Home रिलॅक्स ‘डी’ नावाचा मोठा माणूस

‘डी’ नावाचा मोठा माणूस

1

‘प्रहार’ कार्यालयात येताना दोन रस्ते आहेत. त्या कुठच्याही रस्त्याने आले तरी जुन्या गिरणगावातूनच यावे लागते. त्या गिरणगावातल्या कामगारांचा जागता पहारा असलेल्या सर्व गिरण्या आता जमीनदोस्त झाल्या आहेत. त्या गिरण्यांची साक्ष देणा-या उंचच उंच चिमण्या त्याही जमीनदोस्त झाल्या आहेत.

‘प्रहार’ कार्यालयात येताना दोन रस्ते आहेत. त्या कुठच्याही रस्त्याने आले तरी जुन्या गिरणगावातूनच यावे लागते. त्या गिरणगावातल्या कामगारांचा जागता पहारा असलेल्या सर्व गिरण्या आता जमीनदोस्त झाल्या आहेत. त्या गिरण्यांची साक्ष देणा-या उंचच उंच चिमण्या त्याही जमीनदोस्त झाल्या आहेत.

हाच गिरणगाव हे एकेकाळी मुंबईचे वैभव होते. याच गिरणगावातल्या श्रमिकांनी मुंबईच्या वैभवात जशी भर घातली, तशीच गिरणी मालकांच्या संपत्तीतही मोठी भर घातली. एकटया मुंबई शहरात साठ गिरण्या होत्या आणि चार लाख कामगार या गिरण्यांमध्ये काम करत होते.

त्यामध्ये दीड लाख महिला कामगार होत्या. पुढे हा सगळा गिरणगाव उद्ध्वस्त झाला. गिरण्यांच्या जमिनी मालकांनी विकून टाकल्या. आज त्याच गिरणगावात मोठमोठे टॉवर उभे राहिले. सकाळी सातला भोंगा वाजायचा. ते भोंगे बंद झाले. ते भोंगे ऐकूनच नारायण सुर्वे यांनी लिहिले होते की,

‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे.
सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’

नारायण सुर्वे यांनी थोडासा नाही तर कामगारांच्या हितासाठी फार आवश्यक असलेला जोरदार गुन्हा केला. पण शेवटी गिरण्या उद्ध्वस्त झाल्या. कामगार उद्ध्वस्त झाले. गिरणगाव संपला. त्या गिरणीत कष्ट करणा-या आमच्या भगिनी आजूबाजूच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर कुठे केळी विक, कुठे बोरं विक. सुरकुतलेल्या चेह-यासह आयुष्याची अखेर वेचणा-या या भगिनींना आता कोणी वाली नाही.

गिरणी कामगारांनाही कोणी वाली राहिला नाही. या गिरणगावातून रोज ये-जा करताना तो गिरणी कामगारांचा लढा, त्यांना मिळवून दिलेला बोनसचा हक्क, संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील गिरणी कामगारांचा तो फार मोठा सहभाग आणि अख्खा गिरणगाव संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने पेटून उठलेला त्या गिरणगावचे नेतृत्व करणारे कॉ. डांगे.  सेंच्युरी मिल असो, किंवा ग्लोब मिल असो या रस्त्यावरून येताना कॉ. डांगे यांची आठवण येत नाही, असा दिवस जात नाही. एका महान लढवय्याने मुंबईच्या गिरणी कामगाराला जी प्रतिष्ठा दिली होती त्याला तोड नव्हती.

जॉर्ज फर्नाडिसचा लढा वेगळा होता. लढे कामगारांचेच. पण डांगे यांच्या प्रत्येक लढयाला जसे एक आर्थिक तत्त्वज्ञान होते; तसे राजकीय तत्त्वज्ञान होते. मुळामध्ये कॉ. डांगे म्हणजे आमचे ‘डी’ हे फार मोठे स्वातंत्र्य योद्धे होते.

ब्रिटिशांविरुद्ध लढयात कम्युनिस्टांपैकी सर्वात मोठा सहभाग कॉ. डांगे यांचाच होता. मिरत कटाचा खटला असेल किंवा अन्य सत्याग्रह असतील. ब्रिटिशांच्या तुरुंगात एकूण सहा वर्षे आणि आयुष्यामध्ये विविध लढयांमधला कारावास धरून सतरा वर्षे तुरुंगात काढणारे कॉ. डांगे होते.

कामगार नेत्याचा रूक्षपणा डांगे यांना कधीच शिवला नाही. अतिशय रसाळ आणि लालित्यपूर्ण भाषण यात डांगे यांचा हात धरणारा कोणी दुसरा नेता नसावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर अभिमानी, लोकमान्य टिळकांना राजकीय गुरू मानणारे, रामायण-महाराभारताचे मोठे अभ्यासक, एक तत्त्ववेते आणि साम्यवादी विचारसरणीचे भारतातले प्रणेते अशी डांगे यांची किती रूपे आहेत.

वक्ते म्हणून देशामध्ये सोप्या भाषेत बोलणा-या वक्त्यांच्या यादीत कॉ. डांगे आणि जगजीवनराम ही दोनच नावे घातला येतील. इतके सोपे बोलणारे वक्ते मी तरी आयुष्यात पाहिले नाहीत.

वाजपेयींचं वक्तृत्व मधाळ होतं, रसाळ होतं, खिळवून ठेवणारं आणि पल्लेदार होतं. त्या अगोदर सावरकरांचं वक्तृत्वही ओघवत होतं. पण समोर बसलेला आपला श्रोता कोण आहे, हे समजून त्याला समजेल, रुचेल आणि पटेल असं सोप बोलणारा वक्ता म्हणजे डांगे होते.

खूप मोठया वाचनाशिवाय ही गोष्ट शक्य नाही. डांगे खूप वाचायचे. उत्तम इंग्रजी, उत्तम मराठी. लोकसभेत ते दोन वेळा (१९५७ आणि १९६७) खासदार होते. त्यांच्या त्या दहा वर्षाच्या खासदारकीत त्यांच्या वक्तृत्वाने, अभ्यासाने पंडित नेहरूही प्रभावीत व्हायचे.

१९६७, १९७१ या काळात इंदिरा गांधीही प्रभावीत व्हायच्या. पंडित नेहरूंनी डांगे यांच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचा फायदा घेऊन रशियाचे अध्यक्ष निकेता कृश्वेव आणि युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो यांना भेटण्यासाठी आणि भारताच्या तटस्थ भूमिकेला पाठिंबा मिळण्यासाठी मध्यस्थी करायला ज्या प्रतिनिधीला पाठवले होते त्याचे नाव कॉ. डांगेच होते.

१९६७ साली नऊ राज्यांत काँग्रेसची सरकारे गेली होती. लोकसभेतही काँग्रेस पूर्ण बहुमतात नव्हती. अशावेळी कॉ. डांगे यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाच्या साठ खासदारांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला आणि त्यामुळेच १९६९ साली मोरारजी, एस. के. पाटील, अतुल्य घोष, निजलिंगप्पा या चौकडीच्या हातून काँग्रेस वेगळी करून इंदिराजींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, कोळशांच्या खाणींचेही राष्ट्रीयीकरण केले, संस्थानिकांचे तनखे रद्द केले.

या सगळया पुरोगामी निर्णयांच्या मागे वैचारिक बैठक आणि पाठिंबा कॉ. डांगे यांचाच होता. लोकसभेमध्ये इंदिराजींनी तशी स्पष्ट ग्वाही दिली. या सगळया महत्त्वाच्या पुरोगामी निर्णयात डांगे यांच्या भूमिकेचे जेवढे नेमके विश्लेषण देशात व्हायला हवे होते, ते झाले नाही.

‘जगातला सगळा कामगार एक’ आणि त्याच्या लढयाचे प्रतीक असलेला ‘लाल बावटा’ याला डांगे यांनीच प्रतिष्ठा दिली. ‘लाल सलाम’ हा शब्दही डांगे यांनीच लोकप्रिय केला. संयुक्त महाराष्ट्राच्या पेटलेल्या लढयात मुंबईतला गिरणी कामगार सहभागी झाला नसता तर ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ ही घोषणा मुंबईत एवढी घुमली नसती. या कामगाराला लढयात उतरवण्याचे श्रेय कॉ. डांगे यांचेच आहे आणि ग्रामीण भागातल्या शेतक-याला या लढयात उतरवण्याचे श्रेय उद्धवराव पाटील यांचे आहे.

कॉ. डांगे यांची आठवण जेव्हा जेव्हा होते तेव्हा त्यांच्या अजबगजब नेतृत्वाचेही स्मरण होत राहते. डांगे यांनी गिरणी कामगाराला प्रतिष्ठा देताना १९२८च्या संपात त्याला बोनस मिळवून दिला.

बारा महिन्यांच्या कामाला तेरा महिन्यांचा पगार हे सूत्र डांगे यांच्यामुळेच अस्तित्वात आले. संप कधी करावा, मालकाला कोंडीत कधी पकडावे, याचं तंत्र डांगे यांना बरोबर अवगत होतं.

डांगे साहेब यांना संप कधी मागे घ्यावा हे नेमके कळत होते. दत्ता सामंत यांना ते कळले नाही. त्यामुळे गिरणी कामगार देशोधडीला लागला.

या घातक खेळात दत्ता सामंत यांचे आयुष्य काही गुंडांनी संपवले. अशी चूक डांगेसाहेबांनी कधी केली नाही. त्यांच्या प्रत्येक सभेत ते कामगाराच्या सुखदु:खाशी समरस होऊन बोलायचे.

एकदा त्यांच्या घरी बसलो असताना थोडा वेळ चर्चा झाल्यावर ते कामगार मैदानावर सभेला निघाले होते. त्यांच्यासोबत मी होतो आणि त्यांच्याबरोबरच सभेला गेलो. कामगार मैदान होते की नरे पार्क आता नेमके आठवत नाही. पण बहुधा कामगार मैदान होते. तुडुंब भरले होते. ही १९६६ची गोष्ट सांगतो. लाल बावटे फडकत होते.

कॉ. डांगे व्यासपीठावर आले की कामगारांच्या मुखातून प्रचंड घोषणा येत, ‘कॉ. डांगे जिंदाबाद’ त्यावेळी ‘तुम आगे बडो’ आणि ‘हम तुम्हारे साथ है’ या लबाड राजकीय घोषणेचा जन्म झालेला नव्हता. ‘जिंदाबाद’ या एका शब्दामध्येच कामगारांची ताकद आणि कामगारांचे मन नितळपणे दिसायचे. कॉ. डांगे व्यासपीठावर पोहोचले. त्यांचे भाषण सुरू झाले. भाषण कसलं, नुसत्या गप्पा. त्यांनी सुरुवात केली.

व्यासपीठाजवळच्या कामगारांची नावे सुद्धा ते घेत होते. ‘कामगारांचे नाव घेऊन ते बोलायचे, ‘काय रे, कशी चाललीय तुझी गिरणी.’ मग गिरण्यांची नावे घ्यायचे. सीताराम, सेंच्युरी, ज्युपिटर आणि रोज ज्या रस्त्याने यावे लागते ती ग्लोब आणि मग कामगाराला विचारायचे. ‘अरे मला सांगा, तुमचा मालक अमेरिकेत झक मारायला गेला आणि तुम्ही सगळे कामगार गिरणीत काम करत राहिलात तर गिरणी चालेल की नाही?’

कामगार एका आवाजात म्हणायचे, ‘हो चालेल.’ मग डांगे म्हणायचे, ‘मला असे सांगा, तुम्ही तुमच्या गावी घाटावर, कोकणात जिथे कुठे घर असेल तिथे गेलात आणि तुमचा मालक गिरणीत एकटा येऊन बसला तर गिरणी चालेल का?’ कामगार जोरात म्हणायचे, ‘नाही चालणार, नाही.’ मग डांगे म्हणायचे, ‘म्हणजे तुम्ही गिरणीत असाल आणि मालक गिरणीच्या बाहेर असेल तर गिरणी चालेल, बरोबर’ कामगार जोरात म्हणायचे, ‘हो बरोबर.’ मग डांगे म्हणायचे, ‘आपल्याला साम्यवाद आणताना हेच करायचे आहे.

तुला गिरणीत ठेवून तुझ्या गिरणीच्या मालकाला बाहेर काढणे हाच साम्यवाद’ कामगाराला हे तत्त्वज्ञान झटकन सोप्या शब्दांत समजायचे. त्यातले बरेचसे कामगार कोकणातलेच होते. ते कामगार प्रेमाने कॉ. डांगे यांना ‘आमचो डांगो’ असं म्हणायचे. पण कोकणातले कामगार डांगे यांच्यावर जेवढे प्रेम करायचे तेवढेच घाटावरचे कामगारही करायचे.

संयुक्त महाराष्ट्राच्या प्रखर लढयानंतर जेव्हा महाराष्ट्र राज्य निर्मितीचा क्षण जवळ आला तेव्हा हा दिवस १ मे असावा, हा आग्रह कॉ. डांगे यांचाच होता. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात कामगारांचा वाटा फार मोठा आहे. आणि जगातला कामगार दिन १ मे आहे. पंडितजींनी ही तारीख स्वीकारली आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० ला झाली. ही तारीखही डांगे यांच्या आग्रहामुळेच मान्य झाली.

आज डांगे नाहीत, गोदी कामगारांचे नेते मनोहर कोतवाल नाहीत, एस. आर. कुलकर्णी नाहीत, आर. जे. मेहता नाहीत, जॉर्ज विकलांग आहेत. या मुंबईचे जे जे लढाऊ नेते होते ते सगळे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. गिरण्या उद्ध्वस्त झाल्या. कामगार तळपती तलवार राहिली नाही. शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्याला आत्महत्या कराव्या लागत आहेत. कुठच्याच क्षेत्रात लढाऊ नेतृत्वच राहिलेलं नाही.

महाराष्ट्र कुठे होता आणि आता कुठे येऊन पोहोचला? तिकडे यशवंतराव चव्हाण नाहीत, तिकडे अत्रे, डांगे, एस. एम., उद्धवराव नाहीत . समाजमन समजणारी आणि राजकीय भान असणारी ही नेतृत्वाची फळीच आता अस्तंगत झाली. आणि आता उरल्या आहेत चिरफळया. नेतृत्वाचे नुसते तुकडे तुकडे, अशावेळी ग्लोब मिल पॅसेजला वळसा घालून ‘प्रहार’ कार्यालयात येताना रोज आठवतात डांगे.

२०४, राजा राममोहन रॉय रस्त्यावरून जाताना म्हणजे, जॉर्जच्या कार्यालयाहून जाताना आठवतो जॉर्ज, आणि घरात लाटण्यांनी पोळया होत असताना आठवतात मृणालताई. आता लाटणेही मोडून पडले आहे आणि आंदोलनेही संपलेली आहेत. ‘सिंहगर्जना’ शब्द आठवला की आठवतात आचार्य अत्रे. पण आता सिंहही राहिले नाहीत आणि गर्जनाही राहिल्या नाहीत. सिंह गेले, वाघ गेले, आता राहिली आहेत ती फक्त मांजरे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version