Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती नामजप कधी, कसा व किती करावा?

नामजप कधी, कसा व किती करावा?

1

नामजप हे सर्वात सोपे आणि सुलभ साधन मानले जाते. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये त्याला ‘जपयज्ञ’ म्हटलेले आहे. पण इतर यज्ञयागामध्ये जसे होमकुंड, अग्नी, पूजा साहित्य, आहुती, मंत्रोच्चार, पुरोहित, यजमान इत्यादींची आवश्यकता असते, तशी कोणत्याही गोष्टींची आवश्यकता जपयज्ञामध्ये नसते. इतर यज्ञांसाठी ब-याच माणसांची आणि संपत्तीची आवश्यकता असते तशी जपयज्ञात उद्भवत नाही. जपयज्ञ हे संपूर्णपणे मानसिक आणि वैयक्तिक स्वरूपाचे कर्म असल्यामुळे चित्ताची शुद्धता, मनाची एकाग्रता आणि मानसिक तयारी ज्याची अधिक आहे तोच नामजप साधक उच्च अवस्थेपर्यंत जाऊ शकतो.

नापजप हा कोणालाही हानिकारक नाही. त्यामुळे कोणत्याही सर्वसाधारण माणसास, कोणत्याही प्रकारच्या कर्माचे आचरण करणा-यास, कोणतीही वृत्ती धारण करणा-यास करता येतो. सर्वसामान्य गरीब माणसापासून श्रीमंतांपर्यंत कोणालाही तो करता येतो. सामान्य मजुरास, शेतक-यास, कारागीरास, व्यवसाय करणा-यास आपली दैनंदिन कामे सांभाळून ऐहिक प्रापंचिक जबाबदा-या सांभाळून नामजप करता येतो.

वयाचेही बंधन नाही. लहान मुलापासून वृद्ध व्यक्तीपर्यंत करता येतो. पुरुषाप्रमाणे कोणत्याही स्त्रीला तो करता येतो. नामजप साधना ही सर्व धर्मामध्ये आहे. फक्त धर्माप्रमाणे परमेश्वराचे नाम अलग असते. त्यामुळे कोणत्याही धर्मातील लोकांना आणि जाती-पंथातील लोकांना नामजप करता येतो.

नामजप कुठेही करता येतो. त्याला खास विशिष्ट स्थळ हवे असे काही नाही. शांत आणि एकांत जागा उपलब्ध असली तर अधिक चांगले, पण ती उपलब्ध नसली तरी चालते. नामजपाला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या व संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताच्या जवळपासची वेळ अधिक चांगली अशी म्हटली जाते, पण ती नसली तरी इतर कोणतीही वेळ चालते. आसन, मुद्रा, प्राणायम साध्या सुखासनात बसून नामजप करता येतो.

नामजपासाठी सोवळे-ओवळे पाळायची आवश्यकता नाही. नामजपाला कोणत्याही गोष्टीचा विटाळ नाही. सोवळ्या-ओवळ्याचा विचार न करता जाता-येता, उठता-बसता, कार्य करिता, वदनी वदता, घरी-दारी, घास गिळता, रतिसुखाचे अवसरी असे सर्वकाळ, केव्हाही नामस्मरण करावे, मग ते आपोआप होऊ लागले. फक्त मन पवित्र पाहिजे. प्रसन्न पाहिजे. म्हणजे परमेश्वराच्या कृपेचा प्रवेश अंत:करणात व्हायला वेळ लागणार नाही. नाम किती घ्यावे, कुठवर घ्यावे याला मर्यादा नाही. प्रपंचातून जेवढा वेळ नामासाठी काढता येईल तेवढा काढून नामजप करावा.

जेवढा जास्तीत जास्त नामजप करता येईल तेवढे अधिक चांगले. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलकर महाराज म्हणतात, ‘‘आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही, तो भरतच राहतो, तसे नाम सतत घेत राहावे. तरच ते देहाच्या कणाकणात आणि मनाच्या अंतरंगात मुरते. पुढे देहांचे आणि मनाचे कणन्कण आपोआप नामजप करतात.’’

नामजपामध्ये उच्चारापेक्षा नामाला अधिक महत्त्व असते. वेदामध्ये वेद अक्षरांच्या शुद्ध उच्चाराला महत्त्व असते; पण नामाच्या बाबतीत तसे नाही. ते अशुद्ध उच्चारले तरी चालते. याविषयी पंचसत्रागमनात एक श्लोक आहे तो असा –

‘‘मूखरे वदति ‘विष्णाय’ बुधो वदति ‘विष्णवे’ ‘नम’ इत्येवर्मथ व द्वयोरपि समं फलम् ’’

भावार्थ – मूर्ख मनुष्य ‘विष्णाय नम:’ असे म्हणतो व विद्वान मनुष्य ‘विष्णवे नम: ’ असे (शुद्ध) म्हणतो. पण दोघांनाही फल सारखेच मिळते, कारण दोघांचाही उद्देश नमनाचाच असतो.  परमेश्वराचे नामजपासाठी घेतले जाणारे नाम शक्यतो गुरूकडून घ्यावे. म्हणजे ते अधिक लाभदायक ठरते, परंतु योग्य आणि जानकाराक गुरू न भेटल्यास साधकाने आपल्या पसंतीचे परमेश्वराचे कोणतेही नाम घ्यावे. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. कारण परमेश्वराचे नाम स्वयंसिद्ध आणि परिपूर्ण असते.

नाम हे आपला प्रपंच नेटका करून करायचे असल्यामुळे नामजपाची आपल्या संसारला, सामाजिक जीवनाला, नेहमीच्या नोकरीधंद्याला, शाळा-कॉलेजच्या अभ्यासाला अडचण होता कामा नये याची प्रत्येक साधकाने दक्षता घ्यावयास हवी. नोकरी- व्यवसायात आपले कर्तव्य बजावीत असताना तसेच शाळा- कॉलेजचा अभ्यास करताना आपले सगळे लक्ष त्या कामाकडे किंवा अभ्यासाकडे केंद्रित करावयाचे असते. अशा वेळी जर नामजप केला तर ते महत्त्वाचे काम किंवा अभ्यास चांगला होणार नाही. एकंदर काम बिघडून जाईल.

कित्येक लोक नामजपाचा अतिरेक करतात. वाट्टेल त्या ठिकाणी, गरज नसताना नामजप करतात. दुस-याशी कोणत्याही विषयावर बोलताना प्रत्येक वाक्यागणिक नामजप करतात. त्यांना ही एक सवयच होऊन जाते. अशा प्रकारे प्रत्येक वाक्यागणिक नामजप झाला नाही तर त्यांना अस्वस्थ वाटते. तो अस्वस्थपणा जावा म्हणून ते बोलण्यात कोणताही विषय आला तरी सवयीने प्रत्येक वाक्यागणिक नामजप करतात. हा एक मंत्रचळ होऊन बसतो. खरे म्हणजे तो मानसिक संतुलन बिघडलेला नामजप होय. हा सौम्य स्वरूपाचा मनोविकारच होय. असा मंत्रचळ कोणाला असेल तर त्याने त्यावर ताबा मिळवून त्याच प्रकारे नामजप करावयास हवा.

1 COMMENT

  1. माननीय संपादक, लेख खरोखर छान, धन्यवाद.. श्रद्धा संस्कृती हे सदर अतीउत्तम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version