Home एक्सक्लूसीव्ह पचापच थुंकाल तर पकडले जाल!

पचापच थुंकाल तर पकडले जाल!

1

मुंबईत अस्वच्छता करणा-यांवर दंडात्मक कारवाईसाठी राबवण्यात येणारी ‘क्लीन अप’ मार्शल योजना गेल्या दोन वर्षापासून बंद करण्यात आल्यानंतर पुन्हा सुरू केली जात आहे.

संग्रहीत छायाचित्र

मुंबई- मुंबईत अस्वच्छता करणा-यांवर दंडात्मक कारवाईसाठी राबवण्यात येणारी ‘क्लीन अप’ मार्शल योजना गेल्या दोन वर्षापासून बंद करण्यात आल्यानंतर पुन्हा सुरू केली जात आहे. यासाठी खासगी सुरक्षा कंपन्यांच्या माध्यमातून ‘क्लीन अप’ मार्शल मुंबईतील प्रत्येक वॉर्डामध्ये तैनात करण्यात येणार आहेत. मुंबईतील ७७८ ठिकाणी आता ‘क्लीन अप’ मार्शलची करडी नजर राहणार आहे. त्यामुळे मुंबईत आता कुठेही थुंकताना आणि कचरा फेकताना किंवा अस्वच्छता करताना आजूबाजूला जरा पाहा, नाही तर नियुक्त केलेले ‘क्लीन अप’ मार्शल तुम्हाला पकडून तुमच्याकडून दंड वसूल करणार आहे.

मुंबई स्वच्छ राखण्यासाठी महापालिका ‘क्लीन अप’ मार्शल योजना सुरू करत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, मलमूत्र विसर्जित करणे आदींवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेने २००६मध्ये उपविधी तयार करून ‘क्लिन अप’ मार्शल तैनात केले होते. त्यानंतर वेळोवेळी मुदतवाढ देऊन १९ संस्थांच्या माध्यमातून ही योजना जून २०१४ पर्यंत सुरू होती. परंतु त्यानंतर ही योजना बंद होती.

पण आता स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छ राखण्यासाठी पुन्हा मुंबईतील २४ विभागांमध्ये ७७८ ठिकाणी ही खासगी संस्थांच्या माध्यमातून ‘क्लिन अप’ मार्शल योजना राबवण्यात येत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त विजय बालमवार यांनी स्पष्ट केले.

कुठे तैनात करण्यात येणार क्लिनअप मार्शल

मार्केट, रेल्वे परिसर, वर्दळीचे रस्ते, समुद्र किनारे, महत्त्वाची व्यावसायिक संकुले तथा औद्योगिक संकुले, फेरीवाले विभाग आदी प्रभागातील वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणीच क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात येत आहे.

नियुक्त केलेल्या क्षेत्रापुरतेच क्लिनअप मार्शलांना दंड आकारण्याचे अधिकार असतील,असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रहार कौल-

[poll id=”1345″]

या कृत्यासाठी आकारणार दंड

कचरा इतरत्र टाकणे, थुंकणे, मलमुत्र विसर्जित करणे, रस्त्यांवर जनावरांना खाऊ घालणे, वाहन धुणे, वैयक्तिक व मोठय़ा निर्मात्याने केलेल्या कच-याचे वर्गीकरण न करणे, इत्यादी नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई क्लीनअप मार्शलकडून होणार आहे.

1 COMMENT

  1. स्वच्छ भारत अभियान स्वप्न पूर्ण करायचे असेल तर क्लीन अप मार्शल राबविणे गरजेचे आहे. तसेच एखादी व्यक्ती कचरा टाकताना आढळली तर त्याला दंड आकारून सदर व्यक्तीस किमान आठ दिवस त्या रस्त्यावरचा कचरा काढण्याची शिक्षा करावी तर स्वच्छ भारत अभियान स्वप्न पूर्ण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version