Home क्रीडा फिन, अँडरसनसमोर भारताची शरणागती

फिन, अँडरसनसमोर भारताची शरणागती

1

तिरंगी मालिकेच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

ब्रिस्बेन – सलामीनंतर तिरंगी मालिकेतील दुस-या लढतीत बुधवारी भारत इंग्लंडला चुरस देईल, अशी अपेक्षा होती. मात्र वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन (५ विकेट) आणि जेम्स अँडरसनच्या (४ विकेट) अचूक मा-यासमोर भारताच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्याने सामना एकतर्फी झाला. भारताने ठेवलेले १५४ धावांचे माफक आव्हान ९ विकेट आणि २२.३ षटके राखून पार करताना इंग्लंडने बोनस गुणासह विजय मिळवला. भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे.

१५४ धावांचे विजयी लक्ष्य गाठायला २७.३ षटके पुरेशी ठरली तरी इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. मध्यमगती स्टुअर्ट बिन्नीने डावाच्या तिस-या षटकात मोईन अलीला (८) बाद केले. मात्र त्यानंतर अन्य सलामीवीर इयन बेल (नाबाद ८८) आणि जेम्स टेलरने (नाबाद ५६) दुस-या विकेटसाठी २४.३ षटकांत १३१ धावांची नाबाद भागीदारी करताना बोनस गुणासह इंग्लंडला विजय मिळवून दिला. बेलने ३२वे अर्धशतक ठोकताना ९१ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ८८ धावा तडकावल्या. जेम्सच्या तिस-या अर्धशतकात ४ चौकारांचा समावेश आहे. भारताच्या गोलंदाजांनीही निराशा केली. केवळ बिन्नीलाच विकेट मिळवता आली. दुखापतीमुळे मध्यमगती भुवनेश्वर कुमार केवळ दोन षटके टाकू शकला.

वास्तविक पाहता भारताचा पराभव पहिल्या सत्रातच नक्की झाला. इंग्लंडविरुद्ध दोन बदल करण्यात आले. पायाचा स्नायू दुखावल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शतकवीर रोहित शर्मा खेळू शकला नाही. त्याच्या जागी अंबाती रायडूला संधी मिळाली. ऑफस्पिनर आर. अश्विनऐवजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला प्राधान्य दिले. नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र फिन आणि अँडरसनसमोर भारताच्या फलंदाजांचे तंत्र उघडे पडले. सलग दुस-या लढतीत सलामीवीर शिखर धवन (१) आल्यापावली परतला. सलामीला बढती मिळालेल्या अजिंक्यने सावध सुरुवात करताना ‘वनडाउन’ रायडूसह (२३) दुस-या विकेटसाठी ५६ धावा जोडताना भारताला सावरले. रहाणेला टेलरकरवी झेलबाद करत फिनने भागीदारी संपुष्टात आणली. मात्र रहाणे बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला. विराट कोहलीने (४) निराशा केली. डावखु-या सुरेश रैनाला (१) सातत्य राखण्यात अपयश आले. दरम्यान, रायडूचाही आत्मविश्वास ढासळला. १९व्या षटकात ५ बाद ६७ या वाईट अवस्थेतील भारताला कर्णधार धोनी आणि बिन्नीने दीडशेपार नेले.

धोनी-बिन्नी जोडीने सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करताना संघाला ब-यापैकी सावरले. मात्र पुन्हा एकदा फिनचा ‘स्पेल’ निर्णायक ठरला. त्याने धोनीला यष्टिरक्षक बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. पुढच्याच चेंडूवर डावखु-या अक्षर पटेललाही (०) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भुवनेश्वर कुमारने त्याची हॅट्ट्रिक वाचवली तरी दुस-या बाजूने अँडरसनने भुवनेश्वर (५) आणि मोहम्मद शामीला (१) झटपट बाद केल्याने भारताचा डाव ३९.३ षटकांत १५३ धावांत आटोपला. बिन्नीने ५५ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले. इंग्लंडतर्फे स्टीव्हन फिन सर्वात यशस्वी ठरला. त्याने ८ षटकांत ३३ धावा देताना निम्मा संघ गारद केला. त्याला अँडरसनची (१८ धावांत ४ विकेट) चांगली साथ लाभली. फिनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
सलग दुस-या पराभवामुळे भारत तिस-या स्थानी फेकला गेला आहे. अंतिम फेरीतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही लढती मोठय़ा फरकाने जिंकाव्या लागतील.

संक्षिप्त धावफलक : भारत – ३९.३ षटकांत सर्वबाद १५३ (बिन्नी ४४, धोनी ३४, फिन ३३-५, अँडरसन १८-४) वि. भारत – २७.३ षटकांत १ बाद १५६ (बेल नाबाद ८८, टेलर नाबाद ५६). निकाल : इंग्लंड ९ विकेटनी विजयी. सामनावीर : स्टीव्हन फिन. गुण : इंग्लंड ५, भारत ०.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version