Home वाचकांचे व्यासपीठ गुन्हा दाखल केल्यास डेंग्यूवर आळा घालणे शक्य होईल का?

गुन्हा दाखल केल्यास डेंग्यूवर आळा घालणे शक्य होईल का?

1
संग्रहित छायाचित्र

डेंग्यूची अळी अथवा उत्पत्ती आढळल्यास घरातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे फर्मान महापालिका आयुक्तांनी जारी केले. आयुक्तांच्या या फतव्यामुळे डेंग्यूवर खरोखर आळा घातला जाईल का? 

डेंग्यूने मुंबईत थैमान घातले असून, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला या आजारावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले.

अपयशानंतर आपले खापर मुंबईकरांच्या माथी फोडत घरात डेंग्यूची अळी अथवा उत्पत्ती आढळल्यास घरातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे फर्मान महापालिका आयुक्तांनी जारी केले. आयुक्तांच्या या फतव्यामुळे डेंग्यूवर खरोखर आळा घातला जाईल का? धूरफवारणी करणा-या विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या डेंग्यू पसरण्यास जबाबदार आहे का?

आरोग्य विभागाच्या उदासीन कारभारामुळेच डेंग्यूने डोके वर काढले का? डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे का? भविष्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे का? डेंग्यू पसरण्यास आरोग्य विभागाबरोबर मुंबईकरही जबाबदार आहेत का?

                                                    योग्य कारवाईची गरज

मुंबईत डेंग्यूने डोके वर काढले असून, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे. आपल्या अपयशाचे खापर मुंबईकरांच्या माथी फोडत डेंग्यूची अळी सापडल्यास गुन्हा दाखल करण्याचे फर्मान पालिका आयुक्तांनी काढले. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणे मुंबई महापालिकेचे कर्तव्य आहे. परंतु आपली चूक लपवण्यासाठी मुंबईकरांवरच खापर फोडणे योग्य नसून, यामुळे महापालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून येतो, असा आरोप वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केला. पावसाळ्यानंतर आणि पावसाळ्यापूर्वी साथीचे आजार पसरतात, हे पालिका आरोग्य विभागाला माहीत आहे, तरीही योग्य वेळी उपाययोजना करण्याकडे कानाडोळा केला जात असून, बेजबाबदार अधिका-यांवरच कारवाई केली पाहिजे, असे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून मांडले. पालिका प्रशासन आपल्या जबाबदारीपासून पळत असून, भ्रष्ट अधिकारी व कर्मचा-यांवर प्रथम कारवाईचा बडगा उगारला पाहिजे, असे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केले. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही मुंबईकरांची जबाबदारी असून, मुंबईकरही आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून केला. एकूणच डेंग्यू व मलेरिया पसरण्यास पालिका प्रशासनासह मुंबईकरही जबाबदार आहेत. मुंबई रोगमुक्त करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून काम केले पाहिजे, असा सल्लाही वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला आहे.

पुढाकाराची गरज

अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया डासांचा फैलाव होतो. घरात डासांच्या अळय़ा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा फतवा पालिका आयुक्तांनी काढला. मुंबईकरांना अटक करण्याचा फतवा काढला असला, तरी कारवाई करणे शक्य आहे का, याबाबत अधिका-यांमध्येच संभ्रम आहे. अटक केल्याने खरोखर डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश येईल का, याचा विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. कारवाई करायचीच झाली, तर पालिका प्रशासनातील बेजबाबदार अधिका-यांवर झाली पाहिजे. डेंग्यू, मलेरिया या भयावह आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईकर आणि प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. – संतोष पांढरे, विक्रोळी

तरच रोगांना आळा बसेल

मुंबईत डेंग्यूमुळे ११ जणांना जीव गमवावा लागला, तर शेकडो रुग्ण उपचारासाठी पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात दाखल आहेत.  डेंग्यूची साथ वाढते ती स्वच्छतेच्या अभावामुळे, हे स्पष्ट होते. रस्त्यांवरील टू, थ्री व्हिलर गॅरेज, अनधिकृत बांधकामे याठिकाणी अस्वच्छता असल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. तिथे जर स्वच्छता दिसून येत नसेल, तर त्यावर गुन्हा दाखल केल्यास डेंग्यूवर आळा बसण्याची शक्यता आहे. संख्याबळ कमी आहे, असे सांगून महापालिका अधिकारी मोकळे होतात. मग डेंग्यू व मलेरियासारख्या रुग्णांची संख्येत वाढ का होणार नाही. आरोग्य नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचा-यांची संख्या वाढवली पाहिजे. नागरिकांनी व महापालिका प्रशासनाने आरोग्य जपण्यासाठी एकमेकांची जबाबदारी आेळखली, तरच डेंग्यू व मलेरियासारख्या रोगांना आळा बसेल असे मला वाटते.- प्रदीप थोरात, विद्याविहार

पालिका व नागरिक दोघांचीही जबाबदारी

गेल्या वर्षी याच सुमारास डेंग्यूने कहर केला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांचा मृत्यूदेखील याच डेंग्यूमुळे झाला. त्यावेळी पालिकेतर्फे केलेल्या पाहणीत बडय़ा प्रस्थांच्या घरी असलेल्या फेंगशुई रोपांच्या कुंडीत असलेल्या पाण्यात डासांच्या अळ्या आढळून आल्या होत्या. त्यावेळी सुद्धा जनजागृती मोहिमा राबविल्या गेल्या होत्या. यावर्षी तर ऋषी कपूर यांना डेंग्यूची लागण झाली. त्याचे कारणही घरी असलेली फेंगशुई रोपे होती. म्हणजेच बडय़ा प्रस्थांना जिथे काळजी घेता येत नाही तिथे सामान्यांकडून काय अपेक्षा ठेवणार? परंतु म्हणून पालिका आयुक्तांचा गुन्हा दाखल करण्याचा फतवा मुळीच समर्थनीय नाही. खरं तर या फतव्यामागे पालिकेचे अपयशच आहे. कारण तसे नसते तर मागच्या वर्षीचा धडा घेऊन डेंग्यूच्या फैलावाला आळा घातला गेला असता. यास नागरिकांचा बेजबाबदारपणा, निष्काळजीपणाही तितकाच कारणीभूत आहे. योग्य नियोजन, जनजागृती, नियमित धूरफवारणी, पाणीसाठय़ावर नियंत्रण इत्यादी उपाय डेंग्यू, मलेरिया या रोगांचा प्रतिबंध करू शकतात. परंतु खरी गरज आहे ती पालिका प्रशासन आणि नागरिक या दोघांकडूनही या रोगांच्या प्रतिबंधासाठी प्रामाणिक प्रयत्नांची.- दीपक गुंडये, वरळी

अंतर्मुखपणे विचार व्हावा

डेंग्यू, मलेरियासारखा जीवघेणा आजार पसरू नये, यासाठी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. बेसावधपणा,अति आत्मविश्वास केव्हा केसाने गळा कापेल याचा काही नेम नाही. डेंग्यूची अळी अथवा उत्पत्ती ज्या घरी आढळेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आयुक्तांनी काढलेले फर्मान चुकीचेच आहे. राज्यातील विविध भागांत ज्याप्रकारे डोके वर काढले आहे. त्या तुलनेत स्थानिक स्तरावरील आरोग्य विभागाने नागरिकांना या तापावर सहज उपचार मिळतील, असे पाहिले पाहिजे. म्हणजे ‘पोलिओ’चे समूळ उच्चाटन करण्यासाठी दर काही महिन्यांनी लहान बालकांना पोलिओ निर्मूलनाच्या औषधांचे थेंब त्यांच्या तोंडात टाकले जातात. डेंग्यू या तापाचा वाढता विस्तार पाहता, त्यावर हमखास उपाययोजना काढली जावी. यासाठी परदेशांची मदत घ्यावी लागल्यास ते ही करावे. अस्वच्छता नेहमीच माणसाला संकटात टाकते, हे माहीत असूनही आपण मृत्यूच्या दाढेत चालत जाण्यात धन्यता का मानतो ? माणूस विशेषकरून जेव्हा कोणतेही आर्थिक व्यवहार करतो, तेव्हा फार विचार करूनच पावले टाकतो. कारण सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही, असे असताना आपण आपल्या शरीराच्या बाबतीत निष्काळजी का राहावे? शरीर निरोगी राहिल्यास त्याचा आपल्यालाच उपयोग नाही का होणार? अस्वच्छता करून का आपणच आपले वैरी बना, याचा अंतर्मुखपणे विचार व्हावा.- जयेश राणे,भांडुप

लक्ष देणे गरजेचे

मुंबईत डेंगू या जीवघेण्या आजाराचा सामना लोकांस करावा लागत असून, महानगरपालिकेचे रुग्णालय डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार करण्यास अपुरी पडत आहेत. सांताक्रूझ येथील नवा आग्रीपाडा येथील नागरिकांच्या रहदारीचा मार्ग कचऱ्याने व्यापलेला आहे. विभागात लोकवस्ती जास्त असल्याकारणाने शौचालये कमी पडतात. मात्र महानगरपालिका आणि जनतेने निवडून दिलेले नेतेगण मंडळी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात मग्न आहेत. कोणत्याही ठेकेदारास विभागीय काम सोपवले जाते. परंतु कर्मचारी अपुरा असल्यामुळे साफसफाई योग्य होऊ शकत नाही, असे उत्तर आज महापालिका प्रशासाकडून मिळत आहे. जर कार्य उत्तम नाही, मग असे टेंडर का दिले जाते. विभागात कधीही औषध फवारणी झालेली नाही. नाल्यांची साफसफाई नसल्याने नाल्यात घाणीचे प्रमाण वाढत चालले आहे. महानगरपालिकेने या सर्व गंभीर बाबीकडे लक्ष्य केंद्रित करून नवा आग्रीपाडा विभागास उत्तम करण्यास सहकार्य करावे. डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते पाऊल उचलत मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.- दिलीप बा. साटम, सांताक्रूझ पूर्व

तरच मुंबई रोगमुक्त होईल

गुन्हा दाखल केल्यावर डेंग्यूवर आळा घालणे शक्य होईल का? तर माझे मत नाही. डेंग्यू या साथीवर गुन्हा दाखल केल्यावर पहिल्या प्रथम महानगर पालिकेच्या अधिका-याची चांदी होईल. डेंग्यूच्या रोगावर गुन्हा दाखल करणे पूर्णपणे चुकीचे आहे. गुन्हा दाखल करण्यापेक्षा तुम्ही नियमांचे काटेकोरपणे नियोजन करा. मालदिव हा देश १९८४ पासून मलेरिया मुक्त झाला. २०१२ पासून श्रीलंकेतही मलेरियाचे प्रमाण शून्यावर आले आहे. आपणही प्रयत्न केले तर महाराष्ट्रात मलेरिया व डेंग्यू मुक्त होऊ शकतो. महानगरपालिकेची धूर फवारणी सकाळी असते. मच्छर झाडावर आणि फवारणी मात्र जमीनीवर असते. वास्तविक ही फवारणी सायंकाळी केल्यास मच्छरांचा ख-या अर्थाने नायनाट होईल. महानगर पालिकांने डेंग्यूच्या थैमानाचे ओझे सामान्य नागरिकांच्या खांद्यावर लादू नये. वेळीच नियोजन केल्यास मुंबई रोगमुक्त होईल. – रामचंद्र मेस्त्री, घाटलेगाव

कारवाई हवीच

साचलेले पाणी, जुने टायर, नारळाच्या करवंटय़ा, फुलाझाडाच्या कुंडय़ा, कुलरमधील पाणी, छपरावर टाकलेले प्लॅस्टिक शीट, इतर ठिकाणी पडलेल्या अनेक निरुपयोगी वस्तू, त्यामुळे सर्वात प्रथम पाणी साठवून ठेवण्याला आळा घातला पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाने डेंग्यू फैलाव रोखण्याचे प्रयत्न तर अपुरे पडतच आहेत. पहिल्या प्रथम सोसायटीमध्ये गच्ची व गॅलरीत फुलझाडाच्या कुंडय़ा ठेवलेल्या असतात. त्यांना पाणी टाकले जाते, परंतु कुंडय़ाच्या खालून पाणी झिरपत असते व त्या कुंडय़ा खालील प्लेटमध्ये पाणी जमा होते आणि तेथेच डेंग्यू डासाची खरी उत्पत्ती होते. घराचे मालक याबाबत काळजी घेत नसतील तर प्रत्येक वार्डमध्ये स्वत: अधिका-याने पाहणी करून त्यावर कडक कारवाई करावी. – सुवर्णा मेस्त्री, चेंबूर

समन्वय हवा

डेंग्यूचा प्रादुर्भाव मुंबईत वाढला असून तो जिवावरही बेतू लागल्याने प्रशासनाबरोबरच स्थानिकांनी ही स्वच्छतेबाबत सजग राहणे अत्यंत गरजेचं वाटते. डेंग्यूला लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या आरोग्य विभागाने सर्वस्वी मुंबईकरांना जबाबदार धरणे योग्य नाही. कारवाईची भिती दाखवून डेंग्यूवर मात करणे अशक्य असून समन्वयाने सर्वानी मिळून काम केले तर त्यात शंभर टक्के यश अपेक्षित असते. पालिका कर्मचारी सोसायटी परिसरात नियमितपणे धूर फवारणी करीत नाहीत. त्यातच अलिकडच्या धूर फवारणीतील केमिकल घटकही पूर्वी इतके प्रभावशील नसतात, त्यामुळे या फवारणीलाही डास जुमानत नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईसह राज्यात डेंग्यूचा कहर असून ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न झालेले नाहीत. पावसाळा सुरु झाला की लगेचच आणि नियमित अशा सर्व ठिकाणांचा वेध घेऊन प्रतिबंधात्मक फवारणी करण्याची गरज आहे. त्याचबरोबर याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवून घरोघरी माहिती पोहोचविण्याचीही आवश्यकता आहे. डेंग्यूच्या डासांना काय कोणी आमंत्रण देत नाही, त्यामुळे अधिकारी किंवा मुंबईकरांना जबाबदार धरणे उफराटा प्रकार वाटतो. लोकशिक्षण आणि सार्वजनिक स्वच्छता हाच तूर्तास तरी डेंग्यूवरील उपाय असल्याने तो प्रभावीपणे अंमलात आणण्याची कटिबद्धता प्रशासनाला दाखवावी लागेल. डेंग्यूवर आळा घालण्यासाठी मुंबईकर व महापालिका प्रशासनामध्ये समन्वयाची गरज आहे. – दिलीप अक्षेकर, माहिम

अस्वच्छतेवर नियंत्रण ठेवा!

घराजवळ डासांच्या अळ्या सापडल्यास पालिका प्रशासन संबंधित व्यक्तीवर अटकेच्या कारवाईचा बडगा उगारणार हा प्रकार म्हणजे चोर उलटा कोतवालको डाटे. अस्वच्छतेमुळे डासांच्या निर्मितीला चालना मिळते. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागातील कर्मचारी विभागातील इमारती, गल्ल्यांमध्ये धूरफवारणी करतात. परंतु घरातील शोभेच्या वस्तु, झाडांच्या कुंडय़ा तसेच चिनी वास्तुशास्त्राप्रमाणे हिरव्या रंगाचे लकी बांबू यामध्ये साठवलेले पाणी अशा ठिकाणी डासांच्या अळ्यांची पैदास होते, म्हणून नागरिकांनी याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पालिका प्रशासनाचा अकार्यक्षम कारभारच जबाबदार असून, पर्यायाने पालिका आयुक्त व महापौर यांनी आपली जबाबदारी ओळखून प्रशासनप्रमुखांवर कारवाई करावी. केईएम रुग्णालयातच डासांच्या अळ्यांची पैदास होण्याची ठिकाणे सापडली, मग पालिका प्रशासन कुणावर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होतो. साथीचे आजारांवर मात करण्यासाठी प्रथम अस्वच्छतेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.  – शिवदास शिरोडकर, लालबाग

कामचुकारांवर गुन्हा दाखल करा!

गुन्हा दाखल करण्याचा आयुक्तांचा फतवा एक अजब प्रकार आहे. आपल्यावरची जबाबदारी झटकण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रकार आहे. गुन्हा दाखल केला तर डेंग्यू खरोखरच नाहीसा होईल हा विचारच मूर्खपणाचा आहे. आयुक्तांच्या हाताखाली हजारो कर्मचा-यांचा फौजफाटा आहे ते काय करतात? खरंतर आयुक्त व कर्मचा-यांवर प्रथम गुन्हा दाखल करायला हवा. ‘डेंग्यूला’ आळा घालण्याच्या प्राथमिक जबाबदारीतून महापालिकेची सुटका होऊ शकत नाही. जोपर्यंत इथला भ्रष्टाचार मोडून काढला जात नाही तोपर्यंत ‘डेंग्यू, मलेरिया’ दरवर्षी डोकं वर काढणारचं! आरोग्य विभागाची उदासीनता हा एक गंभीर अदखलपात्र गुन्हा धरला जावा. डेंग्यू, मलेरिया पसरण्यास नागरीकांनी स्वच्छता न पाळणे हा पण एक प्रकार असू शकतो. कामचुकार कर्मचा-यांना कडक शिक्षा हा एक मार्ग असू शकतो.- प्रभाकर देशपांडे, गोवंडी

जनजागृती महत्त्वाची

डेंग्युचे जीवघेणे संकट मुंबईसह महाराष्ट्रभर घोंघावत आहे. ते टाळण्यासाठी मुंबई महापालिकाच नव्हे तर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्तरित्या प्रयत्न केले पाहिजेत. जनतेने नगरसेवकांवर दबाव आणून धूरफवारणी विभागात करुन घेतली पाहिजे. कर्मचारी संख्या वाढवण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली पाहिजे. तसेच धूरफवारणी प्रक्रियेत होणा-या भ्रष्टाचाराचा बिमोड करावा. गुन्हा दाखल करण्यामुळे भ्रष्टाचार फोफावू शकेल. सार्वजनिक ठिकाणी अळ्या सापडल्यास कुणावर गुन्हा दाखल करणार? यामुळे पालिकेच्या या निर्णयाने डेंग्युच्या संकटास आळा बसणे कठीण. डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जनजागृती महत्वाची असून, त्यासाठी महापालिका प्रशसनाने प्रयत्न केले पाहिजे. – डॉ. कृष्णकांत नाबर, माहिम

गंभीरपणे विचार करा

मुंबईकरांची व संबंधित प्रशासनाची असंवेदनशीलता, सुस्ती व नाकर्तेपणामुळेच डेंग्यू आज एक आव्हान व अस्वस्थ करणारी समस्या म्हणून उभी ठाकली आहे हे सत्य! डेंग्यू निर्मूलनासाठी  महानगरपालिकेच्यावतीने विविध माध्यमातून सूचविलेल्या उपायांवर मुंबईकरांची सक्रीय कृतीशीलता व सहभाग जितका महत्त्वाचा, आरोग्य विभागाच्या  असंवेदनशीलता, उदासीनता, सुस्ती व त्रुटी दूर करणे ही अनिवार्यच! ‘समस्यांच्या उपायांची व मोहिमेची अनिवार्यता अशीच सदैव ‘अधोरेखीत’ असणे किती संयुक्तिक आहे का? याचा गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे.- सी.के. बावस्कर, परळ

अस्वच्छता देते रोगराईला आमंत्रण

पर्यावरण बिघडते, धुळीचे लोट पसरतात. दम्याचे आजार वाढतात, काहींच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी मुंबईचे आरोग्य बिघडते. रस्त्यावरील फेरीवाले त्याचा खराब माल रस्त्यावर टाकून जातात. अनधिकृत कृत्याला पाठबळ देणा-यांनीच ‘डेंग्यू’ला कोण पोसतो आहे याचे उत्तर द्यावे. डेंग्यूने मुंबईत थैमान घातले असून सार्वजनिक आरोग्य खात्यावर प्रखर टिका होत आहे. कर्मचारी, अधिका-यांच्या अपू-या संख्येमुळे संपूर्ण शहर रोगराईमुक्त करण्याची अपेक्षा कशी पूरी होणार आवश्यक यंत्रसामुग्री, पुरेसे मनुष्यबळ असेल तेव्हाच रोगराई नियंत्रणात येईल, आपण घाण करू नये. दुस-यास करू देऊ नये. एवढे केले तरी पुरे.- महादेव गोळवसकर, घाटकोपर

यंत्रणा सक्षम हवी

मुंबईला डेंग्यूने विळखा घातला असून १२ जणांचा बळी घेतला. केईएम हॉस्पिटलच्या डॉक्टरचाही मृत्यू झाला आहे. धूर फवारणी भेसळयुक्त झाली आहे, तीला मच्छर दाद देत नाहीत. त्यामानाने आरोग्य विभागाचे काम बरे आहे. सध्याच्या आरोग्याच्या सर्व यंत्रणा अधिक सक्षम केल्या पाहिजेत. काही ठिकाणी कर्मचारी वर्गात वाढ केल्यास साथीचे आजार नियंत्रणात येतील. लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आपले अपयश झाकण्यासाठी हातात झाडू घेणे म्हणजे कर्तृत्व नाही. त्याच्या मूळापर्यंत असलेले दोष काढणे कर्तृत्व ठरेल. – शंकर पानसरे, काळाचौकी

‘ई मेल’द्वारा आलेली पत्रे..

स्वच्छता अभियानाची गरज!

डेंग्यूची अळी अथवा उत्पत्ती आढळल्यास घरातील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे फर्मान महापालिका आयुक्तांनी जारी केले आहे, परंतु कोणतीही साथ ही अस्वच्छतेमुळे पसरते. बांधकाम चालू असलेल्या इमारतींच्या आजूबाजूच्या रस्त्यावर माती, कचरा, पेव्हर उखडलेले रस्ते, साठलेले पाणी, हेच चित्र दिसते व तो कचरा नियमितपणे उचलला जात नाही. बांधकाम साहित्य जर तसेच पडून राहिले तर त्यामध्ये पाणी साठून राहते व डासांची पैदास मोठय़ा प्रमाणावर होते. हवामानातील सतत बदलामुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, त्यामुळे साथ लवकर पसरली जाते. बांधकाम मजुरांची नियमित आरोग्य तपासणी व तेथे धूर फवारणी केली गेली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नागरिकांनीही जागरूक राहून व जबाबदारीने वागून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छता अभियान राबवणे जरुरी आहे.- पुष्पा ढवळे, नवीन पनवेल

स्वच्छता अंगी बाळगा

वाढते शहरीकरण, जीवनशैलीतील बदल यामुळे डासांच्या पैदाशीला मिळणारे प्रोत्साहन यामुळे गेल्या काही वर्षात डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना चांगल्या नागरी सुविधा देण्याचे काम पालिकेला जमलेले नाही. कचरा, घाण उचलण्याबाबत होणारे अक्षम्य दुर्लक्ष आणि पालिकेची उदासीनता यामुळे साथीचे संकट आज मुंबईकरांच्या जीवावर उठले आहे. स्वच्छतेबद्दल पालिकेच्या अधिका-यांमध्ये जागरूकता दिसत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मुंबईकरांनीही डेंग्यूच्या अळ्यांची पैदास ज्या ठिकाणी होते तेथे प्रभावी उपाययोजना करून डास निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. डेंग्यूचा बिमोड करायचा असेल तर स्वच्छता अभियानाऐवजी स्वच्छता अंगी बाळगण्याचा निश्चय करायला हवा.- राजा मयेकर, लोअर परळ

जनजागृती हवी!

सध्या मुंबईत सर्वच रोगांची रेलचेल चालू आहे. स्वच्छतेचा अभाव, नागरिकांची अनास्था व वाढत्या लोकसंख्येने मुंबईत डेंग्यूने जोर धरला आहे. सेलिब्रिटी लोकांच्या घरीच जर डेंग्यूच्या अळ्या सापडतात, यावरून त्यांच्या स्वच्छतेचा हयगयपणा दिसून येतो. यावरून आम्ही किती बेफिकीरपणाने वागतो याचा विचार करायला हवा. सर्व काही आरोग्य खात्यावर सोडून जमणार नाही. याबाबत सर्व रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य नियोजनाची खरी गरज आहे. डेंग्यूसारखे रोग पसरण्यास अस्वच्छता, आळस याबाबीही कारणीभूत आहेत, यासाठी सर्वानी हातात हात घालून सर्व रोगांपासून मुक्तता मिळविण्यासाठी प्रयत्न करूया, तू तू, मैं मैं नको!- सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी

उदासीन धोरण

डेंग्यू आटोक्यात आल्याचे बरेच दावे मुंबई महानगरपालिकेने केले होते. मात्र, मुंबईतील डासांनी महापालिकेच्या या सर्व दाव्यांना फोल ठरवले आहे. रस्त्यात पडलेले खड्डे व त्यात होत असलेल्या डासांची उत्पत्ती, त्या अंडय़ांमधून घोंगावत बाहेर पडणारे लाखो-करोडो डासांचे थवे मुंबईकरांच्या आरोग्यावर हल्ला करतात. मुंबईतील कॉर्पोरट कार्यालयात असलेल्या फेंगशुईची झाडे, फुलदाण्या, एसीचे व्हेंट वगैरेंची सफाई करण्याबाबत महापालिकेने सर्व कार्यालयांना कळवावे. प्रबोधनाची इच्छाशक्तीच नसल्याने मलेरिया-डेंग्यू निर्मूलनास अडथळा निर्माण होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी धूर फवारणी होणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाचे उदासीन धोरण यास जबाबदार आहे.- दादासाहेब येंधे, काळाचौकी

ठोस उपाययोजनांची गरज

महापालिकेने डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्याच्या घरात डासांची उत्पत्तीस्थाने आढळतील त्याला थेट अटक करण्याचा जो फतवा काढला आहे, तो व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यास अपयश आल्याने आरोग्य विभागाने त्याचे खापर मुंबईकरांवर फोडले आहे. शोभेच्या फुलदाण्या, कुंडय़ांच्या खाली ठेवलेल्या प्लेटमध्ये साचलेले पाणी, एसीतून पडणारे पाणी, फ्रीजच्या मागील बाजूस जमा झालेले पाणी, चाळींच्या आसपासचा परिसर या ठिकाणी प्रामुख्याने डेंग्यूच्या अळी आढळतात, आणि त्यातूनच डासांची उत्पत्ती होते. यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. केवळ धुरांची फवारणी मारून चालणार नाही! अपयशी ठरलेल्या पालिकेच्या अधिका-यांना अटक करणार का? जनसामान्यांवर कारवाईचा बडगा उभारून हा प्रश्न सुटणारा नाही! त्यासाठी ठोस उपायांची गरज आहे.- मधुकर कुबल, बोरिवली

पालिकेची उदासीनता!

‘नेहमीच येतो पावसाळा’ याप्रमाणे मुंबई महानगरपालिका दरवर्षी वृत्तपत्रे व दूरदर्शन या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याविषयी आवाहन करीत असते. आता तर ज्याच्या घरात डासांची उत्पत्ती स्थाने आढळतील त्यांना अटक करण्याचा फतवा काढण्यात आला आहे. खासगी इमारतीमध्ये पालिका कार्यवाही करीत असली तरी सार्वजनिक ठिकाणी डेंग्यूची अंडी सापडतात. यावरून पालिकेची उदासीनता दिसून येते. बेजबाबदार पालिकेच्या अधिका-यांना अटक करणार का? मुंबईतील उड्डाणपुलाच्या मोकळ्या जागेत असंख्य भंगार वाहने गेली कित्येक वर्षे पडून आहेत. त्यातही पावसाळ्यात पाणी साचून डासांची पैदास होत असते. अशा वाहनांची त्वरित विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने आठवडय़ातून एक दिवस तरी आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी वेळ काढला पाहिजे. तसेच डेंग्यूच्या नावाखाली उपचाराचे पॅकेज देणाऱ्या डॉक्टर व नर्सिग होमपासून सावध राहाणे आवश्यक आहे.- प्रकाश पेडणेकर, बोरिवली

बेजबाबदार अधिका-यांवर कारवाई करा

अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरिया डासांचा फैलाव होत आहे. घरातील कुंडय़ा, फुलदाण्या व पाणी साचलेल्या जागेवर डेंग्यू, मलेरियाच्या डासांच्या अळय़ा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा पालिका आयुक्तांनी निर्णय घेतला आहे. रहिवाशांना अटक करण्याचा फतवा पालिकेने काढला. परंतु अशी कारवाई शक्य आहे का, याबाबत अधिका-यांमध्येच संभ्रमाचे वातावरण आहे. मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये, तसेच साठलेले स्वच्छ पाणी, अनेक भागांत कच-याचे ढीग साचले असून गटारे, नाल्यांची दुरवस्था झाली आहे. या सर्वाच्या स्वच्छतेची जबाबदारी पालिका प्रशासनाचीच आहे. रहिवाशांना शिक्षेची भीती दाखवणारे प्रशासन आपल्या प्रशासन प्रमुखांवर कारवाई करणार काय, असा सवाल समोर येत आहे.- कमलाकर जाधव, बोरिवली, पूर्व

समन्वयाचा अभाव

महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांत एकूण ७५० रुग्ण दाखल झाले असून, आजपर्यंत मुंबईत डेंग्यूच्या तपामुळे ११ जणांचे निधन झाले नसते. डेंग्यूची साथ जेव्हा जेव्हा वाढते तेव्हा सार्वजनिक स्वच्छतेच्या अभावामुळे वाढते, हेच स्पष्ट होते. रस्त्यांवरील टू, थ्री व्हिलर गॅरेज, अनधिकृत बांधकामे या ठिकाणी अस्वच्छता असल्याने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. तिथे जर स्वच्छता दिसून येत नसेल, तर त्यावर गुन्हा दाखल केल्यास डेंग्यूवर आळा बसण्याची शक्यता आहे. संख्याबळ कमी आहे, असे सांगून महापालिका अधिकारी मोकळे होतात. मग डेंग्यू व मलेरियासारख्या रुग्णांची संख्येत वाढ का होणार नाही. आरोग्य नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचा-यांची संख्या वाढवली पाहिजे. नागरिकांनी व महापालिका प्रशासनाने आरोग्य जपण्यासाठी एकमेकांची जबाबदारी ओळखली, तरच डेंग्यू व मलेरियासारख्या रोगांना आळा बसेल असे मला वाटते. – प्रवीण पाटील, मुंबई

बेजबाबदार अधिका-यांवर गुन्हा दाखल करा

आयुक्त व आरोग्य अधिकारी कार्यालयात बसून डेंग्यूवर आळा घालू शकणार नाहीत. त्यासाठी त्यांनी आपल्या विभागात फिरणे जरुरी आहे. उच्च प्रतीची औषधांची फवारणी न करणे, कचराकुंडी रोजच्या रोज साफ न करणे, नाल्यामधून शौचालयाचे पाणी सोडणे यामुळे चार दिवसांत पाण्यात किडे पडतात. आरोग्य विभागाने मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या उदासीन धोरणामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आपला परिसर स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी तर आहेच, पण कर आकारणा-या मुंबई महापालिकेची अधिक जबाबदारी असून, उदासीन व स्वत:चा स्वार्थ पाहणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांवरच गुन्हा दाखल करा. – अरुण पराडकर, डोंबिवली

स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून..

पावसाळय़ात डासांची उत्पत्ती वाढतेच. परंतु पावसाळा गेल्यानंतरही डासांची वाढ दिसून येते. जनजागृती मोहीम राबवूनही नागरिकांकडून फारशी दखल न घेतल्याने हे आजार  वाढीस लागले आहेत. झोपडपट्टी विभागात धूरफवारणी नियमित होणे गरजेचे आहे. घर, चाळी किंवा झोपडपट्टी विभागात जनजागृती मोहीम राबवून स्वच्छतेचे महत्त्व सांगणे जरुरीचे आहे. उघडे भांडे, अन्न झाकून न ठेवणे, फुलांच्या कुंडय़ा, एसी यांची वेळोवेळी पाहणी करून स्वच्छता ठेवणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वच्छता असेल तर डेंग्यूमुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणे पालिकेची जबाबदारी असून, मुंबईकरांनीही आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. – हरिभाऊ खरनार, उल्हासनगर

प्रशासनच जबाबदार

मनपा प्रशासनाला चांगले ठाऊक आहे की, पावसाळ्यातील साचलेले पाणी-कचरा तुंबण्याच्या जागा पावसाळा संपता संपता डेंग्युला, मलेरियाला जन्म देणा-या ठरतात. मग डास-किटक प्रतिबंध योजना कुणी राबवायला हवी? मुंबईकरांनी की मनपाने? आधीच मनपाच्या पेस्ट कंट्रोल विभागाचे किटक नाशक औषधांबाबतचे प्रकरण गाजले असताना अधिक काही लिहीणे नको, परंतु डेंग्युच्या प्रसाराला सर्वसामान्यांना जबाबदार धरून त्यांना अटक करणे, दंड करणे म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा असाच प्रकार दिसतो. मनपाचे कर्मचारी जेव्हा धूर फवारणींसाठी परिसरात येतात, तर लहानमुळे धुरवाले बाबा, धुरवाले बाबा आरडा ओरडा करीत या धुरात नाचतात, बागडतात. साधे डोळे सुद्धा चुरचुरत नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा कारभार जगजाहीर असून, डेंग्यू पसरण्यास प्रशासनच डबाबदार आहे. विभागीय मनपा सह आयुक्त आणि कीटक नाशक विभागीय अधिकारी या गंभीर प्रकरणाला जबाबदार आहेत. प्रथम त्यांनाच अटक झाली पाहिजे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांचीच आहे.- सुरेश कु-हे, घाटकोपर

योग्य कारवाईची गरज

मुंबईसह राज्यातही डेंग्युचा ताप वाढला असून आतापर्यंत राज्यात डेंग्युचे साडे तीन हजार पेशंट आढळून आले आहेत. आतापर्यंत राज्यात डेंग्युने 24 जणांचा बळी घेतला आहे. राज्याच्या आरोग्य विभागासमोर डेंग्युचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शहरातील डेंग्यु रोखण्यास पालिका अपयशी ठरल्याने या अपयशाचे खापर नागरिकांवर फोडले जात आहे. डेंग्यू ताप हा विषाणूमुळे होणारा ताप आहे. आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ’एडीस इजिप्ती’ जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसरया निरोगी व्यक्तीस संक्रमित केले. साठवलेल्या पाण्यात डेंग्युच्या डासांच्या अळ्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. अस्वच्छ्ता असलेल्या जागेतही डासांच्या पैदास होत असते.घरे आणि सोसायट्यांच्या आवारात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. पालिकेने संबंधित व्यक्ती आणि सोसायट्यांना नोटिसा पाठविल्या असून त्यांच्या तक्रारी महानगर दंडाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आल्या आहेत. ही कारवाई योग्य आहे. – विवेक तवटे, कळवा

आवाज उठवण्याची गरज

मुंबईत स्वच्छता आहे का? दररोज कचरा साफ होत आहे का? करोडो रुपये खर्च करून मुंबईत साफसफाई होत आहे का? याचे उत्तर नाही फवारणी विभागातील कर्मचारी व्यवस्थीत फवारणी करतात का? आयुक्तांनी प्रथम आपल्या कर्मचा-यांवर कारवाई करावी स्वत: फिरून कर्मचारी व्यवस्थीत फवारणी करतात का याची झोपडपट्टीत जावून चौकशी करा. श्रीमंतांच बळी गेला की सरकारला जाग येते. आणि अशावेळी कारवाई सामान्य माणसावर केली जाते, जर खरच डेंग्यूवर आळा आणायची इच्छा असेल, तर पालिकेने प्रथम कर्मचा-यांवर चांगली फवारणी करावी. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपला विभाग स्वच्छ व मच्छर मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. व आपल्या विभागात फवारणी करण्यासाठी येणारा कर्मचारी योग्य फवारणी व औषध टाकतो का? स्वच्छता करतो का? नसेल तर त्याच्या विरुद्ध तक्रार केली पाहिजे ही आपली सर्वाची जबाबदारी आहे.- विद्या सरवणकर, चिंचपोकळी

प्रबोधनाची गरज

मुंबईत डेंग्यूने थैमान घातले असून, आतापर्यंत १२ बळी घेतले आहेत. केईएम रुग्णालयातील महिला डॉक्टरलाही डेंग्यूमुळे प्राण गमवावा लागला. महापालिका प्रशासनातर्फेधूरफवारणी करण्यात येते, ती भेसळयुक्त झाली आहे. पालिका प्रशासनाला डेंग्यूची लागण लागली असून, नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणा अधिक सक्षम केल्या पाहिजेत. कर्मचा-यांच्या संख्येत वाढ करीत उत्तम दर्जाचे आऐषध वापरले पाहिजे. गुन्हा दाखल करणे पर्याय नसून, सर्वानी मिळून साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवले, तरच मुंबई डेंग्यूमुक्त होईल. तसेच भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई केली पाहिजे. तसेच लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. – प्रकाश तायडे, गोरेगाव

महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे वाटते का?

मुंबई महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी महापालिका आयुक्तांसह अधिका-यांनी शपथ घेतली. भ्रष्ट कारभाराला लगाम लावण्यासाठी काही विभागातील अधिका-यांच्या बदल्याही करण्यात आल्या. मात्र कुठल्याही कामासाठी पैशांची मागणी करणाऱ्या महापालिकेचा कारभार खरोखर भ्रष्टाचारमुक्त होईल, का? शपथ घेऊन महापालिका भ्रष्टाचारमुक्त होईल, असे वाटते का? भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्यासाठी नेमक्या कुठल्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे का? लाच देणे व घेणे गुन्हा असल्याने मुंबईकरच भ्रष्टाचारास दोषी आहे, असे वाटते का? भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्यासाठी मुंबईकर व महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे का?

याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.

प्रहार, वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड,
लोअर परळ, मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-४०९६९९००. ०२२- ६१२३९९६६
शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.

आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com  या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.

‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन
ऑनलाइन पत्र लिहा vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता.
त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in

शब्दमर्यादा १०० ते १५० पर्यंत

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version