Home टॉप स्टोरी नांदवीशी गेले पंत, नाही कुणा खेद खंत

नांदवीशी गेले पंत, नाही कुणा खेद खंत

1

पंत आले, अपमानीत झाले, उतरल्या चेह-याने खांदे पाडून घरी गेले आणि सोमवारी सकाळी शेवटी ज्या नांदवी गावातून आले तिथेच आश्रयाला गेले.

मुंबई- पंत आले, अपमानीत झाले, उतरल्या चेह-याने खांदे पाडून घरी गेले आणि सोमवारी सकाळी शेवटी ज्या नांदवी गावातून आले तिथेच आश्रयाला गेले. शिवसेनेत सतत दोन नंबरच्या खुर्चीवर बसणा-या पंतांची इतकी नामुष्की झाल्यावर, हुर्यो झाल्यावरही त्याबद्दल ना कुठे प्रतिक्रिया उमटली आणि ना कुणी खेद व्यक्त केला. उलट त्यांच्या कारस्थानांचे बळी ठरलेल्या अनेकांना ठसठसणा-या गळवाचा निचरा झाल्यासारखे अतीव समाधानच झाले. पंतांच्या अपमानाला साक्षी असलेल्या शिवसेनेच्याच नेत्या-जाणत्यांनी धारण केलेले मौन आणि शिवसैनिकांनी खुल्लमखुल्ला दिलेला राग यामुळे अस्वस्थ झालेल्या मनोहर जोशी यांनी सोमवारी मुंबई सोडून आपले मूळ गाव नांदवी गाठले.

नांदवी गावातून मुंबईत आलेल्या आणि त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर वार लावून शिक्षण घेतलेल्या मनोहर जोशी यांनी कुटनीतीचा वापर करीत शिवसेनेच्या माध्यमातून अनेक पदे उपभोगली. कार्यकर्त्यांचे पाठबळ नाही, कोणते आंदोलन हाती घेतल्याचे उदाहरण नाही, मिळालेल्या पदाच्या माध्यमातून काही ठोस कार्य केल्याचा लौकिक पंतांच्या नावे नाही. तरीही ज्यांच्या आंदोलनावर आणि लढय़ावर शिवसेना मोठी होत गेली त्यांना बाजूला सारून पंतांनी नेहमीच महत्त्वाची पदे काबीज केली.

मिळालेल्या पदांतून दोन-चार जणांचे संसार उभे केले, वेळप्रसंगी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले, असेही त्यांच्या बाबतीत कधी घडले नाही. घडविण्यापेक्षा बिघडविण्याचेच काम पंतांनी केल्याने त्यांची वेळ आल्यावर कोणीही त्यांच्या समर्थनासाठी चकार शब्दही काढला नाही.

लोकांसाठी केलेली कामे हेच खरे राजकीय नेत्यांचे भांडवल असते. मात्र केवळ ‘जी हुजुरी’ हेच ज्याचे भांडवल त्याच्यावर वेळ येते तेव्हा काय गत होते, हे मनोहर जोशी यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाने दिसून आले. ज्या शिवाजी पार्क मैदानात त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेथेच त्यांच्या नेतृत्वाची इतिश्री झाली. यापूर्वी अनेक नेत्यांना शिवसेना सोडावी लागली तेव्हा त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते, नेते, लोकप्रतिनिधी बाहेर पडले.

छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हा अनेक आमदार आणि कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. शिवसेनेला दुसरा सर्वात जोरदार झटका दिला नारायण राणे यांनी. शिवसेनेत असताना अनेक कार्यकर्त्यांचे संसार उभे केलेले असल्याने, अनेकांना राजकारण, समाजकारणात आधार दिलेला असल्याने त्यांच्यासोबत अनेक आमदारांसह कार्यकर्त्यांची फौज होती. म्हणूनच त्यांच्या विषयी शिवसेनेतून कारस्थान केले गेले तेव्हा राणे यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ते बाहेर पडल्याच्या प्रतिक्रिया मुंबई, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात उमटल्या होत्या. नारायण राणे यांनी मात्र जागोजागी उघडपणे फिरून आपली भूमिका मांडली होती.

मनोहर जोशी यांच्या बाबतीत मात्र वेगळेच घडले. त्यांचा जाहीर अपमान होत असतानाही व्यासपीठावर कुणीही त्याची दखल घेतली नाही. सोमवारीही कुठे प्रतिक्रिया उमटली नाही. उलट पोलिसांनाच त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवावा लागला. अखेर पंतांनी नांदवीची वाट धरली. ‘नांदवीशी गेले पंत नाही कुणा खेद खंत’ अशाच प्रतिक्रिया त्यानंतरही दिवसभर उमटत होत्या.

1 COMMENT

  1. पेशवाईचे बंड शमले
    मनोहर जोशीने बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित करून शिवसैनिकांच्या मनातून उद्धव ठाकरे यांना उतरवण्याचा तो एक फंडा होता. साश्रु नयनांनी उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या अस्थी वेचत असतानाच शिवाजी पार्कातच बाळासाहेबांचे स्मारक उभे राहायला हवे, अशी बांग या कुडमुड्याजोशीने दिली. शिवसैनिकांच्या मनातून उतवण्यासाठीच हा डाव होता, हे आता उघड झाले आहे. दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठीच उद्धव ठाकरेंची भेट घेतली. परंतु लेखी माफीनामा देऊन तो वृत्तपत्रांना देण्यास मात्र नकार दिला. इतरांनी दसरा मेळाव्यात जाणे योग्य होणार नसल्याचे सांगितल्यावरही शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा पेशवा तिथे गेला. येथे जर शिवसैनिकांनी जोशीला समर्थन दिले असते तर महाराष्ट्रात दुसरी पेशवाई सुरू झाली असती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version