Home रविवारची मुलाखत चौकटीबाहेरचा छायाचित्रकार

चौकटीबाहेरचा छायाचित्रकार

1

उत्तम छायाचित्रकार असे क्षण टिपतो, ज्या क्षणांची पुननिर्मिती करणं, हे जवळजवळ अशक्य असतं, असं कुणी तरी म्हटलं आहे. या व्याख्येत बसणारे एक मराठमोळे छायाचित्रकार म्हणजे मिलिंद केतकर. भारतातल्या नामांकित छायाचित्रकारांमध्ये त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. नुसतीच छायाचित्रं टिपणारे नव्हे तर त्यातले भाव टिपणारे छायाचित्रकार असा त्यांचा लौकिक आहे. तीन दशकांहूनही अधिक काळ या क्षेत्रात असलेल्या केतकर यांनी स्वत:ला फोटोग्राफीच्या कुठल्याही एका प्रकारात बंदिस्त केलं नाही. इमेज बँकेसाठी काम करणा-या काही मोजक्या भारतीय छायाचित्रकारांत मिलिंद केतकर यांची गणना होते. विशेष म्हणजे, इमेज बँकेमध्ये छायाचित्रांचा सर्वाधिक खप असणा-या भारतीय छायाचित्रकारांमध्ये केतकरांचा समावेश होता, पण त्यांची खरी ओळख आहे ती वेगळीच. केतकर हे वेडिंग फोटोग्राफीतलं प्रतिष्ठित नाव आहे. याव्यतिरिक्त ट्रॅव्हल, लँडस्केप, प्रॉडक्ट, वाइल्डलाइफ, अ‍ॅबस्ट्रॅक्ट अशा सगळ्याच प्रकारातलं छायाचित्रण त्यांनी केलं आहे. या सगळ्याच प्रकारात त्यांनी फोटोग्राफीचा दर्जा उंचावला. या अष्टपैलू छायाचित्रकाराशी केलेल्या बातचीतीतून साकारलेला हा शब्दमय अल्बम.

तुम्ही ज्या काळात फोटोग्राफी करायला सुरुवात केली, त्याकाळी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून फार कमी लोक या क्षेत्राकडे पाहायचे, तरीही तुम्ही या क्षेत्रात कसे आलात?

मी रसायनशास्त्रात बीएससी केलं आहे. माझे वडील परफ्युमिस्ट होते. त्याकाळी वडिलांचा व्यवसाय पुढे चालवण्याची पद्धत होती. मलादेखील परफ्युमिस्ट व्हायचं होतं, म्हणून मी रसायनशास्त्र हा विषय घेतला. रसायनशास्त्राचा अभ्यास करताना डॉक्टरांच्या ब्ल्यू टोनिंगच्या स्लाइड मला एकाने दाखवल्या. त्यामुळे ब्ल्यू टोनिंग कसं करतात, याची मला थोडी उत्सुकता होती. याविषयीची माहिती मिळवताना  छायाचित्रणाविषयी माहिती वाचनात आली. उत्तम टोनिंग करायचं असेल तर छायाचित्रणातलं तांत्रिक शिक्षण आवश्यक होतं, त्यामुळे मी छायाचित्रणाचं शिक्षण घेतलं. माझे वडिल ‘सिंबा’ कंपनीमध्ये कामाला होते, तिथून त्यांनी माझ्यासाठी काही रसायनं आणली. ती वापरून घरीच टोनिंग कसं करायचं याचे प्रयोग मी सुरू केले. या प्रयोगात मी बहुतांशी यशस्वी झालो. टोनिंगपासून सुरुवात केली असली तरी नंतर मात्र टोनिंगमध्ये मी विशेष रस घेतला नाही. मला यातून छायाचित्रणाची आवड वाटू लागली. छायाचित्रणाचं शिक्षण घेतल्यानं या विषयी मला माहिती होती, त्यामुळे मी ‘फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडिया’ आणि ‘कॅमेरा क्लब ऑफ इंडिया’ची मेंबरशिप घेतली. तिथे त्यांचे अनेक उपक्रम चालायचे. अनेक छायाचित्रकार नवोदितांना मार्गदर्शन करायचे. तिथे उत्तमोत्तम छायाचित्रकारांच्या छायाचित्रांची प्रदर्शनं भरायची. या प्रदर्शनांतील छायचित्रं मला भुरळ घालायची. आपणही यांच्यासारखं काहीतरी केलं पाहिजे, असं सारखं वाटायचं. त्यामुळे तिथे भरणा-या स्पर्धामध्ये भाग घ्यायचं मी ठरवलं. त्यात मला अ‍ॅम्युच्युअर प्रकारात पारितोषिक मिळालं. पहिल्याच प्रयत्नात पारितोषिक मिळणं, ही माझ्यासारख्या नवोदितासाठी मोठी गोष्ट होती. त्यानंतर मी या क्षेत्राचा मी गांभीर्याने विचार करू लागलो. छायाचित्रणासारख्या क्षेत्रात त्याकाळी खूप कमी पैसे मिळायचे. अशा क्षेत्रात करिअर घडवायला घरच्यांचा विरोध होता, पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. ज्याची आवड आहे, त्या क्षेत्रातच करिअर घडवण्याचा निर्णय मी घेतला. त्यातून किती पैसे मिळणार, माझं भवितव्य काय असणार याचा विचार तेव्हाही मी केला नाही आणि आताही करत नाही. त्याकाळात उमाकांत शिरोडकर, विलास भेंडे ही या क्षेत्रातली खूप मोठी माणसं होती. मला यांच्यापैकी एकाकडे तरी काम करायचं होतं. माझ्या एका मित्राची विशाल भेंडे यांच्याशी ओळख होती. सुरुवातीच्या काळात मला छायाचित्रणात मिळालेल्या एक-दोन पारितोषिकांच्या भांडवलावर मी विशाल भेंडे यांच्या हाताखाली छायाचित्रण शिकायचं ठरवलं. माझ्या मित्रांनी माझ्यासाठी विशाल भेंडेंकडे शब्द टाकला. मला एक वर्ष भेंडे यांच्या हाताखाली काम करण्याची, शिकण्याची संधी मिळाली. मी लग्नात व्हिडिओग्राफीही करायला सुरुवात केली. तेव्हा लग्नात व्हिडिओग्राफी हा प्रकार अगदीच नवा होता. यात फारशी स्पर्धादेखील नव्हती. माझ्या वयाच्या मित्रमंडळी त्यांचे नातेवाईक यांच्या घरात लग्नं व्हायची, त्यामुळे मला भरपूर काम मिळत गेलं. वेडिंग फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी असं दोन्ही करायला मी सुरुवात केली. तेव्हा दिवसाला हजार-बाराशे रुपये मिळायचे. त्याकाळात तेही खूप होते, पण नंतर सगळे हिणवायला लागले, वेडिंग फोटोग्राफरला लग्नातली छायाचित्रं काढण्याव्यतिरिक्त इतर काही येत नाही. लोकांचा हा समज खोडून काढण्यासाठी मी इतर सगळ्याच प्रकारचं छायाचित्रण करू लागलो.

छायाचित्रणाचे हे वेगवेगळे प्रकार कसे शिकलात? स्टॉकमध्ये काम करण्याचा अनुभव काय होता?

मला माझं नाव हे विशिष्ट प्रकारच्या साच्यात बांधून ठेवायचं नव्हतं, त्यामुळे एके दिवशी मी आता लग्नाचे फोटो काढणार नाही असं जाहीर केलं. पुढे काय हा प्रश्न होता. पण सुदैवाने मला पुढचा पर्याय सापडला. साधारण १९९५-९६ च्या काळात भारतात स्टॉक फोटोग्राफी किंवा इमेज बँक ही संकल्पना सुरू झाली होती. याबद्दल त्यावेळी कोणाला फारशी माहिती नव्हती. स्टॉक फोटोग्राफीबद्दल माझ्या वाचनात आलं. यात तुम्ही कोणतेही फोटो काढून स्टॉकमध्ये जमा करायचे. फोटो विकला गेला की, तुम्हाला त्याबदल्यात पैसे मिळणार. तुमच्या छायाचित्रण कलेला कोणत्याही प्रकारचं बंधन नव्हतं. तुमच्या मनाला वाटेल ते फोटो काढून तुम्ही तिथे द्यायचे. मला ही कल्पना फार आवडली. सुरुवातीला मी काही फोटो स्टॉकमध्ये दिले. त्यानंतर मला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंची मागणी स्टॉककडून येऊ लागली. मोबदलाही वाढत गेला, त्यामुळे काम करण्याची आवड निर्माण होत गेली. मी जाहिरातींसाठी माणसांचे फोटो काढू लागलो. त्याकाळी अनेक बँकांनी जाहिरातीसाठी माझे फोटो वापरले होते. भारतात स्टॉकसाठी काम करणारे मोजकेच छायाचित्रकार त्यावेळी होते. त्यातला मी एक होतो. स्टॉकच्या अनेक स्पर्धा व्हायच्या, त्यात मला नेहमी पारितोषिकं मिळायची, पण २००६ नंतर डिजिटल क्रांतीमुळे स्टॉकचं भविष्य धोक्यात आलं. स्टॉकमधून मिळणारं मानधन कमी झालं. स्टॉकला कोणीही फोटो देऊ लागल्याने ख-या छायाचित्रकारांचं महत्त्व कमी झालं आणि मी स्टॉकसाठी काम करणं बंद केलं.

तुम्ही तीन दशकांहूनही अधिक काळ वेगवेगळ्या प्रकारची फोटोग्राफी करत आहात, पण तुम्हाला कुठली फोटोग्राफी आवडते?

तसं सांगणं जरा अवघड आहे, कारण ही आवड काळानुसार बदलत जाते. सुरुवातीला मला लँडस्केप आवडायचं, पण नंतर कमर्शिअल फोटोग्राफी करताना मला लोकांची छायाचित्रं टिपायलाही आवडू लागलं. त्यानंतर भटकंती करायला लागलो, तशी ठिकठिकाणची छायाचित्रं टिपणं आवडू लागलं. आतार्पयच ट्रॅव्हल, लँडस्केप, प्रॉडक्ट, स्टील सगळ्याच प्रकारची फोटोग्राफी केली. मला वाइल्डलाइफ फोटोग्राफी तेवढी आवडली नाही. वन्यप्राण्यांची छायाचित्रं टिपण्यासाठी खूप संयम लागतो. कित्येक तास, आठवडे, महिने एखाद्या प्राणी-पक्ष्याची वेडयासारखी वाट बघणं, हे मला नाही जमलं, त्यामुळे मला ही फोटोग्राफी आवडली नाही.

तुम्ही छायाचित्रं काढण्यासाठी देशोदेशी भ्रमंती केलीत, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काम केलंत. हे करताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले असतील? यातल्या काही अविस्मरणीय अनुभवाबद्दल सांगा.

खूप अनुभव आले. मला आलेला सगळ्यात विचित्र अनुभव चारधामचा होता. १९९३ सालची गोष्ट.बर्फाने आच्छादलेल्या परिसराची मला छायाचित्रं काढायची होती. फिरता फिरता मी भारताच्या सीमारेषेजवळच्या गावात पोहचलो. तिथे ‘इंडिया की आखरी चाय की दुकान’ असं लिहिलेला एक धाबा होता. त्या परिसरात अनेक छायचित्रं टिपली. तिथे फिरताना मला एक घर दिसलं. माझ्या हातात कॅमेरा होताच. तिथे चेह-यावर सुरकुत्या पडलेली एक आजी घराच्या अंगणात बसली होती आणि बाजूला तिचा नातू खेळत होता. मला ते दृश्य खूप आवडलं. मी पटकन ते कॅमे-यात घेतलं. मला त्या आजीनं बघितलं आणि ती माझ्या अंगावर ओरडू लागली. तिचं असं म्हणणं होतं की, मी तिच्या नातवाचं छायाचित्र काढल्याने आता तो लवकरच मरणार. तिला समजवता समजवता माझ्या नाकीनऊ आले. दुसरा किस्सा म्हणजे प्रॉडक्ट फोटोग्राफी करताना मला आइस्क्रीमचं छायाचित्रं टिपायचं होता. अशा वेळी काही छायाचित्रकार न विरघळणारं खोटं आइस्क्रीम वापरतात. स्वत:ला हवी तशी छायाचित्रं टिपून घेतात. मग त्यांना फोटोशॉपमध्ये विविध इफेक्ट देतात. मला हा प्रकार अजिबात आवडत नाही. म्हणून मी ख-या आइस्क्रीमचे फोटो काढायचं ठरवलं. त्यासाठी हवी तशी प्रकाशयोजना केली आणि रूममधलं तापमान इतकं कमी केलं की, माझा महागडा मोबाइल आद्र्रतेमुळे खराब झाला.

सगळे प्रकार हाताळल्यावर पुन्हा वेडिंग फोटोग्राफीकडे का वळलात?

१९९४ -९५ वेडिंग फोटोग्राफी बंद करून स्टॉकला काम केलं. नंतर स्टॉकला उतरती कळा लागल्यामुळे मी पुन्हा वेडिंग फोटोग्राफीकडे वळलो. खरं तर ही माझी सेकंड इनिंग होती. २००६ मध्ये पुन्हा या क्षेत्रात आल्यावर मला माझ्या ग्राहकांना काहीतरी वेगळं द्यायचं होतं. वेडिंग फोटोग्राफीचा ट्रेंड २००६ साली फारसा नव्हता. या प्रकारच्या फोटोग्राफीला आजसारखी प्रसिद्धी नव्हती. यात वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याला यश येईल, हे मला ठाऊक होतं. वेडिंग फोटोग्राफर्सची त्यावेळी संकेतस्थळंही नव्हती. त्यामुळे मी माझे  www.milindketkar.com  हे संकेतस्थळ सुरू केलं. इंटरनेटच्या माध्यमातून हा ट्रेंड पोहचवण्याची संधी माझ्याकडे होती. या क्षेत्रात आता आहे तशी स्पर्धाही तेव्हा नव्हती. ग्राहकांकडे माझी कला नव्यानं पोहोचवण्याची हिच वेळ होती, म्हणून मी वेडिंग फोटोग्राफीकडे वळलो.

तुमच्या वेडिंग फोटोग्राफीमध्ये काय वेगळंपण असतं?

लग्नाची छायाचित्रं म्हटली की त्यात फक्त नवरा-बायको आणि त्याच्या जवळच्या मंडळींची छायाचित्रं काढायची, असा समज असतो. पण मला अशी छायाचित्रं टिपायला अजिबात आवडत नाही. लग्नाच्या मंडपात इतरही कित्येक गोष्टी घडत असतात, त्या टिपायला मला अधिक आवडतात. मी चेहरे टिपण्यापेक्षा व्यक्तीचे भाव टिपणं जास्त पसंत करतो. नवरा-बायकोनं अमुक एका स्टाईलमध्ये उभं राहायचं, मग हसून दाखवायचं, ‘इकडे बघा-तिकडे बघा’ मग मी तुमची छायाचित्रं काढतो असे प्रकार करायला मला मुळीच आवडत नाहीत. फ्लॅश न वापरता मी फोटो काढतो. काही लोकांना यात कदाचित काहीच वेगळंपण वाटत नाही, पण फ्लॅश न वापरता छायाचित्र काढणं अवघड असतं. कित्येक छायाचित्रकार कॅमेरा हातात घेऊन फ्लॅशचा वापर करून छायाचित्र टिपण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ज्यांना त्रास होतो त्यांचे फोटो खराब येतात. मी फ्लॅश न वापरता फोटो काढण्याचा एक फायदा असा होतो की मी कधी, कुठे, कशी छायाचित्रं टिपलीत ते कोणालाच समजत नाही. जेव्हा फोटोंचा अल्बम ग्राहकांच्या हातात येतो, तेव्हा त्यातली छायाचित्रं बघून सगळेच अवाक होतात.

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या धर्मातील लग्नसमारंभाचे फोटोग्राफी केलीय. सर्वाधिक कसब कुठल्या लग्नात पणाला लागतं?

मला दोन प्रकारच्या लग्नांची छायाचित्रं टिपताना जास्त अडचणी आल्यात. एक मुस्लिम समाजातील आणि दुसरं ख्रिश्चन धर्मातलं लग्न. मुस्लिम समाजातील लग्नात वधू असते एका बाजूला तर वर पक्ष दुस-या बाजूला. त्यामुळे छायाचित्रकाराला दोन्हीकडे धावाधाव करावी लागते. पडद्यामागे ‘कबूल है’ बोलल्यावर दोघांच्या चेह-यावरचे भाव टिपताना तारांबळ उडते. एखादा क्षण निसटला तरी तो पुन्हा आणता येत नाही. त्यामुळे हे खूपच आव्हानात्मक काम असतं. चर्चमधल्या लग्नातही खूपच मर्यादा असतात. तुम्ही मनाला येईल तसं वावरू शकत नाही. फोटो काढताना चर्चच्या आवारात फादर उभे असताना कुठेही जाऊन फोटो काढू शकत नाही. कदाचित त्यांना ते अपमानास्पद वाटू शकतं. तुम्ही तिथे बाकांवर किंवा कशावर उभं राहू शकत नाही. काही चर्चमध्ये प्रकाशयोजना करायलादेखील परवानगी नसते. एक किस्सा माझ्या चांगला लक्षात आहे. एकदा वसईला संध्याकाळी साडेपाच-सहा वाजता एक ख्रिश्चन लग्न होतं. लग्न हिवाळ्यात असल्याने काळोख लवकर पडला होता. त्यातून ते चर्च खूपच जुनं होतं. त्यात छायाचित्रणासाठी आवश्यक अशी प्रकाशयोजना नव्हती. मी तिथे मला हवी तशी प्रकाशयोजना केली. तिथे एकावेळी दोन लग्नं होती आणि फादर एकदम वृद्ध होते. लग्नाच्या विधी सुरू होणार एवढयात फादरनी जाहीर केलं की, त्यांना या प्रकाशाचा त्रास होतोय, त्यामुळे सगळे लाइट्स बंद करा आणि फ्लॅशही वापरू नका. फादरनी आदेश दिल्याने सगळे छायाचित्रकार जाऊन बाहेर उभे राहिले. खरं तर मी उत्तम छायाचित्रकार म्हणून माझ्यावर विश्वास ठेवून व जास्त पैसे खर्च करून लग्न असलेल्या मंडळींनी मला हे काम दिलं होतं. आता प्रकाशयोजना न वापरता काम कसं करणार? मला फोटो काढता येत नाही असं उत्तर मी देऊ शकत नव्हतो. पाच-दहा मिनिटं मी विचारात पडलो. एका जागी उभं राहून शक्य असतील तेवढी छायाचित्रं काढली, पण मला काही केल्या समाधान मिळेना. शेवटी मी इकडे-तिकडे हलायला सुरुवात केली. अचानक तिथे आलेली एक बाई अंगावर ओरडू लागली. ती फोटो काढू देईना, तेव्हा फ्लॅश न वापरता छायाचित्रं टिपण्याचं माझं तंत्र कामी आलं. ते फोटो खूपच चांगले आले. मला आवडणा-या काही खास छायाचित्रांमध्ये त्या लग्नातल्या फोटोंचा समावेश आहे. आजकाल लग्नाचे फोटो काढताना जाणवणारी समस्या म्हणजे डेकोरेटर्सची. ते कोणतंही मीटर न वापरता लग्नात भडक लायटिंग करतात. काही जण तर वेगवेगळ्या रंगाचे एलइडी लावतात. त्याचा परिणाम छायाचित्रं काढताना होतो. चेह-यावर त्यांचा रंगीबेरंगी प्रकाश पडतो आणि मग छायाचित्रं लाल-हिरवी येतात. मग या लाइट्स कमी-जास्त करण्यासाठी डेकोरेटर्सशी वाद घालावा लागतो. ग्राहकांना यातली तांत्रिक बाजू समजत नाही, शिवाय हा सगळा प्रकार इतका अचानक घडतो की, शेवटच्या क्षणाला त्यावर आम्ही काहीच करू शकत नाही. अशा ठिकाणी फोटो काढणं आव्हानात्मक असतं.

आता वेडिंग फोटोग्राफीला पूर्वीपेक्षा चांगले दिवस आले आहेत का?

पूर्वी लग्नात नवरा-बायकोचे मोजकेच चार- पाच फोटो काढले जायचे. आता इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी वाढत चालली आहे, त्यामुळे वेडिंग फोटोग्राफीला वलय आलंय, पण म्हणावे तसे चांगले दिवस आले नाहीत. लोक लग्न म्हटलं की, सजावट किंवा जेवण, कपडे, दागिने, मेकअप यांसारख्या गोष्टींवर लाखो रुपये खर्च करतात, पण तेच चांगल्या छायाचित्रकाराने तीस- चाळीस हजार मागितले तर देत नाहीत. सजावट, जेवण, मेकअप, कपडे हे फक्त एका दिवसासाठी असतं. लग्नाच्या अल्बममधल्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात. त्यामुळे आयुष्यभर पुरतील अशा आठवणींसाठी काही हजार खर्च करायला काहीच हरकत नसते, पण लोक ते करत नाहीत. अमुक एक जण स्वस्तात काम करत असेल, तर मी दुस-याला जास्त पैसे का देऊ, अशी लोकांची मानसिकता असते, पण तो छायाचित्रकार जास्त पैसे का घेतोय, त्याच्या कामात काय वेगळं आहे, हे लोकांना कळत नाही. केवळ काही रुपयांसाठी हे अनमोल क्षण ते जाऊ देतात.

त्तम छायाचित्रं टिपण्यासाठी तुम्ही काय करता?

काही जण छायचित्रं काढताना, आपल्याला योग्य अँगल येण्यासाठी झोपून, वाकून छायाचित्रं टिपतात, पण मला ते आवडत नाही. प्रत्येक छायाचित्रं काही तरी बोलत असतं. त्यातून भावना व्यक्त होत असतात, मला त्यामागची गोष्ट टिपायला आवडते. हेच माझ्या छायाचित्रणाचं वैशिष्टय़ आहे. मी उगाचच छायाचित्र टिपत नाही मला जेव्हा असं वाटतं की, मी टिपलेलं छायाचित्र उत्तम येणार आहे, तेव्हाच मी कॅमे-याचं बटण दाबतो. उगाचच १०० छायाचित्रं कॅमे-यात टिपायची आणि मग त्यातली चांगली निवडायची हा प्रकार मला आवडत नाही. प्रत्येक छायाचित्रं इतकं परीपूर्ण असलं पाहिजे की, त्यातलं सर्वोत्तम कोणतं हे शोधताना संभ्रम निर्माण झाला पाहिजे. मला माझ्या छायाचित्रांचं फोटोशॉपमध्ये एडिटिंग करायला आवडत नाही, त्यामुळे आपण टिपलेलं छायाचित्र उत्तम असावं, याकडे माझा जास्त कल असतो. कदाचित हेच माझ्या उत्तम छायाचित्रणाचं रहस्य असेल.

तुम्ही फिल्म आणि डिजिटल असे दोन्ही कॅमेरे घेऊन काम केलंय, डिजिटलायझेशनमुळे छायाचित्रणकलेतील जिवतंपणा हरवला आहे, असं वाटतं का?

डिजिटलायझेशनमुळे फायदा झाला आणि तोटाही. फायदा असा की, छायाचित्रण हा प्रकार सगळ्यांसाठी खूप सोपा झाला. कोणीही मनाला वाट्टेल ते आणि वाटेल तितके फोटो काढू शकतो, पण यातून ख-या छायाचित्रकाराचं कसब मारलं गेलं. फिल्ममुळे आतला रोल वाया जाऊ नये, म्हणून छायाचित्र टिपताना छायाचित्रकार दहा वेळा विचार करायचे आणि त्यातून सर्वोत्तम छायाचित्र यायचं, पण आता डिजिटलायझेशनमुळे छायाचित्रकार त्याचा विचार करत नाहीत. डिजिटलायझेशनमुळे छायाचित्रणाला चांगले दिवस आले, पण छायाचित्रकाराला नाही.

भारतात छायाचित्रणकलेचं भवितव्य काय?

भवितव्य म्हणाल तर काहीच नाही. आपल्याकडे कला हा विषय प्रगत नाही. लोकांना कलेची पारख नाही. तुम्ही बाहेरच्या देशात जा. तिथल्या लोकांना कलेची योग्य पारख असते. इथे हे समजायला फार वेळ लागेल. त्यामुळे भारतातील छायाचित्रणाच्या भवितव्याविषयी माझं फारसं चांगलं मत नाही.

भविष्यात तरुणाईने छायाचित्रणांकडे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून पाहावं का?

भविष्यात छायाचित्रणाला चांगले दिवस असतील, असं मला वाटत नाही. कारण डिजिटलायझेशनमुळे छायाचित्रणात मोठी क्रांती झाली आहे. आता यात काही बदल होण्यासारखं उरलेलं नाही. आज छायाचित्रणांकडे इतके लोक वळले आहेत की, आता लोकांना खरा छायाचित्रकार कोण आणि हौशी कोण यातला फरकच कळेनासा झालाय. या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे फोटोग्राफी उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकत नाही. ज्याने खरंच या कलेवर प्रभुत्व मिळवलं आहे, तो एकवेळ या स्पर्धेत टिकेल, पण इतरांनी याकडे न बघितलेलंच बरं. त्याचप्रमाणे ज्याला फोटोशॉप उत्तम येतं, तोही या स्पर्धेत टिकू शकतो. छायाचित्रणापेक्षा येणा-या पिढीने आता व्हिडिओग्राफीकडे जास्त लक्ष द्यावं, त्यात त्यांना जास्त वाव आहे.

नवोदित पिढीला काय कानमंत्र द्याल?

हल्ली खूप जास्त नवोदित या क्षेत्रात उतरत आहेत. कित्येक जण तर एक-दोन र्वष काम करून झाल्यावर ते ग्राहकांकडून एक-दोन लाख अल्बमचे सहज घेतात, पण त्यातल्या अनेकांचं वेगळं कौशल्य दिसतच नाही. त्यांच्याकडे मार्केटिंगचं कौशल्य उत्तम असतं, सोशल मीडियावर ही तरुणाई अ‍ॅक्टिव्ह असते, प्रसिद्धी आणि बडेजावपणा कसा करायचा हेही त्यांना ठाऊक असतं, त्यामुळे ते ग्राहकांना सहज फसवू शकतात. लोकांना अजूनही खरं छायाचित्रण काय, हे कळत नाही. कारण छायाचित्रण ही उत्तम कला आहे. ती समजण्यासाठी एक दृष्टिकोन लागतो. तो सगळ्यांकडेच असतो असं नाही. ज्यांना हे समजत नाही, ते अशा काही छायाचित्रकारांना भुलतात. आपल्या कामाचं मार्केटिंग करणं ही वाईट गोष्ट नाही, पण लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पैसे देतात, त्यामुळे तुमचं काम उत्तम ठेवा. दुस-यांची नक्कल करायला जाऊ नका. या क्षेत्रात काम करताना कोणा मोठया छायाचित्रकाराच्या विशिष्ट शैलीने तुम्हाला आकर्षित केलेलं असतं. त्याच्या शैलीची नक्कल करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. हे कदाचित नकळत होत असेल, पण वेळीच तुम्हाला याचं भान आलं पाहिजे, कोणाची तरी नक्कल करण्यापेक्षा यात सर्जनशीलता आणण्याचा प्रयत्न करा. ट्रेंड काय आहे ते बघून फोटो काढा. ट्रेंडच्या विरुद्ध जाऊन काम करू नका. आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचायचं असेल तर हे आवश्यक आहे. नवोदित मुलांनी गॅलरींमधून भरणारी छायाचित्रकारांची प्रदर्शनं पाहावीत. माहितीचा मोफत साठा उपलब्ध आहे, तिथून माहिती घ्यावी. अनेक ऑनलाइन स्पर्धा असतात. त्यात भाग घ्यावा. आंतराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवायचा असेल तर हे करा आणि महत्त्वाचं म्हणजे या कलेचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करा.

1 COMMENT

  1. थोड्या चुका राहिल्या आहेत. मी मास्टर्स डिग्री घेतली आहे. विलास भेंडे व उमाकांत शिरोडकर यांच्या बरोबर मी मित्तर बेदी यांचेही नाव घेतले होते ते राहिले आहे. इमेज बँक ची सुरुवात १९८७ ला झाली ९५-९६ नाही. बाकी सर्वसाधारण माहिती बरोबर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version