Home संपादकीय तात्पर्य तीन तलाक पद्धतीचे वास्तव

तीन तलाक पद्धतीचे वास्तव

1

मुस्लीम समाजातील तीन तलाक पद्धती चांगली की वाईट, अथवा बंद व्हावी या चर्चेने आज संपूर्ण देश ढवळून निघत आहे. सर्वसामान्य मुस्लीम व विशेषत: स्त्रियांचा तीन तलाक पद्धतीने होणा-या घटस्फोटास तीव्र विरोध असल्याचे दिसून येते. या उलट मुस्लीम धर्मगुरू, मुल्ला-मौलवी, काझी या मंडळींना तीन तलाक घटस्फोट पद्धती मुस्लिमांची वैयक्तिक धार्मिक बाब असल्याने त्यांची सार्वजनिक चर्चासुद्धा त्यांना नको आहे. अशावेळी तीन तलाक आणि धर्म यांचा काही संबंध आहे का? आणि असल्यास नेमके त्याचे स्वरूप काय? या प्रश्नांची वास्तविक उत्तरे शोधण्याची गरज आहे.

सर्वप्रथम लक्षात घ्यावयास हवे की, एका श्वासात तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट घेण्याची पद्धती भारत वगळता अन्य कुठल्याही देशात अगदी पाकिस्तान-बांगलादेश-इराण-इराक या मुस्लीम राष्ट्रांमध्येसुद्धा नाही. इस्लाम हा एक मानवतावादी धर्म असून एक आंतरराष्ट्रीय धर्म असल्याचे या धर्माचे चिंतक बोलत असतात. तेव्हा एका झटक्यात स्वत:च्या पत्नीला आयुष्यातून उठवण्याची अमानवी प्रथा आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि वायफायच्या युगात कशी व्यवहार्य ठरते? असा प्रश्न साहजिक निर्माण होतो.

मात्र घटस्फोट प्रक्रिया एवढी क्लिष्ट आणि अवघड केल्याचे दिसते. विशेष म्हणजे तलाक होऊच नये हा त्या क्लिष्टतेमागचा उद्देश आहे. परंतु या कठोरतेला आणि क्लिष्ट प्रक्रियेला भारतातील सामंतशाही, जमीनदारी, जहागीरदारी या मध्ययुगीन कालखंडातील तत्कालीन भ्रष्ट राजे, नवाब, जमीनदार या घटकांनी आपल्या सोईप्रमाने वाकवले. तलाक या शब्दाचा अर्थ, ती प्रक्रिया संपूर्ण स्वत:च्या सोयीप्रमाणे बदलून ही तलाक प्रक्रिया बदलवून टाकल्याचे दिसते.

तीन वेळा तलाक बोलून पत्नीला घटस्फोट देण्यासाठी धर्माची साक्ष मिळत असली, तरी त्याचे स्वरूप खूप वेगळे आहे. प्रत्येक तलाक शब्दातले अंतर एक महिन्याचे असावे. एवढेच नव्हे तर पत्नी मासिक धर्मानंतर शुद्ध अवस्थेत असताना हा तलाक शब्द उच्चारला पाहिजे, असे सांगितले जाते. म्हणजे या प्रक्रियेत ३ वेळा तलाक शब्द उच्चारण्यास ३ महिन्यांचा कालखंड लागतो. दरम्यानच्या काळात या पती-पत्नीला विचार करण्याची संधी मिळावी, त्यांचे मनोमीलन व्हावे, या दरम्यान एखाद्या समजूतदार व्यक्तीने दोघांत सहमती, समेट घडवून आणावा, असा या तीन तलाकमधील अंतराचा अर्थ आहे. थोडक्यात ३ महिन्यांत घटस्फोटापासून त्यांनी परावृत्त व्हावे यासाठी हा अवधी एवढा मोठा ठेवला आहे. एका श्वासात तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट घेणे धर्मानुसार अवैध ठरते! असे जे करतात, ते प्रत्यक्ष धर्माच्या मूळ शिकवणुकीचा अपमानच करतात.

‘तलाक-निकाह-मेहेर’ या ३ गोष्टींचा परस्परांशी अतुट असा संबंध आहे. तलाक तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा निकाह झालेला असतो. निकाह म्हटले की, मेहेर आलेच. इस्लामनुसार मेहेर म्हणजे वरपक्षाकडून वधूस नगदी स्वरूपात विवाहानिमित्त द्यावयाची रक्कम होय. ती शक्यतो चांदीच्या रुपयांच्या स्वरूपात असावी, असे मानतात. ती रक्कम जास्तीत जास्त असावी. तसेच तलाक झाल्यावर ही रक्कम स्त्रीने स्वत:च्या सोबत न्यायची असते. पुरुषाकडे ती ठेवली असल्यास त्याने घटस्फोटित स्त्रीला ती द्यायची असते. ही मेहेरची रक्कम जास्तीत ठेवण्यामागे हाच उद्देश आहे की, ती रक्कम परत करावी लागू शकते, म्हणून पुरुषाने घटस्फोटाचा विचारसुद्धा मनात आणू नये. परंतु या बाबतीत शहाबानो प्रकरण चांगले उदाहरण आहे. शहाबानोला तिच्या पतीने कबूल केलेली चांदीच्या नाण्याच्या स्वरूपातली रक्कम, रुपयांच्या चलनात परत करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे इथेसुद्धा पीडित महिलेची पुरुषांकडून शुद्ध साफ फसवणूकच होते. हे लक्षात घेतले पाहिजे.

भारतीय मुस्लिमांनी ही क्लिष्ट प्रक्रिया सोपी करून टाकली आहे. शरीयतनुसार पहिला तलाक हा तलाक रजई ठरतो. याचा अर्थ हा एकदा उच्चारलेला तीन तलाक शब्दापैकीच प्रथम तलाक शब्द स्थगित म्हणजे रद्द होऊ शकतो. त्या दृष्टीने या प्रथम उच्चारणास फारसे महत्त्व राहात नाही. कारण एका महिन्याने जर दुसरा शब्द उच्चारलाच नाही तर हा प्रथम तलाक आपोआपच रद्द ठरतो. ‘तलाक – बाईन’ म्हणजे तलाक शब्दाचा दुस-यांदा केलेला उच्चार होय. यानंतर घटस्फोट होणारच! हे निश्चित होते. दोन वेळा तलाक शब्द उच्चारणे म्हणजे तिसरा तलाक मिळणार याची खात्री. पण त्यास एक महिना विलंब असतो. याच एका महिन्यात जर पती-पत्नी (विशेषत: पती) यांची मर्जी बदलली आणि जर त्यांनी पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा प्रदर्शित केली तर त्यासाठी शरीयतनुसार एकच मार्ग शिल्लक राहतो. ‘हलाला!’ तलाक-बाईननंतर पुन्हा एकत्र राहण्याचा मार्ग म्हणजे हलाला मार्ग. त्या स्त्रीला प्रथम पतीशी एकत्र राहण्यासाठी पहिले दुस-या पुरुषाशी निकाह (लग्न) करावे लागते. त्याच्यापासून पुन्हा तलाक मिळवावा लागतो. नंतर पूर्ण लग्नविधी संपन्न करून हलाला प्रक्रिया पूर्ण होते. हलाला प्रक्रियेत स्त्रीला गर्भवती राहता येत नाही. ती गर्भवती नाही हे तिलाच सिद्ध करावे लागते. या सर्व बाबी काळजीपूर्वक अभ्यासल्या तर इथे स्त्रियांचे खच्चीकरण करून पुरुषवर्गास झुकते माप देते असे दिसते.

आजपर्यंत हिंदू धर्म आणि त्यास एक जीवन पद्धती म्हणून अंगीकरणा-यांनी वेळोवेळी काळानुरूप आवश्यक असणारे बदल स्वीकारले, प्रसंगी हिंदू धर्मातून निघालेले उपप्रवाहसुद्धा मान्य केले. जैन-बौद्ध-शिख ही त्याची उत्तम उदाहरणे होत. आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या युगात तीन तलाक पद्धतीमध्ये कालानुरूप बदल व्हायला हवा. तेव्हाच मुस्लीम समाजातील महिलांच्या समस्या कमी होतील. त्यांना राज्यघटनेने दिलेल्या समाधिकाराचा वापर करता येईल. महिलांची मोठी समस्या म्हणून तीन तलाकच्या पद्धतीकडे पाहण्याची गरज आहे. यासाठी मुस्लीम समाजातील विचारवंत आणि बुद्धजीवींनी समोर येण्याची गरज आहे. हा विषय कायदा बनवून नव्हेतर समाजात बदलाविषयी जनजागृती करण्याचा आहे. त्यानंतरच समाजाच्या सहमतीने यात बदल करणे योग्य ठरेल.

1 COMMENT

  1. भारतीय मुस्लिमांचे एवढे लांगुलचालन १९४७ पासून येथील सरकारने केले आहे कि ते आता भारताची घटना सुद्धा मानणार नाही.याला उपाय म्हणजे
    १] ” सामान नागरिक कायदा ”
    २] सर्वे मुस्लिम पीडित महिलांनी हिंदू धर्म स्वीकारावा (किमान तशी धमकी तरी दयावी.)
    ३] शरिया कायदा जो मुस्लिम महिलांला लागू आहे तोच मुस्लिम पुरुषांला सुद्धा लागू करावा .
    उदा. चोरी केली कि हाथ कापण्याची शिक्षा (शरिया कायद्या प्रमाणे )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version