Home मध्यंतर सुखदा ‘ती’ घरातही असुरक्षितच!

‘ती’ घरातही असुरक्षितच!

1

घरगुती हिंसाचार ही जागतिक समस्या असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे या अहवालातून हेही स्पष्ट झालं आहे की, महिलांवर अत्याचार करणारे त्यांचे जवळचे नातेवाईक पुरुषच असतात. घराबाहेरच्या जगात स्त्रियांना आपलं अस्तित्व, क्षमता सिद्ध करण्यासाठी झगडावंच लागतं, पण त्यांना घरातही स्वत:चं रक्षण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतो.

स्त्रीचं समाजातील आणि घरातील स्थान या मुद्यावर सतत चर्चा होत असते. महिला सबलीकरणाच्या गोष्टी होतात. पण वास्तव बदलत नाही. आजची स्त्री सुशिक्षित आहे, कमवती आहे, मागील पिढीतील स्त्रियांच्या तुलनेत आर्थिकदृष्टया स्वतंत्रही आहे. पण म्हणून तिच्यावर होणा-या अत्याचारांत काही कमी आली आहे, असं नाही. ते चालूच आहेत. बाहेर आणि घरातही. घरगुती हिंसाचार तर जगभरातील स्त्रियांना सोसावा लागतो. घरगुती हिंसाचार ही खरं तर जागतिक समस्या बनली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात हेच म्हटलं आहे.

जगभरातील ज्या स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत, त्यापैकी बहुतांश स्त्रियांवरील अत्याचार हे त्यांच्या जोडीदाराकडून किंवा जवळच्या नातेवाइकाकडून झाले आहेत, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ‘लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’ आणि ‘साउथ आफ्रिकन मेडिकल कौन्सिल’ यांच्या सहकार्यानं हा अहवाल तयार केला आहे.

त्यात म्हटलं आहे की, महिलांवर अत्याचार करणारे बहुतांश गुन्हेगार त्या महिलांच्या अगदी जवळचे संबंध असलेले असतात किंवा त्यांच्यामुळे महिलांच्या आरोग्यावर दीर्घ घातक परिणाम होत असतात. या अहवालात नमूद केलेल्या आकडेवारीनुसार जगातील हत्या झालेल्या ३८ टक्के महिलांचे खून त्यांच्या जोडीदारांनी केले आहेत. ३० टक्के महिला त्यांच्याच जोडीदारांच्या अत्याचारांच्या बळी असतात. जगातील ३५ टक्के स्त्रियांना अत्याचार सोसावा लागतो आणि ४२ टक्के स्त्रियांना आयुष्यात कधी ना कधी मारहाण किंवा अन्य गोष्टींमुळे इजाही झाली आहे.

थोडक्यात, घरगुती हिंसाचार हा प्रकार आता एखाद्या कुटुंबातील खासगी प्रकार राहिलेला नाही, तर ती एक समस्या बनली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांच्या जीविताला त्यामुळे धोका आहे आणि म्हणूनच याविरोधात कठोर कायदेशीर मार्ग योजण्याची आवश्यकता आहे. घरगुती हिंसाचारामुळे स्त्रियांच्या जीविताला धोका निर्माण होतच आहे, पण त्यातून ज्या स्त्रिया जिवंत राहतात त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या अहवालात घरगुती हिंसाचाराकडे आजार फैलावणारा घटक म्हणून पाहिलं गेलं आहे. हातपाय मोडणं हा प्रकार तर दिसून येतोच, पण अनेक स्त्रियांबाबतीत गरोदरपणात यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

गरोदरपणाच्या काळात स्त्रियांना मानसिक आधाराची गरज असते. सुदृढ बाळ जन्माला यायचं तर आईची तितकीच काळजी घेण्याची गरज असते. पण हे समजून घेतलं जात नाही. गरोदरपणातही स्त्रीला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागतं. आपल्या समाजात तर हे प्रकर्षानं दिसून येतं. स्त्रीला होणारा सासुरवास हा आपल्या समाजातील एक गंभीर आणि भयानक असा प्रश्न आहे. हा छळ इतका भयंकर असतो, की सासरच्या जाचाला कंटाळून अनेक स्त्रिया आत्महत्या करतात.

गरोदरपणात होणा-या छळामुळे जन्माला येणारं मूल कमी वजनाचं, आजारी असतं. थोडक्यात, स्त्रीवर होणा-या अत्याचाराचे परिणाम थेट पुढील पिढीवर दिसून येतात. याशिवाय आपल्या जोडीदाराकडून छळ सोसणा-या स्त्रिया नराश्यग्रस्त होण्याचा धोका जास्त असतो. अशा स्त्रिया व्यसनाधीन होण्याचा आणि लैंगिक विकारांना बळी पडण्याचा धोकाही जास्त असतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात घरगुती हिंसाचार किंवा छळामुळे स्त्रियांचं जीवन कसं खडतर बनलं आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. याकडे सरकारनं गांभीर्यानं पाहण्याची वेळ आता आली आहे. आरोग्य संघटनेनं ज्या मुद्यांना अधोरेखित केलं आहे, त्यांचा समावेश वैद्यकीय आणि परिचारिका शिक्षणात करण्याची गरज आहे. आरोग्य सेविकांनी गावात काम करत असताना घरगुती हिंसाचार सोसत असलेल्या स्त्रियांशी बोलून, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाची माहिती घेऊन त्यावर वेळीच उपचार कसे होतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

महिला सबलीकरण हा विषय ख-या अर्थानं सर्व थरांपर्यंत पोहोचण्यासाठी स्त्रियांना नुसतं शिक्षण देऊन चालणार नाही, तर पुरुषांनी स्त्रियांचे हक्क काय आहेत याची समज देण्याची गरज आहे. आपला देश परंपराप्रिय आहे. जुन्या काळात नव-याकडे पाहण्याचीही हिंमत नसलेल्या स्त्रिया आज त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. त्याच्याबरोबरीनं घराची आर्थिक जबाबदारीही उचलतात. पण घरच्या आघाडीवर पुरुषाची अरेरावीही सहन करतात. पुरुषांच्या मानसिकतेत काहीही बदल झालेला दिसत नाही. स्त्रियांची पिळवणूक करण्याचं काम मात्र त्यांच्याकडून होतं. घरासाठी नोकरी, व्यवसाय करणा-या स्त्रीचा पैसा त्यांना हवा असतो, पण तिने काही सल्ला देण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांना अपमान वाटतो. अनेक घरांमध्ये ही स्थिती आहे. म्हणूनच स्त्रियांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलण्याची गरज आहे.

मे महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ६६व्या जागतिक आरोग्य महासभेत सात राष्ट्रांनी मुली आणि महिला यांना सोसावा लागणारा हिंसाचार ही सार्वजनिक आरोग्याच्या, समानता आणि मानवाधिकारांच्या दृष्टीनं महत्त्वाची समस्या असल्याचं मान्य केलं. या सात राष्ट्रांत भारताचाही समावेश आहे. पण दुर्दैवानं स्त्रियांवर होणा-या अत्याचारांत भारताचा क्रमांक खूप वरचा लागतो. सरकारी पातळीवर ही समस्या दूर करण्याचं ठरलं असलं तरी प्रत्यक्षात परंपरांच्या जोखडात अडकलेल्या समाजात स्त्रीला तिचं अस्तित्व जपण्यासाठी तयार करणं, हे मोठं आव्हान आहे. दिल्लीपासून अगदी दुर्गम भागातील खेडय़ांपर्यंत स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकच आहे- ती पुरुषापेक्षा कनिष्ठ आहे.

स्त्री आणि पुरुष यांचं सहजीवन सुखाचं होतं ते बरोबरीच्या नात्यानं वागलं, त्यांनी एकमेकांचा आदर केला तरच! पण परंपरेनं चालत आलेलं पुरुषी वर्चस्व कुरवाळण्यात धन्यता बाळगणा-या पुरुषांकडून ही अपेक्षा पूर्ण कशी होणार? आपल्या समाजात तर स्त्रीला एक माणूस म्हणून प्रतिष्ठाही दिली जात नाही, तिथे बरोबरीचं स्थान देण्याची गोष्ट दूरच. समाजाचा आणि देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर ज्या परंपरा बुरसटलेल्या आहेत त्या मोडून स्त्रियांच्या समाजाप्रती आणि घराप्रती असलेल्या योगदानाकडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे.
(आदित्य फीचर्स)

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version