Home टॉप स्टोरी नारायण राणे सर्वात चांगले मुख्यमंत्री

नारायण राणे सर्वात चांगले मुख्यमंत्री

1

दैनिक ‘प्रहार ’च्या पाचव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सर्वांचीच मने जिंकली. 

मुंबई- मी पाहिलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये नारायण राणे हे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत, अशी दिलखुलास दाद देत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनीही टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

राजकीय जीवनात वृत्तपत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘प्रहार’च्या माध्यमातूनही तेच होत असून, त्यातून ठाम मते मांडली जात असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. ‘प्रहार’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राणे कुटुंबीयांशी असलेला त्यांचा ऋणानुबंध, वेगवेगळ्या आठवणी, काही किस्से सांगत आणि चिमटे काढत चौफेर फटकेबाजी करत गच्च भरलेल्या षण्मुखानंद सभागृहातील रसिकांची दाद मिळवली.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री असताना बाबा आमटे यांच्या संस्थेला आपल्या शब्दाखातर ६० लाख रुपये दिले होते. हे ऋण कधीही विसरता येणार नाही, याबद्दलची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. दिव्य मराठीचे संपादक कुमार केतकर यांच्या भाषणाचा धागा पकडत नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडियाच्या प्रचाराची फिरकीही त्यांनी घेतली. सध्या आयफोन आणि आयपॅडच्या जमान्यात आपल्याकडे मात्र पारंपारिक आणि साधाच मोबाइल असल्याचे सांगत त्यांनी तो उपस्थितांनाही दाखवला. याचा उपयोग फोन आला की घेतो आणि कुठे करायचा असला तर बटन दाबतो, असे सांगताच एकच हशा पिकला.

धर्म, जात आणि पक्ष आपण कधी मानला नाही. माझ्या बहिणीने अब्बास या मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केले. त्या वेळी आपल्याला अब्बास मिळाला याचे मला समाधान वाटले. मुस्लिम समाजातील प्रत्येकाने खूप शिकावे असे सांगत, शिक्षणामुळे वास्तव काय आहे, जग कोणत्या दिशेला चालले आहे ते समजण्यास मदत होते, असे ते म्हणाले.

जैतापूरच्या खडकाळ आणि रेताड जमिनीला चांगला भाव मिळवून देण्याचे श्रेय हे नारायण राणेंचेच आहे. त्यामुळेच लोक त्यांना मानतात हे विसरून चालणार नाही, असेही त्यांनी या निमित्ताने सांगितले.

ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी कार्यक्रमात लाल शर्ट घातला होता. त्यावरून नाना पाटेकर यांनी तुम्ही कम्युनिस्ट पक्षात कधी प्रवेश केलात असा प्रश्न पडल्याचे सांगत केतकरांचीही फिरकी घेतली. तुम्ही घातलेला लाल शर्ट पाहून पक्ष बदललात की काय, असे वाटले असेही ते म्हणाले. शिवाय तुमच्यासारखा गोरा रंग आपल्याला मिळाला असता तर ‘बेशरम’मधील रणबीर कपूरची जागा मी घेतली असती, पण आपण रंगात मार खाल्ला असे सांगताच नानांच्या संवादाला सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version