Home महामुंबई ठाणे घागर उताणी रे..!

घागर उताणी रे..!

0

कल्याण पूर्वेत पाणी येत नसल्याने अधिका-यांना दिले मडके, पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर नागरिकांसह मनसेचा मोर्चा

कल्याण – यावर्षी दमदार पावसामुळे समाधानकारक पाणीसाठा झाला असला तरी पालिकेच्या ढिसाळ वितरण व्यवस्थेमुळे कल्याण पूर्वेतील बहुतांश भागात आजही पाणी समस्या कायम आहे. अनेकदा आंदोलने निवेदने देऊनही पालिका प्रशासन आश्वासनापलीकडे काहीच कार्यवाही करत नसल्याने शनिवारी संतापलेल्या नागरिकांसह मनसेच्या पदाधिका-यांनी पालिका ड कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत पाणी समस्या निकाली काढण्याची मागणी करत उपहासात्मक ‘मटका फोडो’ आंदोलन करत अधिका-यांना रिकामे मडके भेट देत निषेध नोंदवला. यावेळी पालिका अधिकरी राजीव  पाठक यांनी ड प्रभाग कार्यालयात धाव घेत लवकरात लवकर पाणी समस्या निकाली काढण्यात येईल असे आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले.

पाणीसाठा पुरेसा असूनही पालिकेची सदोष वितरण व्यवस्था, पाणीगळतीकडे होणारे दुर्लक्ष, अनधिकृत नळजोडण्या यामुळे कल्याण पूर्वेतील बहुतांश भागात पाणी समस्या तीव्र बनली आहे. याबाबत अनेकदा लोकप्रतीनिधींसह नागरिकांनी पालिका प्रशासनाविरोधात आंदोलने केली. पालिका प्रशासनाने नेहमीप्रमाणे आंदोलनकर्त्यांना आश्वासने दिली. मात्र त्यानंतरही पालिका प्रशानाने दुर्लक्ष केल्याने आजही कल्याण पूर्वेतील नागरिक पाणी समस्येने ग्रस्त आहे. दोन महिन्यांपूर्वी मनसेने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याने पालिका प्रशासनाने हा प्रश्न बैठक घेत लवकरच निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही काहीच कारवाई न झाल्याने अखेर शनिवारी संतापलेल्या नागरिकांसह माजी नगरसेवक अनंता गायकवाड, उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे, शाखा अध्यक्ष मनीष यादव, मनविसे उपशहर अध्यक्ष भूषण लांडे, विभाग अध्यक्ष विनीत भोई, देवेंद्र पिंगळे आदी पदाधिकरी, कार्यकर्त्यांनी पालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढत पालिका कार्यालयात मटका फोड आंदोलन केले.

मनसेच्या वतीने अधिका-यांना मडके भेट देत पालिकेच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. पालिकेचे अधिकारी  राजीव पाठक यांनी तीन दिवसांत पाणी समस्येबाबत तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी लवकरच जलवाहिनीचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version