Home स्त्री प्रेरणा डॉ. आनंदीबाई जोशी- पहिल्या महिला डॉक्टर

डॉ. आनंदीबाई जोशी- पहिल्या महिला डॉक्टर

1

आज डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिन. ३१ मार्च १८६५ मध्ये पुण्यात जन्मलेल्या आनंदीबाई जोशी यांची आज १५० वी जयंती.

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आनंदीबाईंचा विवाह गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. त्यांचा संघर्ष, नव-याचा त्रास, त्यांची जिद्द् आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.

वयाच्या १४ व्या वर्षी मातृत्त्व प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अपु-या सुविधांमुळे त्यांच बाळ दगावलं. यानंतर त्यांनी मनाशी वैद्यकिय शिक्षण घेण्याचा निर्धार केला. त्यासाठी अपार कष्ट झेलले. १८-१९ व्या वर्षी एकटीनं अमेरिकेला बोटीतून प्रवास केला. तेथे त्यांनी एमडी ही पदवी प्राप्त केली. भारताची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांच्याच नावे जमा आहे.

आनंदीबाई जोशी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये ज्या थिओडोशिया कार्पेटरबाईंकडे होत्या. त्यांनी त्यांना मुलीप्रमाणे सांभाळले. त्यांनी त्यांच्यावर इतकं प्रेम केलं की या बाईंच्या परिवारासाठीची जी सेमेट्री, न्यूयॉर्कमधल्या ज्या पोकिप्सी गावात आहे. तिथेच त्यांनी आनंदीबाई जोशी यांची रक्षा विसर्जित केली. त्यांच्या माहेरच्या एमी लॉट या नावे पोकिप्सी रूरल सेमेट्रीमध्ये आजही आनंदीबाई जोशी यांच्या नावाची समाधी पाहायला मिळते. परदेशात एका भिन्न संस्कृती असलेल्या परिवारात राहताना आनंदीबाईंनी कार्पेटर परिवारात आपलं जे स्थान निर्माण केलं ते मृत्यूनंतरही कायम राहीलं. त्याचीच ही स्मृती आजही या देशामध्ये जपलेली पाहायला मिळते.

डॉ. अंजली कीर्तने यांनी आनंदीबाई यांच्यावर लिहिलेल्या, डॉ. आनंदीबाई जोशी – काळ आणि कर्तृत्त्व या पुस्तकात या संदर्भातले फोटो, लेख वाचायला मिळतात. हे सगळं वाचताना आनंदीबाई जोशी यांच कर्तृत्त्व खरंच केवढं मोठं होतं, हे लक्षात येतं. आज आपण त्यांची १५० वी जयंती साजरी करणार आहोत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. बुद्धीमान तरीही काहीसा विक्षिप्त नवरा, समाजाची अवहेलना हे सारं पचवून आनंदीबाईंनी स्वतःला सिद्ध केलं. १५० वर्षानंतरही आज शिक्षणाच्या बाबतीत मुलींची परिस्थिती काही प्रमाणात सुधारली आहे. तरी ती पूर्ण सुधारली आहे का, असा प्रश्न पडतो. गावखेड्यांच्या पातळीवर आजही मुलींची लवकर लग्न होताना दिसत आहेत.

आजही कित्येकींमध्ये आनेंदीबाई, सावित्रीबाई होण्याची इच्छा आहे. पण त्यांना त्यासाठी मार्ग गवसत नाही. समाजाविरूद्ध काही करण्याचं धाडस या मुलींमध्ये दिसत नाही. अशा वेळेला आनंदीबाईंचा प्रेरणादायी प्रवास निश्चितच मार्ग दाखवणारा आहे. कितीही संकट आली, अडचणी आल्या तरी आपल्या ध्येयाकडे जाण्याची जिद्द् प्रत्येक स्त्रीमध्ये निर्माण होऊ दे. हीच खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version