Home कोलाज नारायण राणे जसे दिसले तसे

नारायण राणे जसे दिसले तसे

2

२०१४ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा पराभव झाला. या दोन्ही पक्षांच्या हातून सलग १५ वर्षाची सत्ता गेली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर विरोधी पक्षात बसायची वेळ आली. विरोधात काम करायची सवय असावी लागते. या दोन्ही पक्षांना ती सवय नव्हती आणि अजूनही या पराभवातून दोन्ही पक्षांतील आमदार पूर्णपणे बाहेर आले आहेत, असे वाटत नाही.

२०१४ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा पराभव झाला. या दोन्ही पक्षांच्या हातून सलग १५ वर्षाची सत्ता गेली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर विरोधी पक्षात बसायची वेळ आली. विरोधात काम करायची सवय असावी लागते. या दोन्ही पक्षांना ती सवय नव्हती आणि अजूनही या पराभवातून दोन्ही पक्षांतील आमदार पूर्णपणे बाहेर आले आहेत, असे वाटत नाही.

जेव्हा पराभव झाला आणि विरोधी पक्षात बसावे लागले तेव्हा राष्ट्रवादीच्या काँग्रेस आमदारांची श्री. शरद पवारसाहेब यांनी बैठक घेतली. ‘आता आपल्याला विरोधी पक्षात बसायचे आहे’, अशी भाषणाची सुरुवात करून पवारसाहेब म्हणाले की, ‘विरोधी पक्षात बसल्यानंतर तुम्ही असे काम करा, जे श्री. नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेता असताना या सभागृहात केले होते..’

शरद पवार हे एका पक्षाचे नेते म्हणून बोलत नव्हते. ते स्वत: राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या बाकावर बॅरिस्टर अंतुले असताना, नंतर बाबासाहेब भोसले असताना आणि नंतर वसंतदादा असताना, विरोधी पक्षाचे नेते म्हणूनही श्री. शरद पवार यांनी प्रभावीपणे काम केले. ते असे म्हणू शकले असते की, ‘विरोधी पक्षात बसल्यावर मी जसे काम केले तसे काम करा’.. विरोधी पक्षनेते म्हणून पवारसाहेबांनी अतिशय प्रभावी काम केलेले होते. पण आपल्या आमदारांनी कसे काम करावे, हे सांगताना नारायण राणे यांनी काम केले असे काम करा, असे त्यांनी अवर्जून सांगितले. मी त्यांना याबाबत विचारले होते, तेव्हा ते म्हणाले होते की, ‘विरोधी पक्षनेत्याने सरकारला कोंडीत कसे पकडावे, सभागृहाच्या नियमांचा आधार घेऊन मुद्देसूद कसे बोलावे आणि अर्थसंकल्पीय भाषणात कोणते नेमके मुद्दे मांडावेत, त्यांचा उत्तम वस्तुपाठ नारायण राणे यांनी घालून दिला.’

शरद पवार यांच्यासारख्या आजच्या सर्वोच्च नेत्याला नारायण राणे यांचे हे गुणविशेष लांबून दिसलेले आहेत. नारायण राणे शिवसेनेत मंत्री असताना, नंतर मुख्यमंत्री झाल्यावर आणि नंतर विरोधी पक्षनेते असताना, शरद पवारसाहेब विधानमंडळात नव्हते ते दिल्लीत होते. हजार मैलावरून त्यांना राणेसाहेबांची कामगिरी दिसत होती. राणेसाहेबांच्या गुणविशेषामध्ये हीच गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आज जे विरोधी पक्षातील सर्वपक्षीय नेते विधानसभेत नाहीत किंवा विधान परिषदेत नाहीत, अशा कोणत्याही नेत्याला विचारले तर महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणात विधानसभेत नारायण राणे हवेच होते, असे सर्रास सगळे जण सांगतात.

‘प्रहार’च्याच कामानिमित्त पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर असताना काही नेत्यांच्या भेटी झाल्या. वारणानगरमध्ये श्री. विनय कोरे यांची भेट झाली. त्यांचे पिताश्री तात्यासाहेब कोरे यांनी वारणानगर केवढे समृद्ध केले आहे. ते विनय कोरे राज्यमंत्रीही होते. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी पहिली गोष्ट ही सांगितली की, ‘स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा एकदा विधानसभेत आला असताना नारायण राणे यांनी पन्नास वर्षातील एवढे संदर्भ देऊन स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आणि अखंड महाराष्ट्राच्या बाजूने इतके तडाखेबंद भाषण केले की, आजही मला सातत्याने असे वाटते की, हे व्यक्तिमत्त्व विधानसभेत हवेच होते. आज काँग्रेसची अवस्था काहीशी दोन पावले मागे असताना काँग्रेसजवळ असलेला हा सर्वात उत्तम नेता वैधानिक आघाडीवर नाही, यात महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झालेले आहे’. ही विनय कोरे यांची प्रतिक्रिया.

कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, वाईचे माजी आमदार मदन भोसले, पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभुराजे देसाई, थेट राजकारणात नसलेले पण कृष्णा उद्योग या मोठया समूहाचे अध्यक्ष सुरेश भोसले या प्रत्येकाशी चर्चा करताना नारायण राणे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील म्हणजे विधानमंडळातील उणीव प्रत्येकाला जाणवत होती. विधानमंडळात असलेल्या माणसांच्या चर्चेपेक्षा जो नेता सभागृहात नाही, त्याची चर्चा इतक्या मोठया प्रमाणात आणि इतक्या लांब राहून लोक करतात, तेव्हा अनुपस्थिती चर्चेची बातमी होते. हा राणेसाहेबांचा गुणविशेष.

आज राणेसाहेब विधानसभेत नाहीत, विधान परिषदेतही नाहीत. अजून तीन वर्षाची ही लढाई आहे. ती लढाई हिमतीने ते लढणार आहेत. गेल्या वर्षी याच दिवसांत काँग्रेसतर्फे सर्व स्तरावर आग्रह करून नारायण राणे यांना वांद्रे (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक लढवायला लावली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवाराला १२ हजार मते मिळाली होती. काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिट गेले होते.

राणेसाहेबांनी व्यक्तिगत लोकप्रियतेवर ३२ हजार मते खेचली. पण दुर्दैवाने विजय मिळाला नाही. राणेसाहेब उभे राहिलेच पाहिजेत, असा ज्यांचा ज्यांचा अग्रह होता, त्या कोणीही निवडणुकीत विजय मिळाला पाहिजे यासाठी भिडल्याचे जाणवले नाही. काँग्रेसमधीलच अनेक जण पराभव कसा होईल, यासाठी एकमेकांना टाळया देत होते आणि पराभव झाल्यानंतरही टाळया दिल्या गेल्या. काँग्रेसची हीच कमजोरी आहे. प्रभावी माणूस नको, अशी एकदा भूमिका घेतली की, मग ते राजकारण दुरुस्त करणे सोपे नाही आणि ते कुणाला दुरुस्त करता येणार नाही.

पराभवाने राणेसाहेब खचून गेले नाहीत. झालेली टीका त्यांनी पचवली. पुन्हा हिमतीने ते राजकारणात उभे राहिले. पण त्यांना एक प्रश्न सतावत होता की, काँग्रेसकरिता आपण सर्व बाजूंनी लढत असताना अनावश्यक टीकेचे धनी आपण का होतो? आणि हा प्रश्न कुणाच्याही मनात येईल. एका पत्रकाराने त्यांना त्याचे अतिशय छान उत्तर दिले. ते उत्तर असे होते की, ‘जे झाड आंब्याने लगडलेले असते, त्याच झाडावर लोक दगड मारतात’.

नारायण राणे ज्यांना समजले नाहीत, असे आणि ज्यांना समजले आहेत, असे अशा दोन्ही लोकांनी नारायण राणे हे व्यक्तिमत्त्व नेमके कोणत्या मुशीतून घडले हे समजूनच घेतलेले नाही. मी त्यांच्याजवळ फार नव्हतो. ‘प्रहार’मुळे गेली १८ महिने त्यांना पाहतो आहे आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रचार समितीचे ते अध्यक्ष होते त्यावेळी तीन-चार महिने प्रचार समितीचा एक सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर होतो. स्वत:ची गाडी, स्वत:चे पेट्रोल, महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांचा सर्व दौरा. आणि शेवटच्या दिवसांपर्यंत महाराष्ट्रभर फिरून जवळजवळ ४० विधानसभा मतदारसंघ श्री. राणे यांनी घुसळून काढले. महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांना प्रचाराकरिता राणेसाहेबच हवे होते. सर्व सभा तुडुंब होत होत्या, अगदी टेंभुर्णी ते सोलापूपर्यंत. आणि उद्या सकाळी निवडणूक तर आदल्या दिवशी संध्याकाळी कुडाळ-मालवण मतदारसंघात ते घरी पोहोचले.

तीन दिवस मतदारसंघात आधी पोहोचले असते तर पराभव झालाच नसता. पण पराभव झाल्यानंतर ते कधीच खचले नाहीत. कारण ज्या कोकणात ५० वर्षाच्या निवडणुकीच्या इतिहासात काँग्रेस रुजवली ती नारायण राणे यांनीच. पहिली निवडणूक १९५२ साली झाली. त्यानंतर जवळजवळ ५५ वर्षे?कोकणात पहिली ३० वर्षे बॅरिस्टर नाथ पै यांच्याभोवती सगळी शक्ती एकवटलेली. नंतर मधू दंडवते. अशा समाजवाद्यांकडे त्यावेळचा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ निर्विवादपणे राहिला.

विधानसभेच्या निवडणुकीत मालवणातून श्याम कोचरेकर, गुहागरमधून डॉ. मंडलिक, लांज्यातून आठल्ये गुरुजी, कणकवलीमधून सी. स. सावंत (शेकाप), कुडाळमधून बा. ली. किनळेकर, राजापूरमधून ल. र. हातणकर असे समाजवादी विचारांचे सगळे निवडून येत होते. सुधीर सावंत यांनी मधू दंडवते यांना पहिला धक्का दिला. पण नंतर नारायण राणे आणि त्यांचे सगळे सहकारी शिवसेनेत राहिले आणि जो समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता तो सगळा कोकण शिवसेनेकडे वळवण्यात नारायण राणे यांची महत्त्वाची भूमिका होती.

मग सुरेश प्रभू लोकसभेला आणि विधानसभेला सेनेचे आमदार हे गणित चालू असताना २००४ पर्यंत जिथे काँग्रेसला अजिबात शक्ती नव्हती, तिथे नारायण राणे यांनी काँग्रेस प्रवेश करून राजकीय चित्र बदलून टाकले होते आणि ही सोपी गोष्ट नव्हती. २००५ च्या विधानसभा निवडणुकीत ते मालवण मतदारसंघातून निवडून आले. तिथे शिवसेनेच्या परशुराम उपरकर या उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांची मालवणात सभा झाली आणि त्या उपरकरांची अनामत रक्कम जप्त करून राणेसाहेब ७८ हजार मतांनी विजयी झाले.

राणेसाहेब काँग्रेसमध्ये आले हे तर फारच छान झाले. कारण त्यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याची, आक्रमक नेत्याची काँग्रेसला गरज होतीच. पण त्याहीपेक्षा कोकणात त्यांनी एक परिवर्तन घडविले. शिवसेना सोडून बाहेर पडणे बाकीच्या नेत्यांना इतके सोपे गेले नव्हते. भुजबळ सेनेतून जेव्हा बाहेर पडले, तेव्हा सहा महिने बाहेर फिरू शकत नव्हते.

गणेश नाईक १ मे १९९८ ला शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा तेही दबकत दबकत पाहेर पडले. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन शिवसेनेशी थेट भीडणारे पहिले नेते होते. शिवसेना ज्यांनी ज्यांनी सोडली होती ते राज ठाकरे असतील, भुजबळ असतील, गणेश नाईक असतील या सर्वानी बाळासाहेबांबद्दल अत्यंत आदराची भावना फारशी जपली नव्हती आणि नाही. आणि मनात जपली असली तरी कधी व्यक्त केली नाही. उलट भुजबळ यांनी ज्या शिवसेनेची शिडी चढून ते वर गेले, त्या बाळासाहेबांची संभावना

‘टी बाळू’ अशी केली होती. राणेसाहेबांनी अशी कोणतीच संभावना करण्याचे सोडाच, पण शिवसेनेचे प्रखर विरोधक म्हणून वावरत असताना बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वाबद्दल अत्यंतिक आदराच्या भावना त्यांनी नुसत्या जपल्या नाहीत तर वेळोवेळी जाहीरपणे व्यक्त केल्या आहेत. ‘बाळासाहेबांमुळे मी मुख्यमंत्री झालो’ असे आजही ते अनेकवेळा सांगतात, तेव्हा ते केवळ शब्द नाहीत तर त्यांचे मन त्यावेळी कृतज्ञतेने ओथंबलेले असते.

दैनिक ‘प्रहार’मधील एक किस्सा सांगतो, गेली १८ महिने ‘प्रहार’चा संपादक म्हणून काम करताना २३ जानेवारी या बाळासाहेबांच्या जन्मदिनी (२०१५) बाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त पहिल्या पानावर फोटो टाकून त्यांच्यावर मी अग्रलेख लिहिला. ‘प्रहार’मधील त्यावेळच्या दोन मित्रांनी हळूच येऊन सल्ला दिला की, ‘हे करू नको’, मी कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, साहेब भडकतील. आणि आज हे जाहीरपणे सांगायला संकोच वाटत नाही की, २३ जानेवारी २०१५ ला अंक प्रसिद्ध झाल्यानंतर साडेआठ वाजता पहिला फोन आला तो नारायण राणेसाहेबांचा. फोन घेतला, मी म्हटले, ‘दादा नमस्कार’. तिकडून नारायण राणे म्हणाले, ‘अभिनंदन, बाळासाहेबांचा फोटो तुम्ही टाकलात आणि उत्तम अग्रलेख लिहिलात..’ हे एक वाक्य सांगत असताना मला त्यांचा चेहरा फोनवर दिसत नव्हता तेव्हाही त्यांचे मन कृतज्ञतेने पूर्ण?भरले आहे हे दिसत होते.

राजकारणात मतभेद झाले तरी त्याचे रूपांतर शत्रुत्वात करू नये. राजकारण वेगळे आणि मैत्री वेगळी, असे मानणारे जे नेते आहेत, त्यातील सर्वश्रेष्ठ नेते शरद पवार हे आहेत. नारायण राणे यांनी राजकारणात शरद पवार यांच्याकडून जो गुण उचलला की, राजकीय विरोध असतानाही मैत्री जपायची. विनोद तावडे यांच्या पिताजींचे दु:खद निधन झाले तेव्हा विनोद तावडे यांच्या सांत्वनाला पार्ले येथील त्यांच्या घरी पहिले पोहोचले ते नारायण राणे.

शरद पवार यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त नेहरू विज्ञान केंद्रात ज्या भव्य सत्काराचे आयोजन झाले होते तिथे बोलणारे वक्ते दिग्गज होते. पण सवरेत्कृष्ट भाषण झाले नारायण राणे यांचे. कारण ते मनापासून बोलतात. कडक टीका करायची झाली तरी मनापासूनच करतात आणि कौतुक करतानाही मनापासून करतात. हातचे राखून काही न ठेवणे हा त्यांचा आणखी गुणविशेष.

राजकारणात त्यांनी प्रचंड यशही मिळवले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. दुग्धव्यवसाय, महसूल, उद्योग या विभागांची मंत्रीपदे यशस्वी करून दाखवली. महसूलमंत्री म्हणून, उद्योगमंत्री म्हणून त्यांचा ठसा उमटवला. त्यानंतरचे निवडणुकीतील अपयशही त्यांनी पचवले. दोन्ही सुविद्य सुपुत्रांना काँग्रेसच्या राजकीय विचारधारेत त्यांनी आणले आणि त्या विचाराने घडवले. हे सर्व करत असताना ज्या परिस्थितीतून आपण मोठे झालो ती परिस्थिती नारायण राणे कधीही विसरले नाहीत.

वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत प्रचारात त्यांच्यासोबत असताना, वांद्रे शासकीय कॉलनीत मामाकडे राहत असताना कोणत्या खोलीत राहत होतो, ती चाळ त्यांनी दाखवली. वडिलांनी शिकायला मामाकडे ठेवले. वडील मुंबईत गिरणी कामगार. मुंबईतील हवामान सोसेना तेव्हा गावाकडे गेले. पण आपल्या मुलाला त्यांनी तू शिकलेच पाहिजेस, हा आग्रह धरला. ज्या मामाची एक खोली होती तिथे या भाच्याला पाठवून दिले. हा भाचा व्हरांडयात सतरंजी टाकून झोपायचा.

पावसाळयात धो धो पाऊस आला की, गॅलरीत झड यायची, मग चटई गुंडाळून उभा राहायचा आणि पाऊस थांबल्यावर खराटयाने पाणी काढून परत झोपायचा. जीवनाची सुरुवात करताना नारायण राणे यांनी फटाके विकून, उदबत्त्या विकून त्यातून दोन पैसे मिळवले. कोंबडयाही विकल्या. कोणाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार असतील तर त्यात मध्यस्ती करून त्यातून दोन पैसे कसे मिळतील, हेही त्यांनी बघितले. १५ व्या वर्षी ते शिवसेनेत गेले. पण सहसा मराठी माणूस ज्या व्यवसायात स्वत:ला गाडून घेत नाही, तो व्यवसाय ते करतच राहिले. शिक्षण झाल्यावर इन्कम टॅक्समधील नोकरी करीत असतानाही फावल्या वेळेत क्रिकेट आणि सकाळच्या वेळेत व्यवसाय. त्यातून दोन पैसे मिळवायचे आणि जमा झालेल्या पैशांतून नवीन उद्योग करायचा.

आज अनेक व्यवसाय करणारे नारायण राणे यांची सुरुवात दिवाळीचे फटाके विकून झालेली आहे. कोणतेही यश मिळवताना त्या यशामागची निष्ठा, श्रम, जिद्द विलक्षण असल्याशिवाय हे यश मिळू?शकत नाही. आज नारायण राणे राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत, उद्योजक म्हणूनही यशस्वी आहेत. प्रत्येक पैशाचा हिशेब करून त्यांनी व्यवसाय केलेला आहे. आजही त्यांचे त्या प्रत्येक विषयाकडे लक्ष आहे. अर्थसंकल्पावर अत्युत्तम बोलू शकत होते. त्यातील बारकावे सांगू शकत होते. कारण व्यवसायातील अर्थसंकल्पाचे तपशील त्यांना माहिती होते.

तूट म्हणजे काय हे त्यांना व्यवसायातच कळले होते. तूट कशी भरून काढायची, हेही कळले होते. म्हणून महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते असताना अर्थसंकल्पाच्या बाहेर एकही राजकीय शब्द न वापरता आपले पूर्ण दीड तासांचे भाषण अर्थसंकल्पाभोवती फिरत ठेवणारा हा महाराष्ट्राचा एकमेव विरोधी पक्षनेता आहे. आजही सेना-भाजपाच्या २०१६च्या अर्थसंकल्पाची चिरफाड सत्तेत नसलेल्या महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने पत्रकार परिषद घेऊन करण्याची हिम्मत दाखवली नाही. हे धाडस फक्त नारायण राणे करू शकतात. कारण अर्थसंकल्प मांडला गेल्यावर आठ दिवस त्याचा अभ्यास त्यांनी केला.

आज तीन हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प ५० हजार कोटी तुटीवर कसा जाणार आहे, रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे तूट कशी वाढणार आहे, हा तपशील बाकी कोणताही राजकीय नेता सांगू शकणार नाही. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ज्या तरतुदी केल्या होत्या, ती रक्कम खर्चच झाली नाही. हा मुद्दा विधानसभेत उघड व्हायला हवा होता. तो विधानसभेत नसलेल्या नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केला.

असे नारायण राणे आज ६५ व्या वर्षात पाऊल ठेवत आहेत. राजकारणातील काही नेत्यांनी वृत्तपत्र व्यवसायातही पाऊल ठेवले. पण जे जे काम करायचे आहे ते सवरेत्तम करायचे या पद्धतीमुळे ‘प्रहार’ची आखणी करताना त्यांनी ही दृष्टी ठेऊनच आखणी केली. म्हणून ‘प्रहार’च्या कार्यालयात भेट दिल्यावर देशाचे त्यावेळचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सहज म्हणाले, ‘राणेसाहेब, अमेरिकेमधील एखाद्या ऑफिसमध्ये आल्यासारखे वाटते..’ त्यांचे आजचे सगळे व्यवसाय या पद्धतीचे आहेत. ‘दादांनी मला मदत केली’ असे सांगणा-यांची यादी छापायची म्हटली तर एक पुरवणी काढावी लागेल.

इतके जण त्यांच्याकडून मदत घेत असतात आणि ते देत असतात. कोकणामध्ये आज अद्ययावत रुग्णालय ते उभे करत आहेत. वृत्तपत्र चालवणे आणि रुग्णालय चालवणे या दोन्ही गोष्टी अत्यंत कठीण आहेत पण या दोन्ही विषयांचे शिवधनुष्य फक्त नारायण राणे हेच उचलू शकतात.

त्यांनी आम्हा ‘प्रहार’ परिवाराला सातत्याने सांगितले आहे की, ‘प्रहार’ हे काँग्रेसचे मुखपत्र नाही, हे व्यासपीठ सर्वासाठी आहे. पण काँग्रेसचा विचार हा देशाला एक ठेवणारा विचार आहे आणि तो मी (राणे) मनोमन स्वीकारला आहे. पण सर्व जाती-धर्माना बरोबर घेऊन हा देश उभा करावा लागेल, ही त्यांची भूमिका आहे. म्हणून जातीय शक्तींच्या विरोधात, भाजपाच्या विरोधात आक्रमक होताना त्यांनी कधीही कसर केलेली नाही.

परिणामांची पर्वा न करता लढणा-या योद्धयाचे नाव नारायण राणे हेच आहे. ही पुढची तीन वर्षे बघता बघता जातील आणि पुन्हा एकदा नारायण राणे आणि त्यांच्या खांद्यावरील काँग्रेसचा झेंडा महाराष्ट्राला समृद्ध करेल, हा त्यांचा विचार पक्का आहे. त्यांच्या या थेट भिडून काम करण्याच्या वृत्तीमुळेच ‘प्रिय-अप्रिय’ याचा विचार न करता काँग्रेससाठी ते स्वत:ला झोकून काम करत आहेत. त्यांची आणि माझी नाळ त्यामुळेच जुळली. म्हणून नियतीने मला ‘प्रहार’मध्ये आणलेय. मी भावे असलो तरी पु. भा. भाव्यांपैकी नाही, विनोबा भावेंपैकी आहे. म्हणून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन लढणारे नारायण राणे हे उद्या मोठे झाले पाहिजेत, महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांच्याकडे आले पाहिजे, तरच महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा उभी राहील.

वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 


नऊच्या आत घरात

‘मी १९८५ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सार्वजनिक जीवनातील कामाला सुरुवात झाली. रात्री घरी यायला उशीर होऊ लागला. एक दिवस असाच उशीर झाला असताना माझ्या पत्नीने विचारले की, ‘तुम्हाला असा उशीर रोज होणार का?..’ मी सांगितले की, ‘आता सार्वजनिक जीवनात आहे. उशीर होईल..’ श्रीमती राणे यांनी मला सांगितले, ‘उशीर म्हणजे नऊच्या नंतर उशीर नको..’ त्यांचे सांगणे मला पटले. मी तेव्हापासून आजपर्यंत घरी शक्यतो नऊवाजेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. अगदीच काही महत्त्वाचे राजकीय काम असेल तर तसे घरी कळवतो. रविवारी मात्र पूर्ण दिवस मी घराकरिता देत असतो. मी असे मानणारा आहे की, सगळयात महत्त्वाचे असेल तर ते आपले कुटुंब. त्यामुळे पत्नीची सूचना मी पाळली आणि नऊच्या आत घरी मी जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करतो.

..आणि शब्द पाळला!

विधानसभेत विरोधी पक्षनेता असताना विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. सरकारवर मी एकदा कमालीचा तुटून पडलो. माझे ते भाषण गाजले होते. मुख्यमंत्री अस्वस्थ होते. सभागृहात उपस्थिती कमी होती. तेवढयात मुख्यमंत्र्यांना तातडीने दिल्लीचे बोलावणे आले. त्यांनी मला बाहेर बोलावून घेतले. सभागृहात काँग्रेसचे सदस्य कमी होते.

विलासराव म्हणाले, ‘नारायणराव मला तातडीने दिल्लीला जावे लागत आहे, आमचे सदस्य आज कमी आहेत. तुम्ही पोल (मतदान) मागणार असाल तर मी थांबतो. ‘मी विलासरावांना म्हटले, ‘तुम्ही निर्धास्तपणे जा’ मी आक्रमकपणे भाषण करेन, पण पोल मागणार नाही..’ मी पोल मागितला नाही. त्या दिवशी सरकार पडू शकले असते. पण मुख्यमंत्र्यांना शब्द दिला तो मी पाळला. विलासरावांनी दिल्लीहून फोन केला म्हणाले, ‘नारायणराव आभारी आहे..’

संपादकांचे संपादक

दैनिक प्रहारचे सल्लागार संपादक म्हणून श्री. नारायण राणे यांचे नाव केवळ प्रसिद्ध करण्यापुरते नसते. गेल्या १८ महिन्यांचा माझा अनुभव असा की, राणेसाहेब मुंबईत असोत की कोकणात.. दैनिक प्रहारचे पहिले पान रात्री तयार झाले की, रोज ते राणेसाहेबांकडे पाठवायचे. पूर्ण वेळ देऊन त्या पानाचे ते वाचन करतात. शीर्षके बदलतात. योग्य ती सूचना करतात आणि अंक अधिक देखणा कसा होईल यासाठी त्यांच्या सूचना अगदी नेमक्या असतात.

याकूबला फाशी झाली त्यादिवशी मुंबईच्या सर्व वृत्तपत्रांनी याकूबची मोठी मोठी छायाचित्रे छापून त्याच दिवशी दफनविधी झालेल्या थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या बातम्या आतल्या पानांत ढकलल्या होत्या. राणे साहेबांनी फोनवर सांगितले होते की, कोणत्याही परिस्थितीत याकूब पहिल्या पानावर असता कामा नये. संपूर्ण पान एपीजेंसाठी द्या.

2 COMMENTS

  1. आदरणीय राणे साहेब,
    तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवारा ला वाड दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    तुमचा समर्थक
    सरफ़राज़ रफ़ीक हाफ़िज़
    मु पोस्ट नागोठने
    तालुक़ा रोहा
    रायगड ४०२१०६

  2. माननीय भावे साहेब,लेख खरोखर फार छान लिहला आहे .आपले लेख खरोखर वाचनीय असतात .आणि माननीय राणे साहेब तर खरंच ग्रेट आहेत. मला त्यांना भेटायची फार इच्छा आहे? ध्यानवाद -संभाजी भोईटे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version