Home संपादकीय तात्पर्य पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

1

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष केंद्रातील भाजपा सरकारने ‘समरसता’ वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने संघ व त्याला संलग्न संस्था कामाला लागल्या आहेत. म्हणूनच की काय, गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रांत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करणा-या जाहिरातींचा रतीब लावला जात आहे. अशा या कल्लोळात डॉ. आंबेडकर यांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक किंबहुना विविध क्षेत्रांतील कार्य तसे लांबच राहिले आहे. दलितांचे उद्धारक, भारतीय घटनेचे शिल्पकार इतपतच डॉ. आंबेडकर यांचे कार्य होते, असाही काहींचा समज आहे. पण गेल्या काही वर्षापासून डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वातला दुर्लक्षित पैलू आता अभ्यासकांमुळे पुढे येत आहे, तो आहे, ‘पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचा!

डॉ. आंबेडकर यांचा जन्म १८९१ चा आणि त्यांचे महानिर्वाण १९५६ चे! ६५ वर्षाचे आयुष्य बाबासाहेबांना लाभले. डॉ. आंबेडकर यांनी २० जुलै १९२४ रोजी ‘बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापना करून भारतीय समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. या पूर्वीचा कालखंड बाबासाहेबांच्या विद्यार्थीदशेचा होता. डॉ. आंबेडकर यांचा पत्रकारितेचा प्रवास ‘मूकनायक’पासून सुरू झाला. नंतर बहिष्कृत भारत, जनता(समतासुद्धा) व प्रबुद्ध भारतपर्यंत तो सुरूच राहिला. आंबेडकर यांच्या पूर्वी दलितांचा कैवार घेणारी विटाळ विध्वंसक (१८८८), सोमवंशीय मित्र (१९०९) अशी नियतकालिके, पाक्षिके होती. पण बाबासाहेब यांनाही सामाजिक-राजकीय ध्येयवादासाठी हातात पत्र असावे, असे वाटत होते. त्यामुळेच ३१ जानेवारी १९२० रोजी त्यांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक सुरू केले होते. पण त्याचे सातत्य त्यांना टिकवता आले नाही. या अंकातच, ‘अस्पृश्यांवर होणा-या अन्यायावर उपाय सुचविण्यासाठी व अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी वर्तमानपत्रासारखी भूमी नाही’ अशी भू्मिका मांडली. त्यानंतर ३ एप्रिल १९२७ रोजी ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक काढले. हे पाक्षिक चालवताना त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर १५ नोव्हेंबर १९२९ रोजी हे पाक्षिक बंद करण्यात आले. दोन वर्षात या पाक्षिकाचे एकूण ३४ अंक प्रकाशित झाले. ‘बहिष्कृत भारत’मधून डॉ. आंबेडकर यांनी १४५ स्फुटलेख व ३३ अग्रलेख लिहिले. ही सर्वच लेखनसंपदा मराठी भाषेचे भूषण आहे. पत्रकार डॉ. आंबेडकर यांची पत्रकार म्हणून ओळख निर्माण करण्यास ‘बहिष्कृत भारत’ची भूमिका महत्त्वाची आहे. तशीच श्रेष्ठकोटीचा निबंधकार, भाष्यकार, तत्त्वचिंतक, मानवतावादी विचारवंत, द्रष्टा असे अनेक पैलू त्यांच्या या पाक्षिकातील लिखाणातून अधोरेखित होत जातात. एका माणसाच्या ठायी आर्थिक, सामाजिक, राजकीय, पाश्चिमात्य तत्त्वज्ञान यांना कवेत घेणारा आवाका होता. असे असतानाच जातीयवादाविषयी चीड होती. तत्कालीन पांढरपेशांची वृत्तपत्रे त्यांच्याच समांतर चालणा-या दलित वृत्तपत्रसृष्टीची दखल घेत नाहीत. किंबहुना दलितांविषयींचे विषय या वृत्तपत्रांत वज्र्य असतात. हे ओळखूनच आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत भारत’ यातून आपल्या आवेशी, सत्यान्वेषी मांडणीतून दलितांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचे काम नेटाने केलेले आहे. आंबेडकर यांचे शिक्षण इंग्रजीतून झाले. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. आयुष्यातील उमेदीचे वर्षे शिक्षणासाठी परदेशात घालवण्यामुळे त्यांचा मराठीशी तितकासा संबंध नव्हता, पण दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी पत्रव्यवसायाची कास धरली. त्यांची मराठी ही साजूक तुपातली नव्हती, पण मांडणीतील आग्रहीपणा, युक्तिवाद, ओजस्वीपणा वाखाणण्याजोगा होता. ज्यांच्यासाठी हे पत्र चालवण्यात येत आहे. त्यांना ती भाषा कळावी यासाठी ते सुबोध पद्धतीने विचार मांडण्याचा प्रयत्न करतात. ‘बहिष्कृत भारत’सह त्यांचे अन्य पाक्षिकांतील अग्रलेख वाचल्यास याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीला ख-या अर्थाने प्रारंभ झाला तो महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनातून. मानवमुक्ती, समानतेसाठी लढविल्या गेलेल्या या आंदोलनात आपल्या पक्षाची बाजू अधिक ठामपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी ‘बहिष्कृत भारत’मधून केला आहे. हे आंदोलन झाल्यानंतर ‘भाला’कार भोपटकर, माटे यांनी आंदोलनाच्या विरोधात विखारी पद्धतीचे लिखाण केले. त्याला आंबेडकरांनी संयमाने उत्तर दिले आहे. विरोधी पक्षाच्या मंडळींची मते खोडण्यासाठी त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ मधून केलेला युक्तिवाद उच्चप्रतीचा आहे. आपला समतेसाठीचा लढा किती योग्य आहे, हे मांडताना त्यांनी अतिशय संयत भू्मिका घेतली होती. ‘बहिष्कृत भारत’मधील त्यांचे लेख, स्फुटलेख हे तत्त्वचिंतनाची डूब असणारे, नवा विचार मांडणारे, मानवतेचा पुरस्कार करणारे, स्त्री-पुरुष भेदापलीकडे समानतेच्या दृष्टीने पाहण्यासाठी उद्युक्त करतात. रोटी, बेटी आणि लोटीबंदी यांच्या तटबंद्या तुटल्याशिवाय समानता अशक्य आहे, असा प्रागतिक विचारही ते मांडतात. डॉ. आंबेडकर यांचा पत्रकार हा पैलू आताशा बाहेर येत आहे. या पैलूंवर विविध कोनांतून लिखाण झाल्यास आंबेडकर यांच्यातील सव्यासाची पत्रकार अधिक झळाळून उठेल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version