Home महामुंबई ‘चैत्यभूमीच आमच्यासाठी मोठे स्मारक’

‘चैत्यभूमीच आमच्यासाठी मोठे स्मारक’

2

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी केंद्र सरकारने दिलेल्या इंदू मिलच्या जागेबाबत परराज्यांतून आलेले अनेक भिमसैनिक व बौद्ध भिक्खू अनभिज्ञच होते.
मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी केंद्र सरकारने दिलेल्या इंदू मिलच्या जागेबाबत परराज्यांतून आलेले अनेक भिमसैनिक व बौद्ध भिक्खू अनभिज्ञच होते. मध्य प्रदेशातील शिवपुरीहून आलेल्या बोधिरत्न या ज्येष्ठ भिक्खूने ‘‘याबद्दल काहीच माहिती नसून चैत्यभूमीच बाबासाहेबांचे सर्वात मोठे स्मारक आहे,’’ असे सांगितले.
शिवपुरीतील मिलिंद बुद्धविहारात बोधिरत्न यांचे वास्तव्य आहे. २७ वर्षापासून चैत्यभूमीवर डोके टेकवून बाबासाहेबांना अभिवादन करून जातो, असेही त्यांनी सांगितले. तर इंदूर, जबलपूर आणि ओदिशात बौद्ध धम्माचा प्रचार करणाऱ्या काही बौद्ध भिक्खूंनी केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली. उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगरहून आलेल्या सुबोधनंदन या ज्येष्ठाने तेथील स्मारकाचा दाखला देत इंदू मिलच्या जागेतील स्मारक जगातील एक आदर्श ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर विदर्भातील गाव-खेडय़ांतून आलेल्या महिलांनी या निर्णयासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मनापासून आभार मानले.

माहितीसाठी संकेतस्थळ, सरकारी स्टॉल
रोजगार, शिक्षण, आरोग्य, सरकारच्या विविध प्रकारच्या योजना आणि त्यासाठीची आवश्यक माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी सिन्पॅक्ट फाउंडेशन व ओएनजीसी एसीएटी अँड अदर बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉइज असोसिएशनने www.scstobcng.org या संकेतस्थळाचे उद्घाटन चैत्यभूमीवर केले. या वेळी संस्थेचे सरचिटणीस अभय डोंगरे, सयाजी वाघमारे, जितेंद्र निकाळजे आदी उपस्थित होते. या संस्थेच्या वतीने मुंबईत नोकरीच्या शोधात येणा-या राज्य आणि परराज्यांतील कोणत्याही बेरोजगारांसाठी राहण्याची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्यायविभाग, कृषीविभाग, विविध प्रकारची महामंडळे आणि त्यासोबतच आर्थिक विकासासाठी असलेल्या महात्मा फुले, संत रोहिदास, अण्णाभाऊ साठे आदी मंडळांच्या उपक्रमांची माहिती देणारे अनेक स्टॉल्सही होते.

सीडी, डीव्हीडी खरेदीसाठी गर्दी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध आदी महामानवांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी तयार केलेल्या भिमगीतांच्या सीडी, डीव्हीडींना उदंड प्रतिसाद होता. विचार, प्रबोधन, मनोरंजन, आवाहन, विचारधारांच्या सीडींसोबतच बुद्ध, बाबासाहेब, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे अशा महापुरुषांच्या जीवनावर आधारित गाणी, चित्रपटही उपलब्ध होते.
‘रमा भिमाची नवरी’, ‘नागपूरची नागीण, भिमगीतांची राणी’, ‘शेरणी जयभिमवारी’,‘भिमाचा छावा’, ‘हॅलो जयभिम’, ‘घरा-घरात घडवूया भिमसागार’, ‘निळं वादळ’, ‘पेटून उठली जयभिमवाली’, ‘भिमाची वाघीण’, ‘मी भिमकन्या’, ‘भिमाने वाढवली शान’, ‘बापाचा बाप झाला, रूढीचा थरकाप झाला’, ‘गाजवल’, ‘एका घरात यारे’, ‘विश्वात पहिला नंबर’, ‘भिमानं लंडन’ अशा शीर्षकांच्या शेकडो वैविध्यपूर्ण सीडींच्या खरेदीसाठी गर्दी होती.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version