Home ऐसपैस ग्रँड चव

ग्रँड चव

1

दिवाळीचा माहौल म्हणजे खाण्यापिण्याची अगदी रेलचेल असते. सतत काहीना काही गोडधोड समोर येतचं असतं. एरवी पेढयासाठीही आवर्जुन हात पुढे करणारी अनेक खवय्यी माणसं या काळात मिठाईच्या ताटालाही नाही म्हणतात. या गोडधोड खाण्याचा जरा अतिरेक झाला असेल व आपल्या जिव्हेला काही वेगळं चटपटीत खाण्याची इच्छा होणार असेल तर त्यासाठीचा परंपरागत असा पर्याय मुंबईत आहे तो म्हणजे ‘हॉटेल ग्रँड’.
क्रॉफर्ड मार्केटच्या जवळ असलेल्या हज हाऊसच्या शेजारी ग्रँड हॉटेल आहे. हे हॉटेल ग्रँड म्हणजे नेमकं कोणतं हॉटेल असा प्रश्न पडला असेल तर याचं दुसरं नाव म्हणजे पोलिस कँटीन. हे हॉटेल सुरु झालं ते १९५० साली. ज्या जागी हे हॉटेल होते त्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात ‘गॅन्ट’ या गव्हर्नरचं घर होतं. त्या ठिकाणी ब्रिटीशांनी बांधलेली एक सुंदर इमारत होती. स्वातंत्र्यानंतर ही जागा मद्यप्रतिबंधक विभागाला देण्यात आली. त्या काळात आजुबाजूची जागा ही पोलिसांच्या छावण्यांनी व कारागृहानं व्यापलेली होती. या गव्हर्नर साहेबांच्या बंगल्याच्या समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये लक्ष्मण वर्मा हे नोकरी करत होते. पोलिसांना, कारागृहात चहा वगैरे नेऊन देण्याचं काम ते करत असत. त्यानंतर जेव्हा या जागी नवे कार्यालय आणले तेव्हा अनेकांनी त्यांना इथेच त्यांचे स्वत:चे हॉटेल सुरू करायला सांगितले. सुरुवात झाली ती चहापासून नंतर काही नाश्त्याचे पदार्थ. पोलिसांना साधारण मांसाहारी जेवणाची आवड होती. त्यांनी त्यांना ऑम्लेट वगैरे द्यायला सांगितले. तिथून मग त्यांनी पहिला पदार्थ द्यायला सुरुवात केली तो खिमा पाव. आपल्या खास चवीनं हा खिमा पाव लवकरच पोलिसांमध्ये लोकप्रिय झाला. त्याची चव मग कनरेपकर्णी सगळीकडेच पसरली व नंतर सुरू झाली ती पोलिस कॅंटीनची सद्दी. पुढे ही जागा हज हाऊसला देण्यात आली. त्यावेळी सरकार, हज कमिटी यांनी त्यांना एक वेगळी जागा दिली व हे हॉटेल ग्रँड नावानेच इथे १९९६ साली सुरु करण्यात आले. लक्ष्मण वर्मा यांची जुळी मुलं श्रीधर व शेखर वर्मा हे सध्या हे हॉटेल चालवत आहेत. प्रत्यक्ष लक्ष, सर्व मसाले आपल्याच देखरेखी खाली करून घेणं, माशांपासून ते इतर सर्वच खरेदी स्वत: करणं यामुळे या हॉटेलमधल्या पदार्थाना एक खास चव प्राप्त झाली आहे. आपल्या हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे सर्वच पदार्थ हे खास दर्जाचे असावेत यावरही या दोन्ही बंधूंचा कटाक्ष असतो. सकाळपासून ते रात्रीपर्यंत दोघेही जण सर्वच ग्राहकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांना काय हवं नको ते पाहतात. ग्रँड ची चव ही खास त्यांच्या या थेट जनसंपर्कालाही आहे. आतापर्यंत अनेक मोठ मोठया लोकांनीही या हॉटेलमध्ये हजेरी लावली आहे.

आज फोर्ट विभागात कामासाठी येणा-यांच्या पार्टीचं हे अगदी आवडतं असं ठिकाण आहे. तुम्ही जर दुपारच्या वेळी कधी इथे गेलात तर तुम्हाला तातडीने बसायला व जेवायला मिळेल याची शाश्वती कमीच. तुम्हाला काही वेळाची प्रतीक्षा ही करावीच लागणार हे ठरलेलच. एक मात्र खरं की आपण केलेली प्रतीक्षा वाया गेली नाही हे तुम्हाला इथल्या कोणत्याही पदार्थाच्या पहिल्या घासातच लक्षात येईल. ग्रँडची सुरुवात होते ती अगदी सकाळपासूनचं म्हणजे इथे सकाळी खास खिमा पाव खाण्यासाठी अनेक खवय्ये हे मुंबईच्या कानाकोप-यातून येतात. या खिम्याला एक वेगळीच चव आहे. यातला जो तिखटावा आहे त्याला गरम मसाला व मिरची पावडर यांचे एक विशेष मिश्रण व त्याच्या बरोबर ओल्या मसाल्याचा एक जबरदस्त ब्लेंड झाल्याचं लक्षात येतं. एकाच पदार्थात मटणाचा खिमा, लाल तिखट, गरम मसाला व त्याच्या बरोबर आलं लसुणाच्या वाटणाची एक खास चव या खिम्याला येते. आजकाल अनेक ठिकाणी खिमा खातांना आपण भाजीचा खिमा खातोय की काय असं वाटत असतं. इथला खिमा म्हणजे अगदी ताज्या मटणापासून तयार केलेला लुसलुशीत असा असतो. त्याच्या बरोबर पाव तोही ग्रँड हॉटेलसाठी खास तयार करण्यात आलेला. इथला खिमा हा थोडा तिखट असतानाही खिम्यावर एक मिरची दिली जाते. काही खवय्यांना ही मिरचीही प्रचंड आवडते. तुम्हाला जर थोडं तिखट वाटलं तर सोबतीला असते ती लिंबाची फोड व कांदा. इथे नाश्ता करण्यासाठी अनेक पदार्थ तसे उपलब्ध असतात. त्यातही ऑम्लेट पाव, भेजा फ्राय या सा-या गोष्टी इथे मिळतात. तुम्ही जर तीन चार जणांच्या ग्रुपनं नाश्ता करायला जाणार असाल तर इथल्या सगळ्याच पदार्थाची चव तुम्हाला सहज घेता येईल. दुपारच्या जेवणासाठी तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातही क्रॉफर्ड मार्केटच्या मासे बाजाराच्या जवळ असलेलं ग्रँड इथे मिळणा-या माशांसाठी अगदी प्रसिद्ध आहे.

त्याची जाणीव त्यांच्या माशांचे पदार्थ खातांना सहज येते. इथे जर सुरमई थाळी मागवलीत तर त्यात सुरमईचा अगदी मोठा तुकडा येतो. तशीच गोष्ट इतर माशांचीही असते. इथे माशांचे काही खास पदार्थही आहेत. त्यातही स्टफ पापलेट ही इथली खासियत. यात पापलेटच्या आतमध्ये हिरवी पुदिन्याची चटणी भरली जात असते. हे पापलेट नंतर मग मसाल्यात घोळवले जाते व नंतर ते तळले जाते. हे पापलेट कशाही बरोबर खायचं नाही. ते एक पापलेट मागवायचं व त्यावर यथेच्छ ताव मारायचा. लाल मसाल्यातलं पापलेटचं आवरण, त्यात पांढ-या रंगाचं पापलेटचं मांस व आतली हिरवी चटणी याचं असं काही कॉम्बिनेशन होतं की वाह क्या बात है. इथे खिम्याचे अनेक प्रकारही मिळतात. त्यात खिमा भेजा फ्राय खाण्यासाठी अनेकजण अगदी सकाळपासूनचं गर्दी करतात. अंडं व खिमा याचा मिलाफ असलेला खिमा घोटाला हीसुद्धा अनेकांची आवडती डिश. इथे माशांचे काही खास प्रकारही आपल्यासाठी असतात. त्यातल्या त्यात चटणी सुरमईची लज्जत काही न्यारीच असते. काहीशा फिक्या असलेल्या रव्यात तळलेल्या सुरमईचा मोठा तुकडा व त्याच्या बरोबर आलेली खास पुदिनाची चटणी. ही खाण्याचीही एक खास पद्धत आहे. केवळ सुरमईचा एक मांसल तुकडा घ्यायचा व तो पुदिन्याच्या चटणीत घोळवायचा. या घासात मासा, मसाला व पुदिना याचा असा एक सुरेख मिलाफ आपल्या जिभेवर होतो की क्या बात है. त्याच्या बरोबरच खास गावरान कोंबडीचे मटणही आपल्याला समाधान देऊन जातं. इथे अगदी खास तयार करण्यात आलेल्या झिंगा मसाल्याची चवही बराच काळ जिभेवर रेंगाळणारी अशी आहे. तांदळाच्या भाकरीबरोबर हा झिंगा मसाला एक वेगळीचं मजा देऊन जातो. यानंतर आपल्याला भात खावासा वाटत असतो मात्र तो थोडया प्रमाणात, आपल्या ग्राहकांची ही गरजही त्यांनी अगदी अचूक ओळखली आहे. इथे आपल्याला एक मुद भातही दिला जातो. जोडीला एका वाटीत कोंबडीचा रस्सा, आपली कितीही इच्छा नसली तरी हा एक मूद भात कमीच पडत असतो. आपल्या कोणत्याही थाळीबरोबर इथे आपल्याला मागवता येतात ते तळलेले बोंबिल. आपण जरी अनेक ठिकाणी कुरकुरीत तळलेले बोबिंल खात असलो तरी इथल्या बोबिंलांची गंमतचं काही और असते. त्याच्या बरोबर अगदी सहज खाण्यासाठी म्हणूनही आपल्याला इथे मांदेली वा इतर गोष्टी खाता येतील. या सगळ्या पदार्थाबरोबरच इथली खास बिर्याणी ही खायलाच हवी. इथे येणारे अनेकजण हे आपल्या लंच टाइममध्ये येत असतात. त्यांना कधी कधी पटकन काहीना काही खाऊन निघायचे असतं. त्यांच्यासाठी हा बिर्याणीचा पर्याय अगदी चांगला व योग्य असा आहे. ग्रँडच्या सर्वच गोष्टी या अशा वेगवेगळया वैशिष्टयांनी आपल्यासमोर येत असतात.

आतापर्यंत अनेक दिग्गजांनी गौरवलेले अशी ओळख असली तरी ग्रँडचे मालक लक्षात राहतात ते त्यांच्या विनम्र स्वभावामुळे व त्यांच्या आतिथ्यशिलतेसाठी. ही चव, ही वागणूक एकदा तरी अनुभवायला हवीच, ती एकदा का अनुभवलीत की त्याची आपल्याला सवय होऊन जाणार हे निश्चितच.

1 COMMENT

Leave a Reply to Pandudada. Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version