघड परिस्थितीवर काय उपाय करता येतील, यावर ‘प्रहार’ने वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या.. या आवाहनावर वाचकांच्या पत्रांचा अक्षरश: पाऊस पडला. एसटीने जादा बस सोडून कोकणवासीयांचे तारणहार व्हावे, यासह अनेक उपाय पुढे आले आहेत..


‘स्वाभिमान’ने करिश्मा दाखवावा

‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता’ अशी आळवणी करणा-या कोकणवासींची प्रार्थना बाप्पानं ऐकली नाही. रेल्वे प्रशासनाने कोकणवासीयांना दामदुपटीने लुबाडण्याचा घातलेला घाट आहे, हे स्पष्ट दिसते. कारण ही सर्व आरक्षित तिकिटे रेल्वेशी संबंधित ट्रॅव्हल कंपन्या, एजंट, रेल्वे कर्मचारी दामदुपटीने विकून आपलं उखळ पांढरं करणार आहेत. हे न थांबणारं आणि न संपणारं दुष्टचक्र तोडायचं असेल तर सरकारने एसटीला समांतर वाहतुकीची सोय करावी. त्यासाठी २०-२५ रुपये जास्त घेतले तरी कोकणी गणेशभक्त तयार होईल. मात्र खासगी बस वा ट्रॅव्हल कंपन्यांकडून होणारी लूट रोखण्याची सरकारची इच्छाशक्ती वा मानसिकता नसावी, असे वाटते. राजकीय संघटनांचे काही सांगता येत नाही, पण ‘स्वाभिमान’चे संस्थापक-अध्यक्ष आणि युवा नेते नितेश राणे यांनी आतापर्यंत केलेले प्रकल्प यशस्वी झाले आहेत. तेव्हा त्यांनी ‘स्वाभिमान’च्या माध्यमातून रेल्वे प्रशासनावर हल्लाबोल करून दीड मिनिटात फुल्ल झालेल्या आरक्षणाचा लेखाजोखा पडताळून पाहण्याची मागणी करावी, कारण या लोकांना त्रास, दाम, दंड – भेद दाखविल्याशिवाय कोकणवासीय गणेशभक्तांना रेल्वेने कोकणात जाण्याचा मार्ग मोकळा होणार नाही. – दिलीप अक्षेकर, माहीम


प्रवाशांनी पुढाकार घ्यावा

गणेशोत्सवात कोकणात जाणा-या प्रवाशांची संख्या लक्षात घेता दरवेळीच्या अपु-या व्यवस्थापनामुळे प्रवाशांचे हाल होतात, हे नित्याचे झाले आहे. गणेशोत्सवात विशेष गाडय़ा मिळाव्यात, यासाठी आग्रह धरला पाहिजे. शिवाय शासनानेही एक महिना अगोदर गणेशोत्सवासाठी अतिरिक्त गाडय़ांची घोषणा करावी. प्रवाशांनीही आयत्या वेळी आरक्षणे जूनपूर्वीच कार्यक्रम निश्चित करावा आणि रेल्वे, एस. टी. महामंडळ तसेच प्रवासी संघटनांशी सल्लमसलत करून सोय उपलब्ध करून घ्यावी. – हरीश बडेकर, मुंबई


कोकणवासीयांचे दुष्टचक्र संपणार का?

गणपतीसाठी मे महिना या हंगामात रेल्वेचे आरक्षण दीड मिनिटात संपते! प्रतीक्षा यादीही मोठी असते. हंगामामध्ये सर्वच जण गावी जाण्यासाठी सज्ज असताना एसटी महामंडळाने जास्तीत जास्त गाडय़ा सोडूनही प्रवासी रेल्वेतून अक्षरश: कोंबलेल्या गुरांसारखा प्रवास करावा लागतो. अशा वेळी खासगी गाडय़ांचा भावही जास्त वाढतो. अशा वेळी राजकीय संघटनांनी त्यांना तालावर आणून भरमसाठ भाववाढीपासून रोखायला हवे आणि यावर सर्वात जालीम उपाय ज्यांना खरेच गणपतीला जायचे आहे, त्यांनीच जावे. रेल्वेला धारेवर धरून प्रत्येक महत्त्वाच्या स्टेशनवरून जादा रेल्वे सोडण्यासाठी आग्रह धरावा. येत्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न सत्ताधारी व विरोधकांनी उचलून धरावा व कोकणातील लोकप्रतिनिधींनी याबाबत आक्रमता दाखवावी, शेवटी कोणकणवासीयांचा वाली कोण, असा प्रश्न पडतो. – सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी पूर्व


बेबंदशाहीला लगाम हवा

प्रवाशांची संख्या दुपटीने वाढल्यामुळे रेल्वे व एसटी प्रवाशांची मागणी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजास्तव इतर पर्यायांचा स्वीकार करावा लागतो. याचाच फायदा घेऊन खासगी बसवाले आपल्या मर्जीप्रमाणे दर ठरवून प्रवाशांची लूट करतात. या बसना पर्यटन परवाना दिलेला असतो. पर्यटन परवाना दिलेल्या बसना प्रवासी वाहतूक करता येत नाही, पण या बस सर्रास प्रवासी वाहतूक करतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. रिक्षा -टॅक्सीप्रमाणेच खासगी बसही प्रवासी सेवेचा भाग आहे. त्यामुळे खासगी बसचे दर शासनानेच ठरवायला हवेत. सरकारी बस सेवेच्या दराचे सूत्र खाजगी बसेसनाही लावायला हवे. त्यामुळे खासगी बसच्या मनमानीला आवर घालता येईल आणि प्रवाशांना माफक दरात प्रवास करता येईल, या सर्व गाडय़ांना नियमाच्या बंधनात आणून त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. नाही तर या खासगी बस कंपन्यांची बेबंदशाही सुरूच राहील. – राजा मयेकर, लोअर परळ


खासगी वाहतुकदारांचे कारस्थान!

पूर्वी फक्त एस.टी. किंवा खाजगी गाडय़ांनी जाण्याचा प्रवास असतानाही भाविक कसेही कोकणात पोहचत असत. रेल्वेचे आरक्षण मिळणे सोपे होणे अपेक्षित होते परंतु आता आरक्षण दीड मिनिटांत ‘फुल्ल’होते. खासगी बसेसना प्रवासी मिळावेत, असा हेतू तर नाही ना, अशी शंका येते. – नरेश नाकती, बोरिवली


अधिकाधिक एसटी बस सोडा

चाकरमानी कोकणला जाण्याची आतुरतेने वाट पहात असताना तिकीटे हाऊस फुल झाल्याचे समजताच भक्तांची पायाखालची वाळूच सरत आहे. चाकरमान्यांसाठी कोकण प्रवास सुखाचा होण्यासाठी अधिकाधिक एस.टी बस व रेल्वेच्याही वाढीव गाडय़ा गणपतीसाठी सोडाव्यात. – दिनेश तुरे, अलिबाग


प्रवास सुखकर कसा होणार?

कोकणवासीयांचा अतिशय आवडता सण गणपती, परंतु आपणगावी कसे पोहोचणार याच विवंचनेत तो बुडालेला असतो आणि ही त्याची खंत गेल्या कित्येक वर्षापासूनची आहे. एस.टी. आपल्या ठरावीक मर्यादेपर्यंत जात नाही आणि महामंडळाचा तोटा हे त्यांचे रडगाणे आहेच. त्यामुळे कोकणवासी पूर्णपणे एसटीवर अवलंबून राहू शकत नाही. वास्तविक पाहता एसटी महामंडळाने असे सण जसे होळी, गणपती, दिवाळी आणि त्यानंतरची उन्हाळय़ाची दीर्घ अशी जवळजवळ दीड-दोन महिन्यांची सुट्टी लक्षात घेऊन आपल्या बसेसची चांगली देखभाल ठेवली आणि या सा-या गर्दीला लक्षात ठेवून फे-या वाढवल्या तर कोकणवासीयांचे गावी जाण्यासाठी हाल होणार नाहीत आणि महामंडळालाही तोटा आवाक्यात ठेवता येईल. या बाबींचा पाहिजे तसा गंभीरपणे विचार एसटी महामंडळ, रेल्वे खात्याकडून होत नाही. रेल्वेच्या गाडय़ा कोकणात थांबवण्यासाठी बिचा-या कोकणवासीयांना आंदोलने करावी लागतात, पण रेल्वे खाते म्हणजे पालथ्या घडय़ावर पाणी. कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्याने त्यांना खाजगी वाहनांकडे वळावे लागते. त्याचाच गैरफायदा खाजगी वाहनचालक घेतात. अवास्त भाडे, खचाखच भरलेली खासगी वाहने हा त्रास सहन करून कोकणवासी गणेशोत्सवात तेथे पोहचतो. – प्रमोद कडू, पनवेल


खासगी बसच्या भाडय़ावर नियंत्रण हवे

कोकणात सर्व जण गणरायाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच्या स्थापनेची सर्वत्र तयारी सुरू झालेली असते. मुंबईत कोकणवासीयांचा जास्त भरणा आणि त्यांचे गणेशप्रेम सर्वश्रुतच आहे. गणरायाच्या आगमनाआधी आपापल्या घरी जाण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असते. रेल्वेने आरक्षण खुले करताच काही मिनिटातच ‘फुल्ल’चा बोर्ड. प्रतीक्षा यादी भली मोठी, तरीपण घरी जाणे आवश्यक. मग काही प्रवासी ग्रुपने मिनी बस करून जाण्याचा प्रयत्न करतात. खासगी बसवाले वाटेल ते भाडे आकारून प्रवाशांना लुटण्याचे काम करतात. या वेळेसही त्यांचा हा धंदा सुरू झाला आहे. भाडे दुप्पट, तिप्पट आकारून आरक्षण करत आहेत. सरकारने यात पुढाकार घेऊन कोकणवासींना त्यांच्या गावी वेळेवर पोहोचवण्यास मदत करणे आवश्यक आहे. यासाठी एस.टी.च्या जादा बसेस तसेच कमी भाडय़ात खासगी बसमधून त्यांना कोकणात पोहोचवण्यास मदत केली तर कोकणवासी सरकारचे आभार मानतील. – लक्ष्मण टिकार, मालाड


सरकारने ठोस पावले उचलावीत

खरे तर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या भाविकांची संख्या पाहता, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने खास सुविधा उपलब्ध कराव्यात तसेच खाजगी वाहनांच्या भाडय़ांवर निर्बंध लादावेत. सरकारने या सणासाठी ‘कोकणवासीय’ मंडळांकडून त्यांच्या सोयीनुसार धोरणे राबवावीत. – ओमकार, विलणकर, प्रभादेवी


एसटी बसची संख्या वाढवा

पैशाचा चुराडा करील, प्रवासात यातना भोगेल, परंतु मुंबई व आजूबाजूच्या शहरांतील चाकरमानी गणपतीसाठी कोकणात जाणारच. गणेशोत्सव काळात कोकणात नवोत्साह, नवचैतन्य पसरते. हिरवळ, पाण्याचे ओढे, झ-यांची खळखळ, भजन, मोहक सुगंधी दरवळ, घरोघर सजावटींची अहमअहमिका, सुगरणींच्या हातचं सुग्रास जेवण, पक्वान्नांची रेलचेल असते. मात्र प्रवासी यातनांमुळे त्यांच्या उत्साहाचे पार खोबरे होते. प्रवाशांना अक्षरश: लुटले जाते. ही लूट थांबवायची असेल तर पुणे, स्वारगेटसाठी जशा पटापट बसगाडय़ा सुटतात, त्याच धर्तीवर कोकणातील प्रवाशांसाठी प्रवासी बस वाहतूक सुरू होणे हाच उत्तम उपाय आहे. – आनंदराव खराडे, विक्रोळी


‘ई मेल’द्वारे आलेली पत्रे..

नियोजनाचा अभाव

गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा पारंपरिक उत्सव आहे, पण तेथे जाण्यासाठी अजूनही सुखकर प्रवास झालेला नाही. तो दिवसेंदिवस खर्चिक तेवढाच त्रासदायकही ठरत आहे. रात्रीची दादर- सावंतवाडी गाडी सोडण्यात राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचा मोठा हातभार आहे. हा एक अपवाद आणि कोकण रेल्वेचे प्रणेते स्व. मधु दंडवते यांचाही अपवाद वगळता कोकणातील, कोणत्याही राजकीय पक्षाने गणेशोत्सवातील प्रवास सुखाचा व्हावा यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. रेल्वेची अपुरी संख्या, हे एक कारण असलं तरी कोकण रेल्वेमार्गाचं दुपदरीकरणं झालेले नाही. सगळीकडे शक्य नाही पण जेथे शक्य आहे तेथे दुसरा रेल्वे ट्रॅक व्हायला हवा. कारण आजही गाडी कितीही वेळेत असली तरी संपूर्ण प्रवासात २ ते ३ तास रेल्वे क्रॉसिंगमुळे ‘फुकट’ जातात. याशिवाय खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर नियंत्रण ठेवावे. एस.टी.च्या जास्तीत जास्त बसेस सोडाव्यात आणि ५० कि.मी. किंवा एक ते दीड तासाच्या अंतरावर वाहतूक पोलिसांच्या तुकडय़ा ठेवाव्यात. – संदेश बालगुडे, घाटकोपर


जलमार्गाचा आता विचार करा

कोकणात पूर्वी जेव्हा रस्ते वाहतुकीचा विकास झालेला नव्हता तेव्हा प्रमुखाने बोटीने प्रवास केला जात असे. ठाण्यापासून कोकणात पुढे अनेक खाडय़ा आहेत. कोकणातील बंदरांचा विकास केल्यास अनेक प्रवाशांना थेट त्यांच्या गावांपर्यंत बोटीने विनासायास पोहोचता येईल. सुसज्ज अशा लहान बोटी त्यासाठी उपयुक्त ठरतील. तातडीची नसलेली अवजड वाहतूक पूर्वीप्रमाणे शिडाच्या गलबतांमधून केल्यास इंधनाचीही बचत होईल. – विवेक जुवेकर, मुलुंड (पूर्व)


डान्सबार’ पुन्हा सुरू होणे योग्य आहे का ?

डान्सबारच्या माध्यमातून समाजात फोफावणा-या अनिष्ट बाबींना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने डान्सबार बंदी घालण्याचे स्वागतार्ह पाऊल उचलले पण त्याला बारमालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राज्य सरकारही यावर लवकरच फेरविचार याचिका दाखल करणार आहे. या याचिकेवर यथावकाश निकाल लागेल. पण हे डान्सबार कायमचे बंद झाले पाहिजेत, ही राज्य सरकारची, आमदारांची आणि सर्वसामान्यांची भावना आहे. मात्र डान्सबार कायमचे बंद करण्यासाठी कोणते उपाय करता येतील? डान्सबारवर ७० हजारांहून अधिक महिलांचा चरितार्थ अवलंबून आहे. बार बंद झाल्यावर अनेकींनी आत्महत्या केली, असा बारमालकांच्या संघटनेचा दावा आहे. त्यात किती तथ्य आहे? बार पुन्हा सुरू करण्यासाठी लोकांची सहमती आहे का? डान्सबार समाजासाठी खरचं घातक आहेत का? डान्सबार पुन्हा सुरू करण्यामागील कारण काय? .. याबाबत वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत. शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा. आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.

प्रहार, वन इंडियाबुल्स सेंटर,
नववा मजला, ज्युपिटर मिल्स कंपाउंड,
लोअर परळ, मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-४०९६९९००.
०२२- ६१२३९९६६

‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन

ऑनलाइन पत्र लिहा vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in

3 COMMENTS

  1. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणपती ९ सप्टेंबरला येत असल्यामुळे नेहमीसारखीच झुंबड सगळीकडे दिसून येत आहे. विशेषकरून रेल्वेची वेटिंगची यादी १००० च्या वर गेलेली असल्यामुळे त्यांच्यासाठी कोकणातून पुढे जाणाऱ्या सगळ्या गाड्यांमधून नेहमीपेक्षा थोड्या जास्त जागा वाढवून प्रवास करण्यास मान्यता द्यावी. बाहेरील डेपोच्या एस.टी. मागवून तेथेही प्रमाणापेक्षा जास्त जागा वाढवून देण्यात याव्यात व प्रवास करण्यास मुभा देण्यात यावी. खाजगी बसवाल्यांवर नजर ठेवून रास्त दरात तसेच थोड्या अधिक प्रवाशांना नेण्याची परवानगी देण्यात यावी. ह्या काळात सेवाभावी संस्थाना प्रोत्साहन देऊन प्रवासी वाहतुकीसाठी उद्युक्त करण्यात यावे त्यासाठी त्यांना सवलतीत डिझेल/पेट्रोल मिळेल ह्याकडे लक्ष पुरविण्यात यावे. महामार्गांची निगा राखण्यात यावी, जेणेकरून प्रवास सुखकर व आनंददायी होईल.

  2. प्रवाशांच्या सेवेसाठी….. दरवर्षी कोकणवासी मोठ्या उत्साहात घराघरांतून गणेशोत्सव थाटामाटात साजरा करतात. मात्र प्रत्येक वर्षी त्यांना कोकणात जाण्या-येण्यासाठी रेल्वे, एस.टी, खासगी बसेसचे आरक्षण मिळविण्यासाठी मोठी परवड सहन करावी लागते. नियोजन करूनही आरक्षण यंत्रणा का कोलमडते ? रेल्वे, एस.टी वेळापत्रकातील अनियमितता, प्रवाशांची संख्या, दरपत्रकातील फरक, आरक्षणातील दुरवस्था, कर्मचा-यांवर पडणारा कामाचा ताण, अपघाताचे वाढते प्रमाण वगैरे कारणांमुळे प्रवास करणेही जिकीरीचे झाले आहे. प्रवाशांची गरज ओळखून जादा एस.टी, रेल्वे आणि खाजगी बसेसची सोय करायला हवी परंतु योग्य निर्णय आणि त्याची अंमलबजावणी यांचा अभाव दिसतो. कधी कार्यालयीन तांत्रिक अडचणीही उद्भवतात. स्वस्त परिवहन सेवा देण्यात एस.टी आणि रेल्वे महामंडळातील वरिष्ठ अधिका-यांचे खासगी वाहतूकदारांशी असलेले आर्थिक स्नेहसंबंध आडवे येतात. त्यामुळे खासगी बसवाल्यांकडून गणेशभक्तांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणावर होते. याकरिता प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे व एस.टी ने वेळापत्रकांत सोयीस्कर बदल करून तोट्याच्या मार्गावरील फे-या तात्पुरत्या रद्द करून जादा विशेष गाड्या सोडाव्यात. यासंदर्भात प्रशासनाने प्रवासी संघटना, प्रवासी यांच्या हरकती व सूचना मागवून चर्चा करून तोडगा काढावा. आज ट्रान्सपोर्ट क्षेत्रात परप्रांतीयांनी शिरकाव करून रेल्वे व एस.टी खात्यास पर्यायी वाहतुकीचा पर्याय देऊन आव्हान दिले आहे. यापुढे तरी लूट करणा-या खासगी वाहतुकीस मज्जाव करून उल्लंघन केल्यास चालक, वाहक, मालक यांचे परवाने रद्द करून तुरूंगाच्या शिक्षेसह दंडही आकारण्यात आला पाहिजे. अन्यथा त्यांनी एस.टी च्या दरपत्रकाप्रमाणे आकारणी करावी हे बंधन घातले पाहिजे. राजकीय संघटना, स्वयंसेवी संस्था, प्रवासी संघटना यांनी स्वस्त दरात खासगी बस सेवा उपलब्ध करून द्याव्यात. जर मुस्लीम समाजास हज यात्रेसाठी आर्थिक अनुदान देण्यात येते तर गणेशोत्सवानिमित्त गावी जाणा-या कोकणवासीयांना दुहेरी प्रवासी भाड्यात सवलत देण्यात यावी अशी मागणी संबंधित लोकप्रतिनिधींनी करून त्याचा पाठपुरावा केला पाहिजे.

  3. कोंकणकन्या एक्सप्रेस, मत्स्यगन्धा एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस (नियमित कोकण गाड्या इ)अतिरिक्त डब्बे जोड़ा जेनेकरून प्रतीक्षा यादि कमी होईल आणि जास्तित जास्त प्रवाशांना त्याचा फायदा होईल… गणपति बाप्पा मोरया…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version