Home रिलॅक्स जाऊ पुढे जोशात!

जाऊ पुढे जोशात!

0

छोटा पडदा हा महिलांचा आहे असं वाक्य नेहमी ऐकायला मिळतं. टीव्हीचा रिमोट हा सहसा गृहिणीच्या हाती असतो. कधी कधी एखाद्या सामन्याच्या वा एखाद दुस-या बातमीच्या निमित्ताने तो कुटुंबातील पुरुषाच्या हाती येत असेलही, मात्र यातली टक्केवारी नेहमीच महिलांच्या बाजूने आहे. त्यामुळे साहजिकच या छोटय़ा पडद्यावरून दाखवल्या जाणा-या मालिकांमध्येही त्यांचाच वरचष्मा पाहायला मिळतो. प्रेक्षकातील स्त्रीवर्गाला आवडतील अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यावरच निर्मात्यांचा नेहमी भर राहिलेला आहे. काही वर्षापूर्वी याच जाणीवेतून सासु-सूनेच्या संबंधांवर आधारित मालिका आल्या. त्यानंतर त्यात अनेक बदल होत गेले. आताशा मात्र या मालिकेतल्या महिलांचा चेहरा संपूर्णपणे बदलून टाकण्याचा चंगच छोटया पडद्याने बांधला असून सध्याच्या व येणा-या मालिकांमध्ये स्त्रीची विविध रूपं पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मालिकांच्या याच बदललेल्या चेह-याचा वेध घेण्याचा हा एक प्रयत्न..

0सासु-सूनांच्या मालिकांनी मोठय़ा प्रमाणावर व दीर्घ कालावधीसाठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘सांस भी कभी बहु थी’ व ‘कहानी घर घर की’ या मालिकांनी तर एक इतिहासच घडवला होता. साहजिकच या मालिकांपासून प्रेरणा घेऊन त्या काळात अनेक मालिका आल्या. त्यातल्या काही चालल्या तर काही मालिकांनी मान टाकली. त्यानंतरचा काळ हा एकाच स्त्रीच्या जीवनातल्या विविध टप्पे दाखवणारा होता. ‘कुसुम’ ही सोनी टीव्हीवर गाजलेली मालिका. या मालिकेत एका मराठी मुलीच्या जीवनातले विविध टप्पे दाखवण्यात आले होते. त्यानंतरचा टप्पा हा तुलनेने कुरुप दिसणा-या मात्र अंगी सामर्थ्य असलेल्या मुलींच्या आयुष्यावर बेतलेल्या मालिकांचा होता. ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतून हे कथानक दाखवण्यात आलं होतं. जस्सीला प्रेक्षकांनी अगदी आपलं मानलं. तिच्या रुपात झालेला बदल मोठय़ा आनंदाने स्वीकारला. त्यानंतर पुढे जाण्याच्या ऐवजी टीव्ही विश्वाने पुन्हा मागे जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्यांच्या अंगलट आला. जस्सीनंतरचा काळ आला तो छोटय़ा पडद्यावरच्या प्रेमकथांचा. या प्रेमकथांनी काही काळ लोकांना धरून ठेवलं होतं. मात्र नेहमीची सहनशील, अन्याय, अत्याचाराने ग्रस्त झालेली मुलगी लोकांना तितकीशी आवडेनाशी झाली. आता टीव्ही एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. सध्याच्या काळात विनोदी व गुन्हेविषयक मालिकांनी टीव्हीचा पडदा व्यापला आहे. त्यातून पुन्हा कौटुंबिक मालिकांकडे प्रेक्षकांना आणण्याचा विचार व प्रयत्न सध्या सर्वच वाहिन्या करत आहेत. याच विचारातून त्यांनी आता आपल्या कक्षा व आपल्या मालिकेतल्या स्त्रीच्या रुपात अनेक बदल केल्याचं दिसून येत आहे.

समाजात सध्या नोकरी करणा-या महिलांची संख्या वाढत आहे. आपल्या स्वाभिमानाची रक्षा करण्यात त्या समर्थ झाल्याचं दिसून येत आहे. एकत्र कुटुंब पद्धती ही केव्हाचीच हद्दपार झालेली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या बदललेल्या करमणूकविषयक गरजा भागवण्यासाठी सध्या वेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात असल्याचं दिसून येत आहे.

सध्या काही काही वाहिन्यांवर सुरू असलेल्या रिअ‍ॅलिटी शोजमध्ये सहभागी झालेल्या महिला कलाकारांनाही पुरुषांच्या बरोबरीने अनेक धोकादायक टास्क दिले जात आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यात कोणताही भेद करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाचं या सीझनचं सूत्रसंचालन दिग्दर्शक रोहित शेट्टी याने केले होते. त्यावेळी त्याने माझ्याकडून देण्यात येणा-या कोणत्याही आव्हानात मी भेदभाव करणार नसल्याचे आधीच सांगून ठेवले होते. असाच एक कार्यक्रम आहे ‘झुंज मराठमोळी’, जो ई टीव्हीवर सादर होत आहे, त्यातही अशाच जोखमीच्या टास्क दिल्या जातात. तुम्ही महाराष्ट्राला किती ओळखता अशी ओळख असलेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रेयस तळपदे करत आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही महिला कलाकारांनाही पुरुषांच्या बरोबरीनेच वागणूक व आव्हानं दिली जात असल्याचं दिसून येत आहे. त्याला प्रेक्षकांचा व खुद्द कलाकारांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशाच प्रकारच्या गोष्टी अनेक विविध शोंमध्येही पाहायला मिळत आहेत. सध्या प्रत्येक वाहिनीवर किमान एकतरी विनोदी कार्यक्रम हा आहेच. या आधी अशा कार्यक्रमांमधून केवळ विनोदाचा विषय ठरलेल्या अनेक महिलाही सध्या सहभागी होऊन चांगल्या प्रकारे स्टॅण्डअप कॉमेडी करतांना दिसत आहेत. मराठीत सादर होणा-या ‘कॉमेडी एक्सप्रेस’ व ‘फु बाई फु’ या कार्यक्रमातून सादर होणारा महिला कलाकारांचा अभिनयही सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. नेहमीची लाजत मुरडत येणा-या स्त्रीची प्रतिमा या कार्यक्रमांनी व त्यात काम करणा-या अभिनेत्रींनी अगदी बदलून टाकली आहे ही गोष्टही नाकारून चालणार नाही.

इतर मालिकांमधल्या स्त्री पात्रांना काही ना काही व्यवसाय असलाच पाहिजे असा सध्याचा ट्रेण्ड आहे. त्या केवळ घरात राहून घरातल्या राजकारणावरच चर्चा करतात किंवा त्या एकमेकींच्या विरोधात राजकारण खेळतात, या पलिकडे जाऊन आता त्यांच्या कार्यालयात चाललेलं राजकारण व त्याचा त्यांच्या घरावर होत असलेला परिणामही सध्या महत्त्वाचा विषय ठरत आहे. काही वर्षापूर्वी मोठे उद्योग असलेल्या घरातल्या स्त्रियांच्या परिस्थितीवर बेतलेलं कथानक असे. त्यात शेअरची खरेदी- विक्री किंवा कंपन्यांचे हस्तांतरण यासारखे विषय असतात. आता तर या पुढे जाऊन अनेक मालिकांमधल्या स्त्रिया या स्वत:ची कंपन्या चालवत असल्याचे दिसून येत आहे. अगदी मराठीतही यशस्वी झालेल्या ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतल्या आजी कंपनी चालवत असतात. तर त्यांची सून एका बँकेत कामाला आहे. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ याएका यशस्वी मालिकेतही नायिका म्हणजेच स्पृहा जोशी वकिलाची भूमिका करत आहे. त्यामुळे कौटुंबिक व त्याचबरोबर कार्यालयीन पातळीवरच्या कथानकांनाही चांगला वाव मिळत असल्याचं दिसून येत आहे. एका बाजूला स्त्रीची भूमिका बदलत असतांना पुरुषांचीही भूमिका बदलण्यात येत आहे. झी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘जमाईराजा’ या मालिकेची टॅगलाईनच मुळी ‘बहुओंने निभाई खुब जिम्मेदारी, अब है दामादोंकी पारी’ अशी आहे. या मालिकेत लग्नानंतर आपल्या सासरच्या व्यवहारात व त्या घराच्या भल्यासाठी झटणा-या एका जावयाची कथा सांगण्यात येत आहे. या मालिकेने अनेक वेगवेगळ्या गोष्टीही समोर आणलेल्या आहेत. यात सासूची भूमिका करणारी महिला ही स्वत: एक यशस्वी फॅशन डिझायनर दाखवण्यात आली आहे. आपल्या कष्टाने ती जीवनात यशस्वी होते, मात्र या काळात आपल्या मुलीकडे तिचं दुर्लक्ष होतं. त्यातून या दोघींमध्ये एक वितुष्ट येतं. तिच्या लग्नानंतर तिचा नवरा हे वितुष्ट दूर करून त्या घरात आनंद कसा निर्माण करतो ही कथा दाखवण्यात येणार आहे. सध्या या मालिकेत या दोघांचे प्रेमप्रकरण दिसत असले तरीही पुढे मात्र या कथानकात नेहमीप्रमाणे विविध वळणं येणार आहेत. ‘बे दुणे दहा’ या मालिकेतली नायिका ही एका कॉपरेरेट कार्यालयात नोकरी करतांना दाखवली असून ‘मानसीचा चित्रकार तू’ या मालिकेतली नायिका म्हणजे तेजस्वीनी ही सध्या आयएएसची तयारी करतांना दाखवली आहे. ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेची नायिका शुभ्रा ही विद्यार्थिनी असून तिची आई ही शिक्षिका आहे, तर तिची जाऊ ही डबे बनवून देण्याचा व्यवसाय करताना दाखवण्यात आली आहे.

याही मालिकांना अपवाद हे आहेतच. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत कुणीच काहीही करत नाही. त्यात केवळ अक्कासाहेब अक्कासाहेब करतांना दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतल्या बायकाही काही काम करत नाहीत. बिग मॅजिक या वाहिनीवरच्या ‘अजब गजब घरजमाई’ या मालिकेत तर कल्पनेचा एक नवाच अविष्कार पाहायला मिळत आहेत. या मालिकेत हिमानी शिवपुरी यांनी आजेसासूची भूमिका केली आहे. त्यांनी एकटय़ाच्या जोरावर घर व व्यवसाय सांभाळल्याचे यात दाखवण्यात आले आहे. यात त्यांनी आपल्या घरच्या मुलींना सासरी पाठवण्यापेक्षा सगळ्याच मुलींसाठी घरजावई आणले आहेत. घरजावई ही संकल्पनाही सध्या मालिकांची आवडती संकल्पना बनली असल्याचं दिसून येत आहे. या मालिकांना मिळत असलेले संमिश्र यश पाहता प्रेक्षकांना नेमके काय आवडते हे नेहमीप्रमाणेच गुलदस्त्यात आहे. सध्याच्या काळात महिलांच्या विषयीचा दृष्टीकोण हा काहीसा बदलत असलेला पाहायला मिळत आहे. त्यांच्या परंपरागत सादरीकरणात काही बदल करणं आवश्यक असल्याचा विचार अनेक निर्मात्यांकडून व्यक्त होत आहे. मालिकांना मिळणारा प्रतिसाद पाहता यापुढचा काळ हा स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणा-या महिलांवर आधारित मालिकांचा असेल असा अंदाज करायला हरकत नाही.     

केवळ महिलांसाठीची वाहिनी

आजच्या काळातल्या महिलांचे प्रतिनिधीत्व करणा-या मालिकांच्या सध्याच्या ट्रेण्डमध्ये एक पाऊल पुढे टाकत सोनी वाहिनीने खास महिलांसाठी असलेल्या एका नव्या वाहिनीची घोषणा केली आहे. ‘सोनी पल’ असं या वाहिनीचे नाव असून ‘खास महिलांच्या जीवनातला त्यांचा स्वत:चा असा एक क्षण’ अशी या वाहिनीची टॅगलाईन आहे. ही वाहिनीने नेहमीच्या परंपरागत मालिकांपेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीच्या मालिका या वाहिनीवरुन देण्याचा प्रयत्न करणार असून हिंदी कार्यक्रम निर्मितीच्या क्षेत्रात असलेल्या अनेक दिग्गज निर्मिती कंपन्यांना यासाठी पाचारण केलं आहे. त्यातही आजच्या काळातल्या महिलांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न या मालिकांमधून करण्यात आला आहे. या वाहिनीचा चेहरा म्हणून जुही चावला यांना निवडण्यात आले आहे. कोणत्याही वाहिनीसाठी एक ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर नेमण्याचाही एक नवाच पायंडा या वाहिनीने घालून दिला आहे. या वाहिनीवर खास महिलांसाठी एक गेम शो असून त्यात सर्वसामान्य माहिलांनाही सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. ‘दिल है छोटासा छोटीसी आशा’ असे या गेम शोचे नाव आहे. ‘एक रिश्ता ऐसा भी’ या मालिकेतून भावोजी व मेहुणी यांच्यातल्या नात्याकडे एका वेगळ्याच कोनातून पाहण्यात येणार आहे. यात सध्याच्या अनेक परंपरांविषयी प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात येणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. ‘तुम साथ हो जब अपने’ या मालिकेतून एका मुस्लीम मुलीच्या जीवनातील तिच्या टेनिस खेळाविषयी असलेल्या प्रेमाला होणारा विरोध दाखवण्यात आला आहे. अशा विविध मालिकांमधून ते सध्याच्या बदलत्या काळाचे प्रतिबिंब पाहायला मिळणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version