Home मध्यंतर उमंग चला, पावसाळा एन्जॉय करूया!

चला, पावसाळा एन्जॉय करूया!

0

मोठे शहर असो किंवा छोटे शहर, आजच्या धावपळीच्या युगात सर्वाना थोडासा का होईना, बदल हवा असतो. सध्या पावसाळा सुरू आहे. सुंदर हिरवाईने नटलेली वनराई आणि त्याचा जवळून अनुभव घेण्याची मजा वेगळीच. मग जायचं कुठे, हा प्रश्न उभा राहतो. कमी वेळेत पर्यटनासाठी आम्ही काही पर्याय सुचवत आहोत. बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि एक दिवसाची किंवा दोन दिवसांची सहल तुम्हाला करता येईल.

एलिफंटा बेट
गेटवे ऑफ इंडियापासून फेरीद्वारे एक तासाच्या अंतरावर असलेले एलिफंटा बेट हे मुंबईपासून दहा किमी पूर्वेस आहे. येथे हाताने कोरलेल्या भिंतींवरील चित्रांच्या सात प्राचीन लेण्या आहेत. यांचे अजिंठा व वेरुळच्या लेणींशी बरेच साधम्र्य आहे. ही लेणी बघितल्यानंतर आपण कॅनॉन हिलवर चढू शकता, इथे शिखरावर एक जुनी तोफ ठेवण्यात आलेली आहे.


कर्नाळा
तुम्हाला जर पक्षी निरीक्षणाची आवड असेल, तर कर्नाळा या ठिकाणाला नक्की भेट द्या. ट्रेकिंग करणे आणि कर्नाळा किल्ल्याला तुम्ही भेट देऊ शकता. कर्नाळा किल्ल्याची निर्मिती देवगिरीच्या यादवांनी केली होती. नंतर हा किल्ला तुघलकाने जिंकून घेतला. पनवेलपासून १२ किमी अंतरावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य १२.११ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. इथे निवासी पक्ष्यांच्या १५० प्रजातींचे व स्थलांतरित पक्ष्यांच्या ३७ प्रजातींचे निवासस्थान आहे. आपण अवश्य भेट द्यावी, अशा काही ठिकाणांपैकी हे एक आहे. यावर चढण्यासाठी आपल्याला जरी एक तास पाहिजे असला, तरी एक वेळा येथे पोहोचल्यानंतर येथून मुंबई बंदराचे विहंगम दृश्य दिसते.


अ‍ॅम्बी व्हॅली
थोडंसं थ्रिल अनुभवण्यासाठी व मजेशीर सहलीसाठी थोडेसे पैसे खर्च करण्याची तयारी असेल, तर अ‍ॅम्बी व्हॅली हे एक सुंदर ठिकाण आहे. दहा हजार एकरवर पसरलेल्या या लक्झरी रिसॉर्टमध्ये इनडोअर व आऊटडोअर मौजमस्ती करण्यासाठी बरीच आकर्षणे आहेत. लोणावळ्यापासून फक्त ३० मिनिटे व मुंबईपासून १०५ किमी अंतरावर असलेल्या या अ‍ॅम्बी व्हॅली रिसॉर्टमध्ये एक सेवन स्टार रेस्टॉरंट, एक १८ होल्सचे गोल्फ कोर्स, एक अत्याधुनिक वॉटर पार्क व मुलांसाठी एक विशेष भाग आहे.


कोलाड
कोलाड हे ठिकाण त्याच्या कुंडलिका नदीमधील व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि ट्रेकिंगच्या पायवाटांसाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या पुढय़ात वसलेलं व मुंबईपासून १२१ किमी अंतरावरील कोलाड हे नेहमीच साहसी क्रीडाप्रकारांनी गजबजलेलं असतं. राफ्टिंगशिवाय येथे निवड करण्यासाठी कॅनोइंग, कायाकिंग, पॅराग्लायडिंग, रॅपलिंग, रॉक क्लायम्बिंग आणि रिव्हर झिप लाईन क्रॉसिंगचे पर्यायही उपलब्ध आहेत. मग जर तुम्हाला या साहसी खेळांमध्ये रुची असेल, तर येथे येण्यास काहीच हरकत नाही.


माथेरान
परंपरागत पद्धतीच्या डोंगराळ निरवतेचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईपासून फक्त ९० किमी अंतरावर असलेले हिल स्टेशन म्हणजे माथेरान. पश्चिम घाटांमध्ये समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवर वसलेलं आहे. हे क्षेत्र जगातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे वाहनांना परवानगी नाही, यामुळे त्याची निरवतेची पातळी उंचावण्यास मदत मिळाली आहे. येथे असताना आपण झाडांनी आच्छादलेल्या वेढलेल्या भागांमधून पायीच लांब फेरफटका मारू शकता किंवा घोडेस्वारी करू शकता. लुईसा व हनिमून पॉइंटदरम्यान झीप-लायनिंग करू शकता.


लोणावळा
एक दिवसाच्या सुट्टीसाठी मुंबईकरांसाठी लोणावळा हे जवळचे आणि सहज जाता येईल असे सहलीचे ठिकाण आहे. आसपासच्या डोंगर व द-यांमध्ये भरपूर पॉइंट्स आढळतात. येथे निसर्गसौंदर्याचा खजिना लुटू शकतात. राजमाची या पॉइंटवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमाची या प्रसिद्ध किल्ल्याचे निरीक्षण करू शकता. टायगर पॉइंट याला टायगर्स लीप (वाघाची झेप) सुद्धा म्हटले जाते. हे आणखी एक स्थळ आहे. इथे पर्यटक भेटी देतात. येथे ६५० मीटरची सरळ दरी आहे आणि फक्त पावसाळ्यात सक्रिय होणारा एक लहानसा धबधबासुद्धा आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी येथे भेट देत असतात. मुंबईपासून फक्त ९६ किमी अंतरावर असलेलं हे हिल स्टेशन जितकं आपल्या चिक्कीसाठी प्रसिद्ध आहे, तितकंच निसर्गरम्य ठिकाणांसाठीही प्रसिद्ध आहे.


येऊरचे डोंगर  
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पूर्वेकडील भागात असलेले येऊरचे डोंगर हे सहा लहान वस्त्या व तेथील रहिवासी असलेल्या आदिवासींचं घर आहे. धबधबे आणि एक गडद वृक्षाच्छादित आवरण असलेला हा नयनरम्य भाग म्हणजे जंगलातील पायवाटांवर संपूर्ण दिवसभर भटकंती करणं. आवडणा-या निसर्गप्रेमींसाठी तो स्वर्ग आहे. हौशी पक्षी निरीक्षक व शाळेची मुलं येथे नेहमी भेट देत असतात. येऊरच्या डोंगरावर काही रिसॉर्टही आहेत, येथे आपण आरामात आपला दिवस घालवू शकता व स्वादिष्ट मेजवानीचा आस्वादही घेऊ शकता. मुंबईपासून फक्त २५ किमी अंतरावर आहे आणि मुंबईकरांसाठी सहज पोहोचता येणारं असं हे सहलीचं ठिकाण आहे.


मांडवा
गेटवे ऑफ इंडियापासून फेरीद्वारे मुंबईपासून १०२ किमी अंतरावर असलेले समुद्रकिना-यावरील हे उबदार मांडवा गाव आपल्या चमकदार समुद्रतटांसाठी, स्वादिष्ट मेजवानीसाठी व जलक्रीडांसाठीही प्रसिद्ध आहे. जरी आपण येथे एक दिवसाच्या सहलीसाठी आलात किंवा संपूर्ण वीकेंड साजरा करण्यासाठी आला असाल, तर हे निवांत गाव बघत, जुन्या आरसीएफ जेट्टीच्या आसपासच्या परिसरात चिंब भिजून घेत, मांडव्याच्या किना-यावर पायी चालत व स्थानिक कोळी लोकांसोबत संवाद साधत आपण आपला दिवस आनंदात घालवू शकता.


सुला वाईनयार्ड
मुंबईपासून सुमारे २३० किमी अंतरावरच्या या द्राक्षांच्या मळ्यांमध्ये तुम्हाला नक्कीच रिफ्रेशिंग वाटेल यात शंकाच नाही. संपूर्ण वाईनयार्ड व वायनरीच्या सहलीसोबत ग्रेप-टू-ग्लासचा अनुभव या ठिकाणी घेता येईल. सुला बियाँड या इन-हाऊस व्हिलामध्ये राहता येईल. सुला वाईनयार्ड एक दिवसाच्या सहलीसाठी किंवा तेथे थांबून वीकेंड साजरा करण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. इथल्या कॅफे रोज या रेस्टॉरंटमध्ये जेवण करता येतं, स्वीमिंग पूलमध्ये मनसोक्त पोहणं किंवा गावातल्या रस्त्यांवर सायकलने फेरफटका मारण्याचा आनंद वेगळाच. इथून आपण वरचे वैतरणा धरणाकडेही जाऊ शकता. हे वैतरणा नदीवर बांधलेलं आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारं हे धरण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आहे. इथल्या सुंदर सरोवर आणि नयनरम्य परिसरासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version