Home महाराष्ट्र कोकण मेवा निसर्गसौंदर्याने नटलेले मोचेमाड

निसर्गसौंदर्याने नटलेले मोचेमाड

1

हिरव्यागार वनराईने नटलेल्या पर्वताच्या कुशीत व प्रसिद्ध अरबी सागराच्या किनारी वसलेले एक छोटेसे गाव म्हणजे मोचेमाड.

मोचेमाड – हिरव्यागार वनराईने नटलेल्या पर्वताच्या कुशीत व प्रसिद्ध अरबी सागराच्या किनारी वसलेले एक छोटेसे गाव म्हणजे मोचेमाड. वेंगुर्ले तालुक्यातील पर्यटनसंपन्न गाव म्हणून या गावाची ओळख आहे. येथे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे. येथील लोकसंख्या जवळपास १,०६७ एवढी आहे. निसर्गसौंदर्य आणि शुभ्र समुद्रकिनारा व गावाचे वेगळेपण दाखवून देणारी छोटया खाडीचा शोध घेऊन महाराष्ट्र सरकारने हे गाव पर्यटनस्थळ म्हणून निवडले आहे. गावाला निर्मल ग्राम पुरस्कार, तालुकास्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार व महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाले आहेत.

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला वेंगुर्ले तालुका म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरील स्वर्ग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील अनेक भाग स्वप्नवत वाटणारे आहेत. तेथील रमणीय परिसर मनाला भारावून टाकतो. त्यापैकीच एक गाव म्हणजे मोचेमाड आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या गावाला सुंदर व स्वच्छ अशी २ कि. मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. येथील सूर्यास्ताचे दर्शन म्हणजे समुद्रकिनारपट्टीवरून दिसणारे विलोभनीय दृश्य. संपूर्ण नदी व समुद्रकिनारी मोठमोठी नारळाची झाडे होती. पूर्वी ‘मोठ्ठे माड’ असलेले हे गाव म्हणून या गावाची ओळख होती. कालपरत्वे मोठ्ठे माड या नावाचा अपभ्रंश होऊन ‘मोचेमाड’ हे नाव प्रसिद्ध झाले असावे, असे सांगितले जाते. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार ‘मौजेमाड’ या नावानेसुद्धा हे गाव ओळखले जायचे. नंतर त्याचा मोचेमाड असा उच्चार रूढ झाला असावा, असे म्हटले जात आहे.

एका बाजूस नदी दुस-या बाजूस समुद्र व डोंगरपायथ्याशी वसलेले मोचेमाड गाव. माड बागायती, शेती, मच्छीमारी व वाळू उत्खनन हे या गावातील प्रमुख व्यवसाय होय. या गावात सागरकिनारा, मोचेमाड खाडी व पूल, श्रीदेव गिरोबा मंदिर, श्रीदेवी नवलादेवी मंदिर, श्रीदेव करंडेखोल, खालचे अणसूर येथील श्रीदेव दाडोबा मंदिर, काडोबा डोंगर ही पर्यटनस्थळे आज पाहावयास मिळतात. याचबरोबर येथील शिवरात्रीला होणाऱ्या रथोत्सवामुळे व दशावतारी कलेमुळे वेगळी ओळख या गावाची सर्वदूर पसरली आहे. सर्वप्रथम मामा मोचेमाडकर, नाईक मोचेमाडकर दशावतार नाटय़मंडळ, लक्ष्मण रामचंद्र देविदास मंडळ, पुंडलिक अर्जुन मोचेमाडकर या दशावतारी मंडळांचे कार्यक्रम या गावात बारमाही होत असत. मामा मोचेमाडकर, नाईक मोचेमाडकर दशावतार नाटय़मंडळांनी दशावतारी क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

सुमारे २०० वर्षापूर्वी या गावात एक स्वयंभू लिंग सापडले. ते लिंग गिरोबा देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या देवस्थानाबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. या गावातील एक ब्राह्मण दूधविक्रीचा व्यवसाय करीत असे. त्याच्या गायी चरावयास सोडल्यानंतर मोचेमाड राई येथे जात. त्यातील एक गाय एका विशिष्ट ठिकाणी आपला पान्हा सोडी. त्यावेळी गायीवर पाळत ठेवण्यात आली. आपण खायला घालतो अन् गाय दूध रानात सोडते. या रागाने ब्राह्मणाने गाय पान्हा सोडत असलेल्या ठिकाणी कोयतीने तीन वेळा वार केला असता भळाभळा रक्त वाहू लागले. ते पाहून ब्राह्मण घाबरला व पळाला. पुन्हा तो त्या स्थळी आलाच नाही. यानंतर काही दिवसांनी कर्नाटकातील यल्लमा (रेणुका) देवीचा पुजारी गावडा यांच्या स्वप्नात जाऊन मला जखम झाली आहे. ती भरून काढ, अशी सूचना केली. त्याप्रमाणे गावडा आपल्यासोबत करंडयातून एक देवता पूजेसाठी घेऊन आला. तो मोचेमाड येथे ज्या भागात उतरला तेथे त्याने करंडयातून आणलेल्या देवतेची पूजा केली. ती देवता म्हणजे आजचा ‘करंडेखोल देव’ होय. गावामध्ये नवचैतन्य युवक मंडळाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, रक्तदान, नेत्रदान, श्रमदान शिबिरे, शेतकरी शिबिरे, एकांकिका स्पर्धा असे विविध सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. गावात एकूण सहा बचतगट कार्यरत आहेत. या बचतगटांच्या माध्यमातून महिला विविध प्रकारचे उपक्रम राबवतात. ग्रामपंचायतीने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेंतर्गत कापडी पिशव्या, निर्धूर चुलींचे वाटप गावात केले आहे.

दृष्टिक्षेपात मोचेमाड..

लोकसंख्या – १,०६७
स्थळे – सागरकिनारा, मोचेमाड खाडी व पूल, श्रीदेव गिरोबा मंदिर, श्रीदेवी नवलादेवी मंदिर, श्रीदेव करंडेखोल, खालचे अणसूर येथील श्रीदेव दाडोबा मंदिर, काडोबा डोंगर
वाडया – देऊळवाडी, गाळोकरवाडी, केदारवाडी, तरवाडी, गाबीतवाडी, भंडारवाडी, होळकरवाडी, नाबरवाडी व खालचे अणसूर

1 COMMENT

  1. DHANYAWAAD MADAM,

    sundar konkan.

    maaze aajol VARCHE ANSUR aahe. tyabaddal mala kuthly site la maahiti milel kaay. shivaay maaze gaav aasoli-josoli. tyabaddalahi mala kaahi maahiti milaali tar havi hoti.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version