नवखेपणा नडला

0

नवे दिग्दर्शक, कलावंत, निर्माते मराठी चित्रपटात येतात. काही त्यांची ताकद दाखवतात. चमकतात. पुढे जातात. काही नवखे चेहरे पहिला सिनेमा काढतात. आम्ही काहीतरी वेगळे करतो आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करतात. पण …

मुक्काम पोस्ट धानोरी
दिग्दर्शक : सुदर्शन वराळे, महेश राजमाने
कलावंत : नियती घाटे, योगेश शिंदे, स्वराज कदम, अंकुश काने, देवयानी मोरे, प्रकाश धोत्रे.

नवे दिग्दर्शक, कलावंत, निर्माते मराठी चित्रपटात येतात. काही त्यांची ताकद दाखवतात. चमकतात. पुढे जातात. काही नवखे चेहरे पहिला सिनेमा काढतात. आम्ही काहीतरी वेगळे करतो आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या या नवखेपणाच्या ‘एक ना धड भाराभार चिंध्या’ होऊन कलाकृतीची पुरती वाट लागते. एकीकडे मराठी चित्रपट दर्जेदार होत असतानाच अशा चार-दोन चित्रपटांनी हा दर्जा खाली येतो. कुठल्याही कलाकृतीसाठी अनुभवसंपन्नता महत्त्वाची असते. ती कमावण्यासाठी चित्रपट निर्मात्याला, दिग्दर्शकाला आपल्यातल्या बलस्थांनासोबतच उणिवांचीही जाणीव असावी लागते. चित्रपट निर्मात्यांनीच असे स्वत:चे मूल्यमापन केले तर हौसेखातर कुठलीही कलाकृती कुणाचा अंत पाहणार नाही.

भय आणि अभयाचा संघर्ष विणलेल्या ‘मुक्काम पोस्ट धानोरी’मध्ये सा-या नवीन कलावंतांनी पदार्पण केले आहे. कथेमधील प्रसंगांचे धागे जोडताना उडालेली तारांबळ या प्रमुख दोषांसह चित्रपटात अनेक उणिवा राहून गेल्या आहेत. तरीही या नवख्या तरुण कलावंतांचा उत्साह मारला जाऊ नये. त्यांचा हुरूप कायम राहून, नव्या ताकदीने, नव्या उमेदीने, नवा चित्रपट त्यांनी तयार करावा. त्यात उणिवा राहू नयेत याची काळजी घ्यावी आणि नव्या दमाने या माध्यमात आपले स्थान निर्माण करावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देणे गरजेचे आहे. चित्रपटाची निर्मिती करताना त्यांच्या चुका झाल्या असल्या तरी त्यांचे या माध्यमावर असणारे प्रेम, प्रामाणिकपणा दिसतो. तो प्रामाणिकपणा त्यांच्या पुढील चित्रपटासाठीची मोठी शिदोरी आहे. संपत्ती आहे. ती संपत्ती वाढली तर त्यांना यश कमावणे अजिबात जड जाणार नाही.

कुठल्याही कलाकृतीच्या सुरुवातीपासून आपली उत्सुकता ताणली गेली पाहिजे. पुढे काय घडणार आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता जागवली गेली पाहिजे. ‘मुक्काम पोस्ट धानोरी’मध्ये ती उत्सुकता जागवण्यापेक्षा रेंगाळणेच अधिक असल्याने चित्रपटाचा पसरटपणा नकोसा वाटायला लागतो. पुढे काहीतरी धक्कादायक घडेल, असे प्रेक्षकांना वाटत असले तरी हातात काहीही लागत नाही. मुळात चित्रपटाच्या विषयाला गती आहे, ते या चित्रपटाचे मोठे भांडवल ठरले असते. पण ते भांडवलही गमावले आहे. मध्यंतरापर्यंत असे रितेपणच हातात लागल्यानंतर पुढे काहीतरी भन्नाट घडेल ही आशा पूर्ण होण्यापेक्षा, चित्रपटाच्या मर्यादाच अधिक स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे हा चित्रपट फसला आहे. सुदर्शन वराळे आणि महेश राजमाने यांनी निर्मिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट रसिकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा नसला तरी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे. नवीन कलावंतांना सोबत घेऊन चित्रपट तयार करण्यासाठी लागणारे जिगर त्यांच्याकडे आहे. अगदी या चित्रपटकथेच्या नायिकेसारखे!

चित्रपटाची कथा पुरातत्त्व विभागातील विद्यार्थिर्नी असणा-या पूजा नावाच्या मुलीभोवती फिरणारी आहे. ही विद्यार्थिनी आपल्या दोन मित्रांसोबत पुरातन मंदिर, तिथे असलेला खजिना याच्या शोधासाठी धानोरी हे गाव गाठते. (दरम्यान, वाटेत त्यांना गणू आणि फुलवा हे लग्न करण्यासाठी पळून जाणारे युगुल भेटते. त्यांना घेऊनच ते धानोरीत येतात. या गावात येण्यापर्यंतचा प्रवास बराच लांबला आहे.) जिथे गावातील माणूस कधीही फिरकत नाही, अशा भयाण विश्रामगृहात त्यांची थांबण्याची व्यवस्था असते. गावाबाहेर, जंगलात असणारे ते विश्रामगृहच नव्हे तर धानोरी गावाचा सर्व परिसर भुताच्या नावाने भयभीत असणारा आहे. तरीही धाडस करून हे पाच जण तिथे राहण्याचा निर्णय घेतात. पूजासह सारे जंगलातून पुरातन मंदिराकडे जातात. फुलवाला विश्रामगृहातच ठेवले जाते. (का? याचे उत्तर विचारायचे नाही.) चौघेही विश्रामगृहावर येतात, तेव्हा फुलवा नसते. तिचे पोलके अस्ताव्यस्त पडलेले असते. आवाज देऊन, शोधाशोध करूनही ती सापडत नाही. फुलवाचे नेमके काय होते, ती सापडते की नाही, धानोरीच्या पुरातनकालीन मंदिरात खजिना सापडतो का? याची खूपच उत्सुकता असेल तर हा चित्रपट बघा.

पूजाची भूमिका साकारणा-या नियती घाटेमध्ये प्रचंड स्पार्क आहे. ती थिएटरची विद्यार्थिनी असावी, याची जाणीव होते. या भूमिकेसाठी तिने तिच्या परीने खूप मेहनत घेतली आहे. इतर सहकलावंत प्रकाश धोत्रे (बाळासाहेब), योगेश शिंदे (रघू), स्वराज कदम (समीर), अंकुश काने (गणू), देवयानी मोरे (फुलवा), प्रिया गमरे, यशवंत बर्वे, प्रशांत कांबळे, रविकिरण दीक्षित, महेश आंबेकर, रुपाली पथारे यांना खूप संघर्ष करावा लागला आहे. कथा, छायाचित्रण आणि संकलन हे तंत्रही सुदर्शन वराळे आणि महेश राजमाने यांनीच आपल्या खांद्यावर घेतले आहे. छायालेखनात प्रचंड चुका राहून गेल्या आहेत. दिवस-रात्र याचा भास-आभास निर्माण करण्याची तसदी न घेतल्याने धानोरीतील मुक्काम किती दिवसांचा हे प्रेक्षकांनीच ठरवायचे आहे. पहिल्या फ्रेममध्ये पूजाच्या आईचा अपघात होतो. त्या अपघातात ती पाय गमावून बसते. त्याचे आणि या कथेचे धागेदोरे जोडण्याची गरज होती. असे अनेक धागे विस्कटल्याने चित्रपटाला विस्कटलेपणाचे गालबोट लागले आहे.

‘मुक्काम पोस्ट धानोरी’ची निर्मिती करणारे सारे नवखे असल्याने त्यांना हेच नवखेपण नडले आहे. निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ सारे काही दोघांनीच खांद्यावर घेण्याचा अतिउत्साहीपणाही या चित्रपटाच्या अंगलट आला आहे. उसने अवसान फार काही देत नसते. त्यासाठी अनुभवाची शिदोरी सोबत असणे गरजेचे असते. या चित्रपटाच्या निमित्ताने ही शिदोरी त्यांना मिळाली आहे. याचा सकारात्मक विचार करून, नव्या चित्रपटासाठी ताकद लावावी. नव्या कलावंतांना घेऊनच चित्रपट करा, कुणीही अडवणार नाही, पण जे काही द्याल ते नवेनवे असले तरी रसिकांना हवेहवेसे वाटले पाहिजे. त्यासाठी या तरुणाईला शुभेच्छा!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version