Home टॉप स्टोरी तर पालिका आयुक्तांना अटक करणार का?

तर पालिका आयुक्तांना अटक करणार का?

1

संपूर्ण मुंबईत कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने डेंग्यूसह इतर साथीच्या रोगांचा फैलाव मोठय़ाप्रमाणात होत आहे.

मुंबई – घरात, सोसायटीत डेंग्यूच्या डासांचे अड्डे आढळल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्याचा महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतलेल्या निर्णयाचा तीव्र निषेध विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी शुक्रवारी केला.

संपूर्ण मुंबईत कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने डेंग्यूसह इतर साथीच्या रोगांचा फैलाव मोठय़ाप्रमाणात होत आहे. त्यामुळे कच-याला जबाबदार असलेल्या महापालिकेचे आयुक्त तसेच महापौरांवर आरोप ठेवून त्यांना अटक करायला हवी,अशी मागणी त्यांनी केली. याबरोबरच पालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये डेंग्यूचे डास आढळल्यास आयुक्तांना अटक केली जाईल का असा प्रश्नही आंबेरकर यांनी केला.

साथीच्या रोगांच्या प्रतिबंध घालणे हे पालिकेचे कर्तव्य असून जानेवारी ते ऑक्टोबपर्यंत केवळ ६२० रुग्ण आढळल्याचे नमूद केले आहे. मात्र,ही आकडेवारी फसवी असून कांजूर येथील एका विभागातच खासगी रुग्णालयातील डेंग्यूची रुग्णांची संख्या १८४ आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत डेंग्यू रुग्णांची संख्या मोठी असल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन लपवी छपवी करत असल्याचा आरोप आंबेरकर यांनी केला.

शहरात डेंग्यूने थैमान घातले असून गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विरोधकांसह सत्ताधारी पक्षांनीही प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर प्रशासन जागे झाले आणि त्यांनी घर, सोसायटी, दुकान आणि कंपन्या परिसरातील झाडांच्या कुंडय़ा, फुलदाण्या किंवा साठवलेल्या ड्रमातील पाण्यात अळया आढळल्यास संबंधित व्यक्ती, सोसायटी पदाधिकारी, मालकांना अटक करण्याचे फर्मान आयुक्तांनी काढले.

आयुक्तांनी हा घेतलेला निर्णय म्हणजे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’या धाटणीचा असल्याचा आरोप आंबेरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला. शहरातील घाण आणि कच-याला जबाबदार धरून आयुक्त सीताराम कुंटे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांनाही अटक करायला हवे,असे त्यांनी स्पष्ट केले.

पालिकेची विविध प्रशासकीय कार्यालये, उद्याने, सार्वजनिक ठिकाणी डेंग्यूच्या अळया सापडल्यास संबंधित अधिका-यांविरोधात अटक केली जाईल काय? असा सवाल करतच केईएम रुग्णालयात डेंग्यूच्या डासांच्या अळया सापडल्या. मग या प्रकरणी आयुक्तांना अटक करणार का असा जाब प्रशासनाला विचारला आहे.

अभिनेते ऋषी कपूर यांनाही डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्या घरात डासांच्या अळया आढळल्या आहेत. मग सेलिब्रेटीनाही हाच न्याय लावणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या साथीच्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी कीटकनाशक धूर फवारणीसाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च झाला आहे. या रोगांचा प्रतिबंध करण्यास पालिकेला अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केली.

1 COMMENT

  1. आजही मुंबईतील चाळीत जेथे गटारे दिसतात त्यात मुद्दामून प्लास्टिकच्या पिशव्या,हेंडसाळ पाणी, निर्माल्य टाकून शेजारी एकमेकास त्रास देतात. स्वताचे घर जास्तीतजास्त स्वच्छ दिसण्याकरिता घरातील छोट्याछोट्या खाद्य पदार्थाच्या पिशव्या,चॉकलेटचे व्यापर्स गटारातून टाकून पूर्ण गटारे चौकअप करतात.जुनी फुले,हारे दरवाजावर लटकवून ठेवतात ज्यामुळे डासांना भरपुर प्रमाणात वाव मिळतो. नगरसेवकांकडे लादिकरणास निवेदन दिले तरी ते काम करू नये, याकरिता तेथील गटप्रमुख/शाखाप्रमुखास धमकी दिली जाते. गटाराची वाहननलिका आपल्या घराच्या दरवाजातून जात नाही म्हणून समोरील व्यक्ती तेथे हवी तेवढी घाण करण्यास तयार असते. बर याबदद्ल पोलिसचौकीत तक्रार जरी केली तर दत्तक वस्ती योजनेतील कंत्राटदार उलट उत्तरे देतात, जा जा के पोलिसचौकिमे ही जायेगा ना उधर अपनी बडेबडे साहब लोकसे बडी पहेचान है और साहब भी बोला है लेकर आओ कुछ तो झगडा कर के, हम लोग उसे मारेगा भी और पैसा भी भरने को बोलेगा, नही तो किसी झूठी केस मे फसा देगा आणि ही सत्य परिस्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version