Home टॉप स्टोरी भूकंपाच्या धक्क्याने भारतात १७ मृत्यू

भूकंपाच्या धक्क्याने भारतात १७ मृत्यू

1

७.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे भारतात सतरा जणांचा मृत्यू झाला आहे.  
नवी दिल्ली – नेपाळला दुस-यांदा बसलेल्या जास्त तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याचे परिणाम पूर्व आणि उत्तर भारतात दिसून आले. ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे भारतात सतरा जणांचा मृत्यू झाला आहे. यात एकटया बिहारमध्ये १६ जण ठार झाले आहेत.

तीन आठवडयात दुस-यांदा बिहारमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत. ३८ ते ३९ जण या भूकंपामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये सर्वाधिक चार, दरभंगा आणि सारनमध्ये प्रत्येकी दोन, सिवान, नावाडा. समस्तिपूर, मुझफ्फरपूर, सितामरी, माधेपूरा, मोतीहारी आणि पूर्णिया जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उत्तरप्रदेशमध्ये एकाचा मृत्यू झाला. भूकंपामुळे भिंत अंगावर कोसळून बहुतांश मृत्यू झाले आहेत.

बिहारची सीमा नेपाळला लागून आहे. त्यामुळे  नेपाळच्या भूकंपाचा सर्वाधिक परिणाम बिहारमध्ये दिसून येतो. २५ एप्रिलच्या नेपाळमधल्या भूकंपाच्या झटक्याने बिहारमध्ये ५८ नागरीकांचा मृत्यू झाला होता. मंगळवारच्या भूकंपाचे दरभंगा, पूर्व चंपारण आणि किसनगंज भागात धक्के जाणवले.

राजधानी पाटण्यासह अनेक भागात नागरीक रस्त्यावर जमा झाले होते. अनेक शाळा तात्काळ रिकामी करण्यात आल्या. दोन आठवडयांपूर्वीच्या नेपाळमधल्या विनाशकारी भूकंपाचा भारतात सर्वाधिक फटका बिहार राज्याला बसला होता. भूकंपामुळे बिहारमध्ये सर्वाधिक जिवीतहानी झाली होती.

या भूकंपाच्या धक्क्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाला (एनडीआरएफ) सज्ज ठेवण्यात आले आहे. गृहमंत्रालय भूकंपामुळे झालेल्या हानीची माहिती घेत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

गृहमंत्र्यांनी नेपाळमधील भारताचे राजदूत रणजीत रे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांच्याकडू तिथल्या परिस्थिती माहिती घेतली आहे. गृहमंत्रालय वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेऊन आवश्यक मदत तात्काळ उपलब्ध करुन देणार आहे.

आसाम

७.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने आसामही हादरले. जवळपास मिनिटभर आसाममध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची कंपने जाणवताच कार्यालय आणि घरातून नागरीक तात्काळ बाहेरच्या मोकळया जागेच्या दिशेने पळाले. जिवीत व वित्तहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.

पश्चिम बंगाल
नेपाळमधल्या भूकंपाचे धक्के पश्चिम बंगालमध्येही जाणवले. भूकंपाच्या धक्क्यानंतर शेकडो नागरीक रस्त्यावर जमले होते. लेक टाऊन, सॉल्ट लेक, डलहौसी आणि पार्क स्ट्रीट भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

चेन्नई

नेपाळमधल्या विनाशकारी भूकंपाचे सौम्य धक्के चेन्नईमध्येही जाणवले. वलसारावक्कम, संथहोम आणि कोडमबक्कम भागात भूकंपाचे धक्के जाणवले. कंपने जाणवताच रहिवाशी आणि कर्मचा-यांनी तात्काळ सुरक्षित स्थळी धाव घेतली. चेन्नईमध्ये कुठेही जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

ओडिसा
ओडिसामध्येही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांनी तात्काळ घराबाहेर पळ काढला. कटक, बालासोर, संबलपूर, बेरहमपूर, खुर्दा, गंजाम, बारीपाडा, केंद्रपाडा या भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

उत्तराखंड
नेपाळमधल्या भूकंपाचे धक्के उत्तराखंडमध्येही जाणवले. डेहराडून, हरिव्दार, नैनितालसह १३ जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले.

1 COMMENT

  1. भरतातील मुल निवाशींची जमीन संपादन करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत.नेपाळचे २ भूकंप हे नरेंद्र मोदींना इशारा आहे.नरेंद्र मोदी शहाणे झाले नाहीत तर ३ रा भूकंप गुजरातला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version