Home कोलाज छोटया निवडणुकीचा मोठा अर्थ

छोटया निवडणुकीचा मोठा अर्थ

1

सगळे हिशोब काळ चुकते करीत असतो आणि भल्याभल्यांची नशा उतरवण्याचे कामही काळच करत असतो. एक वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या ज्या भाजपाला आसमान ठेंगणे झाले होते तो भाजपा महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत जमिनीवर आलेला आहे.

सगळे हिशोब काळ चुकते करीत असतो आणि भल्याभल्यांची नशा उतरवण्याचे कामही काळच करत असतो. एक वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या ज्या भाजपाला आसमान ठेंगणे झाले होते तो भाजपा महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीत जमिनीवर आलेला आहे. नुसता जमिनीवर नाही तर मतदारांनी भाजपाला त्याची जागा दाखवली आहे. किती मस्तीत सगळे बोलत होते. मुख्यमंत्र्यांची मस्ती तर विचारू नका.

मग्रुरीची भाषणे सुरू होती. कारण मोदी लाटेमुळे अठरा महिन्यांपूर्वी यांचे हात आभाळाला पोहोचले होते. जग जिंकणारा सिकंदर यांच्यापुढे फिका पडेल, इतका उन्माद यांना चढला होता. ही माणसे किती खोटी आहेत, हे गेल्या वर्षात दिसून आले आणि यांचे मोदी दसपटीने खोटारडे आहेत, याचाही अनुभव लोक करत आहेत. महागाईने हैराण झालेल्या माणसाने आपल्या मनातला असंतोष आणि संताप या निवडणुकीत पुरेपूररीत्या व्यक्त केलेला आहे.

निदान ग्रामीण भागातल्या निवडणुकांमध्ये तरी निश्चितपणे शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला असे समाजाचे सर्व घटक निश्चितपणे भाजपाला कंटाळले. नुसतेच कंटाळले नाहीत तर शिव्या- शाप घालून अनेकांनी भाजपाला मनातूनही आता हद्दपार केलं. कारण सामान्य माणसं दोन गोष्टी सहन करू शकत नाहीत.

एक फसवणूक आणि दुसरी गोष्ट ढोंग. भाजपावाले सोवळे नेसलेले आहेत. आम्ही स्वच्छ आहोत, आम्ही चारित्र्याचे पुतळे आहोत, अशी त्यांची भाषा. पण यांच्याएवढी ढोंगी माणसे जगात कुठे नसतील. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली ती मवाल्याच्या तोंडी शोभणारी भाषा आहे. ज्या खुर्चीत यशवंतराव चव्हाण बसले होते, वसंतदादा पाटील बसले होते, त्या खुर्चीत आपण बसलेलो आहोत.

नशिबाने ती आपल्याला मिळालेली आहे. त्या पदाची प्रतिष्ठा ठेवण्याकरिता तरी मुख्यमंत्र्यांनी रवीकिरण देशमुखकडून जरी एक-दोन पॅरे लिहून घेतले असते तरी अशी भाषा वापरली नसती. इकडे केंद्रात मंत्री असलेले गडकरी तर चारचौघांच्या देखत अधिकाऱ्याला, त्यांच्या सेवेतील कर्मचा-यांना आणि शिपायाला सुद्धा अगदी दंडूकाची भाषा वापरतात. इतक्या घाणेरडया शिव्या देणारा मंत्री आज कोणीही नसेल. ही माणसे बाहेरून सोवळेपणा दाखवतात. पण ही स्वच्छही नाहीत आणि शुद्धही नाहीत. शिवाय ढोंगी आहेत आणि फसवणूक करणारी आहेत. यांनी शेतक-यांची फसवणूक केली, कामगारांची फसवणूक केली.

मध्यमवर्गीयांची फसवणूक केली. असा एकही विभाग नाही, ज्याची फसवणूक केलेली नाही. मोदींच्या ढोंगामुळे देशातले लोक फसले आणि आता त्यांना पश्चाताप होत आहे, म्हणून पहिल्या संधीची लोक वाट पाहत होते.

भूमीअधिग्रहण विधेयकाच्या निमित्ताने या देशातल्या शेतक-यांची लूट करण्याचा मोदींचा डाव लगेच लक्षात आला आणि म्हणून लोकसभेत अवघे ४५ सदस्य असलेल्या काँग्रेसच्या मागे बहुमताचे बळ असावे इतके सामर्थ्य निर्माण झाले. हे सामर्थ्य संख्येचे नव्हते. हे सामर्थ्य शेतक-यांच्या पाठिंब्याचे होते. आणि ती संख्या न मोजता येणारी आहे. हे मोदी सरकार आपल्याला लुटत आहे, हे महाराष्ट्र सरकार लबाड आहे. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत. याचे पुरावेच्या पुरावे समोर येऊ लागले आहेत.

सत्तेत बसलेली ही माणसे भ्रष्ट आहेतच. पण नुसतीच भ्रष्ट नाहीत तर नतद्रष्टसुद्धा आहेत. प्रत्येक दिवशी समोर काही ना काही असे विषय येत गेले की या सरकारची कलई रोज निघू लागली आणि ज्या काँग्रेसला बदनाम करण्याची मोहीम या मंडळींनी निवडणूक काळात चॅनेलवाल्यांना हाताशी धरून केली होती, ती या निवडणुकीत पार उघडी पडली.

ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो किंवा नगर परिषद, महापालिका असो. त्या त्या गावातल्या आणि शहरातल्या मतदारांच्या मनाचे त्या संस्था हे आरसे आहेत. नगर परिषद म्हणजे तालुका पातळीवरची सामान्य गावे.

या गावाचे मिश्रण तर असे आहे की इथे बुद्धिवादी आहेत, व्यापारी आहेत, कष्टकरी आहेत, तरुण आहेत, महिला आहेत. अशा समाजातल्या सर्व विभागातील मतदारांनी आपला कौल या निवडणुकीत दिला आणि ज्या दोन मोठया महानगरपालिका मानल्या गेल्या होत्या त्या म्हणजे कल्याण-डोंबिवली आणि दुसरी कोल्हापूर या दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपाला सत्तेपासून मतदारांनी दूर ठेवले ही सगळयात महत्त्वाची गोष्ट. कोल्हापूरमध्ये तर ताराराणीच्या सोबत गेल्यामुळे भाजपाची अब्रू काहीशी वाचली. पण त्या

महानगरपालिकेत शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार. कल्याण-डोंबिवलीतही भाजपाची जी मिजास होती ती मिजास पूर्णपणे उतरलेली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही इतरांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन करू शकतो. करून दाखवा ना. बोलता कशाला? पण खरी गोष्ट अशी आहे की, कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने भाजपाची जिरवली आहे. मुख्यमंत्र्यांचे तर नाक तळापासून कापले.

आता राहिला प्रश्न ग्रामीण महाराष्ट्राचा. या ग्रामीण महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने २४५ जागा मिळवून क्रमांक एकवर झेप घेतलेली आहे. एकटया विदर्भात नऊ जिल्ह्यांत नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस १०२ जागांवर विजयी झालेली आहे. भाजपा ७१ जागांवर विजयी झालेली आहे.

राष्ट्रवादी ४४ जागांवर निवडून आलेली आहे. आणि शिवसेना अवघ्या २१ जागांवर आहे. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी इथून पुढे शहाणपणाने वागली. महाराष्ट्रात या दोन पक्षांची आघाडी झाली तर या पक्षांना हरवण्याची हिंमत ना भाजपाची आहे ना शिवसेनेची आहे. इथून पुढे पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढतील हीच भूमिका घेणे गरजेचे आहे.

काही निर्णय काळानुसार घ्यावे लागतात. काँग्रेसनेही आता प्रतिष्ठेचे प्रश्न न करता पहिल्याप्रथम या देशातल्या सत्तेतून आणि महाराष्ट्रातल्या सत्तेतून भाजपाला हद्दपार करणे हे एकमेव राष्ट्रीय कर्तव्य समजले पाहिजे. कारण भाजपा चार वष्रे सत्तेत राहिला तर या देशात अराजक निर्माण होईल. ही माणसे एवढी खोटी आहेत, रामाला फसवायला यांनी कमी केलेले नाही. तर सामान्य माणसांची काय पर्वा करणार आहेत?

प्रभू रामचंद्राच्या नावाचे मंदिर बांधून त्याची पक्षाच्या जाहीरनाम्यात जाहीर कबुली देणारी ही मंडळी रामाला फसवतात. सत्ता मिळाल्यावर रामाचे किंवा मंदिराचे नाव काढत नाहीत. ते कोणाशी खरं बोलणार आहेत? या राज्याचा मुख्यमंत्री तर एवढा पोरकट आहे की महाराष्ट्राला दहा वष्रे मागे नेऊन ठेवणार आहे. त्यांच्या नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे दात त्यांच्याच घशात मतदारांनी घातले.

मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या तिन्ही नगर परिषदांमधून भाजपाला हद्दपार करण्यात आले. तिकडे ‘लोकांच्या मनात मीच मुख्यमंत्री आहे’ असे सांगणा-या पंकजा मुंडे यांच्या बीडमध्ये मतदारांनी भाजपाला धोबी घाटासारखे आपटले. जालन्यात भाजपाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे. दानवे कसले दानवच म्हणा.

महाराष्ट्रासाठी या दानवाने इतक्या वर्षाच्या खासदारकीच्या काळात केले काय? एक तरी विषय त्यांनी महाराष्ट्राला दाखवून द्यावा, जो महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. जालन्याच्या या खासदाराने लोकसभा दणाणून टाकली, असा एकतरी विषय दाखवा. तोंड उघडले नाही या माणसाने. त्या जालना जिल्ह्यातही दानवे आणि मंत्री लोणीकर यांची नाके मतदारांनी तळापासून कापली. फार छान झाले.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भाजपा पराभूत होतो आहे. हा लोकसंताप टिकवण्याची जबाबदारी आता काँग्रेसवर आणि राष्ट्रवादीवर आहे. चार र्वष हा संघर्ष जारी ठेवला पहिजे. मोदींना देश चालवता येत नाही. त्यांच्याविरुद्धही देशभरात असे अराजक निर्माण होईल की त्यांना पळताभुई थोडी होईल.

महाराष्ट्रात तर भाजपा हा विषय कायमचा बाद करून टाकला पाहिजे. देशाला घातक अशी ही विचारसरणी, धार्मिक उन्माद या सगळयाचे मिश्रण म्हणजे भाजपा आहे. भाजपाची ही धोरणे देशाला तोडणारी आहेत. कोणाला पटो न पटो. पण काँग्रेसचा खानदानीपणा भाजपाजवळ कधीही येणार नाही. काँग्रेसमध्ये काही दोष असतील. ते सगळयांमध्ये असतात. पण काँग्रेसचा विचार ज्या दिवशी पूर्णपणे मोडेल, त्या दिवशी हा देश मोडून पडेल. सर्व जाती-धर्माना बरोबर घेऊन जाण्याशिवाय या देशाला पर्याय नाही आणि काँग्रेसचा हा विचार हीच देशाच्या विविधतेमधली एकता आहे.

एक मोठी चूक करून जनतेने केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपाला सत्तेवर बसवले याची फार मोठी किंमत देशाला मोजावी लागणार आहे. अठरा महिन्यांपूर्वी ज्या मोदींची लोकप्रियता शिगोशिग होती ते मोदी आज लोकांच्या मनात राहिलेले नाहीत. पण जेव्हा भाजपाच्या भांडयाची कलई निघायला सुरुवात झालेली आहे. तेव्हाच काँग्रेसने आक्रमक होणे गरजेचे आहे. ‘लोहा गरम है, हतौडा मार दो,’ ही भूमिका घ्यायचे दिवस आता काँग्रेससमोर आलेले आहेत.

देशाचे आणि राज्याचे वाटोळे व्हायचे नसेल तर काँग्रेसने आता रस्त्यावर उतरावे, पडेल ती किंमत द्यावी. लोक काँग्रेसच्या बरोबर येतील. ७८ साली असेच झाले नव्हते का? इंदिराजी स्वत: निवडणूक हरल्या आणि नागपूरला येऊन त्यांनी प्रश्न विचारला. ‘हारे तो क्या हुआ. फिर जीत जायेंगे.’ त्या पवनारला निघाल्या आणि त्यांच्या मागे लाखो लोक आहेत, हे त्यांना पाहता आले. आज नेमकी तीच स्थिती आहे.

भाजपाबद्दलचा भ्रमनिरास झाल्यानंतर शेतकऱ्याला मानसिकदृष्टया संघटित करायला कोणीही बाहेर पडलेले नसताना मोदींनी भूमिअधिग्रहण विधेयक का मागे घेतले? काँग्रेसच्या बाकावर लोकसभेत फक्त ४५ जण असताना २८३ बहुमतात असलेल्या भाजपाला माघार का घ्यावी लागली? शेतक-यांच्या मनातून मोदी उतरले, भाजपा उतरला. आणि म्हणून मोदींचा पराभव झाला. आज ही स्थिती आहे, पुढच्या चार वर्षानंतर किंवा त्याच्या अगोदर सुद्धा भाजपा या देशात पुन्हा निवडणूक जिंकू शकणार नाही, असे वातावरण निर्माण करून काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांनी आता मैदानातच उतरले पाहिजे.

लोक निश्चित तुमच्या बरोबर येतील. चुकीच्या रस्त्याला एकदा माणूस जातो. पुन्हा जात नाही. २०१४ चा रस्ता चुकीचा होता. २०१९च्या विजयाच्या रस्त्याने जायचे आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्राने ग्रामीण भागात भाजपाला पराभूत करून दिलेली आहे. असा या छोटया निवडणुकीचा मोठा अर्थ आहे.

1 COMMENT

  1. सर्व विरोधक एक झाले तर भाजपला हरवू शकतात.मोदींना त्यांचे साधू संत महंत यांची जातीवादी विधाने भोवली. गोमास, जातीय आरक्षणाचा फेरविचार. दादरीकांड , विद्वानांनी मानपत्र परत करणे. कट्टर हिंदुत्वाचा प्रसार तसेच जद, जेडीयू, कांग्रेस, सपा युनिटी यामुळे भाजप हरली. तरी दिल्लीपेक्षा परिस्थिती चांगली आहे. भाजपने यावरून बोध ghyava…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version