Home कोलाज चड्डीकडून चड्डीकडे..

चड्डीकडून चड्डीकडे..

1

हेडगेवार, गोळवलकर, देवरस यांनी सरसंघचालकपदाला मिळवून दिलेली प्रतिष्ठा डॉ. मोहन भागवतांनी धुळीला मिळवली. प्रथमच कुण्या सरसंघचालकाने मदर तेरेसा यांच्या सेवावृत्तीवर प्रश्नचिन्ह लावले. सारे बोलत आहेत. पण मोदी गप्प आहेत. संघ परिवारात येऊ घातलेल्या वादळापूर्वीची ही शांतता समजायची का?
समाज ज्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहतो अशा लोकांनी हल्ली जीभ मोकळी सोडली आहे. आपण काय बोलतो, त्याचे समाजावर काय परिणाम होतील याची कुणाला चिंता राहिलेली नाही. बोलतात आणि नंतर कानावर हात ठेवून मोकळे होतात. अशा पुढारी लोकांच्या पंगतीत संघ परिवारातील लोकही आता उतरले आहेत.

 ‘हिंदू महिलांनी चार मुलांना जन्म द्यावा’ असा आदेश साक्षी महाराजांनी काढू पाहिला. घरातून मार पडला तेव्हा ते फिरले. पण त्यानंतरही ‘चार पाळण्याची’ भाषा प्रवीण तोगडियांपासून अशोक सिंघलपर्यंत परिवाराने चालवली. एका शंकराचार्याने तर १० पोरं जन्माला घालण्याची धर्माज्ञा दिली.

मोदींसाठी हे सर्व करावे लागेल असे त्यांचे म्हणणे होते. गेले नऊ महिने हे ‘शब्दांचे पाळणे’ आपण हलताना पाहिले. कुणीही हे ‘पाळणे’ थांबवले नाहीत. शेवटी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनाच ‘स्त्रिया म्हणजे पोरं जन्माला घालायचे कारखाने नाहीत’ असे सांगावे लागले. पण तोवर बरेच पाणी पुलाखालून गेले होते. मोहन भागवत ‘माणसात आले’ असे वाटत असताना त्यांनी जीभ सोडली.

या जगात काही व्यक्ती अशा आहेत की, त्यांचे नाव घेतले की मूíतमंत त्याग समोर येतो. त्यांची जात, त्यांचा धर्म, त्यांचा हेतू मनात येत नाही. माणूस मनोमन नतमस्तक होतो. ज्यांचे पाय पाहावे अशा व्यक्ती अलीकडे दुर्मीळ झाल्या आहेत. जे थोर होऊन गेले त्यांचे पद्धतशीर प्रतिमाभंजन सुरू आहे.

साईबाबांची जात आतापर्यंत कुणी विचारली नव्हती. पण आता ते सुरू झाले आहे. साईबाबा मराठवाडयातील आणि ब्राह्मण कुटुंबातील होते असे सांगितले जात आहे. महात्मा गांधींची तुलना सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी करण्याचा मध्यंतरी भाजपाने प्रयत्न केला. आता भरतपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी अकलेचे तारे तोडले.

मदर तेरेसा म्हटल्या की, सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यांपुढे त्यागमूर्ती, सेवामूर्ती उभी राहते. पण भागवतांना काही वेगळेच दिसते. ‘मदर तेरेसा यांनी केलेल्या गरिबांच्या सेवेमागे नागरिकांचे ख्रिश्चन धर्मात धर्मातर करणे, हा हेतू होता’ असे ते म्हणाले.

तेरेसांच्या सेवेबद्दल भागवतांची तक्रार नाही. पण, त्यामागे एक उद्दिष्ट असायचे असा त्यांचा आक्षेप आहे. त्यांच्या या वक्तव्यावर वादळ उठले तेव्हा संघ परिवाराने सारवासारव केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. भारतात कायद्याने धर्मातराची मुभा आहे. फक्त ते बळजबरीने नको. प्रत्येक धर्म आपला व्याप वाढवण्याची धडपड करतो. ख्रिश्चनही त्याला अपवाद नाहीत.

दोन हजार वर्षापूर्वी ख्रिश्चन भारतात आले तेव्हापासून हे सुरू आहे. उत्तर-पूर्वेकडील राज्यांमध्ये आज ख्रिश्चनबाहुल्य पाहायला मिळते. अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट भागात अनेक खेडूतांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पण त्यांच्या घरात आजही हिंदू संस्कार सुरू आहेत.

मुसलमानांचीही लोकसंख्या वाढते आहे. अनेक मतदारसंघ असे आहेत की, मुस्लीम लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय निवडून येणे कठीण आहे. संघ परिवाराच्या हे लक्षात आल्याने त्याने धर्मातराला बंदी आणा, असा दबाव आणणे अलीकडे सुरूकेले आहे. पण व्होट बँकेच्या राजकारणात मदर तेरेसा यांना त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल १८ वर्षानी खेचणे कितपत योग्य आहे? ख्रिश्चन मिशनरी भारतात गरिबांची सेवा आणि आणखी काय काय करतात हे उघड गुपित आहे. धोबीघाटावर त्याची चर्चा करून समाजात तेढ वाढवायची काय गरज आहे?

कुणीही माणूस एखादे कार्य हाती घेतो तेव्हा त्यामागे एक उद्दिष्ट असते. संघही हिंदुत्वासाठी काम करतो आहे. हिंदू राष्ट्र हे संघाचे टाग्रेट आहे. पण म्हणून संघ परिवाराने देशभर चालवलेले सेवाभावी संस्थांचे काम कमी महत्त्वाचे ठरते का? व्यक्ती आपल्या ध्येयाप्रमाणे झिजतात. तेरेसा यांचा काळ १९१० ते १९९७ असा होता. १९२९मध्ये त्या भारतात आल्या.

या काळात त्यांनी खरेच धर्मातर हे टाग्रेट ठेवले असते तर जनगणनेत ते दिसले असते. ताज्या जनगणनेप्रमाणे ख्रिश्चनांची भारतातील लोकसंख्या फक्त अडीच टक्के आहे. हे वास्तव असताना तेरेसा यांच्या हेतूबद्दल संशय घेणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल.

अलीकडे सेवाभावी लोक शोधावे लागतात. सेवादलाची जागा मेवादलाने घेतली आहे. एनजीओ म्हणजे स्वयंसेवी संस्था नावाचा तथाकथित सेवाभावी संप्रदाय जन्माला आला आहे. सेवा आणि सेवाभावी माणसे दुर्मीळ होत चालली असताना अशाप्रकारे कुणाच्या हेतूबद्दल संशयकल्लोळ उठवणे योग्य नाही. आदर्श व्यक्ती अशाप्रकारे आपण फोडत गेलो तर लोकांनी कुणाकडे पाहत जगायचे? जगण्यासाठी माणसाला पॉवर स्टेशन लागत असते.

आपण आपसातल्या स्वार्थापायी ही पॉवर स्टेशन्सच उद्ध्वस्त करीत चाललो आहोत. संघ परिवार हाही काही साधू-संताचा मठ नाही. हिंदुराष्ट्र निर्माण करणे हा संघाचा हेतू नाही काय? अजेंडा का लपवता? संघाने गांधीजींना छळले, आता मदर तेरेसांशी छेडछाड सुरू आहे. चेटकीन दोन घर सोडते असे म्हणतात. संघ तर एकही घर सोडायला तयार नाही.

पण संघाकडून फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही. अलीकडेच सरसंघचालक याच पठडीतले आहेत. हेडगेवार, गोळवलकरगुरुजी आणि बाळासाहेब देवरस या तीन सरसंघचालकांच्या नावाला प्रतिष्ठा होती. गोळवलकर यांचा नेहरूंशी आणि देवरस यांचा राजीव गांधींशी संवाद होता.

स्वयंसेवकाच्या भाषेत सरसंघचालक हा ‘परमपूज्य’ असतो. तसे ते लोक होतेही. पण अलीकडे या ‘पूज्यांचे’ अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे होती नव्हती प्रतिष्ठाही संघ गमावून बसला आहे. अर्धी चड्डी हा संघाचा गणवेश आहे. एव्हढी वष्रे होऊनही संघाची मानसिकता ‘अर्धी’च राहिली. हे फूल पॅन्टवर आले नाहीत.

झापडे लावलेल्या टांग्याच्या घोडयासारखी यांची परिस्थती आहे. विहिरीतल्या बेडकाला विहिरी एव्हढेच जग आहे असे वाटते. संघातल्या स्वयंसेवकांची मानसिक अवस्था तशी असते. एव्हढी वष्रे उलटूनही संघ सर्वसमावेशक होऊ शकला नाही त्याचे कारण ही मानसिकता आहे. सरसंघचालकांनी पायरी सोडून चालण्याला रज्जूभय्यांपासून सुरुवात झाली.

सोनिया गांधींबद्दल अतिशय खालच्या पातळीवरचे शब्द रज्जूभय्यांनी वापरले होते. त्यांच्या जागी आलेले के. सुदर्शन हे तर पहिल्या दिवसापासून वादग्रस्त बनले. ‘हिंदू कुटुंबात चार मुले असली पाहिजेत’ असा आदेश त्यांनीच पहिल्यांदा काढला. ‘स्त्रियांनी नऊवारी पातळ नेसणे हे संस्कृती रक्षणासाठी कसे आवश्यक आहे’ हेही त्यांनी सांगून टाकले.

सध्याचे मोहन भागवत हे अशा पार्श्वभूमीवर आलेले सहावे सरसंघचालक आहेत. ते ढोर डॉक्टर होते. पूर्वीच्या सरसंघचालकांनी संघाला राजकारणापासून निदान दर्शनी स्वरूपात दूर ठेवण्याची काळजी घेतली. उघडपणे संघ निवडणुकीच्या राजकारणात कधी पडला नव्हता. भागवतांनी संघाला राजकारणाच्या कामी जुंपले. भाजपाचा लगाम आपल्या हाती घेतला.

नागपूरच्या नितीन गडकरी यांना भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणले. नरेंद्र मोदी रुसल्याने पुढे गडकरी यांना बाजूला व्हावे लागले तो भाग वेगळा. पण संघाला राजकारणाच्या आखाडयात खुल्लमखुल्ला उतरवणारा हा पहिला सरसंघचालक. लोकसभा निवडणुकीत स्वयंसेवक उघडपणे उतरल्याचे देशाने पहिले.

सांस्कृतिक संघटना म्हणून असलेली संघाची ओळख भागवतांनी अशा प्रकारे मोडीत काढली. संघाने देश जिंकला. पण आपला आत्मा गमावला. संघ परिवारात एकमेकांचे पाय खेचणे सुरू झाले आहे. संघात पदाधिकार सहसा बदलण्याची पद्धत नाही. पण नुकतेच नागपूर संघाचे प्रमुख डॉ. दिलीप गुप्ता यांना तडकाफडकी डच्चू देण्यात आला.

निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले, दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला आणि भागवतांचा दबदबा आणखी वाढला. सध्या देशात दोन शक्तीकेंद्रे आहेत. एक नरेंद्र मोदी आणि दुसरे मोहन भागवत. भागवत हिंदू अजेंडा चालवतात. हिंदू नेते आणि साधू-संतांचे आगखाऊ भाषणे आपल्याला ऐकायला मिळतात, त्यामागे संघाचीच मानसिकता आहे. असे नसते तर, मोदींनी अन्य धर्मियांचा विश्वास संपादन करण्याची धडपड चालवली असताना, धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य मोहन भागवतांनी केले नसते.

भागवतांच्या फटाक्याने मोदींच्या प्रयत्नांवर पाणी पडले आहे. ही तर सुरुवात आहे. मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल संघाच्या हातात आहे. पुढच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसा संघाचा सरकारवरचा दबाव वाढेल. राम मंदिर पुन्हा चच्रेत येईल. संघवाल्यांना विकासाशी काही घेणे-देणे नाही. त्यांना संघर्ष हवा आहे. ती त्यांची खुमखुमी आहे. खासदार योगी आदित्यनाथ यांनी परवा सांगूनच टाकले आहे.

‘धर्मातर रोखण्याबाबत कायदा होत नाही तो पर्यंत घरवापसी कार्यक्रम सुरूच राहील’ असे या योग्याने जाहीर केले आहे. मोदी कुणाकुणाची तोंडे बंद करणार? एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. तेरेसा यांच्याबद्दलच्या भागवतांच्या वक्तव्यावर मोदींनी चकार शब्द काढला नाही. त्यांचे समर्थनही केले नाही आणि सारवासारवही केली नाही. गप्प राहण्याचा मोदींचा स्वभाव नाही. पण ते गप्प आहेत.

तोंडाला कुलूप आहे. पण हे कुलूप उघडेल. एक दिवस असा येईल की, मोदी आणि संघ परिवारात घमासान संघर्ष होईल. तो दिवस दूर नाही. कारण हे संघवाले मोदींना कामच करू देत नाहीत. दिल्लीत तशी चर्चा सुरू झाली आहे.

1 COMMENT

  1. तुम्हची इतकी घाणेरडी भाषा संघाबद्दलची आम्ही सुद्धा खपवून नाही घेणार
    तुझी तर इतकी खालच्या दर्जाची भाषा आहे ह्यावरून असे वाटते की पाच्छीमात्यांचा दलाल आहेस…..जय हिन्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version