Home टॉप स्टोरी नारायण राणे आणि मी शून्यातून विश्व निर्माण केले!

नारायण राणे आणि मी शून्यातून विश्व निर्माण केले!

1

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते नारायण राणे आणि मी दोघेही झीरो क्लबचे मेंबर्स आहोत.

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते नारायण राणे आणि मी दोघेही झीरो क्लबचे मेंबर्स आहोत. हातामध्ये काहीही नसताना केवळ जिद्द आणि चिकाटीच्या बळावर सर्व काही मिळवले. शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया साधणे हे आमच्यात साम्य असले तरी दोघांचे स्वभाव मात्र भिन्न आहेत. नारायण राणे हे अत्यंत परखड बोलणारे आहेत.

एखादे सत्य मांडताना ते कुणालाही घाबरत नाहीत. मला मात्र ब-याचदा इतक्या स्पष्टपणे बोलणे अवघड जाते. आम्ही कष्ट करून जे मिळवले, त्यातून गरिबांना मदत करण्याचा दोघांचाही स्वभाव आहे. मात्र नारायण राणे यांचा हात मदत करताना माझ्यापेक्षाही अधिक मोकळा असतो, असे दिलखुलास उद्गार भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते नारायण राणे यांच्या निखळ मैत्रीचे धागे मंगळवारी ‘प्रहार’च्या कार्यालयात उलगडले गेले. सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यालयाला भेट देऊन ‘प्रहार’ परिवाराशी मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले की, ‘नारायण राणे आणि मी झीरो क्लबचे मेंबर्स आहोत.

आमच्या हातात काही नसताना आम्ही केवळ कर्तृत्वाच्या बळावर सर्व मिळवले. हा आमच्या दोघांमध्ये समान धागा आहे. म्हणूनच आम्हाला एकमेकांबद्दल नितांत आदर आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो तेव्हाही आणि आता काँग्रेसमध्ये एकत्र आहोत तेव्हाही आमच्या मैत्रीत कधी खंड पडला नाही. एक वेळ तर अशी होती की, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि नारायण राणे हे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्या जोडीला होते गोपीनाथ मुंडे!

दोघेही माझ्यावर तुटून पडायचे. पण त्यात वैयक्तिक द्वेष नव्हता, तर राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्याची तळमळ होती. नारायण राणे यांचे अर्थसंकल्पावरील भाषण इतके अचूक असायचे की, अर्थसंकल्पाबाबत इतकी माहिती असणारा शहाणा माणूस मी अजून पाहिला नाही, असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले.

‘प्रहार’ कार्यालयात आल्यावर आपल्याला अमेरिकेत आल्यासारखे वाटले, असे सांगून शिंदे पुढे म्हणाले, नारायण राणे जे करतात ते अत्यंत भव्यदिव्य असते. आपल्याकडे असलेल्या ऐश्वर्याचा अनुभव आपल्यासोबत काम करणा-या लोकांनाही मिळाला पाहिजे, अशी त्यांची भावना असते. त्यांची दोन्ही मुले अभ्यासू आहेत.

निलेश यांचे काम मी संसदेत पाहिले आहे. तर नितेश हे विधानसभेत चांगले काम करीत आहेत. त्यांच्या जिद्दीमुळे ‘प्रहार’ महाराष्ट्रात गाजत राहील आणि दीनदुबळ्यांना न्याय देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करील, असेही शिंदे यांनी सांगितले.

दिवस चांगला जावा वाटत असेल तर सुशीलकुमार शिंदे यांना भेटा

आपला दिवस चांगला जावा असे वाटत असेल तर सकाळी सकाळी जाऊन सुशीलकुमार शिंदे यांना भेटा. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या या दिलखुलासपणाच्या बळावरच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते आणि देशातील जनतेचा विश्वास संपादन केला आहे, असे उद्गार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढले.

राजकारणात जी काही मोजकी चांगली माणसे आहेत, त्यात सुशीलकुमार शिंदे यांचा नंबर खूप वरचा आहे. अत्यंत निर्मळ अंत:करणाचा माणूस. राजकारणात राहूनही त्यांच्याबद्दल वाईट बोलेल असा माणूस संपूर्ण महाराष्ट्रात सापडणार नाही. राजकारणात टीका सहन करावीच लागते.

टीका झाली तरी त्यांनी आपल्या चेह-यावरील हस्य कधी मावळू दिले नाही. ते मुख्यमंत्री होते आणि मी विरोधी पक्षनेता होतो. मी त्यांच्यावर कडाडून टीका करायचो. परंतु मी केलेले कठोर शाब्दिक हल्लेही ते अत्यंत हसतमुखाने परतवून लावायचे. एक प्रसंग मला चांगला आठवतो, सुशीलकुमार शिंदे यांनी एकंदर नऊ वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यामुळे आकडय़ांचे खेळ कसे करायचे ही कला त्यांच्या इतकी इतर कुणाला अवगत नसेल. ते मुख्यमंत्री असताना अशीच हातचलाखी करून त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. तो निवडणुकीच्या अगोदरचा अर्थसंकल्प असल्याने त्यांनी मोठया चलाखीने काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात जास्त पैसे दिले.

हे माझ्या लक्षात येताच मी कडाडून हल्ला चढविला. दोन दिवस सभागृहाचे कामकाज बंद पाडले. अखेर शिंदे यांनी खुल्या दिलाने जेवढे पैसे सत्ताधारी आमदारांना देण्यात येणार होते, तेवढेच पैसे विरोधी पक्षांच्या आमदारांनाही देण्याचा निर्णय घेतला. गरीब घराण्यातून येऊन त्यांनी जो देदीप्यमान प्रवास केला आहे, त्यामुळे त्यांचा मला अभिमान वाटतो, असेही कौतुकोद्गार नारायण राणे यांनी काढले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version