Home कोलाज झाडीपट्टी जाणार सातासमुद्रापार!

झाडीपट्टी जाणार सातासमुद्रापार!

1

निखिल खजीनदार हा पश्चिम विदर्भातील अमरावतीचा. पूर्व विदर्भातील झाडीपट्टीबद्दल त्यानं बरंच ऐकलं होतं. पण प्रत्यक्षात झाडीपट्टी रंगभूमीवर जाण्याचा योग आला नव्हता. दरम्यानच्या काळात निखिल मुंबईत वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये गुंतला होता. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात काम करणा-यांचा गोतावळा जमवला होता. त्याच गोतावळ्यात त्याला शलाका पाटील ही रंगमैत्रीण भेटली. ती मुंबईची. तिला झाडीपट्टीबद्दल सांगितलं. ती अवाक् झाली. त्या रंगभूमीवर डॉक्युमेंट्री करावी, असं या दोघांनी ठरवलं. त्यांनी झाडीपट्टी रंगभूमीचा समृद्ध लेखाजोखा कॅमे-यात बंदिस्त केला असून, तो फीचर्स डॉक्युमेंट्रीरूपाने जगभरातल्या वेगवेगळ्या महोत्सवात पोहोचणार आहे..

नाटकावर प्रेम करणारा माणूस दिवाळी ते होळीदरम्यान विदर्भात गेला तर त्याच्या कानावर येतं झाडीपट्टीचं कौतुक. योगायोगानं त्यानं नागपूरपासून साधारणत: शंभर-सव्वाशे कि. मी. अंतरावर जाण्याचं ठरवलं आणि नाटक असलेल्या गावात दाखल झाला तर तो अचंबित होतो. या रंगभूमीचे वेगवेगळे पैलू त्याला खुणावतात. तो लेखक असेल, तर त्यावर लेख लिहितो. फोटोग्राफर असेल तर ते क्षण आपल्या कॅमे-यात बंदिस्त करतो. रंगमित्रांना ते अनुभव शेअर करतो. तिथून परतल्यानंतर तो गप्प बसूच शकत नाही, एवढी या झाडीपट्टीची रंगपरंपरा समृद्ध आहे.

झाडीपट्टीच्या नाटकांत गेल्या तीन-चार वर्षापासून काम करणारा विशाल तराळ हा निखिल खजिनदारचा रंगमित्र. झाडीपट्टीचे असंख्य किस्से त्याच्याकडून निखिलने ऐकले होते. त्याने ते शलाका पाटील या मुंबईच्या रंगमैत्रिणीसोबत शेअर केले. कालांतराने निखिल आणि शलाकाला झाडीपट्टीवर काहीतरी करायला हवं, असं मनापासून वाटायला लागलं. मुंबई-पुण्याची व्यावसायिक रंगभूमी आणि झाडीपट्टीतील रंगव्यवसाय याची तुलनात्मक मांडणी करणारी डॉक्युमेंट्री तयार करावी, असं त्यांनी निश्चित केलं. आज-उद्या करताकरता दिवस सरकत होते. हे काम करण्यासाठी कॅमेरामन हवा होता.

जितेंद्र पंडित या प्रसिद्ध कॅमेरामनला याविषयी सांगितलं. त्यालाही हे सारंकाही भन्नाट वाटलं. सहा जणांची टीम महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा गावात दाखल झाली. त्यात होते ओवी क्रिएशनचे निखिल खजिनदार आणि शलाका पाटील (निर्माते, दिग्दर्शक), कॅमेरामन जितेंद्र पंडित (डिओपी), विशाल तराळ (कार्यकारी निर्माता), विवेक चक्रे, सचिन ठाकरे (स्टील फोटोग्राफी). गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांतील छोटया छोटया गावांत नाटकांचे प्रयोग होत असतात. त्या सर्व गावांपर्यंत नाटक पोहोचवणारं जंक्शन म्हणजे वडसा. ओवीची टीम वेगवेगळ्या गावांत झाडीपट्टीतील रंगपरंपरा अनुभवू लागली. त्यातले वेगळेपण कॅमे-यात बंदिस्त करू लागली. वेगवेगळ्या गावांतील नाटकांवर असणारं प्रेम, त्याविषयी त्यांचं आकलन सारं काही थक्क करणारं वाटलं. हे अनुभवताना व्यावसायिक रंगभूमीचा तुलनात्मक अभ्यास करण्यापेक्षा झाडीपट्टीतील रंगपरंपरेवरच फीचर डॉक्युमेंट्री करावी, हे निखिल आणि शलाकानं निश्चित केलं.

१५ दिवस वेगवेगळ्या गावांत ‘ओवी’ची टीम फिरत होती. वडसा जंक्शन ते नक्षल प्रभावित असलेल्या अतिदुर्गम भागातील छोटी-मोठी गावं, त्यातलं नाटय़वेड त्यांनी पाहिलं. प्रत्यक्ष रंगमंचावर हसवणा-या, रडवणा-या कलावंतांचं खासगी जीवनही कॅमे-यात बंदिस्त केलं. झाडीपट्टी रंगभूमीवर ज्या कलावंतांच्या नावावर तिकिटं विकली जातात, त्या कलावंतांची माहिती देताना, फक्त अँकरचा वापर करून ही डॉक्युमेंट्री कोरडी होऊ नये याची काळजी दिग्दर्शक निखिल आणि शलाकाने घेतली आहे. एकीकडे रसिकांना हसवणारा नट आणि दुसरीकडे त्याचं गावात आठवडयातील सातही दिवस २४ तास सुरू असणारं सलूनही दाखवलं. अशा अनेक बाबी या डॉक्युमेंट्रीमध्ये आहेत. त्यामुळे सिनेमासाठी काम करणा-या या दिग्दर्शक द्वयीनं ही डॉक्युमेंट्री मनोरंजक करण्यात यश कमावलं आहे.

झाडीपट्टीत कलावंतांपेक्षाही येथील रसिक चोखंदळ आहेत. गावखेडयातील साध्या वाटणा-या महिलांनाही संगीत नाटकातील पदं पाठ असतात. एखाद्या गावात जुन्या संगीत नाटकाचा प्रयोग सुरू असेल आणि एखादं पद चुकलं, एखादा प्रवेश बाद केला तर रसिक ते आवर्जून सांगतात. एखाद्या कलावंतांचं काम आवडलं तर त्याला डोक्यावर घेतात. आणि एखाद्याला त्याची भूमिका साकारता आली तर नाटक संपल्यानंतर लगेचच ‘तुमचा रोल आज जमला नाही भाऊ’ म्हणून कलावंताच्या तोंडावरच सांगून मोकळंही होतात. त्यामुळे इथं मोठमोठया नटांना इमाने-इतबारे आपली भूमिका जगावी लागते.

छोटयाशा गावात एकाच वेळी दोन-तीन प्रयोग तर नेहमीच होतात, पण वडसापासून जवळच असलेल्या कुरुड गावात एकाच रात्री, एकाच वेळी ८ ते १० नाटकांचे प्रयोग होतात. या वर्षी या गावात ९ नाटकांचे प्रयोग झाले. ओवीच्या टीमने तिथलं वातावरणही आपल्या डॉक्युमेंट्रीमध्ये बंदिस्त केलं आहे.

याशिवाय झाडीपट्टीतील नाटकांचं जंक्शन समजल्या जाणा-या वडसा या गावाशिवाय प्रा. सदानंद बोरकर हे नवरगावमध्ये नाटकाच्या रीतसर तालमी घेऊन झाडीपट्टीतल्या नाटय़परंपरेत मोलाची भर टाकत आहेत. त्यांच्या नाटकांसह इथली दंडार ही लोकनाटयाची परंपरा, दिवसभर होणारे शंकरपटही या डॉक्युमेंट्रीत असणार आहेत. अत्यंत मेहनतीने सर्व तपशील आपल्या कॅमे-यामध्ये बंदिस्त करून ते एडिट करण्यासाठी एफटीआयमधून तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या नीतू सिंग आणि दुर्गेश काटकर या एडिटर्सकडे सोपवण्यात आले आहेत. मयुरेश केळकर यांच्या पार्श्वसंगीताने ही डॉक्युमेंट्री झाडीपट्टीच्या नाटकाचा समृद्ध दस्तावेज म्हणून वेगवेगळ्या फेस्टिव्हल्ससाठी तयार होत आहे.

ही डॉक्युमेंट्री तयार करताना आलेल्या अनुभवांचा मोठा खजिना ‘ओवी’च्या टीमने साठवून ठेवला आहे. त्यातला एक अनुभव झाडीपट्टीतील कलावंतांच्या जगण्याशी संबंधित आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात ‘ओवी’चे निखिल आणि शलाका कलावंतांच्या गाडीतून प्रवास करत होते. एका जंगलात त्यांची गाडी अडवण्यात आली. ‘कुठं चाललात?’ अशी विचारणा झाली. नाटकासाठी चाललो, असं उत्तर देण्यात आलं. तुम्ही नाटकासाठीच चाललेत कशावरून, अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. त्यांनी गाडीत असणारी वेगवेगळी पत्रकं दाखवली. कसाबसा प्रश्न सुटला. पोलिसांनी गाडी सोडून दिली. त्यानंतर एका अभिनेत्रीने हसत-खेळत या प्रसंगाला समोरं जात, यांना का इथं नाचून दाखवायचं, असं म्हणत तपासणीचा ताण दूर करण्याचा प्रयत्न केला. शलाकाने त्यांना विचारलं, तुमच्याकडे कलावंत म्हणून ओळख दाखवण्याचं कुठलंच ओळखपत्र नाही? त्यांनी नाही, असंच उत्तर दिलं.

झाडीपट्टी रंगभूमीच्या इतिहासात असंख्य कलावंतांनी आपलं आयुष्य वेचलं. लोकांचं मनारंजन केलं. पण आयुष्याच्या संध्याकाळी ‘रंगभूमीचा सेवक’ म्हणून सांगणारा कुठलाही दस्तावेज त्यांच्याकडे नसल्यानं त्यांचं जगणं सरकारदरबारी ‘सामान्य’च राहिलं. दोन-तीन वर्षापूर्वी नाटकाचा प्रयोगासाठी प्रवास करतानाच कलावंतांच्या गाडीला अपघात झाला. त्यात काही कलावंतांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनाही मदतीपासून वंचितच राहावं लागलं. कलावंतांचं जगणं त्यांच्या अभिनयानुसार समृद्ध झालं पाहिजे, यासाठीही ही डॉक्युमेंट्री महत्त्वाची भूमिका मांडणार आहे.

या डॉक्युमेंट्रीचा उद्देश झाडीपट्टीत असणारी रंगचळवळ जगभर पोहोचवण्याचा आहे. त्यातही येथील कलावंतांचं अडचणींवर मात करून जगणं, रसिकांचं नाटकावर असणारं प्रेम, येथील नाटकांचा व्यवसाय, काही गमतीजमती चित्रित करण्याचा प्रयत्न निर्माते शलाका पाटील आणि निखिल खजिनदार यांनी आपलं दिग्दर्शकीय कौशल्य वापरून केला आहे. त्यांच्या मेहनतीचा आणि झाडीपट्टीवर केलेल्या रंगप्रेमाचा गौरव होईल, ही शुभेच्छा!

1 COMMENT

  1. हि एक फार मोठी रंगभूमी आहे.मी जेव्हा गडचिरोली भागाचा दौरा करायचो तेव्हा या प्रकारचे बरेच नाटक पहायचा योग आला.त्यांचे ते भन्नाट पोस्टर ,advertising सर्व काही तुफान.
    या रंगभूमी बद्दल कोणी पुढाकार घेत आहे हे ऐकून बरे वाटले.
    थान्क्स तो All

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version