Home Uncategorized जपूया जमिनीचे आरोग्य!

जपूया जमिनीचे आरोग्य!

1

जमीन हा संपूर्ण सृष्टीचा मूलभूत आधार आहे. तो एक नैसर्गिक, मर्यादित स्वरूपाच्या आणि पुनर्निर्माण न होणारा अनमोल स्रोत आहे. मानवीय जीवनाच्या अमर्याद गरजा भागविण्यासाठी या संसाधनांचा अविरतपणे वापर होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजेपोटी उत्पन्न होणा-या असंख्य गरजा भागविण्याचे आव्हान या दुर्मीळ संसाधनावर आहे. भविष्यातही अन्नधान्याची सुरक्षितता जोपासण्यासाठी जमिनीचा योग्य वापर करून शाश्वत व्यवस्थापन करावे लागणार आहे.  जमीन या संसाधनाविषयी, तिच्या आरोग्याविषयी आणि शाश्वत व्यवस्थापनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी २०१५ हे वर्ष जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ५ डिसेंबर २०१५ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मृदा दिवस’ म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने ‘सुदृढ जीवनासाठी सुदृढ जमीन’ हे घोषवाक्य जमीन आरोग्याच्या जागरूकतेसाठी देण्यात आलेले आहे. या माध्यमातून जमिनीचे संवर्धन होऊन आपल्या पुढील पिढय़ांसाठी तसेच भविष्यातील गरजांसाठी हा स्रोत शाश्वत राहील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. जगभरात त्या निमित्ताने या दिवशी निरनिराळया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आपल्या कोकणातील जमिनीचा विचार केल्यास आपल्याकडील जमिनी काही प्रमाणात सुपीक आणि कसदार आहेत. कोकणातील शेतीच्या प्रगतीमध्ये या जमिनीचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. कोकणातील जमिनी या मुख्यकरून जांभ्या दगडापासून बनलेल्या आहेत. पाणथळ आणि वरकस अशा दोन प्रकारच्या जमिनी येथे आढळतात. जांभ्या दगडाच्या कातळ भागावर आंबा हे मुख्य पीक आहे. आणि पाणथळ जमिनीमध्ये भात हे मुख्य पीक आहे. उन्हाळयामध्ये पाण्याची उपलब्धता असेल तर अशा जमिनीमध्ये भुईमूग, सूर्यफूल, चवळी व थोडया प्रमाणात भाजीपाला घेतला जातो. परंतु गेल्या काही वर्षापासून आपल्या जमिनींची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कमी झालेली आहे.

पीक उत्पादन घेताना आपण त्या पिकोंचे किती उत्पादन घेणार याबाबतचा विचार करतो, परंतु ती पिके ज्या मातीत उगवत असतात त्या मातीबद्दल आपण किती विचार करतो? जरी आपल्या मातीचा कस कमी होत चालला आहे व त्यामुळे उत्पादन घटत चालले आहे, हे माहिती असले तरी आपण मातीला तिची सुपीकता परत मिळवून देण्याकरिता काय उपाय केले पाहिजेत हे समजून घेतो का? आपल्याक डील जमिनींची सुपीकता कमी होण्याची खूप कारणे आहेत, त्यात मुख्य करून वंशपरंपरागत होणा-या वाटण्यांमुळे जमिनीचे होणारे तुकडे सेंद्रिय आणि हिरवळीच्या खतांची कमी उपलब्धता आणि कमी होत चाललेले पशुधन, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, हवामानातील बदल आणि मजुरांची कमतरता त्यामुळे बांधबंदिस्ती करणे शक्य होत नाही. त्याचा मुख्य परिणाम म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. आपल्याकडील जमिनीची सुपीकता आणि जिवंतपणा कमी कशाप्रकारे झाली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे १५-२० वर्षापूर्वी पहिल्या पावसात येणारा सुगंध नाहीसा झाला आहे.

मातीला व्हॅनिला किंवा अत्तरासारखा एक सुगंध सुटायचा,त्याचे मुख्य कारण ‘अ‍ॅक्टिनोमायसिटीस’ या तंतुमय जीवाणूंचे कार्य. परंतु गेल्या काही वर्षापासून हा सुगंध नाहीसा झालेला आहे. कारण अ‍ॅक्टिनोमायसिटीस या जीवाणूंच्या वाढीसाठी आवश्यक असलेले त्याचे अन्न म्हणजे शेणखत, पालापाचोळा, हिरवळीची खते यांची अनुपलब्धता. या जीवाणूंमुळे पीक वाढीसाठी आवश्यक असणा-या ह्युमसची निर्मिती होते. हे जीवाणू शेणखत, सेंद्रिय खते, जमिनीमध्ये वापरण्यात येणा-या सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी झाले, त्यांची जागा रासायनिक खते आणि कीटकनाशकांनी घेतली आणि शेतक-यांची हजारो वर्षे सेवा करणारे हे जीवाणू मृत्यूंच्या वाटेवर प्रवास करू लागलेत.

आजकाल अनेक  रासायनिक खते,कीटकनाशके, तृणनाशके वापरली जातात. त्यामुळे मातीमध्ये असलेले कीटक, सुक्ष्मजीव मरून जातात. जनावरांना जी काही औषधे दिली जातात. त्यांचा अंशसुद्धा शेणात उतरतो व मातीतल्या सजीवांना घातक ठरतो. म्हणून आपण मातीकडे काळजीपूर्वक पाहायला हवे व तिला योग्य तो आधार द्यायला हवा. आपण मातीचा प्रकार, तिचा कसरदारपणा, तिची सुपीकता या सर्वाबद्दल माहितीही करून घेतली तर आपण त्या मातीचा उत्तम उपयोग करून घेऊ शकतो. वेगवेगळया प्रकारची माती वेगवेगळया पिकांकरिता योग्य व चांगली असते.

नत्र,स्फुरद आणि पालांश या व्यतिरिक्त मातीत क र्बही मोठया प्रमाणात असते आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे गांडूळ आणि इतर कीटक,सुक्ष्मजीव हे घटक ही असतात आणि त्यांच्यामुळेच आपली माती कसदार आणि सुपीक बनते.आपल्याला जर आपली माती उत्तम व निरोगी असायला हवी असेल तर मातीतले सर्व सजीवसुद्धा निरोगी असायला हवेत हे ही लक्षात घ्यायला हवे.

मातीच्या सुपीकतेचा विचार करण्याअगोदर माती म्हणजे काय? याचीही माहिती असणे आवश्यक आहे. मातीच्या पातळ थरात पृथ्वी आच्छादलेली आहे. माती निर्माण होण्याची निसर्गातील प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व शतकानुशतके चाललेली असते. पाऊस, थंडी-वारा यांच्या मा-याने खडक झिजून झिजून शेवटी त्यांचे मातीमध्ये रूपांतर होते. जमीन वाढणा-या झाडांना आधार देते, त्यांना पोषक अन्नद्रव्ये पुरवते, जमिनीत सुक्ष्म जीवजंतू राहतात. त्यायोगे मातीमध्ये हवा आणि पाणी खेळते राहण्यास मदत होते.

माती चार घटकांपासून बनलेली असते. खनिजद्रव्ये (४५ टक्के),सेंद्रिय द्रव्ये (५ टक्के), जल (२५ टक्के) आणि वाफ (२५ टक्के) पिकांची वाढ होण्याकरिता हे चारही घटक योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मातीमध्ये कीटकांची टरफले, प्राणिमात्रांचे अवशेष मिसळून राहतात. साधारणत: २.५ से.मी. मातीचा थर तयार होण्यासाठी ६५० वर्षे लागतात. परंतु हाच थर वाहून जाण्यासाठी पावसाची एक मोठी सर पुरेशी आहे.

पृथ्वीवर जेवढी जमीन आहे तेवढीच राहणार तिच्यात वाढ होणार नाही, म्हणूनच उपलब्ध असलेली अनमोल जमीन जपून व काळजीनेच वापरली पाहिजे. आतापर्यंतच्या विवेचनावरून स्पष्ट होते की, दिवसेंदिवस जमिनीचा गुणात्मक दर्जा घसरत आहे. जमिनीचा जिवंतपणा कमी होत चाललेला आहे. त्या अनुषंगाने जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी पुढील उपाय उपयुक्त ठरतील.

जमिनीचा कमी-अधिक उतार, डोंगर रांगा आणि जमिनीचा उंच-सखलपणा जमिनीची धूप करण्यास कारणीभूत ठरतो. म्हणून पावसाच्या पाण्याला अडवून जल आणि मृदसंधारणासाठी छोटया जलसंधारण क्षेत्राची उभारणी करावी. छोटया नाल्यांना योग्य आकार देऊन त्यावर बांध घालणे इ. योजना करावी, त्यामुळे जमिनीची धूप कमी होईल.

जमिनीचा सजीवपणा प्रामुख्याने जमिनीतील सेंद्रिय द्रव्यांच्या प्रमाणावर आणि गुणधर्मावर अवलंबून असतो. सेंद्रिय खत म्हणजे शेणखत, कंपोस्टखत, पेंडीचे खत, हिरवळीचे खत, प्रेसमड, गांडूळखत या सर्व सेंद्रिय द्रव्यांवरच जमिनीचे सर्व गुणर्धम नियंत्रण करणा-या सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अवलंबून असते. सेंद्रिय खताच्या नियमित वापराने जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय कर्ब स्थिरावतो. सूक्ष्म जीवाणूंची संख्या आणि जैविक प्रक्रियांमध्ये समतोल निर्माण क रून, जमीन सच्छीद्र राहते, प्राणवायूचे प्रमाण वाढते, निचराशक्ती, जलवाहकता आणि जलधारणक्षमता वाढते. जमिनीचा सामू स्थिरावून पीक पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.

जेथे सेंद्रिय खते कुजलेल्या स्वरूपात उपलब्ध नसतात, जेथे शेतातील पिकांचे अवशेष, पालापाचोळा, वसकटे, मुळया निरनिराळया पिकांपासून मिळणारा भुसा उसाचे पाचट इ. जमिनीत मिसळून नांगरणी केल्यास जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.

जेथे कमी प्रमाणात सेंद्रिय खते, सेंद्रिय पदार्थ आणि हिरवळीची खते उपलब्ध आहेत, तेथे एकात्मिक खत पुरवठा पद्धतीचा वापर करणे योग्य ठरते. एकात्मिक खत पुरवठा पद्धतीमध्ये रासायनिक खते, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जीवाणूखते, स्फुरद विद्राव्य, जीवाणू संवर्धने, द्विदल धान्यांचे अवशेष, पेंडीची खते इ.योग्य प्रमाणात वापर के ल्यास ती एकमेकांस पूरक ठरून तसेच उभयतांची कार्यक्षमता वाढवितात.

जमिनीचा दर्जा आणि पर्यावरण संतुलन टिकविण्यासाठी, माती परीक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. माती परीक्षणाच्या अहवालानुसार शिफारशीत मात्रेमध्ये बदल करून रासायनिक खतांचा समतोल वापर करणे आवश्यक आहे. खतांचा समतोल वापर नत्र, स्फुरद, पालाश या खतांपुरताच मर्यादित न ठेवता कमतरता असलेल्या इतर अन्नद्रव्यांचा देखील समतोल खत नियोजनात अंतर्भाव करावा.

दिवसेंदिवस सुपीक जमीन अकृषीक योजनांसाठी वापरण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अधिक उपजाऊ शक्तीच्या सुपीक जमिनीच्या अकृषीक वापरांवर बंदी आणण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागेल. जमिनीच्या संवर्धनाच्या दृष्टीने जमीन एकत्रीकरण शेतजमीन सुधारणा कायदा, कुळकायदा इ. प्रभावी अवलंब होणे महत्त्वाचे आहे.

माती आणि व्यवस्थापनाचे वेगळे नियोजन न करता दोन्ही नैसर्गिक संपदांचा संयुक्त विचार व्हावा. पावसावर अवलंबून असलेल्या भागात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या पाणलोट विकास कार्यक्रमाचा प्रभावीपणे वापर करावा.

जमीन ही स्थावर मालमत्ता असल्याने पिढयान् पिढया तिचा वापर होणार आहे, म्हणून शैक्षणिक कार्यक्रमातून जमिनीचे महत्त्व, तिच्याशी असलेली सामाजिक बांधिलकी, उद्भवणा-या प्रदूषणविषयक समस्या जमिनीचे कायदे. इ. वर प्रबोधनाची गरज आहे आणि त्यादृष्टीने जमिनीचे संरक्षण, संवर्धनाला सामाजिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले पाहिजे. माध्यमिक अभ्यासक्रमात याचा अंतर्भाव करावा. गाव पातळीवर मृदनियंत्रण आणि वापर समित्यांची स्थापना करावी. ‘जमीन वाचवा, देश वाचवा’, ‘अनमोल जमीन वाचवा, वसुंधर वाचवा’ ही घोषवाक्ये प्रत्येक नागरिकांच्या मनात रूजविण्यासाठी जन चळवळ सातत्याने सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग येथे मृद शास्त्रज्ञ आहेत)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version