Home महामुंबई नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला

0

नवी मुंबई येथे प्रस्तावित विमानतळ उभारताना प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

नवी मुंबई- नवी मुंबई येथे प्रस्तावित विमानतळ उभारताना प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विविध प्रकल्प उभारणीसाठी जमिनीची गरज भासते. मात्र, यासाठी भूधारकांना वा-यावर सोडून चालत नसल्याचेही ते म्हणाले. वाशी ‘एपीएमसी’त बुधवारी आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

लेव्ही साखरेचा दहा टक्के कोटा सरकारने बंद केला असून, रेशनिंग दुकानांवर ती उपलब्ध होण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.आर्थिकदृष्टय़ा मागासांना सरकारतर्फे अल्पदराने धान्य पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, हे धान्य शेतक-यांकडून खरेदी करताना निश्चित आधारभूत किमतीवरच खरेदी केले जाईल. यासाठी शेतक-यांनी मनात कोणतीही भीती बाळगू नये, असेही ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकाला मंजुरी देण्यात सरकारचा काहीएक संबंध नाही. सीआरझेड व हेरिटेज कमिटीची यासाठी मंजुरी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

राज्य सरकार घरेलू, बांधकाम मजूर व असंघटित कामगारांसाठी विमा संरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव आणण्यात येईल, राज्यात दुष्काळी परिस्थितीत दहा लाख जनावरांना चारा छावण्यांतून चारा पुरवठा केल्याचा दावा त्यांनी केला.

नाशिक येथील शेतक-यांचा जमिनीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. या मेळाव्याला जलसंधारणमंत्री शशिकांत शिंदे, ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक, आमदार नरेंद्र पाटील, आमदार संदीप नाईक, खासदार संजीव नाईक, मंदा म्हात्रे, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version