Home टॉप स्टोरी दिल्लीकर घुसमटले

दिल्लीकर घुसमटले

0

प्रदूषणाच्या क्रमवारीत देशात अग्रक्रमावर असलेल्या राजधानी दिल्लीत विषारी धुरक्याने नागरिकांना अक्षरक्ष: बेजार केले आहे. 

नवी दिल्ली- प्रदूषणाच्या क्रमवारीत देशात अग्रक्रमावर असलेल्या राजधानी दिल्लीत विषारी धुरक्याने नागरिकांना अक्षरक्ष: बेजार केले आहे. दाट धुके आणि प्रदूषणाच्या छायेत वावरणा-या दिल्लीकरांच्या आरोग्याचे सूत्र बिघडले असून श्वसनासारख्या नाना विकारांनी त्यांना घेरले आहे.

या आपत्कालीन परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीने कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावून सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस दिल्लीतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई, बांधकामे उभारणे आणि बदरपूर येथील ऊर्जा प्रकल्पाचे काम पुढील पाच दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

विषारी वायूचा फैलाव शहरभर झपाटय़ाने होत असल्याने दिल्ली शहर जणू ‘गॅस चेंबर’ बनले आहे. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडून हे वायू प्रदूषणाचे संकट दूर लोटण्यासाठी कॅबिनेट बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रदूषणाला अटकाव घालण्यासाठी दिल्लीत राबवलेली ‘ऑड-इव्हन’ मोहीमही सरकारकडून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

विषारी धुरक्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत दिल्लीकरांनी घराबाहेर न पडताना घरातून आपले कामकाज करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. सर्वत्र पसरलेले विषारी धुरके खाली बसवण्यासाठी रस्तोरस्ती पाण्याचा मारा करण्याचा उपाय दिल्ली सरकार योजणार आहे. शहरात कुणी कचरा जाळताना आढळल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version