Home महामुंबई दादर स्मशानभूमीत नाभिकांची हलगर्जी

दादर स्मशानभूमीत नाभिकांची हलगर्जी

2

शिवाजी पार्क या स्मशानभूमीत धार्मिक कार्यासाठी येणा-यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सलून आणि कार्यशाळेची उभारणी करण्यात आली आहे. मात्र..

मुंबई– मुंबईमध्ये अंत्यसंस्कार आणि त्यासंदर्भातील धार्मिक विधींसाठी सर्वात सोयीचे ठिकाण म्हणजे शिवाजी पार्क स्मशानभूमी. या स्मशानभूमीत धार्मिक कार्यासाठी येणा-यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सलून आणि कार्यशाळेची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, या सलूनमधील नाभिकांमध्ये जास्तीत जास्त गि-हाईके मिळवण्यासाठी सुरू असलेली चढाओढ रहिवाशांसाठी घातक ठरत आहे. घाईघाईत केस काढताना डोक्याला वस्तरा लागून जखमा होण्याचे प्रकार येथे वारंवार घडत आहेत. दर दोन माणसांमागे एकाच्या डोक्यावर अशा प्रकारच्या जखमा होत आहेत. मधुमेहींसाठी या जखमा तापदायक ठरण्याची शक्यता आहे.

दादर-शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीमध्ये मृतांच्या नातेवाइकांना धार्मिक विधी करता यावेत म्हणून कार्यशाळा उभारण्यात आल्या आहेत. पूर्वी येथे उघडयावर दगडावर बसूनच दहाव्याचे धार्मिक विधी केले जात. मृतांच्या नातेवाइकांचे केस तिथेच कापण्यात येत. २००८ मध्ये आमदार निधीतून येथे अत्याधुनिक सलून उभारण्यात आले. सलूनमध्ये नऊ नाभिकांसाठी खुर्च्या आहेत. परंतु जास्तीत जास्त गि-हाईके मिळवण्याच्या प्रयत्नात हे नाभिक धार्मिक कार्यासाठी आलेल्या व्यक्तींचे मुंडन घाईघाईत करतात. त्यांच्या या हलगर्जीचे दुष्परिणाम मात्र मृतांच्या नातेवाइकांना भोगावे लागतात. एखादी व्यक्ती मुंडन करून घेण्यासाठी खुर्चीत बसली की जनावराची मान हातात पकडून सुरी चालवावी, त्याप्रमाणे डोक्यावर वस्तरा फिरवून केस काढले जातात. पुढच्या गि-हाईकावर डोळा ठेवून घाईघाईत मुंडन केले जात असल्यामुळे अनेकांच्या डोक्याला वस्तरा लागून जखमा होतात. 

या सलूनमध्ये एका दिवशी ३० ते ५० व्यक्ती धार्मिक विधी करण्यासाठी येतात. प्रत्येक व्यक्तीच्या मुंडनासाठी ७० रुपये घेतले जातात. त्यामुळे एका नाभिकाला कमीत कमी तीन ते पाच गि-हाईके मिळतात. सकाळी साडेसात ते साडेनऊ दरम्यान हे कार्य केले जाते. जास्तीत जास्त गि-हाईके मिळवण्याच्या प्रयत्नांत अनेकांच्या डोक्यावर जखमा होतात.

नळांची चोरी, हिटर बंद..

२००८ मध्ये जेव्हा हे सलून उभारण्यात आले, तेव्हा तिथे दोन स्वच्छतागृहे बांधण्यात आली. गरम पाण्यासाठी दोन हिटर बसवण्यात आले. शॉवर आणि स्टीलचे नळही बसवण्यात आले. परंतु आता या सलूनमधील नळ चोरीला गेले आहेत. हिटर बंद आहेत. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी येणा-यांना ना गरम पाणी मिळत ना साधे पाणी. शिवाय परिसरात प्रचंड अस्वच्छता आहे. त्यामुळे आंघोळ कुठे करायची हा प्रश्न निर्माण होतो.

सलूनमध्ये मुंडन करताना योग्य काळजी घेतली जात नसेल तर ही गंभीर बाब आहे. हा विषय विभागीय कार्यालयाच्या अखत्यारीत आहे. याकडे विशेष लक्ष दिले जाईल. – डॉ. अरुण बामणे, कार्यकारी आरोग्य अधिकारी

स्मशानभूमीतील कार्यशाळांचे दरवाजे तुटलेले आहे. सलूनची अवस्थाही फारशी वेगळी नाही. त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार निधी यासाठी खर्च करण्यास परवानगी मिळाली आहे. त्याप्रमाणे धार्मिक कार्यशाळा आणि सलूनच्या दुरुस्तीसाठी नवे साहित्य आणले जाईल. नाभिकांकडून होणा-या हलगर्जीमुळे मुंडन करताना जखमा झाल्यास त्याची योग्य दखल घेतली जाईल. – शरदचंद्र उघडे, सहाय्यक आयुक्त, जी/उत्तर विभाग

सर्वसाधारणपणे वस्तरा लागून जखम झाल्यास ती त्वरित बरी होते. परंतु एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल आणि त्याच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण अधिक असेल तर त्या व्यक्तीला जखम झाल्यास ती बरी होण्यास बराच वेळ लागतो. त्यासाठी आधी शर्करेचे प्रमाण नियंत्रणात आणावे लागते. त्यानंतर योग्य औषधोपचार केल्यावर जखम बरी होते. – डॉ. कैलास गौड

2 COMMENTS

  1. गि-हाईके मिळवण्याच्या प्रयत्नात हे नाभिक धार्मिक कार्यासाठी आलेल्या व्यक्तींचे मुंडन घाईघाईत करतात. त्यांच्या या हलगर्जीचे दुष्परिणाम मात्र मृतांच्या नातेवाइकांना भोगावे लागतात. एखादी व्यक्ती मुंडन करून घेण्यासाठी खुर्चीत बसली की जनावराची मान हातात पकडून सुरी चालवावी, त्याप्रमाणे डोक्यावर वस्तरा फिरवून केस काढले जातात

  2. सलूनमधील नळ चोरीला गेले आहेत. हिटर बंद आहेत. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी येणा-यांना ना गरम पाणी मिळत ना साधे पाणी. शिवाय परिसरात प्रचंड अस्वच्छता आहे. त्यामुळे आंघोळ कुठे करायची हा प्रश्न निर्माण होतो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version