Home रविवार विशेष पंढरीच्या वाटे गैरसोयीचे काटे

पंढरीच्या वाटे गैरसोयीचे काटे

1

आज रविवार. पंढरीच्या वाटेवर चालणा-या हजारो पावलांना आता वेग आलाय. 

आज रविवार. पंढरीच्या वाटेवर चालणा-या हजारो पावलांना आता वेग आलाय. आणखी दोन दिवसांनी वेळापूर जवळ येईल, विठुनामाचा गजर अनावर होईल, तुकोबारायांच्या ‘तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा’ अभंगातील भक्तिभावाचा भावकल्लोळ होईल, पावलांना आलेले फोड, दुखणा-या पोट-या, तळपायाला पडलेले घट्टे या सा-यांचा क्षणात विसर पडेल, थकले-भागले देह काही अनामिक तनमनात संचारल्यागत धावत सुटतील. गेल्या जवळपास १८-१९ दिवसांचा शीण माऊलींची पालखी, दिंडय़ा पंढरपूरच्या शिवारात शिरता क्षणी कुठल्या कुठे नाहीसा झालेला असेल. सावळ्या विठोबाच्या दर्शनाची आस लागलेला हा जनप्रवाह एका अंदाजानुसार यंदा पाच लाखांच्या आसपास आहे. हा जनताजनार्दन गुरुवारी चंद्रभागेतीरी वाळवंटात विसावेल.

बरोब्बर सात दिवसांपूर्वी गेल्या रविवारी भावभक्तीचा हाच आवेग जेजुरी-वाल्हे-लोणंद या वारीच्या टप्प्यात जनांचो प्रवाहो घेऊन अंगावर आला होता. शेकडो नव्हे हजारो पावलं. टाळमृदंगाच्या नादात, अभंगांच्या थाटात अथक चालणारी. कॅमे-याला कितीही क्षमतेच्या मोठय़ा लेन्स लावल्या तरी फ्रेममध्ये मावणार नाहीत इतकी पावलं आणि तल्लीन मनं. कुणाच्या पायात प्लॅस्टिकच्या चपला तर, कुणी स्लीपर घालून, काही काही तर अक्षरश: अनवाणी. पोशाखही जसे जमतील तसे. शुभ्रतेच्या मळखाऊ छटा. आमच्यासारखे शहरी संडे वारकरी जरा बरे शूज वगैरे घालून बाजूबाजूने. भक्तीची, श्रद्धेची श्रीमंती ल्यायलेल्या त्या गोरगरिबांना धक्का लागू नये म्हणून बिचकतच चालत होते. ‘नायके’, ‘अदिदास’चे शूज घातलेली मंडळी सकाळीच चेह-यावर हास्याचे कमळ फुलवून, फोटोबिटो काढून गायब झाली होती. संध्याकाळच्या आत त्यांचे फोटो फेसबुकवर झळकलेही होते, वर्तमानपत्रांच्या कार्यालयात पोहोचलेही होते.

ऊनपाऊस डोक्यावर घेत चालणा-या पावलांना, मुक्कामाच्या ठिकाणी मिळेल तिथे उघडय़ावरच दोन घास खाणा-या, भर उन्हातही कपाळावर आडवा हात घेऊन निवांत दोन क्षण आडवं होणा-या वारक-य़ांना सारे कष्ट झेलण्याची जी सिद्धी प्राप्त झाली आहे त्यापुढे अशा प्रसिद्धीची काय पत्रास हो! सरकारी कृपेने वारीची सोबत करणा-या टँकरमधील विचित्र चवीचे पाणी विनातक्रार पोटात ढकलणा-या वारक-यांचा पांडुरंगच खरा पाठीराखा म्हणावा लागेल.

वारीचा महामार्ग प्रशस्त झाला आहे पण, या महामार्गाच्या दुतर्फा अडचणी आणि गैरसोयींचे टोलनाके तसेच राहिले आहेत. जेजुरीचेच उदाहरण घ्या. पालखी वाल्हे मार्गाकडे लागल्याच्या सकाळी आम्ही गड जेजुरी चढत होतो. गड उन्हात चमकत होता, अजित पवार यांच्या हस्ते येथील सोयीसुविधांचा शुभारंभ झाल्याची पाटीही चमकत होती. चार पावले पुढे सरकल्यावर हागणदरीचा जो वास नाकात घुसला तो जाता जाईना. गडाकडे जायला ना पक्की सडक ना अन्य सुविधा. जेजुरीच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी गेला कुठे? पण सहनशील वारकरी, येणारे भाविक मंदिर गाठतात, सदानंदाचा येळकोट करतात, भंडारा उधळतात आणि वाटेला लागतात. नाकात घुसलेला तो वास जायला मात्र बरीच वाट सरावी लागते.

वारकरी तक्रार करत नाहीत, वारकरी दंगामस्ती, दंगल, आंदोलने करत नाहीत म्हणून वारीबरोबर पोलिस बंदोबस्त नाही. बरोबर आहे, एका लायनीत, शिस्तीत दिंडय़ा-पताका घेऊन चाललेल्या वैष्णवभक्तांच्या मांदियाळीला नियंत्रणात ठेवण्याची गरज काय? पण याचा अर्थ पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करू नये, वारीच्या मार्गात येणारे वाहतुकीचे वा इतर अडथळेही दूर करू नयेत असा नाही. मात्र पोलिसांची उपस्थिती अभावानेच जाणवते. जाणवते तीही शहर सीमेवर वा कुणी व्हीआयपी वारीत चालण्याचे नाटक करणार असतील तेव्हा.

वारकरी दिवसभर चालतात, त्यांनाही नैसर्गिक विधींसाठी आडोशाची गरज असते, विश्रांतीसाठी पक्क्या निवा-यांची गरज असते. त्यांच्या विसाव्याचा प्रश्न दिंडीचालकांवर सोपवून आणि नैसर्गिक विधींसाठी त्यांना निसर्गाच्या भरवशावर सोडून दिले जाते. हे कितपत योग्य आहे? वारीसाठी, सोयीसुविधांसाठी योजना, निधी जाहीर होतात, दरवर्षी पंढरपूर विकासाच्या घोषणा होतात, हे सारे जाते कुठे? निधी मंजूर होतो. पण लोणंदच्या मार्केट यार्डमध्ये दिंडय़ा विसावतात, तेव्हा रस्त्याला लाइट नसतात, रस्ताही धड नसतो आणि शेडही अंधारातच असतात. वारक-यांनी या गैरसोयी का आणि आणखी किती वर्षे निमुटपणे सहन कराव्यात याचे उत्तर कोण देणार?

आपल्या परीने संबंधित यंत्रणा करत असतात पण, लाखो वारक-यांची सोय लावायला यंत्रणा अपुरी पडणारच, इतक्यांची सोय कशी लावता येणार?, असे म्हणणेही योग्य आहे. पण वारीत सहभागी झालेले हजारो वारकरी दररोज राहुट्यांमध्ये झोपतात, दरवर्षीची ही ठरलेली ठिकाणे आहेत. या ठिकाणी काहीशे जणांना तरी पक्का निवारा देता येऊ शकतो, शौचासाठी माळरानावर शेपाचशे मातीचे चर खोदून ठेवता येऊ शकतात, चांगले पाणी मिळेल याची काही तरी व्यवस्था करता येऊ शकते. वारक-यांनी अस्वच्छता केली म्हणून नंतर नाके मुरडणारे अनेक असतात. हे होऊ नये यासाठी सरकारमधील कर्त्यांधर्त्यांनी काही अंशी तरी नोकरशाही, जिल्हा पातळीवरील यंत्रणा हलवावी इतकीच अपेक्षा आहे. पांडुरंगाकडेही काही न मागणा-या वारक-यांसाठी, पंढरीच्या वाटेवरील गैरसोयीचे काटे सरकारी यंत्रणेने दूर करावेत. भाबडय़ा वारक-यांसाठी इतुके करायला काय हरकत आहे.!

1 COMMENT

  1. अप्रतीम… वारक-यांसाठी किमान सोयी-सुविधा उपलब्ध करून द्यायलाच हव्यात. सोहळ्यासोबत चार पावले चालून त्यांनी बोलून न दाखविलेल्या व्यथा मांडल्याबद्दल अभिनंदन… संजीव ओक http://www.raajmat.wordpress.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version