Home महामुंबई धरणक्षेत्रात पाऊस वाढला

धरणक्षेत्रात पाऊस वाढला

0

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सर्व धरण क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस पडू लागला असून यामुळे तलावांमधील पाण्याच्या साठ्यात वाढ होत आहे.

संग्रहित छायाचित्र

मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सर्व धरण क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस पडू लागला असून यामुळे तलावांमधील पाण्याच्या साठ्यात वाढ होताना दिसत आहे. विहार आणि तुळशी वगळता चार प्रमुख तलावांमध्ये शंभर मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तलावातील साठाही आठ दिवसांमध्ये दुपटीवर जाऊन पोहोचला. त्यामुळे तलाव क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहावा, असे साकडे मुंबईकर वरुणराजाला घालताना दिसत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या धरणांमध्ये सध्या १४ हजार ५४९ कोटी लिटर एवढा साठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच कालावधीत ९० हजार कोटी लिटर एवढा साठा होता.

दिवसभरात मोडकसागर (११८ मिमी), तानसा (१०३ मिमी), विहार (७३ मिमी), तुळशी (८२ मिमी), अप्पर वैतरणा (१११ मिमी), भातसा (८० मिमी), मध्य वैतरणा (५८ मिमी) एवढा पाऊस पडला आहे.

पाऊस घेणार विश्रांती

येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होणार असून काही दिवस तो विश्राम करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. गुजरात आणि केरळमध्ये कमीदाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकणसह मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता. परंतु हा पट्टा विरत चालल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये तुरळक सरी कोसळण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी व्यक्त केली.

झाड पडून तीन जखमी

महालक्ष्मी रेसकोर्ससमोरील महापालिकेच्या बैठय़ा चाळीवरील एका घरावर पिंपळाचे झाड तुटून पडले. यामध्ये दीपक भाटकर (३६), नंदा भाटकर (३३), प्राची भाटकर (१०) हे  झोपडतीतील तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

ठाणे, रायगडमध्ये रिमझिम सुरूच

मागील दोन दिवसांपासून संततधार पावसाने ठाणे, रायगड जिल्ह्याच्या बहुतांश भागात गुरुवारीही जोर कायम ठेवला. ठाणे शहर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, बदलापूर येथेही पावसाची भुरभुर सुरूच होती. ग्रामीणमध्ये शहापूर तालुक्यात पाऊसधार सुरू असल्याने धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version