चढणीचे मासे

1

चढणीच्या माशांमध्ये चवीला सर्वात मस्त म्हणजे मळये, त्यानंतर शेंगटी, मग खवळा, डेकळा, दांडकी, खडस, वाळव, काडी, करजुवा, झिंगू, सुळे.. तशी प्रत्येक भागात माशांची नावे वेगळी आणि चवही वेगळी.. अशी मासेमारी करणा-या तरु णांची-ज्येष्ठांची टोळकी ग्रुप करून येतात, मासेमारी करतात. वाटे पाडतात. काही वाटे घरी पोहोचतात तर काही वाटे पार्टीला वापरले जातात. ब-याच वेळा नदीकिनारीच किंवा शेतातच या पाटर्य़ा रंगतात.रिमझिमत्या पावसात गरमागरम माशाचे तिखले अहाहा..ऽऽ

पावसाची रिपरिप वाढू लागताच शेतकऱ्यांच्या जशी दैनंदिनी बदलू लागते तसा त्यांचा आहारही बदलतो. सहयाद्रीतील धबधबे वाहू लागतात. सहयाद्री ते सागर अशी ओहोळांची साखळी एकदा का पूर्ण झाली की वसुंधरेचे रूपच बदलून जाते. ख-या अर्थाने पावसाळयाला गती येते. ओहोळ खळाळू लागले की, एरव्ही उन्हाळयात पाण्यासाठी तहानलेल्या नदीतील कोंडी भरून वाहू लागतात. याच कोंडींमध्ये असलेले मासे आता नव्या जगात जाण्यासाठी सैरभैर धावू लागतात. जणू काही आता येथे राहणेच नको. यापेक्षाही चांगले तळे पाहूया म्हणून त्यांची शर्यत सुरू होते. खळाळत्या धबधब्यांच्या विरुद्ध दिशेने ते प्रवास करू लागतात. ही माशांची चढाओढ पाहणे म्हणजेच एक दिव्य असते.

साखळी सुटली की पुढचे दहा ते पंधरा दिवस चढणीच्या माशांचा उडणारा फर्रा आणि झालेली धावपळ, अंगावर रिमझिमणारा पाऊस आणि हातात एखादा दांडा घेऊन माशाला पकडण्यासाठी कसरत करणारी टोळी..सध्या मुलखातल्या गावांमध्ये दिसणारे हे दृश्य.

पावसाला सुरु वात होताच सुकलेले ओहळ, आटलेल्या नद्यांच्या कोंडी भरभरून वाहू लागल्या की एवढयाशा डबक्यात राहिलेले मासे मुक्त होतात. पाऊस कोसळतच असतो. प्रवाह वाढत जातो आणि माशांची झुंबड धावू लागते, पाण्यावर उडू लागते आणि या उडणा-या माशांना, सैरावैरा धावणा-या माशांना पकडण्यासाठी सर्वांची एकच धावपळ. अंधार पडल्यानंतर तर माशांची लगबग अधिकच वाढते. मग बत्तीवरची मासेमारी सुरू होते. अचानक प्रकाश पाहून मासे थबकतात आणि खवय्यांची शिकार होतात.

पाऊस धुवाधार बरसू लागताच माशांची चढाओढ लागते. त्यांना नव्या जगात जायची घाई असते आणि सैरभैर झालेल्या माशांना कधी एकदा पकडतो असे शेतक-याला झालेले असते. माशांची आणि शेतकरी या दोघांच्या पळापळीत मोठी कसरत रंगते. एरव्ही उन्हाळयात कोंडीच्या तळाशी जाऊन बसलेले हे गोडया पाण्यातील मासे पावसाबरोबर थव्याने पुढे सरकू लागतात आणि या माशांना पकडण्यासाठी सारेच जण सरसावतात. हरतऱ्हेची शस्त्रे बाहेर पडतात. ही शस्त्र म्हणजे या भागाची एक वेगळी ओळख आहे. डोम, आके, पागरे, हूक, भरीव बांबूच्या काठय़ांनी तयार केलेली गरी. आके (गोल छोटेखानी जाळयाचा प्रकार) पागरे (छोटे जाळे, याला लोखंडी किंवा जस्ताचे तुकडे वजनासाठी जोडलेले असतात.) हे साहित्य बाहेर पडते. गढूळ पाण्यामध्ये माशांच्या हालचाली टिपत त्यांना पकडण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न होतात. काही मंडळी नदीच्या मुख्य मोक्याच्या जागी ‘किव’ही घालतात. मासे मारण्यासाठीचा लाकडी सापळा तयार करतात. या साखळी लागण्याच्या दिवसात चढणीचे मासे मारण्यासाठी हौसे, नवसे तयार असतात. चढणीच्या माशांची मज्जा जेवढी सांगावी तेवढी थोडीच. माशांच्या कसरतीप्रमाणे त्यांच्या कलेने घेत अलगद पिशवीत भरणारे अनेक महाभागांची कसरत पाहण्यासारखीच असते.

चढणीच्या माशांमध्ये चवीला सर्वात मस्त म्हणजे मळये, त्यानंतर शेंगटी, मग खवळा, डेकळा, दांडकी, खडस, वाळव, काडी, करजुवा, झिंगू, सुळे. तशी प्रत्येक भागात माशांची नावे वेगळी आणि चवही वेगळया.. अशी मासेमारी करणा-या तरु णांची-म्हाताऱ्यांची टोळकी ग्रुप करून येतात, मासेमारी करतात. वाटे पाडतात. काही वाटे घरी पोहोचतात तर काही वाटे पार्टीला वापरले जातात. ब-याच वेळा नदीकिनारीच किंवा शेतातच या पाटर्य़ा रंगतात. रिमझिमत्या पावसात गरमागरम नुसते मीठ-मसाल्यात परतलेले मासे खाणे म्हणजे अहाहा.ऽऽ झणझणीत याचा अर्थ येथेच समजतो..

रात्री रॉकेलचे दिवे पेटवून नदीच्या किना-याने फिरत असताना सैरावैरा धावणारे मासे, कुल्र्याना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. हा हंगाम या माशांचा विणीचा हंगाम. चढणीचे मासे प्रवाहाच्या विरोधात पोहून जातात आणि नेमक्या ठिकाणी अंडी घालतात. हा त्यांच्या प्रजोत्पादनाचा फंडा असतो. नद्यांच्या पाण्याला यावेळी वेग असतो, परंतु चढणीच्या या माशांचा पिले जन्माला घालण्याचा आवेग त्याहीपेक्षा अधिक असतो. त्यामुळे ते प्रवाहाविरु द्ध पोहतात, टिकतात आणि त्यांचा जन्म सफल करतात. प्रत्येक मासा आपली पिलावळ वाढविण्याच्या इच्छेखातर हजारो अंडी कुशीत घेऊन पुढचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा का कोंड सोडली की आगीतून फुफाटयातच असा त्यांचा प्रवास सुरू होतो. नदीचे पाणी पुरामुळे आजूबाजूच्या शेतात घुसते, हे मासे मग त्या शेतात मिळणारे किडे, कीटक, मुंगी यावर ताव मारतात. ज्याप्रमाणे पावसाळयात

पाऊस-पार्टीचे वेध

तरुणाईला लागतात तशीच त्या माशांचीही ती एक प्रकारची पार्टी असते, पण एकदा शेतात किंवा पाण्याबाहेर पडल्यानंतर या माशांना प्रवाहात परतणे अवघड होते आणि मग त्यांची शिकार होते. चढणीचे मासे मारण्यासाठी सारेच जण टपलेले असतात. उन्हाळयात हे मासे एवढया संख्येने कुठे असतात? पावसाबरोबर ते बाहेर कुठून पडतात? हा सर्वसामान्यांना प्रतिवर्षी पडलेला प्रश्न. रात्र होताच आज कुठच्या डोहाकडे मासे मारण्यासाठी जायचे. हा बेत काही मंडळी ठरवत असतात. मग दिवे काढले जातात. पूर्वी पेट्रोमॅक्सवरून मासेमारी केली जायची. हे दिवे धरण्यासाठी एक विशेष माणूस असायचा. हे दिवे धरण्याची पद्धतही वेगळी होती. कारण दिव्यावर पाऊस किंवा पाणी उडू नये. याची दक्षता घेतानाच पेटत्या दिव्याची धगही थेट हाताला लागूनही ही दक्षता बाळगणे गरजेचे असायचे. शिलूक, काठया, लाठया, जाळे घेऊन मासेमारी केली जायची. तासा-दोन तासात किना-यावर लपत-छपत असलेले मासे अथवा डोहातून बाहेर पळणा-या माशांना पकडण्यासाठी धावपळ सुरू होते.

अलीकडे दिव्याची रचना बदलली. आता रॉकेलच्या दिव्यापेक्षा चायनीज दिवे वापरात येऊ लागले आहे. या दिव्यांवर पावसाचा तेवढासा फरक पडत नाही. अलीकडे काही मंडळींनी खास मासेमारीसाठी वॉटरप्रुफ दिवे विकत घेतले आहेत. पकडून आणलेल्या माशाचे तिकले खाण्याचा मोह कुणाला थोपविता येणार नाही. केवळ मीठ, मसाला आणि हळदीचे पान, त्रिफळ घालून माशांचे केलेले कालवण ही तर मालवणी मुलखातली चढणीच्या माशांची खास थाळी असते. या थाळीचा ज्यांनी आस्वाद घेतला त्यांना चढणीचे माशांची लज्जत समजेल ज्यांनी घेतला नाही त्यांनी सुसाट कोकण गाठावे..

आता फक्त गरवणेच

मच्छीमार नौका बंद झाल्याने आता गरीने अथवा पागून मासे मिळविण्यास सुरुवात झाली असून युवक व मुले मासळी पकडण्याचा गर घेऊन खाडीत मासळी पकडताना दिसत आहेत, तर पहिला पाऊस पडल्यावर बाहेर येणा-या कुल्र्या पकडण्यासाठीही रात्री बत्ती घेऊन फिरताना दिसत आहेत. नदीतून अथवा वहाळातून चढणीचे मासे मारण्यासाठी छोटी जाळी लावली जातात. तर किनारपट्टीला मासळी पकडण्यासाठी गर टाकून तासन् तास बसावे लागते.
देवगड बंदरानजीकच ब-याचशा नौकांना किना-यावर येण्यासाठी जागा नसल्याने खाडीतच प्लास्टिकचा कागद घालून नौका उभ्या करून ठेवण्याशिवाय पर्याय दिसत नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतरही काही मच्छीमार बांधव आपल्या नौका किना-यावर आणण्यात मग्न आहेत.तर काहींच्या नौकांवर पावसाळयातील संरक्षण म्हणूनच झापांचे आच्छादन तसेच प्लास्टिक कागद बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मासेमारीसाठी वापरण्यात येणारी जाळी तसेच अन्य सर्व सामान नीटनेटके ठेवण्याची लगबग दिसत आहे. दरवर्षी मे महिन्यातच हजेरी लावणारा पाऊस यावर्षी उशिरा दाखल झाला असून पावसाची वाट पाहणारा शेतकरी तसेच स्थानिक मच्छीमार मात्र पावसाची सुरुवात होताच आपल्या कामाला लागला आहे. परंतु खाडीला अद्याप पूर न आल्याने खाडीमध्ये माशांचा शिरकाव झाला नसल्याने मासे मिळण्याचे प्रमाण कमी असल्याचे मत येथील स्थानिक मच्छीमार बांधव व्यक्त करत आहेत.

अधिक प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यास खाडीला पूर येतो व त्या पुराबरोबरच मासे खाडीपात्रात शिरकाव करतात. या माशांमध्ये सुळे, तांबवसे, गुंजली आदी माशांचा समावेश असतो.पावसाळयातील खोल समुद्रातील मच्छीमार बंद असल्याने या माशांना चांगला भाव मिळतो.मात्र सध्या पावसाचा जोर कमी असून अद्यापही खाडीला पूर न आल्याने मासे मिळण्याचे प्रमाण कमी आहे.देवगड तालुक्यात वाडातर, टेंबवली-वानिवडे तर,मोंडतर, कट्टा, तारामुंबरी, मळई या खाडींमध्ये हे मासे मिळत असल्याने पारंपरिक पद्धतीने येथील स्थानिक मच्छीमार मासे पकडतात. याउलट परिस्थिती तांबळडेग, मोर्वे, मिठबांव या भागातील मच्छीमारांची असून पावसाळयात येथील मच्छीमारांना मात्र खाडीत मासे मिळत नसल्याने तीन महिने घरी जाळी विणणे यासारखी कामे करावी लागतात. देवगडमध्ये यावर्षीचा मासळी हंगाम हा मच्छीमारांच्या दृष्टीने तोटयातच गेला. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांची भिस्त आता पावसाळयातील पारंपरिक मच्छीमारीवर असून मुळातच पाऊस उशिरा दाखल झाल्याने मच्छीमारांच्या आशेवर पाणी पडले हे निश्चित. सध्या मच्छी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने मच्छीचा भावही वधारला आहे. त्यामुळे अंडी व मटण व्यावसायिक मात्र तेजीत आहेत. देवगडमध्ये मच्छीच्या किमती या भरमसाट वाढल्या असून पापलेटच्या एका नगाची किंमत १५० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या वधारलेल्या किमती सर्वसामान्यांना परवडत नाहीत. लोकांनी आता सुके मासे, कालवे, तिसरे, मुळे व खेकडे घेण्यावरच भर दिला आहे.

या दिवसात सारेच काही झटपट उरकायचे असते.?पावसाला थांबण्याची हौस नसते. पदार्थ तयार करण्याच्या पद्धती तेवढयाच झटपट. खमंग हळदीच्या पानात मिरपूड, त्रिफळ, हळद, मीठ, मसाला घालून सोरकुलात किंवा चुलीवर केलेला माशांचा तिखला लय भारी. सध्या समुद्राची मासेमारी थांबली आहे.?अशा कालावधीत चढणीच्या माशांच्या तिखला खायचा बेत या मुलखात झक्कास जमतो.?गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत झणझणीत तिखले जिभेवर पोहोचण्यापूर्वी?लाळ गळत असते आणि खमंग वासाने एक घास अधिकच जातो. खरपूस वासामुळे चटणीही  खरवडून खावीसी वाटते.

जसे तिखले तसाच मोटलासुद्धा.. पकडलेल्या इवल्याशा माशांना हळद, मीठ, मसाला आणि कोकमची दोन सोलं टाकून हळदीच्या पानात पुरचुंडीप्रमाणे  गुंडाळले जाते. त्याला पुन्हा कुंबियाच्या पानाने बांधून ती रसरशीत आगीत भाजली जाते. पाऊस सुरू होताच घरातील पडवीमध्ये कांबळे सुकविण्यासाठी न्हाणी घरात अथवा चुलीवर उतव (ओले कपडे सुकविण्यासाठी बांधण्यात आलेली बांबूची चौकड) बांधले जातात. याच चुलीत हा मोटला टाकला जातो. काही मिनिटातच पानांचा रंग बदलतो आणि खमंग वास सुटतो. अहाहाऽऽऽ हाच तर स्वाद हळुवार पोहोचणा-या सर्देलेल्या थंडीतही हा मोटला स्वर्गीय थाळीचा आनंद देतो.

अलीकडे चढणीच्या माशांचा मोटला खाण्याचे भाग्य आजच्या पिढीला मिळत नाही. कारण पाऊस जसा बदलला आहे तसेच नदींचे प्रवाहही बदलले आहेत. अनेक कोंडी संपल्या आहेत. उन्हाळी होणा-या मासेमारीमुळे गोडया पाण्यातील या नदीतल्या माशांची पैदासही थांबली आहे. मळवे, डेकळय़ांचे कालवण आता दुर्मीळ होण्याची चिंता आहे. पुढचे पुढे, आज मात्र चढणीच्या माशांचा बेत सहयाद्रीतल्या अनेक गावांमध्ये रंगला आहे हे मात्र खरेच!.

साखळी लागण्याची आजही प्रतीक्षाच आहे. सध्या नद्यांमध्ये प्रवाहही कमी असून या प्रवाहावरून जाणारे मासे मारण्यासाठीची लगबग सुरू आहे. मासे मारण्यासाठी येंड, शेंडी, कांडाळी, आक्या, जावला, कोयता, शिलूक आदी साधने घेऊन हे हौशी लोक नद्या-नाल्यात फिरताना दिसतात. तर रात्रीच्या वेळी बत्तीच्या उजेडात हे लोक मासे पकडताना पाहायला मिळतात.

पाण्याच्या डोहातील मासे पकडण्याची एक पद्धती म्हणजे मासे पागवणे. एक मोठे जाळे घेऊन लोक ते या डोहात टाकतात व सर्व बाजूंनी पाण्याच्या तळाशी दाबून धरतात. यावेळी मध्ये फसलेले मासे या जाळयात अडकतात. कांडाळी म्हणजे एक लांब जाळे असते. हे जाळे पाण्याच्या प्रवाहात पाणी शांत असलेल्या ठिकाणी आडवे टाकले जाते. यामुळे वर जाणारे मासे या जाळयात अडकतात. पाण्याच्या खाली कोसळणा-या प्रवाहातून वर उडया मारून जाणारे मासे अलगदपणे शेंडीत झेलले जातात.

या शिवाय शिलूक आणि शिगेच्या सहाय्यानेही मासे मारले जातात. खवळे, मळवे, टोळ, शेंगटी, ठिगूर, वाळय, काडी आदी मासे सध्या जोरदार मिळत आहेत. कणकवलीच्या गडनदीपात्रात सध्या हे चढणीचे मासे मारण्यासाठी लोकांची मोठी वर्दळ आहे. मासेमारीची अनेक साधने घेऊन लोक दिवसरात्र या पात्रात फिरताना दिसतात.

1 COMMENT

  1. मी हा सर्व अनुभव माझ्या लहानपणी गावी घेतला आहे… किशोर राणे यांचा हा लेख खूपच छान आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version