Home आनंदमंत्र गोल-गोल वेटोळी कलाकुसर आगळी

गोल-गोल वेटोळी कलाकुसर आगळी

1

विशिष्ट प्रकारच्या कागदापासून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या डिझाइन्समधून निर्माण होणा-या कलाकृतींचं क्विलिंग आकर्षक तर दिसतंच. पण आता त्यापासून शोभेच्याच वस्तू नव्हे तर बनवलेले हलकेफुलके दागिनेही काया सजवू लागले आहेत..

क्विलिंग म्हणजेच पेपर वर्क. कागदाची बारीक पट्टी कापून तिला हवी तशी वळवून त्या पट्टीपासून आपल्याला छान छान आकार तयार करता येतात. त्या आकाराचा वापर कितीतरी ठिकाणी करून त्या वस्तूला एक वेगळाच लुक मिळतो. कसं ते आज आपण माहीत करून घेणार आहोत.

क्विलिंग ही एक अशी कला आहे, जिच्यामध्ये पेपरच्या बारीक बारीक पट्टयांचा वापर केला जातो. या पट्टया हातांनी हलकेच दाबून आपल्याला पाहिजे त्या आकारात वळवल्या जातात. मग तो आकार फुलाचा असो वा पानाचा, नक्षीचा असो वा पक्ष्याचा.. कोणताही आकार करताना पेपर खूप जवळ जवळ गुंडाळला जातो. शेवटच्या टोकाला गम लावून त्या पेपरची गुंडाळलेली लहानशी गोळी तयार होते. अशा गुंडाळी गोळ्या बाजूबाजूला ठेवून विविध आकार तयार केले जातात.

क्विलिंगची कल्पना आपल्याकडे आली कुठून ?
पुनरुत्थानाच्या काळात फ्रेंच आणि इटालियन जोगिणी आणि भिक्षुक पुस्तकांचे पृष्ठ किंवा धार्मिक ग्रंथांची सजावट करण्यासाठी क्विलिंगचा वापर करत असत. त्यासाठी ग्लिडेड पेपरचा वापर केला जाई. लोखंडी कलाकुसरप्रमाणे अतिशय बारकाईने कलाकुसर केली जाते. त्यामुळे क्विलिंग हा प्रकार आयर्नवर्कच्या अनुकरणातून आला आहे, असं म्हटलं जातं. अठराव्या शतकात हा कला प्रकार युरोपात खूप प्रसिद्ध झाला. तिथल्या महिला फावल्या वेळात ही कलाकुसर करत असत. यासाठी खूप मेहनत किंवा पैसे लागत नसल्याने घरबसल्या या महिला अगदी सहजपणे ते करत. युरोपप्रमाणेच हा प्रकार अमेरिकेतही प्रचलित आहे. इतकंच नव्हे, तर अमेरिकन राजवटीतील काही कलाकुसरी पाहिल्या असता या प्रकारच्या सजावटीची कित्येक उदाहरणं आपल्याला सापडतात.

अशा प्रकारची कलाकुसर प्रामुख्याने लाकडी कपाटांवर, लोखंडी स्टँडवर, लाकडी फळ्यांवर, महिलांच्या पर्सवर प्रामुख्याने केली जात असे. टी कोस्टरवर, ज्वेलरीच्या लाकडी बॉक्स अथवा ड्रॉव्हरवरही केली जायची. मध्यंतरी तर अशा स्वरूपाची कलाकुसर खोबणीच्या पृष्ठभागावरही केली जायची. आता तर क्विलिंग हा प्रकार कलाकुसर किंवा चित्रकलेशीही जोडला गेला आहे. हा प्रकार उच्चभ्रू लोकांचा आहे असा कहीसा समजही कला जगतात पसरला आहे. कित्येक कलादालनातही हा प्रकार आढळतो.

आता मात्र या कलेत कित्येक बदल झाले. नवनवीन तंत्राबरोबरच कलेच्या रचनेत आणि साहित्यातही बदल होऊन हल्ली या कला प्रकाराला खूपच लोकप्रियता मिळालेली दिसते. दैनंदिन जीवनातही त्याचा सर्रास वापर होऊ लागला आहे. या कलेची व्याप्ती वाढली आहे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ही अतिशय कमी खर्चिक कलाकुसर आहे. म्हणूनच याचा वापर लग्नपत्रिका आणि शुभेच्छा पत्रांची सजावट, स्क्रॅप बुकची पानं, विविध बॉक्स, फुलदाणी, इतकंच नव्हे तर दागिन्यांमध्येही मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आहे. वजनाला हलके आणि अगदी आखीवरेखीव असल्याने हे दागिने जास्त लक्षवेधी दिसतात.

कोणत्याही मार्केटमध्ये हा क्विलिंगचा पेपर मिळत असून त्यात जवळपास २५०पेक्षा अधिक रंग आणि आकार उपलब्ध आहेत. सॉलिड कलर क्विलिंग पेपर, ग्रॅज्युएटेड क्विलिंग पेपर, अ‍ॅसिड फ्री, टू टोन क्विलिंग पेपर असे काही प्रकार उदाहरणादाखल सांगता येतील. त्यांची जाडीदेखील १/८ इंच, १/४ इंच, ३/८ इंच अशी आहे. यातल्या काही पेपरची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.

अ‍ॅसिड फ्री पेपर – नावावरूनच हे कळतंय की, हा पेपर अ‍ॅसिड फ्री आहे. त्यामुळे या प्रकारचा कागद स्क्रॅप बुक, रबर स्टॅम्प आणि चित्रफ्रेम तयार करण्यासाठी वापरला जातो. या पेपरच्या वापरामुळे तुम्ही केलेली कोणतीही कलाकुसर दीर्घकाळ टिकू शकते. त्यावर कशाचाही परिणाम होत नाही.

ग्रॅज्युएटेड क्विलिंग पेपर – हा पेपर वापरल्याने तुमच्या कलाकुसरमध्ये एक वेगळाच आकर्षक लुक येतो. यात एकाच रंगाच्या दोन शेड्स असतात. म्हणजे गडद रंगापासून सुरुवात होते आणि फिक्या रंगाच्या शेडवर संपते. कधी कधी याउलटही स्थिती असते.

टू टोन क्विलिंग पेपर – हा ग्रॅज्युएट पेपरप्रमाणेच असतो. मात्र याच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूंना एकाच रंगाच्या गडद आणि फिक्या अशा दोन शेड्स असतात. त्यामुळे कलाकुसरमध्ये एकच रंग कायम राहतो. केवळ रंगाच्या उत्कटतेमध्ये थोडाफार फरक असतो. याचा उपयोग प्रामुख्याने तयार चित्राला उठाव देण्यासाठी केला जातो. त्यामुळे एकाच ठिकाणी खूप पेपर वापरले असल्याचा भास होतो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version