Home टॉप स्टोरी नाशिकच्या महापौरपदी मनसेचे अशोक मुर्तडक

नाशिकच्या महापौरपदी मनसेचे अशोक मुर्तडक

1

नाशिक महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या साथीने नाशिकचे महापौरपद कायम राखण्यात यश मिळवले आहे.

नाशिक – ऐनवेळी भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने चुरशीच्या बनलेल्या नाशिक महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या साथीने नाशिकचे महापौरपद कायम राखण्यात यश मिळवले आहे.

शुक्रवारी सकाळी राजीव गांधी भवन येथे पार पडलेल्या निवडणुकीत मनसेचे अशोक मुर्तडक विजयी झाले. त्यांनी महायुतीच्या सुधाकर बडगुजर यांचा ३१ मतांनी पराभव केला. अशोक मुर्तडक यांना ७५ मते मिळाली तर, बडगुजर यांना ४४ मते मिळाली.

नाशिक महापालिकेत बहुमत सिध्द करण्यासाठी मनसेला ६२ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. मनसेक़डे स्वत:चे ३७ नगरसेवक होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन, मनसेने सहज बहुमताचा आकडा गाठला.

उपमहापौरपदी आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष नगरसेवक गुरमित बग्गा यांची निवड झाली. मनसेने महापौरपदावरील भाजपाचा दावा नाकारल्यानंतर भाजपने अडीचवर्षांपासून असलेली युती तोडत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर मनसेला नाशिक महापालिकेत सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा करण्याशिवाय पर्याय नव्हता. आघाडीने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली असती किंवा, तटस्थ राहिले असते तर त्याचा फायदा शिवसेना-भाजपलाच झाला असता, त्यामुळे महायुतीला रोखण्यासाठी नाशिक महापालिकेत मनसे-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी नवी आघाडी आकाराला आली आहे.

मनसेच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह
मनसेने नाशिक महापालिकेतील सत्ता कायम राखली असली तरी, मनसेच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन जोरदार आरोप केले होते.

मनसेने वेळोवेळी आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली आहे. महत्वाचे म्हणजे काहीवर्षांपूर्वी पुणे महापालिकेत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी-भाजप आणि शिवसेना अशी महाआघाडी झाली होती.

त्यावेळी राज ठाकरे यांनी विश्वासहर्तेचा मुद्दा उपस्थित करीत जोरदार टिका केली होती. आता राज ठाकरे यांनी स्वत:च सत्तेसाठी अशा प्रकारची तडजोड केल्याने मनसेला याचा फायद्या होण्यापेक्षा तोटाच जास्त होण्याची शक्यता आहे.

1 COMMENT

  1. अशीच आघाडी वरील पक्षांनी विधानसभेत करावी आणि या भा ज प गद्दार पक्षाला त्याची जागा दाखवावी . शिवसेनेने शहाणे व्हावे आणि या भा ज प पासून वेळीच वेगळे व्हावे नाही तर येत्या पाच वर्षात शिवसेना संपलेली असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version