Home टॉप स्टोरी जेम्स लेनचे कौतुक आणि पुस्तक वितरण केल्याबद्दल पुरंदरेंना पुरस्कार दिला काय?

जेम्स लेनचे कौतुक आणि पुस्तक वितरण केल्याबद्दल पुरंदरेंना पुरस्कार दिला काय?

1

‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणारे पुस्तक लिहिणा-या जेम्स लेन यांचे जाहीर कौतुक केले म्हणून राज्य सरकारने बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे की, त्यांच्या पुस्तकाचे अधिकृत विक्रेते म्हणून हा सन्मान केला?’’ असा संतप्त सवाल काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारला विचारला आहे.

मुंबई- ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणारे पुस्तक लिहिणा-या जेम्स लेन यांचे जाहीर कौतुक केले म्हणून राज्य सरकारने बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे की, त्यांच्या पुस्तकाचे अधिकृत विक्रेते म्हणून हा सन्मान केला?’’ असा संतप्त सवाल काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारला विचारला आहे. शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. आम्हाला आमची अस्मिता प्राणापेक्षाही प्रिय आहे, असेही राणे यांनी गुरुवारी येथे ठणकावून सांगितले.

संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना वादग्रस्त बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देणे, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही आरोपी न सापडणे आणि नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले बिहार पॅकेज या विषयावर आपली मते मांडण्यासाठी ‘गांधी भवन’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी सरकारवर जोरदार तोफ डागली. ‘मराठवाडय़ात भीषण दुष्काळ असताना त्यावर काही उपाययोजना करण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने वादग्रस्त असणारे बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देऊन राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळावरील लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच सरकारने हे कारस्थान केले आहे, असे माझे ठाम मत आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ दिल्यामुळे संपूर्ण राज्यातील बहुजन समाज आणि मराठा समाजामध्ये तीव्र संताप उसळला आहे. त्याचे पडसाद जागोजागी उमटत आहेत. हा पुरस्कार देण्यामागे सरकारचा हेतू शुद्ध नाही. तसा असता तर हा वाद निर्माण झाल्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी पुरस्काराविरोधात भूमिका घेणा-यांना बोलावून चर्चा केली असती. कारण विरोध करणारी कुणी सामान्य माणसे नव्हती. त्यापैकी अनेक जण साहित्यिक, इतिहास संशोधक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मनातील शंकांचे सरकारच्या वतीने चर्चा करून समाधान करण्याची गरज होती; परंतु ही विचारवंत मंडळी तळमळीने हा पुरस्कार देऊ नका, असे सांगत असताना, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्या नाकावर टिच्चून हा पुरस्कार दिला जातो, यामागे मुख्यमंत्र्यांचा उद्दामपणा आहे. त्यामुळेच लोकांच्या मनातील संताप उफाळून वर आला आहे. याची जाणीव सरकारलाही आहे. म्हणूनच हा समारंभ जाहीररीत्या भव्य स्वरूपात आयोजित न करता शे-दीडशे माणसे बसणा-या

‘राज भवना’वरील दरबार हॉलमध्ये घ्यावा लागला. वर मुख्यमंत्री म्हणतात, ‘आम्ही घाबरत नाही’. तुम्ही घाबरत नाही, तर मग इतक्या कडक पोलीस बंदोबस्तात पुस्कार वितरण सोहळा का घेतला? भाजपा सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर लाखो लोकांच्या साक्षीने होतो. मग महाराष्ट्राचे भूषण असणारा पुरस्कार सोहळा एका छोटय़ा हॉलमध्ये का घेतला जातो? अशा परखड सवालांची सरबत्ती त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांची भाषा बघा. काय तर म्हणे ‘हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बाबासाहेबांचे जाहीर भव्य सत्कार अनेक ठिकाणी होतील.’ मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, लोकांच्या भावना एवढय़ा तीव्र आहेत की यापुढेही तुम्हाला पुरंदरेंचे सत्कार पिंज-यातच घ्यावे लागतील. कारण ज्या जेम्स लेनने शिवाजी महाराजांची बदनामी करणारे पुस्तक लिहिले, त्याचे जाहीर कौतुक २१ सप्टेंबर २००३ रोजी सोलापूर येथे भाषण करताना पुरंदरेंनी केले होते. इतकेच नव्हे तर ज्या पुस्तकावर बंदी घालण्यात आलेली आहे, त्या पुस्तकाचे पुरंदरे अधिकृत विक्रेते आहेत. सरकारने एकदा जाहीर करून टाकावे की, जेम्स लेनचे कौतुक केले म्हणून हा पुरस्कार दिला की, त्यांच्या पुस्तकांचे अधिकृत विक्रेते म्हणून पुरंदरे यांचा गौरव केला?’ मुख्यमंत्री म्हणतात, पुरंदरेंनी शिवाजी महाराज घराघरात पोहोचविले. माझा त्यांना सवाल आहे की, शिवाजी महाराजांमुळे पुरंदरे आहेत, की पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज आहेत, याचा खुलासाही त्यांनी करावा, असा सणसणीत टोलाही राणे यांनी लगावला.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि शिवसेना नेत्यांचाही राणे यांनी या वेळी समाचार घेतला. ते म्हणाले, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनाही चांगलाच कंठ फुटला आहे. हा माणूस म्हणजे बोगस आहे. हे शिक्षण मंत्री झाल्यापासून विद्यापीठात बोगस पदव्या देण्याचे प्रकार वाढले. वाढणारच ना! शिक्षण मंत्र्यांचीच पदवी बोगस असेल तर आपण तरी का अभ्यास करायचा? असेच लोकांना वाटत असेल, असा टोला लगावत राणे म्हणाले, अशा सांस्कृतिक मंत्र्यांनी पुस्कार वितरण सोहळय़ात पुरंदरेंचे कौतुक केले. वर म्हणतात मी मराठा आहे. हो आहे ना! तुमच्यासारखे मराठे शिवाजी महाराजांच्या काळातही होते. त्यांनी महाराजांना जागोजागी विरोध केला. त्यातलेच हे आहेत, असेही राणे यांनी सुनावले. शिवसेनेबद्दल तर न बोललेलेच बरे, असे सांगून राणे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरच ज्वलंत शिवसेना संपली. ज्यावेळी जेम्स लेनच्या पुस्तकावरून वाद झाला, तेव्हा भांडारकर संस्थेवर हल्ला करणारे शिवसैनिक होते. तो जाज्वल्य शिवसैनिक आता उरला नाही

डॉ. दाभोलकर-पानसरेंच्या मारेक-यांना सरकारचे पाठबळ

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज दोन वर्षे उलटून गेली, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येलाही सहा महिने पूर्ण झाली. तरी या दोघांच्याही मारेक-यांना पकडण्यात सरकारला यश आलेले नाही. किंबहुना जोपर्यंत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत डॉ. दाभोलकर-पानसरे यांचे आरोपी पकडले जाणार नाहीत, असेच मला वाटते. कारण या मारेक-यांना सरकारचेच पाठबळ आहे, असेही राणे म्हणाले.

बिहार पॅकेज म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण

बिहारमधील विधानसभा डोळय़ांसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारला सव्वा लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. इथे महाराष्ट्रातील जनता दुष्काळामध्ये होरपळत आहे. चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना इथे मदत द्यायला पंतप्रधानांना वेळ नाही. पण बिहारमधील निवडणुका पाहून तिथे घोषणा केली; परंतु ते जाहीर केलेले पॅकेजही तेथील जनतेला मिळणार नाही. कारण मोदींच्या घोषणा म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण आहे, हे आता या देशातील लोकांना कळून चुकले आहे. लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दिलेली किती आश्वासने पूर्ण झाली? आले का अच्छे दिन? असा सवाल करून राणे म्हणाले की, आता नरेंद्र मोदी यांच्या भूलथापांना कोणीही फसणार नाही, हे बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर दिसून येईल.

1 COMMENT

  1. नारायणराव राणे, तुम्हाला सगळ्या मराठ्यांचे धन्यवाद. शिवाजीराजेंचा भव्य इतिहास हा मराठ्यांचा कर्तुत्वाचा इतिहास आहे. शिवाजीराजे हे सगळ्या मराठ्यांची आणि बहुजन समाजाची अस्मिता आहे. ७००-८०० वर्षाच्या मराठ्यांच्या इतिहासात ग्वाल्हेरच्या शिंदे पासून तंजावरच्या भोसले पर्यंत आणि बडोदाच्या गायकवाड पासून मध्यप्रदेशच्या पवार पर्यंत असंख्य पराक्रमी लढवय्ये मराठा राजे, संस्थानिक, सरदार आणि सैनिक होऊन गेले परंतु मराठेशाहीत छत्रपती शिवाजीराजेंचे स्थान सर्वोच्च आहे असे सगळे मराठे मानतात. मराठ्यांच्या इतिहासावर जळणाऱ्या आणि द्वेष करणाऱ्या कारस्थानी पुरंदरेने ब्राह्मणांचे महत्व वाढविण्याकरता शिवाजीराजेंचा इतिहासच बदलण्याची हरामखोरी केली. पुरंदरेने शिवाजीराजेंचे आई-वडील जिजाबाई-शहजीराजेंचा अपमान केला. जेम्स लेनला खोटी माहिती पुरवून गप्प बसणारा लबाड पुरंदरे हाच खरा जेम्स लेन आहे असे आम्ही आधी पासूनच बोंबलत होतो. परंतु ह्या जातीयवादी ब्राह्मणी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने सगळ्या बहुजन समाजाच्या भावना चिरडून पुरंदरेला कडक पोलिस बंदोबस्तात महाराष्टभूषण दिले. आता पुरावे मिळाल्यावर पुरंदरेवर खटला दाखल करून अटक केली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version